आज मकर संक्रांतीचा सण.
या सणाच्या शुभेच्छा दिल्या की काही भाषाप्रेमी आक्षेप घेतात. कारण, मराठीत एखाद्यावर संक्रांत आली या वाक्प्रचाराचा अर्थ नकारात्मक आहे. संक्रांत येणे म्हणजे संकट ओढवणे. पण, मकर संक्रांत हा आपल्या शेतीआधारित परंपरेशी जोडलेला सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, अशी मान्यता आहे. शेतातल्या ताज्या पिकांची देवाणघेवाण करणे, तिळगूळ देणे, इष्टमित्रांना भेटणे, अशा नाना प्रकारांनी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाच्या शुभेच्छा निश्चितच देता येतात.
संक्रांत ही देवता असून ती वाहनावर बसून येते, असे समजले जाते. तिचे वाहन कोणते यावरून येणारे वर्ष कसे जाणार आहे, याचे भविष्य मांडले जाते. त्यामुळेच इथे शीर्षकात ‘वाहन : बुजगावणे’ असे वाचून वाचक गोंधळले असतील. बुजगावण्यांना मानवी आकार असतो, पण त्यांच्यात जीव नसतो. ती काही हालचाल करत नाहीत. त्यांना पाहून पक्ष्यांना असे वाटते की शेतावर माणसाची राखण आहे. त्या शेतातल्या पिकावर डल्ला मारण्याचा बेत पक्षी रद्द करतात, पीक वाचते. अशी ही स्थिर बुजगावणी संक्रांतीचे वाहन कशी ठरतील?
हे समजण्यासाठी आधी महाराष्ट्रावर आलेली संक्रांत समजून घेतली पाहिजे. ही काही मकर संक्रांतीप्रमाणे शुभ अर्थाने आलेली संक्रांत नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय यंत्रणा आणि सामदामदंडभेदाचा मुक्त गैरवापर करून शिवसेनेत उभी फूट पाडली आणि राज्यावर बेकायदा मिंधे सरकार नावाची संक्रांत आली. हा मजकूर तुम्ही वाचत असाल, तोवरच्या काळात १० जानेवारी रोजी या फुटीवरची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणखी एका पावलाने पुढे गेली असेल आणि हे सरकार बरखास्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असेल, अशी आशा आहे. त्या घातपाती सत्तापालटानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोन बुजगावणी या संक्रांतीचे वहन कसे करत आहेत, त्याचे प्रत्ययकारी चित्रण मार्मिकच्या मुखपृष्ठावर गौरव सर्जेराव यांनी केलेलेच आहे.
या बुजगावण्यांची गंमत अशी आहे की मुख्य आणि उप यांची अधिकृत रचना काहीही असली, तरी प्रत्यक्षात मुख्य कोण आणि उप कोण हे इथला बच्चा बच्चा (आणि बच्चू बच्चू) आणि टिल्लू टिल्लूही जाणतो. जे नावापुरते मुख्य आहेत, त्यांना लिहून दिलेलेही धड वाचून दाखवता येत नाही, त्यामुळे मंच कुठलाही असो, समोर कोणीही असो, त्यांची टेप चार महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्रात काय क्रांती करून दाखवली, याची तीच तीच वांती पुन्हा पुन्हा करून दाखवण्यापलीकडे जात नाही. आज ‘उप’च्या खांद्यावर ‘उप उप’ असे ‘मुख्य’ बुजगावणे बसलेले आहे आणि महाराष्ट्राच्या शेतावर ठिकठिकाणचे कावळे तुटून पडले आहेत, असे विदारक चित्र मराठी जनतेला पाहायला मिळते आहे.
या बुजगावण्यांनी महाराष्ट्राची काय राखण केली हो?
महाविकास आघाडीने खेचून आणलेले औद्योगिक महाप्रकल्प यांच्या नाकाखालून गुजरातने पळवले. हे अशा अचूक वेळेला घडले आहे की हे घडवण्यासाठीच महाशक्तीने इथले स्वाभिमानी सरकार पाडून खोकेबाज मिंध्यांना बळ दिले की काय, अशी रास्त शंका येते. पाठोपाठ मलबार हिलच्या वृद्धाश्रमातून महाराष्ट्राच्या मानबिंदूंच्या बदनामीचे सत्र सुरू झाले. तिथले उपद्व्यापी पार्सल स्वगृही रवाना करणे तर दूरच, त्याविरोधात चकार शब्दही काढण्याची हिंमत मिंध्यांनी दाखवली नाही. त्यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी राजकीय सोयीसाठी सीमा प्रश्नाची काडी टाकली. त्या राज्यात पुढच्या वर्षी निवडणुका आहेत आणि भाजपची सत्ता उलथण्याचे संकेत आहेत. या पक्षाला अस्मिताबाजी, विकासाचे पोकळ इव्हेंटबाज ढोल वाजवणे आणि समाजात तेढ निर्माण करून त्यावर आपली पोळी भाजून घेणे यापलीकडे काही जमत नाही, हे गेल्या १० वर्षांत दिसून आले आहे. कन्नड अस्मितेचा निखारा चेतवून तिथल्या मतदारांना भुलवण्यासाठी बोम्मई यांनी महाराष्ट्राची कुरापत काढली. तरी ही बुजगावणी ढिम्मच! इथेही सरकार भाजपचे, तिथेही सरकार भाजपचे आणि दोन्हीकडे मर्जी चालते दिल्लीश्वरांची. त्यामुळे इथल्या भाजपेयींना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यावाचून गत्यंतर नाही. पण, सीमा लढ्यात कर्नाटकात तुरुंगवास भोगून आलेल्या मिंध्यांचे तोंड कोणी शिवले होते? महाराष्ट्राचा अवमान होत असताना सत्तेवर लाथ मारण्याची हिंमत त्यांनी का दाखवली नाही? हीच बाळासाहेबांची शिकवण अंगीकारलीत का?
आता अलीकडेच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींबरोबर बैठका घेतल्या. इथे त्यांनी रोड शोसुद्धा केला. आपली बुजगावणी अहमदाबादेत किंवा लखनऊमध्ये असे करू धजतील काय?
योगी आदित्यनाथांच्या हिंदी सिनेमासृष्टीबरोबरच्या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टी याने त्यांना तोंडावर सुनावले की बॉयकॉट
बॉलिवुडसारखे ट्रेंड चालणार असतील, तर हिंदी सिनेमासृष्टीला तुम्ही तुमच्या राज्यात देत असलेल्या सवलतींचा काहीही उपयोग होणार नाही. आम्ही काय चोवीस तास ड्रग्जच्या नशेत असतो काय? या देशाला बांधून ठेवणारा एक मुख्य घटक आहे चित्रपटसृष्टी हा. त्यात काही लोक चुकीचे वत&न करत असतील, पण सगळ्या चित्रपटउद्योगाची बदनामी कशी करता येईल? चित्रपटसृष्टी म्हणजे काही स्टार्स नसतात, त्यात सुतारांपासून तंत्रज्ञांपर्यंत असंख्य माणसांचा समावेश असतो. आधी (तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी चालवलेला) बॉयकॉटचा ट्रेंड बंद करायला लावा. प्रेक्षक थिएटरमध्ये यावेत, हे सिनेमासृष्टीसाठी सर्वाधिक गरजेचे आहे. ते सुकर करा. त्याहून अधिक सवलतींची गरज नाही. जे सुनीलसारखा अभिनेता स्पष्टपणे बोलू शकला, ते आमच्या बुजगावण्यांच्या तोंडून निघू शकले नाही, हे महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे.
कधी गुजरातचे, कधी कर्नाटकाचे, कधी उत्तर प्रदेशाचे कावळे येऊन इथे टोचा मारत आहेत. महाराष्ट्राचे पीक ओरबाडून नेत आहेत. मराठीजनांच्या राष्ट्रीय वृत्तीमुळेच सर्वसमावेशक राहिलेल्या महाराष्ट्राची ‘कोणीही यावे चोच मारून जावे’ अशी दयनीय अवस्था या बुजगावण्यांनी करून ठेवली आहे.
संक्रातीचा दिवस संक्रमणकाळाची आठवण करून देणारा असतो. महाराष्ट्राला पुन्हा ऊर्जितावस्था देणारे संक्रमण लवकरच घडो आणि बिनकामाच्या बुजगावण्यांवर बसून आलेली ही संक्रांत लवकरच टळो, याच संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा!