नवे वर्ष सुरू झाले, व्हॉट्सअॅपवर ढिगाने येणार्या नववर्ष संदेशांमुळे तर ते अधिकच प्रकर्षाने जाणवले. कधी नव्हे तो मुंबईच्या हवेत सुखद गारवा आलाय, म्हणजे घाम कमी; पण नव्या वर्षाच्या योजना संकल्प आखणारे रगड वाढले आहेत.
सकाळ किंवा पहाट, यांचे माझ्याशी विद्यार्थीजीवनापासून कमाल वाकडे. एकतर मुंबईत कोवळी उन्हे, पक्ष्यांची किलबिल असले काहीही नसते. परत सकाळी सकाळी मरून खपून तयार होऊन शाळा नामक छळवादाला सामोरे जायचे, त्यातही पहिला तास शारीरिक शिक्षणाचा आणि दुसरा गणिताचा. म्हणजे होणार्या त्रासाची कल्पना करू शकता… किंवा नका करू; कारण तुम्ही सकाळ पक्षी (अर्ली बर्डचे भाषांतर) आणि अठरा नव्वे किती याचे उत्तर लीलया देऊ शकणारे स्कॉलर इष्टुडंट असू शकता… हमारे दुख की कीमत तुम क्या जानो अभ्यासू बाबू!!
माझी प्रवृत्ती जन्मापासूनच बैठी. व्यायामशाळा किंवा जिम बिमसमोरून ‘मनोजव्या मारूत्तुल्या वेगम’ म्हणून निघून जाणे हे माझे वैशिष्ट्य.
आता नवे वर्ष आले की नव्या वर्षात व्यायाम संकल्प करणारे हौशी झुंडीने बाहेर पडतात, एरव्ही निवृत्त माणसांनी भरलेले रस्ते अगदी पहाटेपासून फुलून जातात. घराच्या समोर वॉकिंग ट्रॅक असल्याने हे दृश्य परिचयाचे.
आता या गर्दीत नवखे परफेक्ट ओळखता येतात. नवे शूज, नवे ट्रॅक सूट आणि हातावर ते ‘तुम्ही किती आळशी आहात हे ठणठणीत सांगून पाळत ठेवणारे’ फॅन्सी घड्याळ म्हणजे स्मार्टवॉच. तोंडात भाषा काय, तर आज इतकी पावले चाललो, काल कमी होती, हार्ट रेट इतका हवा, तो अमुक आहे, चार ग्रॅम वजन वाढले अगं, नो कार्ब अगदी स्ट्रिक्टपणे पाहायला हवे गं!!!
आता यांचा कळप जोपर्यंत त्यांच्या त्यांच्यापुरता असतो तोपर्यंत ठीक, पण यांची वक्रदृष्टी माझ्यासारख्या, मंदगती, जडशरीरी लोकांकडे वळली की नको जीव होतो. आता तू अमुक कर, तमुक खा, इतके चाल, या सूचना चालू. बरे आविर्भाव असा की मला आताच हार्ट अटॅक येणार आहे आणि हॉस्पिटलचे बिल यांना भरायचे आहे. व्यायामात खरोखरचे मुरलेले लोक असले काही करत नाहीत. ते त्यांचे चालतात, पाचेकशे लिटर घाम गाळतात आणि चूप घरी निघून जातात. हे नवे प्राणी मात्र उच्छाद मांडतात.
अरे बाबांनो, तुम्हाला काय व्यायाम-कसरत करायचीय ती करा, पण हे फुकटचे आरोग्य सल्ले थांबवा यार. शाळेतले पीटी शिक्षक परवडले, पण हे हेल्थ फ्रीक नकोत (याला काही मराठी नाव सुचवा प्लीज. आरोग्यवेडे असं म्हणणं बरोबर वाटत नाही). परत हे लोक्स सल्ले देऊन थांबतील तर शप्पथ… यांच्यासारखे आणखी कोणी भेटले की यांची विशिष्ट भाषा सुरू होते, ते लंजेस, लोअर बॉडी व्यायाम, पिलात्ते (याचा बरोबर उच्चार काय हो?), एक्स्ट्रीम व्यायाम, हाय डेसिटी, जमिनीवरील व्यायाम, हार्ट बीट, कॅलरी… नासामधील वैज्ञानिक पण सोप्पे बोलत असतील नक्की (हल्ली ते संस्कृतमध्ये बोलतात म्हणे- म्हणजे पुन्हा अवघडच). परत हे जर विंग्रजी भाषेत असेल तर माझ्यासारख्या लोकांच्या डोक्यावरून जाणार पक्के.
मुळात एखादा/दी व्यक्ती स्वस्थ, काहीही न करता बसली असेल तर त्याच्या/तिच्यामागे काहीतरी कर, म्हणून भुंगा लावणार्या लोकांची नक्की मानसिकता काय? मला फक्त खाणे आणि झोपणे या गोष्टीत रस आहे असे सांगितले किंवा मला भजी प्रचंड आवडतात किंवा व्हिस्की मस्त असे म्हणायची खोटी, आपण काही महाभयंकर पाप केलेय असे कटाक्ष टाकून सल्ले सुरू.
वेळेचा सदुपयोग कर म्हणणारे पण याच वर्गात. नक्की काय करू? नवी कला शीक… कधी शिकू? लोकलगर्दीतून घर गाठता गाठता रात्र होते, जेवून हात धुता धुता मध्यरात्र, मग नवे कधी शिकणार? आणि मुळात का? इथे मुंबईत अर्धमेला होऊन माणूस घरी येतो आणि तुम्ही सांगता, जिममधे जा किंवा सतारबितार वाद्य शीक… मग कितीही अहिंसक माणूस असला तरी असे सांगणार्याच्या कानाखाली वाद्यमेळ काढावा वाटतोच ना! यांची वाईट नजर असते ती हक्काच्या रविवारवर… या दिवशी मटण-कोंबडी-मासे आणणे आणि त्यावर ताव मारणे याव्यतिरिक्त आपल्याला काहीएक मंजूर नाही. विषय कट.
सतत काहीतरी स्फूर्तिदायक संदेश देण्याचीही हौस अनेकांना असते. जणू आमचे आयुष्य निरर्थक दिशाहीन असून देवाने यांच्या हाती त्याचे सुकाणू दिलेत. आमचा उद्धार करायला अवतरला अवतार (आयला मीटरमध्ये बसले की)! जीवनाकडे सकारात्मकतेने बघा, ही यांच्या लेक्चरची सुरुवात. इथे इंधन महाग झालेय, कर्जाचे हप्ते थकलेत, अगदी मासळीबाजारातील बांगडे आणि मांदेलीसारखे चीपाट मासे पण परवडत नाहीयेत. त्यात आयुष्याकडे काय डोंबल सकारात्मक बघणार, भावा?
पण हे सांगायची सोय नाही, की सुरू… अरे पेट्रोल महाग झाले म्हणजे तू पायी चालशील, मग आरोग्य सुधारेल, कर्ज आहे मग वायफळ खर्च बंद होतील, ही पुस्ती सुरू.
एकवेळ ते व्यायामवेडे परवडले, पण हे पॉझिटिव्ह लोक्स नकोत.
माझ्या परिचयाचा एक माणूस (याला खरं तर इसम म्हणायला हवे), भल्या पहाटे पाचच्या सुमारास काहीतरी पॉझिटिव्ह म्यासेज व्हॉट्सअपावर ढकलतो. मग सूर्य उगवू लागला की गॅलरीत जाऊन, हे उगवत्या सूर्या तुला धन्यवाद, हे वार्या थँक यू, असे मोठमोठ्याने कोकलत राहतो. त्याला जोड खालून चालणार्या व्यायामवेड्याची… ते पण हातवारे करून याला जोड देतात… असले चाळे मग बराच वेळ चालू असतात. याच्या सकारात्मकतेवर मी मात्र एकदा सूड उगवला होता. आजारी होता तो, तेव्हा म्हटले की अरे तू मृत्यू पावलास (वास्तविक गचकला शब्द योग्य) तर ते मुलांसाठी बरे नाही का? तुझे पैसे त्यांना लवकर मिळतील… मृत्यूकडे असा बघ की!!
असले सकारात्मक संदेश देणारी जमात आर्थिकदृष्ट्या भक्कम असते, सरकारी नोकरीतून निवृत्त, अनेकांनी पगारापेक्षा पेन्शन जास्त घेतलेली असते, भरपूर, फंड बिंड असतोच, मुले अर्थात परदेशात; हे लोक डोंबोली, पार्ले, कोथरूड, ठाणे या ठिकाणी बहुल्याने दिसतील बघा. सहा महिने इथे आणि सहा महिने परदेशात, मधून केसरीबिसरीसोबत टूर, हे यांचे आयुष्य. हातात रिकामा वेळ आणि जन्मजात भोचक वृत्ती… भारताची मानसिकदृष्ट्या वाट लावण्यात या शतमूर्खांचा मोठा वाटा आहे. आपण फिरंग्याचे अनेक आचारविचार उचलले, जीवनशैली घेतली पण माइंड युअर ओन बिझनेस (म्हणजे इतरांच्या ताटात, घरात आणि कशाकशात डोकावून भोचकपणा करू नका) हे त्यांचं सर्वोत्तम तत्त्व मात्र अजून आत्मसात केलेलं नाही. पूर्वी ऋषी मुनी मानसिक शांततेसाठी अरण्यात जायचे… त्यांना कसली अशांती असणार समाजात? मला तर फुल्ल गॅरंटी आहे की त्यावेळीही असलेच पॉझिटिव्ह भुंगे त्यांच्यामागे पण भुणभुण करून वात आणत असणार.
समोरचा ट्रॅक माणसांनी फुलून गेलाय. त्यातही सराईत आणि नवखे पूर्ण ओळखू येतात. त्यांचा उत्साह साधारण मार्चपर्यंत टिकतो. म्हणजे वर्षाचा आर्थिक ताळेबंद सादर होता होता यांचा व्यायामाचा ताळेबंद गुंडाळला जाणार हे ठरलेले असते. इतिहास गवाह है.
फक्त त्या पॉझिटिव्ह काकाकाकवांचे काय करायचे हे कळत नाहीये… कुच इलम है क्या बंटाय? (हा शब्द माहीत नसल्यास तुम्ही अस्सल मुंबईकर नाय).