विश्व मराठी साहित्य संमेलनांची मांदियाळी सुरू झाल्यापासून केसरकरांच्या अंगात जे संमेलनाचे वारे शिरले ते अद्याप निघून गेलेले नाही. एकदा मी त्यांना गुपचूप भेटून, तुम्ही अखिल विश्व भाजप संमेलन का आयोजित करत नाही असा खडा टाकला आणि क्षणार्धात त्यांनी फडणवीसांमार्फत दिल्लीत अमित शहांशी संपर्क साधून आपण आठ दिवसांत हे संमेलन धुमधडाक्यात साजरे करू असा शब्द दिला. ताबडतोब फडणवीस कामाला लागले. त्यांनी भाजपच्या कोअर समितीची बैठक घेऊन आज या संमेलनाची का आवश्यकता आहे हे त्यांना जास्त बोअर न करता पटवून दिले. गौहाती आपला लकी स्पॉट असल्यामुळे संमेलनस्थळ म्हणून एकमताने त्याला मान्यता देण्यात आली. संमेलनाध्यक्ष म्हणून मोहन भागवत यांची निवड झाली आणि संमेलनाचा दिवस कधी येऊन ठेपला ते कळलेही नाही.
माझा मानलेला परममित्र पोक्या याच्याकडे संपर्क आणि खानपान व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. संमेलनाला अर्थातच पंतप्रधान मोदी व अमित शहा प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार होते. भव्य मंडपात व्यासपीठावर पार्श्वभागी कमळाची मोठी प्रतिमा आणि अनेकांचे फोटो लावण्यात आले होते. त्या सर्वात नथुराम गोडसेचा फोटो उठून दिसत होता. विश्वभरातून भाजपचे चाहते संमेलनाला हजर झाले. सकाळी दहा वाजता प्रमुख नेते आल्यावर ‘भाजप पक्ष म्हणून महान, ती विश्वाची शान’ या स्वागतगीताने टाळ्यांच्या कडकडाटात संमेलनाला सुरुवात झाली.
निवेदिका अमृता फडणवीस यांनी नमो नम: म्हणत माईकवरून निवेदनास प्रारंभ केला- उपस्थित सर्व भाजपप्रेमींचे स्वागत. भाजप हा पक्ष विश्वपातळीवर कसा जाईल याबाबत या संमेलनात वक्ते आपले मौलिक विचार मांडतील. मी स्वागताध्यक्ष दीपक केसरकर यांना विचार मांडण्यासाठी पाचारण करते.
-मुळात भाजपसोबत आल्यापासून ही कल्पना माझ्या डोक्यात होती. भविष्यात कालकुपी पुरताना माझ्या नावाची नोंद असली पाहिजे, म्हणून मी हे गुपित उघड केले. मला जास्त काही बोलायचे नाही. आता मीच लावलेल्या क्रमवारीनुसार पंतप्रधान मोदीजी हे आपले विचार मांडतील. जय हिंद, जय विश्व भारत.
– भाईयों और बहनों, सबको प्रणाम। ये विश्व भाजप संमेलन आयोजित और प्रायोजित करनेवालों के प्रति मैं कृतज्ञता व्यक्त करता हूं। आज विश्वभर में भाजप जैसी पार्टी की आवश्यकता है। भारत के सभी क्षेत्र में हो रहा विकास पूरा जग देख रहा है। कल अमरिका के प्रेसिडेंट का फोन आया था। वो बोले, अमरिका ने भौतिक प्रगती की है, लेकिन तुम्हारे भारत की प्रगती उसकी संस्कृती में है। तुम्हारी अर्थव्यवस्था घाटे में होगी, बहोत लोग गरीब होंगे, लेकिन तुम्हारे देश का आत्मबल मजबूत है। इसलिए इंडिया के प्रति हमें आदर है। विदेश में भाजप के प्रति प्रेम है। एक ना एक दिन काम्पुचिया छोडकर सब देशों में भाजप की सत्ता होगी। ये सपना नहीं, सच है, सच होगा। जय हिंद, जय भारत, नमस्ते। अब अमितजी का नंबर है।
– मेरे प्यारे भाजपप्रेमीयों, अगले कई बरस के बाद विश्व में सिर्फ भाजप का राज होगा। हम सब इसके लिए कोशिश करेंगे। सभी राष्ट्रप्रमुखों के साथ हम अच्छे संबंध रखके बाद में उनकी पीठ में भाजप स्टाईल से क्या घुसा देंगे ये तो आपको मालूम है। ‘फोडो और अपने साथ जोडो’ यही हमारा मूलमंत्र है। दाढीवाले को हमने वैâसा हिप्नोटाईज किया ये आपको मालूम है। यही तरीका हम विश्वभर में अपनाएंगे। जय विश्व भारत। अब रामदेव बाबा मार्गदर्शन करेंगे।
– उपस्थित स्त्री-पुरुष सज्जनों। भाजप सार्या विश्वात हातपाय पसरणार आहे ही माझ्याही दृष्टीने चांगली गोष्ट आहे. माझ्या कंपनीची प्रॉडक्ट आतापासूनच जगभर जात आहेत. विश्वात भाजपची सत्ता आल्यावर बाजारपेठेत माझ्या उत्पादनांमध्ये शंभरपट वाढ होईल. वैश्विक पातळीवरील स्त्री-पुरुषांचे योग अभ्यासवर्ग मी मोदींमार्फत आतापासून आयोजित करण्यास सांगतो. आपणा सर्वांना जगातील महिलांचा उद्धार करायचा आहे. त्यासाठी विश्वभाजप ही संकल्पना चांगली आहे. त्यासाठी मी एका पायावर जगात कुठेही दौरे करायला तयार आहे. जय भाजप, जय हिंद, जय योगम। आता चित्राताई वाघ बोलतील.
– सर्वांना प्रणाम. विश्वभाजप या स्वप्नाला माझा आणि आपल्या सर्व बंडखोर महिलांचा पाठिंबा आहे. उद्या जगात भाजप पसरल्याबरोबर जगभरच्या महिलांवरील अत्याचार, बलात्कार, अन्याय, शोषण बंद होईल याची मला खात्री आहे. मोदीजी मला विश्वभाजप महिला संघाची प्रमुख करतील याचीही मला खात्री आहे. कारण महिलांवर कुठेही अन्याय झालेला दिसला की माझे पित्त किती खवळते हे तुम्ही पाहिले आहे. आता आपले ईडीफेम नेते किरीट सोमय्या बोलतील.
– जय मोदीजी, अमित शहाजी. ‘विश्वभाजप’ ही आयडियाच भल्याभल्यांना धडकी भरवणारी आहे. जागतिक पातळीवरील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मी ईडीची आयडियाची कल्पना मग जगभर राबवीन. जो नेता भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार देईल, त्याला ईडी लावून तुरुंगाची हवा खाण्याची शिडी लावण्यात येईल. माझी खरी पॉवर मी जागतिक पातळीवर दाखवीन. फक्त मोदी आणि अमितसाहेबांनी मला लष्करी टाईपचा गणवेष द्यावा. एक रायफल, मशीनगन, पिस्तुल द्यावे. मी जागतिक भ्रष्टाचाराची मूळव्याध मुळासकट उपटून टाकीन. आता आदरणीय फडणवीसजी बोलतील.
– जय विश्वभाजप. ही कल्पनाच मुळात चित्तथरारक आहे. ही बातमी व्हायरल झाली तर जगात खळबळ उडेल आणि जगातील लोक मोठ्या आशेने भाजपकडे डोळे लावून बसतील. आता अध्यक्षीय भाषण सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत करतील.
– नमो नम: मला अध्यक्ष म्हणून बोलण्यास काही शिल्लकच ठेवलेले नाही. मी एवढेच सांगेन की या वैश्विक भाजपला संघाचे पूर्ण पाठबळ असेल. संघाच्या शाखा जगभरात प्रत्येक देशातील प्रत्येक प्रांतात, गल्लीबोळात स्थापन करणे हे माझे कर्तव्य राहील. एवढेच सांगतो. जय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जय भाजप. नमस्ते. आता सूत्रसंचालक सूत्रे हाती घेतील.
– सर्वांना धन्यवाद. आपले संमेलन चांगले झाले. आता सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. जय विश्वभाजप.