□ उत्तराखंडातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ जोशी मठ खचण्याच्या स्थितीत! आसपासची बांधकामे आणि जलविद्युत प्रकल्पामुळे मोठ्या भेगा पडून घरे खचली, मंदिर कोसळले.
■ भोगा बेबंद विकासाची फळे! संपूर्ण हिमालयाच्या संवेदनशील क्षेत्रांत असाच झटपट विकास सुरू आहे… जोशी मठ तो झाँकी है…
□ भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारचा विरोध न जुमानता बिहारमध्ये जातनिहाय जनगणना.
■ धर्म जागा केला की जाती जाग्या होणारच. आधी अमुकमुक्त भारत, तमुकमुक्त भारतच्या डिंग्या मारणार्यांनी जातिमुक्त धर्माच्या दिशेने वाटचाल करायला हवी.
□ पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी देशाला माओवादमुक्त करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
■ २०२२मध्ये बुलेट ट्रेन धावणार होती, त्यातलाच हा प्रकार ना? अमुकमुक्त, तमुकमुक्त करून फक्त भाजपयुक्त देश करण्याच्या विकृत लालसेतून तुम्ही कधी मुक्त होणार ते सांगा.
□ कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करणार : मुख्यमंत्री बोम्मई यांचे संकेत.
■ अरेरे, म्हणजे बेळगावात एवढं वातावरण तापवून पण राज्यात काँग्रेसच्याच बाजूने वातावरण आहे तर.
□ नोटांच्या थप्पीवर बसून फोटो काढून घेतलेला गुंड सँट्रो रवी याची चौकशी करण्याचे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश.
■ अहो, तुमच्या मंत्र्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेला गुंड आहे तो. काही खोके तर त्यालाही मिळाले असणारच ना!
□ रेसकोर्स मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर हलवले जाणार; रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभे राहणार.
■ म्हणजे एक चिंटुकले थीम पार्क बनवून बाकीची जागा दोन मालकांच्या घशात घालणार!
□ पुणे शहर पोलीस दलात शिपाई बनण्यासाठी एमबीए, एमसीए, बीएचएमएस, बीएएमएस, बी फार्म अशा उच्च पदव्या घेतलेल्यांचे अर्ज.
■ आणि तिकडे देशाचे गृहमंत्री बिनधास्त फेका मारतायत की मोदींच्या सरकारने तरुणांना काम दिल्यामुळे माओवाद्यांचे कंबरडे मोडले!
□ नागपुरात इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये हळदीकुंकू, रांगोळ्या.
■ आता पुढच्या वेळी एक वडाचं झाड उभारून त्याच्याभोवती फेर्याही मारा आणि मंगळागौर करून फुगड्याही खेळा… त्यातलं विज्ञान सांगायला व्हॉट्सअपवरचे बिनपगारी, फुल अधिकारी छद्मवैज्ञानिक आहेतच तयार!
□ आता परदेशी विद्यापीठांना देशात मुक्तद्वार.
■ देशातल्या विद्यापीठांचा किचकट कायदे करून गळा घोटणार, परदेशी विद्यापीठांसाठी पायघड्या घालणार, अजब अडाणी सरकार!
□ सीबीएसई शाळांसाठी बनावट ना हरकत दाखले देणारी राज्यव्यापी टोळी उघड, अनेक शाळा बेकायदा.
■ फ्लॅट घेतला तर बिल्डिंग कायदेशीर असेलच, याची खात्री नाही; मुलांना शाळेत टाकले तर शाळा बनावट निघण्याचा धोका; और कितना विकास चाहिए आपको?
□ शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे कोणीतरी म्हणाले, तेव्हापासून मी संसदेत जायला घाबरतो : शरद पवार यांची मिष्कील टिप्पणी.
■ पवारसाहेब, घाबरू नका. त्यांनी बालपणी जे जे काही केले (असे वेळोवेळी सांगितले), त्यातील संबंधित व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांचा एक स्वतंत्र पक्ष स्थापन करता येईल, इतकी यादी मोठी आहे!
□ मालपाणी दिल्याशिवाय कोणतीही फाईलच हलत नाही : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
■ मालपाणी वरपर्यंत पोहोचते असे अधिकारी सांगतात गडकरी साहेब! मग फाईल हलेल कशी? बाकी भ्रष्टाचारमुक्त भारताचा फुगा फोडल्याबद्दल अभिनंदन!
□ मंत्रिमंडळ विस्तारावरून मिंधे गटात खदखद; ठाण्यात मिंधे गटाच्या बोलबच्चनला भाजपचे शाब्दिक तडाखे.
■ कागदाची बोट कधीतरी बुडणारच; मग उंदीर इकडून तिकडे उड्या मारतील… बच्चे लोग, दिल थाम के बैठो!
□ पुढच्या वर्षी एक जानेवारीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहील : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
■ मंदिरांच्या उभारणीच्या तारखा सांगणं हे तुमचं काम आहे काय? इतक्या संवेदनशील पदावर दुसर्या कुणाला तरी बसवा आणि तुम्ही विरोधी पक्ष फोडणे, मंदिरांमध्ये घंटा वाजवणे वगैरे पूर्णवेळ कामे करा की!