‘केसरिया तेरा इश्क है पिया’ हे गाणं फार प्रसिद्ध झालंय हल्ली. ते आठवलं, पुण्यातल्या केशराच्या शेतावरून. पुण्यात एक तरूण केशराची इनडोअर शेती करतोय, या बातमीवर माझा विश्वासच बसला नाही. पुणे तिथे काय उणे, हे बरोबर आहे हो, पण, काश्मीरच्या थंड वातावरणात उगवणारी केशराची फुलं पुण्याच्या वातावरणात कशी फुलली असतील? याच उत्सुकतेने थेट पुणं गाठलं. वारजे येथे पुणे सातारा हायवेला लागूनच असलेल्या जागेत एका ८ बाय ४०च्या कंटेनरमधे शैलेश मोडक केशराची शेती करतात. लोखंडी दरवाजाची बेल वाजवली. डोळ्यावर चष्मा, पोनी टेल बांधलेल्या एका तरुणाने दरवाजा उघडला. आत प्रवेश केल्याबरोबर थंड हवेचा झोत अंगावर आला. सगळीकडे डिस्कोथेकच्या प्रकाशाशी साधर्म्य असणारे निळ्या लाल रंगाचे एलईडी लाइट्स होते. टेबलावर एका बाजूला ‘रेड गोल्ड’ म्हणजे केशराची बिछायत होती, तर दुसर्या बाजूला लॅपटॉप, पुस्तकं पहुडली होती. कडेला कार्बन डायॉक्साइड सिलेंडर, टायमर, सीसीटीव्ही, अशी अद्ययावत उपकरणं होती. हातातील मोबाईलचा वापर करून झाडांना पाणी देणं, शेतीच्या गरजेनुसार प्रकाश आणि तापमान कमी जास्त करणं सुरू होतं. या मॉडर्न शेतकर्याची आधुनिक शेती पाहून मनात विचार आला की आपण चुकून बाविसाव्या शतकात तर नाही ना पोहचलो!
मोडक सांगू लागले, ‘पारंपरिक शेतीतल्या अडचणींवर मात करून, कॉर्पोरेट कंपन्यांसारखी नफा मिळवून देणारी आधुनिक शेती मला करायची होती. सर्वात महाग आणि मागणी असणारं केशर मी निवडलं. पाच लाख रुपये किलो या दराने ते विकलं जातं. केशर इतकं महाग आहे, कारण जांभळ्या रंगाच्या क्रोकस सॅटिव्हसच्या ७५,००० फुलांमधून जेव्हा केशराचे तंतू वेगळे केले जातात, तेव्हा त्यातून फक्त एक किलो केशर मिळते. त्यामुळेच एक ग्रॅम केशराची किंमत ४०० ते ६०० रुपये इतकी असते. या फुलांचा हंगाम वर्षातून एकदा, ऑक्टोबर महिन्यात तीन आठवडे असतो. आपल्या देशातील मागणीपैकी फक्त चार टक्के उत्पादन आपण करतो. उर्वरित ९६ टक्क्यांची इराण, नेदरलँड आणि अरब देशांतून आयात होते. इराणमध्ये इनडोअर शेती केली जाते, हे वाचनात आलं. इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असल्याने माझ्यासाठी हा प्रयोग इंटरेस्टिंग होता. हेच उत्पादन आपण कंटेनरमध्ये घेऊ शकतो का, याबद्दल डॉक्टर राहुल ढाके या मित्राशी चर्चा केली. कंटेनरच्या ३२० स्क्वेअर फूट जागेपैकी १६० स्क्वेअर फूट जागेत केशराचे उत्पादन घेण्याचं ठरविले. प्राथमिक प्रयोगासाठी काश्मीरहून बारा किलो केशराचे कंद मागवले. आठ किलो प्रवासातच खराब झाले. उरलेले चार किलो कंद कंटेनरमध्ये लावले. पण त्यांना फुलं न येताच ते कोमेजून गेले. नक्की काय चुकलं याचा शोध घ्यायला ऑगस्ट २०२२मध्ये मी पंम्पोरला गेलो. तेथील शेतकर्यांशी बोललो, केशराचं शेत पहिलं. फुलांचा मोसम नव्हता, पण केशराची लागवड आणि त्याचं अर्थकारण समजून घेतलं. काश्मीरहून रस्तामार्गे पुण्यात पोहोचायला आठ दिवस लागले, म्हणून आमचे केशर कंद खराब झाले, असा निष्कर्ष निघाला. आता मला साडे तीन लाख रुपये किंमतीचे ५०० किलो केशर कंद ऑर्डर करायचे होते. सर्वात जलद गतीने विमानाने मागवता आले असते, पण खर्च परवडणारा नव्हता. मग जम्मू-पुणे हा ट्रेन मार्ग स्वीकारायचं ठरवलं. या मार्गे कंद दोन दिवसात आमच्याकडे पोहोचले.
पुलवामा जिल्ह्यातील पंम्पोर तालुक्यात काश्मीरमधील ९० टक्के केशरनिर्मिती होते. जगात आपलं केशर सर्वोत्तम गुणवत्तेचं मानलं जातं. याचं कारण पंपोरचं केशरशेतीला पोषक हवामान. पंपोर तालुक्यातील मागील पाच वर्षांचे हवामानाचे रिपोर्ट जमा करून त्यानुसार कंटेनरमध्ये तिथलं ‘वातावरण’ निर्माण केलं. एका ट्रेमध्ये आकारानुसार चारशे ते सहाशे कंद बसवून रॅकमधे ठेवले. झाडाला लागणारा कार्बन डायऑक्साईडचा सिलेंडर, आर्द्रता निर्माण करणारं उपकरण, वातावरण मायनस डिग्रीत नेणारे चिलर कंटेनरमध्ये लावण्यात आले. सर्व गोष्टी नियंत्रित करण्यासाठी मोबाईल अॅपची निर्मिती केली. कोणतीही मानवी चूक होऊ नये यासाठी काही ठिकाणी टायमर लावले. रात्रीच्या देखरेखीसाठी आत सीसीटीव्ही लावले. सगळी तयारी झाली होती. कंदांची समाधानकारक वाढ दिसत होती. पण सहा वर्षे फक्त अपयश पदरी पडलं असताना जोपर्यंत यश समोर दिसत नाही, तोपर्यंत कशाचाच भरवसा वाटत नव्हता. आता फक्त केशराच्या फुलांची वाट पाहणं हातात होतं.
सुट्टीत मुलांना घेऊन नाशिकला गेलो होतो. एके दिवशी संध्याकाळी सहकार्यांचा फोन आला, दादा फुलं आली आहेत. मी तडक नाशिकहून निघालो, पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. कंटेनर उघडताना हात थरथरत होते. आत आल्यावर कंदांना बहर आलेला दिसला, ती जांभळ्या रंगाची फुलं, त्यात केशराचे लाल तंतू पाहून एकटाच खूप वेळ रडत बसलो. माझा प्रवास मला पुन्हा दिसू लागला…
माझा जन्म नाशिकचा, वडील हिंदुस्तान एरोनॉटिक्समधे फिटर होते. कमी पगारात मुलांचं शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदार्या उचलणं तेव्हा अवघड होतं. माझे दोन मोठे भाऊ इंग्रजी माध्यमात आणि मी शेंडेफळ मराठी शाळेत शिकून मोठे झालो. भाऊ त्यांच्या मित्रांशी इंग्रजीतून बोलू लागले की मला आपण कुठे तरी कमी आहोत असं वाटायचं. बारावीला ५८ टक्के मिळाले. एका भावाला मेडिकल तर दुसर्या भावाला इंजिनीअरिंगमधे मेरिटवर प्रवेश मिळाला. माझे मार्क पाहून बाबा म्हणाले, याला आयटीआयमध्ये टाका. पण मला कॉम्प्युटरची आवड होती. मोठ्या भावाच्या सांगण्यानुसार बीसीएसमध्ये (कॉम्प्युटर सायन्स) माझा प्रवेश झाला. तिथे डिग्री घेतल्यानंतर, एमसीएसाठी पुण्यात इंदिरा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजची मुलं शहरी भागात राहणारी आणि चांगलं इंग्रजी बोलणारी होती. आपल्याकडून बोलताना चुका होतील आणि सगळे हसतील या भीतीने अनेकदा मी गप्पच बसायचो. फार मित्र नसल्याने इथला वेळ मी अभ्यासासाठी देऊ लागलो. कॉम्प्युटरमध्ये आपल्याला गती आहे हे कळत होतं. कॉलेजात सातवा आलो, तेव्हा माझ्या हुषारीवर शिक्कामोर्तब झालं. कॅम्पस प्लेसमेंट सुरू झालं. मार्केटमध्ये आयटी बूम होतं, पण मार्क्स चांगले असूनही मला कोणतीही कंपनी घ्यायला तयार नव्हती. कारण इंटरव्ह्यूमध्ये ‘माय नेम इज शैलेश’ याच्यापुढे माझं इंग्रजी धापा टाकायचं. इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला की उठून समोरच्या बोर्डावर डायग्राम काढून मी उत्तर लिहायचो. शेवटी इलेक्ट्राकार्ड सर्व्हिसेस (ईसीएस) या कंपनीने माझ्या तांत्रिक ज्ञानावर विश्वास ठेवून मला टेम्पररी नोकरी दिली. जगभरातील प्रमुख बँका आणि वित्तीय संस्थांसाठी ही कंपनी ‘पेमेंट सोल्यूशन’ची सेवा द्यायची. एका बँकेच्या कार्डने दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना किंवा क्रेडिट कार्डने खरेदी करताना माहितीचे आदानप्रदान करावे लागते. यासाठीचे सॉफ्टवेअर बनवून इंस्टॉल करणे हे काम आम्ही करायचो. मेहनती स्वभाव आणि गुणवत्ता या जोरावर मला नोकरीत कायम करण्यात आलं. आमच्या कंपनीला कंबोडियातील एका बँकेचं काम मिळालं. तिथे मला पाठवण्यात आलं. परदेशी काम करताना सात हजार रुपये पगारावरून डायरेक्ट एक लाख रुपये पगार मिळायला लागला. पण तुम्हाला सांगतो, वाढीव पगारापेक्षा जास्त आनंद मला इथल्या लोकांचं इंग्रजी माझ्यापेक्षा वाईट आहे हे कळल्यावर झाला. व्हिएतनाम, युगांडा, घाना, मलेशिया या देशांत देखील कामासाठी जाणे व्हायचे. पंचतारांकित हॉटेल, चांगलं खाणं, भरपूर काम, भरपूर मजा असं आयुष्य चाललं होतं.
मधल्या काळात कौटुंबिक पातळीवर काही महत्वाच्या घडामोडी झाल्या. बाबांचे कंपनीतील मित्र शामराव बोरकर यांच्या मुलीशी माझ्या मोठ्या भावाचं लग्न जमलं. तिला कविता नावाची एक लहान बहीण होती. मी कॉलेजात कविता करायचो. घरच्यांच्या नकळत कवी आणि कविताच्या भेटीगाठी सुरू झाल्या. आमच्या घरात ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा सुरू झाला. पण सिनेमासारखी फार वळणं न येता २००८ साली आम्ही चतुर्भुज झालो. लग्नानंतरही माझ्या परदेशवार्या सुरूच होत्या. कविता पुण्यात आयटी फर्ममध्ये काम करायची. तूही आता पुण्यात नोकरी मागून घे, असा घरच्यांचा रेटा सुरू होता. मी कंपनीला सांगून पुण्यात बदली मागून घेतली, पण मला नवी मुंबई हे कार्यक्षेत्र दिलं गेलं. रोज मुंबई-पुणे प्रवास करून कुटुंबाला पुरेसा वेळ देणं खरंच अवघड होतं. याच कारणाने नोकरी बदलायचं ठरवलं. बार्कलेज् या बहुराष्ट्रीय कंपनीत २०१२ साली इंटरव्ह्यूसाठी गेलो. अजूनही माझ्या इंग्रजीत फारसा फरक पडला नव्हता. ते प्रश्न विचारत होते. मला उत्तरं येत होती. पण इंग्रजी भाषेत मांडताना गडबड होत होती. मुलाखत घेणार्या सरांच्या चेहर्यावर नकार दिसत होता. इतक्यात त्यांचे एक सहकारी त्यांच्या क्रेडिट कार्ड सिस्टीमसंबंधित अडचण घेऊन त्यांच्याकडे आले. त्यांच्यात खल सुरू असताना मला तो प्रॉब्लेम काय आहे हे कळलं. त्यावर मी उपाय सुचवला. त्या सहकार्यांनी माझ्याकडे साशंकतेने पाहात मी सांगितल्याप्रमाणे सिस्टीममध्ये बदल केले. तो प्रॉब्लेम सुटला. सरांनी खूष होऊन मला विचारलं, हे तुला कसं आलं? मी म्हणालो, मी अनेक बँकांमध्ये ही सिस्टम बसवली आहे, त्यामुळे मला याबद्दल ए टू झेड माहिती आहे. अर्थातच नोकरी मिळाली. आधीच्या तुलनेत या कंपनीत चांगला पगार मिळून सरांच्याच टीममध्ये माझा प्रवेश झाला. दर वर्षी कामात बढती मिळत गेली. हाताखाली पंचवीस जणांची टीम होती. वार्षिक पगार पंचवीस लाख झाला होता, पण एकाच प्रकारचं काम करून तोचतोचपणा येत होता. स्वतःच काहीतरी करावं असं वाटत होतं. नोकरी सांभाळून वे टू बिझ या नावाने वेबसाइट बनवून देण्याचं काम सुरू केलं. पण थोड्याच कालावधीत कंपनीतल्यासारखंच नीरस काम करत असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे हे काम बंद केलं.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची माझी इच्छा कविताला कळत होती. थोडं फार सेविंग गाठीशी होतं. दोन मुलांचं शिक्षण, घराचे, गाडीचे हप्ते यांची जबाबदारी कविताने घेतली. भावांनी आणि मित्रांनी मानसिक आधार दिला. व्यवसायात स्थिर होण्यासाठी स्वतःला दोन वर्ष देऊ, असा निर्धार करून मी डिसेंबर २०१६ला नोकरीचा राजीनामा दिला. पण करायचं काय हे अजून ठरलं नव्हतं. सकाळी घरातून निघायचो, कामाशिवाय हायवेवर गाडी चालवताना आता पुढे काय याचा विचार करायचो.
एके दिवशी रेडिओवर, ‘मधमाश्या नष्ट झाल्या तर पुढील चार वर्षांत पृथ्वीवरून मानव वंश संपेल’ असं ऐकलं. कुतूहल निर्माण झालं. मी म्हटलं हा तर जीवनमरणाशी निगडित प्रश्न आहे, याला फ्युचर आहेच. या व्यवसायात आपल्याला काहीतरी करता येईल. पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत मधमाशी पालन प्रशिक्षण घेतलं. एका फुलातील परागकणांचे दुसर्या फुलावरील स्त्री केसराबरोबर मीलन होणे म्हणजे परागीभवन. ते मधमाश्या घडवून आणतात. पण गेल्या काही वर्षांत कीटनाशकांचा वापर इतका वाढला आहे की मधमाश्या शेताकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे शेतीचं उत्पन्न घटतंय. मध गोळा करून विकणे हे तर अनेक जण करतात, पण कमी भांडवलात व्यवसाय करायचा असेल, तर लोकांना एखादी अडचण किती मोठ्या प्रमाणात भेडसावतेय, ते पाहावं लागतं. शेतीकडे न फिरकणार्या मधमाश्या जर आपण पेट्यांतून भाडेतत्त्वावर दिल्या तर? हा विचार करून जानेवारी २०१७मध्ये मधमाश्यांच्या साठ पेट्या विकत घेतल्या. वर्तमानातपत्रात जाहिरात दिली. मला लगेच पेट्या द्या मागणारे शंभर फोन आले. कारण डाळिंबाचा परागीभवनाचा हंगाम सुरू होता. एका पेटीचं १५ दिवसांचं भाडं दोन हजार रुपये मिळायचं. पंधरा दिवसात मध, मेण आणि पेट्यांचं एक लाख रुपये भाडं आलं. हे काम करताना आयुष्यात कृषीतज्ञ डॉ. विकास खैरे नावाचा एक देवमाणूस आला. त्यांना मी मोठ्या पगाराची नोकरी सोडून शेतीपूरक व्यवसाय करतोय याचं कौतुक होतं. अंजीर आणि सीताफळ लागवड संशोधनात त्यांचं मोलाचं योगदान आहे. ते शेतीशाळा घ्यायचे. त्यांच्याकडून मला शेतीविषयक खूप माहिती मिळाली. पंधरा दिवसांत यशप्राप्ती ही माझी यशोगाथा वाचायला छान वाटतेय ना. पण खरी गंमत पुढे आहे. एका शेतात मधमाश्यांना केवळ पंधरा दिवसांची मागणी असते, त्यानंतर जिथे मागणी असेल तिथे त्या घेऊन जाव्या लागतात. मधमाश्या सकाळी मध गोळा करायला जातात आणि अंधार पडल्यावर परत येतात. कितीही काळजी घेतली तरी पेट्या हलवताना त्या चावतात. माझा व्यवसाय, मला चावल्या तर ठीक, पण इतर कोणाला मधमाश्यांकडून चावून घ्यायची हौस का असेल? त्यामुळे हे काम करायला माणसं मिळायची नाहीत. आडवळणावरील शेतातील रस्ते ओबडधोबड असायचे. तिथे जायला टेम्पो मिळायचा नाही. आठ किलो वजनाची एक पेटी, अशा चाळीस पेट्या मी एकटाच उचलून टेम्पोत भरत होतो. टेम्पोचा ड्रायवर बाजूला उभा होता. एकदा रात्री दोन वाजता पेटी शेतात ठेवताना मी दगडावर ठेच लागून खाली पडलो. वीस हजार मधमाश्या हवेत उडाल्या. टेम्पोचा ड्रायव्हर जीव घेऊन सैरावैरा पळत सुटला. मी अंगावर गोणी ओढून घेतली. थोड्या वेळाने ड्रायव्हरला कॉल केला, तर तो म्हणाला, भाऊ, तुम्ही पैशासाठी काय काय करता हो. मी काही आता येत नाही. टेम्पो चालवून तुम्हीच माझ्या घरी सोडा. अशा अनेक अडचणींचा सामना करत होतो. मधमाशी चावून तोंड सुजणं तर अगदी कॉमन होतं. लाखो रुपयांची नोकरी हे असं तोंड सुजवायला सोडली का, असं घरच्यांनी विचारायला सुरुवात केली. आठ महिने हे काम केलं. मध्य प्रदेशातील एका ग्रुपला मधमाश्यांच्या पेट्या देऊन या व्यवसायातून बाहेर पडलो. या व्यवसायातून मिळालेल्या माहितीमुळे मला काय करायचं आहे हे मला कळलं. शेती आणि शेतकर्यांचं जीवन जवळून अनुभवता आलं. वाटलं की, आपली कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीची आवड आणि शेती यांची सांगड घालून करता येईल असा कुठला व्यवसाय असेल?
वेगळा धंदा शोधताना, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट लायसन्स घेतलं. निर्यात काय आणि कुठे करायची हे माहीत नव्हतं. मी भारताबाहेर पहिल्यांदा कंबोडिया देशात पाऊल टाकलं होतं. तेव्हा व्यवसायाचा श्री गणेशा तेथूनच करावा असं ठरवलं. तेथील हॉटेल
व्यावसायिक राज कुमारशी मैत्री झाली होती. त्याला कॉल करून सांगितलं की आपल्याला एक्स्पोर्टचा व्यवसाय करायचा आहे. तिथे काय विकलं जाईल? त्याने त्याच्या हॉटेलमध्ये प्रामुख्यानं लागणारी गोष्ट सांगितली, लसूण. दुसर्या दिवशी मी मध्य प्रदेशातील मंदसौर मार्वेâटमध्ये पोहोचलो. दोन दिवस राहून, व्यापार्यांना भेटून लसणाचे वेगवेगळे सॅम्पल गोळा केले. दोन दिवसात कंपनीचे व्हिजिटिंग कार्ड, माहितीपत्रक इंग्रजी आणि कंबोडियातील ख्मेर या लोकल भाषेत छापून घेतलं. कंबोडियाला राजसमोर हजर झालो. तिथं मार्केट फिरल्यावर कळलं की इथे चीनमधील सौम्य चवीची लसूण मागवली जाते. भारतीय ऊग्र वासाच्या लसणाला इथे फारशी मागणी नाही. सगळी मेहनत वाया गेली.
अजून काय करता येईल याचा शोध घेत असताना एका पीनट बटर बनवणार्या कंपनीला दर महिन्याला पाचशे टन शेंगदाणे हवे आहेत, हे कळलं. मी पुन्हा भारतात येऊन अहमदाबाद, राजकोट येथील होलसेल मार्केटमध्ये शेंगदाण्याचे भाव नक्की करून सॅम्पल गोळा केले आणि कंबोडियाला रवाना झालो. त्यांना शेंगदाण्याचे सॅम्पल आणि दर पटले. मोठी ऑर्डर हातात मिळाली. वाटलं जिंकलो आता. पण एक जून २०१८ला शेतकर्यांच्या संघटनांनी देशात संप पुकारला. शेतकर्यांनी धान्य विकणं बंद केलं. यामुळे शेंगदाण्याचे दर वाढले. या दरात एक्स्पोर्ट करणं शक्य नव्हतं. सगळी मेहनत वाया गेली. राजने नेपाळमध्ये कांद्याची एक ऑर्डर मिळवून दिली. सकाळी लासलगावला जाऊन कांद्याचा दर विचारून समोर भाव दिला. दुपारी ऑर्डर नक्की होईपर्यंत भाव चार रुपयांनी वाढला आणि पुन्हा एकदा पदरी निराशाच पडली.
स्वतःवरचा विश्वास डळमळीत होऊ लागला. सेव्हिंगचे पैसे संपत चालले होते. खूप काळ सांभाळून ठेवलेलं धैर्य आता कच खाऊ लागलं होतं. गेली दोन वर्षे इन्कम शून्य आणि खर्च मात्र वाढत होता. फॅमिली लाइफ सोडून दिवस रात्र वणवण भटकत होतो. माझ्या या निर्णयावर माझ्यामागे काही मित्र, नातेवाईक हसत, टिंगल टवाळी करत. त्यांची मी पर्वा केली नाही, पण सततच्या अपयशाने, मी नोकरी सोडून चूक तर केली नाही ना असे विचार मनात डोकावत असत. या काळात आई, वडील, बायको, डॉ. हितेश, प्रशांत हे मोठे भाऊ यांनी मानसिक आधार दिला. आता शेवटची संधी असं मनात धरून मी कमी पैशात जास्त चांगला व्यवसाय कोणता करता येईल, याच्या शोधात होतो. मला शेती व्यवसायात काम करायचं होतं, पण त्यातील अनिश्चितता मान्य नव्हती. ग्रामीण भागात शेती पिकवून माल शहरात विकायला आणण्यापेक्षा शहरात पिकवून शहरातच विकली जाईल असं मॉडेल शोधत असताना कंटेनरमध्ये एरोफोनिक अथवा हायड्रोपोनिक शेतीचा पर्याय समोर आला. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने मातीविरहित शेती केली जाते. जेएनपीटी बंदरातून एक कंटेनर विकत घेऊन पुण्याला आणला. तो ठेवण्यासाठी संतोष आणि प्रभाकर चौधरी यांच्याकडून जागा भाड्याने घेतली. जुन्या कंटेनरला झळाळी देणे, आपल्या गरजेनुसार आराखडा तयार करण्यासाठी मला माझे मित्र किरण बोंडे यांनी मदत केली. रोपांना जगण्यासाठी माती हे माध्यम असतं. पण या मातीविरहित शेतीत आपण पिकांना कार्बन डायऑक्साइड, न्यूट्रियंट, पाणी, अन्न तयार करण्यासाठी प्रकाश, वातावरण या गोष्टी योग्य प्रमाणात इथे देतो. पारंपारिक शेतीच्या तुलनेत इथे फक्त दहा टक्के पाणी वापरलं जातं. जगातील कोणतंही पीक असं नाही, जे कंटेनर शेतीमध्ये आपण काढू शकत नाही आणि चाळीस हजार स्क्वेअरफूट (एक एकर) जमिनीवर जितकं पीक घेऊ शकतो, तितकं पीक आपण कंटेनरमधील तीनशे वीस स्क्वेअर फुटांच्या जागेत काढू शकतो. अशा प्रकारे वर्षातील तीनशे पासष्ट दिवस शेती करता येते, म्हणून कंपनीचं नाव ३६५ डी फार्म ठेवलं. सुरुवातीला प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरी, अंजीर लागवड केली. पण मला कमी जागेत, जास्त संख्येने आणि लवकर येणारं पीक काढायचं होतं. पालक-मेथी या भाज्या जास्त प्रमाणात विकल्या जातात, पण ही लागवड आमच्या आर्थिक गणितात बसत नव्हती. त्यामुळे लेट्यूस, केल, हर्ब्ज, आणि पार्सली अशा एक्झॉटिक पालेभाज्या उगवायचा निर्णय घेतला. पंचेचाळीस दिवसांत या भाज्या कापणीसाठी तयार होतात. या मालाला डिमांड आहे आणि याला दर देखील चांगला मिळतो. आम्ही नवीनच असल्याने सुरुवातीला अडचणी आल्या, पण दोन हंगामांनंतर सुधारणा करून चुका दुरुस्त केल्या. एक्झॉटीक भाज्या ज्या वर्टिकल बारमध्ये पिकवल्या तेच बार घेऊन, जणू शेत तुमच्या दारात, या धर्तीवर आम्ही या भाज्या आठवडा बाजारात विकायला घेऊन गेलो. शहरी ग्राहकांसाठी आपल्या हाताने शेतातली ताजी भाजी काढून घेण्याचा हा अनुभव अनोखा होता. आबालवृद्धांनी या प्रयोगाचं स्वागत केलं. संध्याकाळी बार पुन्हा कंटेनरमध्ये नेऊन ठेवले, की शिल्लक भाजी पुन्हा ताजीतवानी हिरवीगार व्हायची. बाजारात न विकला गेलेला भाजीपाला फेकून द्यावा लागतो. ती समस्या आम्हाला कधी भेडसावली नाही.
हे मॉडेल यशस्वी झाल्यावर ही आधुनिक शेती पाहायला देशविदेशातून अनेक लोक यायचे. त्यांनी अशा प्रकारचे तयार कंटेनर बनवून मागितले. ही चांगली संधी दिसत होती. याची जुळवाजुळव करत असतानाच कोविड सुरू झाला आणि दोन वर्षांत सर्व धंदा ठप्प झाला. याच काळात माझं मणक्याचं ऑपरेशन झालं. पुन्हा धंदाउभारणी करताना काहीतरी नावीन्यपूर्ण करायला हवं होतं. तेव्हा केशराची निवड केली. केशर पुण्यात पिकवल्याची बातमी प्रसारमाध्यमांमुळे वेगाने पसरली, आठ दिवसांत बरचसं केशर विकलं गेलं. केशरावर वेगवेगळे प्रयोग करून वर्षातून एकदा फुलणार्या केशराचे आपण चारदा पीक घेऊ शकतो का, शिल्लक राहिलेल्या कंदाचे मातीत रुजवून एकाचे चार कंद तयार येऊ शकतील का, याचे प्रयोग मी सुरू केले आहेत. यामुळे पुन्हा केशरपिकासाठी कंद घ्यायला काश्मीरला जायची गरज उरणार नाही. पाचशे किलो कंदांनी एक किलो केशर मी या कंटेनरमध्ये घेऊ शकतो. या कंटेनर शेतीमध्ये ऊर्जाबचत करण्यावर आता फोकस आहे. सध्या ही शेती विजेवर सुरू आहे, त्याऐवजी ग्रीन एनर्जी म्हणजे सोलर पॅनल आणि हायड्रोपॅनल (वातावरणातील आर्द्रता शोषून ते पाणी रोपांना देणे) हे प्रयोग सुरू आहेत.
केशराला आलेली पहिली फुलं पाहणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. नैसर्गिक वातावरणात वाढणारे केशर, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढवताना मनात धाकधूक होती. पण त्या जांभळ्या फुलांच्या रूपाने, निसर्गाने कौल दिला. आणि माझा प्रयोगशील राहण्याचा हुरूप वाढला. वर्षातून चार वेळा केशर घेता आलं तर, केशरनिर्मिती व निर्यातीत आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो.’
पारंपारिक शेतीत कष्ट अधिक, पण त्या प्रमाणात उत्पन्न नाही. हिस्से वाटण्यांमुळे, दरडोई जमिनीचं प्रमाण कमी होतंय. भारतात आता अल्पभूधारक शेतकरी अधिक आहेत. त्यांना प्रयोगशील राहणं परवडत नाही. वाढत्या लोकसंख्येची भ्ाूक भागविण्यासाठी शेती आणि शेतकरी वाढले पाहिजेत, पण नवीन पिढी शेतात राबण्यासाठी फार उत्सुक नाही. शेतकरी मुलाशी लग्न करायला आज मुली तयार नाहीत. ही समस्या सोडवायला पारंपरिक शेतीला अपडेट करायला हवं. डोकॅलिटी आणि विज्ञानाच्या सहाय्याने मोबाईलवरून शेती प्रâॉम होम करणारे शैलेश मोडक, कष्ट कमी आणि उत्पन्नाची हमी असं हुकमी मॉडेल राबवत आहेत. प्रगतीसाठी नोकरीच्या मृगजळामागे धावणार्या या कृषिप्रधान देशातील तरुणांना शेतीकडे वळवायचं असेल तर आधुनिक शेतीला पर्याय नाही.