शिवसेनेच्या फुटीनंतरची जरी ही पदवीधर मतदारसंघासाठीची पहिली निवडणूक होती तरी गद्दारांविरुद्ध खुद्दारच निवडून येणार हे स्पष्ट होते. कारण मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेना याचे नाते अतूट आहे.
– – –
मुंबई-कोकण पदवीधर तसेच मुंबई-नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी २६ जून रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस यांनी साम-दाम-दंड नीती वापरली. तरी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अॅड. अनिल परब यांचा २६,०१२ इतक्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला. या मतदारसंघातून १९८८ साली सर्वप्रथम शिवसेनेचे प्रमोद नवलकर विजयी झाले होते. तेव्हापासून गेली ३६ वर्षे या मतदारसंघातून शिवसेनाच विजयी होत आली आहे. ३६ वर्षांपूर्वी मुंबईतील पदवीधरांनी भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी मोडून काढली. तर यंदाही मुंबईतील पदवीधर मतदारांनी पुन्हा एकदा भाजपाला नाकारले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अॅड. अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर विजयी झाले. एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन खासदार निवडून दिल्यानंतर मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा भाजपाला पराभवाची धूळ चारत शिवसेनेला विजयी केले आहे. मुंबईत आवाऽऽज शिवसेनेचाच हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
१९७६ साली शिवसेनेने प्रथमच मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली. त्यावेळी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे तंत्र सेनेला तितकेसे माहित नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार माधव देशपांडे यांना अवधी २९१ मते मिळाली आणि ते पराभूत झाले. जनसंघाचे डॉ. वसंत कुमार पंडित आणि ग. भा. कानिटकर यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे २७२५ व २३४० मते मिळाली आणि ते विजयी झाले. १९७८ सालच्या महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रमोद नवलकर उभे राहिले. त्यांच्याविरुद्ध जनता पक्षाचे मधू देवळेकर उभे होते. डॉ. वसंतकुमार पंडित यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. नवलकर यांना विविध क्षेत्रांतील महनीय व्यक्तींनी पाठिंबा दिला होता. त्यावेळेस मधू देवळेकर यांना ५८४३ मते तर प्रमोद नवलकर यांना १४०८ मते पडली आणि नवलकर पराभूत झाले.
त्यानंतर जुलै १९८२मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपातर्फे मधू देवळेकर, शिवसेनेतर्फे सुधीर जोशी, तर जनता पक्षातर्फे प्रा. सदानंद वर्दे यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत देवळेकर आणि वर्दे विजयी झाले. मतमोजणीच्या सातव्या फेरीअखेरीस शिवसेनेचे सुधीर जोशी अवघ्या १६९ मतांनी पराभूत झाले. कोणाही उमेदवाराला आवश्यक तो ७४५४ मतांचा कोटा मिळाला नाही. एकूण ४२,४२१ मतांपैकी फक्त २४, १७५ जणांनी मतदान केले म्हणजेच हे मतदान जवळपास ५० टक्के झाले. सुधीर जोशींचा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला. आपली मेहनत कुठे कमी पडली याचा शोध घेतला. मग लोकाधिकारच्या सुशिक्षित व नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी नियोजन पद्धतीने शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पुढच्या निवडणुकीसाठी आखणी केली. मग पुढील सर्व निवडणुकीत शिवसेनेला पदवीधर मतदारसंघ जिंकण्यात यश आले.
यशाची मुहूर्तमेढ
मुंबईतील विविध राष्ट्रीय बँका, इंश्युरन्स कंपन्या, विमान कंपन्या आणि राज्य व केंद्रातील विविध कार्यालयांत मराठी पदवीधरांना शिवसेनेमुळे नोकर्या मिळत होत्या. त्यांच्या जीवनमानातही फरक पडला होता. शिवसेनेच्या लोकाधिकार समितीनेच आपल्याला नोकरी देऊन न्याय मिळवून दिला, या भावनेमुळे अशा या बुद्धिजीवी मराठी पदवीधारकांचा ओढा शिवसेनेकडे वाढू लागला होता. मुंबईत मतदारांची नोंदणी जर काटेकोरपणे केली तर महाराष्ट्र विधान परिषदेवर शिवसेनेचा एक आमदार निवडून येऊ शकतो, असा विश्वास शिवसेनेला वाटू लागला. आकडेवारीतील विजयाचे गणित बाळासाहेबांना पटवून देण्यात लोकाधिकार समितीचे नेते व पदाधिकारी यशस्वी झाले.
१९८२च्या निवडणुकीत सुधीरभाऊ जोशींचा निसटता पराभव झाला, परंतु या पराजयातच पुढच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून व लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यालयातून पदवीधरांचा शोध घेऊन त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट केले जात होते. मतदार नोंदणीचा ठोस कार्यक्रम राबविला जाऊ लागला. अशी मराठी पदवीधर मतदारांची नोंदणी शिवसेनेने केली. या नोंदणीला प्रतिसादही चांगला लाभला.
त्यानंतर १९८८ साली झालेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमोद नवलकरांनी मधू देवळेकर यांचा पराभव करून पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे पहिले आमदार होण्याचा मान मिळविला. ‘हा सन्मान लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमांमुळे प्राप्त झाला,’ असे प्रमोद नवलकर नेहमी म्हणत असत. या विजयाने मुंबईतील सुशिक्षित प्ादवीधर व बुद्धिजीवी मराठी वर्ग शिवसेनेच्या मागे आहे, हे दाखवून दिले. या विजयात लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, याची नोंद मराठी वृत्तपत्रांनी घेतली आणि गौरवही केला. प्रमोद नवलकर यांनी १९८८, १९९२, १९९९ असे तीन वेळा पदवीधर मतदारसंघातून विजयी होऊन हॅटट्रिक केली. त्यानंतर झालेल्या प्रत्येक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळाला. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शाखा-शाखांमधून विभागातील मराठी पदवीधर मतदार नोंदणीचा कार्यक्रम धडकपणे राबविला. या त्यांच्या सुनियोजित आखणीमुळे नवलकर निवडून आले. नंतर जून २००६ आणि २०१२ मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. दीपक सावंत निवडून आले.
२०१८ साली लोकाधिकार समितीचे एक उच्चशिक्षित पदाधिकारी विलास पोतनीस यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि तेही ११,५६२ मतांनी विजयी झाले. याही खेपेस कुणी कितीही आटापिटा केला तरी अॅड. अनिल परब हेच निवडून येतील अशी खात्री शिवसेनेला होती. शिवसेनेच्या फुटीनंतरची जरी ही पदवीधर मतदारसंघासाठीची पहिली निवडणूक होती तरी गद्दारांविरुद्ध खुद्दारच निवडून येणार हे स्पष्ट होते. कारण मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेना याचे नाते अतूट आहे. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी गद्दारांचा पराभव करून निष्ठावान अनिल परब भरघोस मतांनी विजयी झाले. त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघातून प्रथमच शिवसेनेचे ज. मो. अभ्यंकर निवडून आले आहेत.
पदवीधर-सुशिक्षित-शिक्षक मतदार हा आपलाच आहे असा भाजपनेत्यांचा भ्रम असतो. पण मुंबईतील या बुद्धीजिवी मतदाराने आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबरोबर आहोत हे दाखवून दिले. लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांनी आणि शाखेशाखेतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारांची रीतसर नोंदणी केली.
मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सुनियोजित प्रचार केला. निवडणुकीच्या दिवशी मतदान होते की नाही यावर शिवसेना पदाधिकार्यांनी लक्ष ठेवले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आखलेल्या रणनीतीनुसार शिवसेना व लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांनी अपरंपार मेहनत घेऊन शिवसेनेला पुन्हा विजय मिळवून दिला. त्यामुळे मुंबई पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून अस्सल शिवसेनेचाच उमेदवार विजयी होण्याचा सिलसिला सुरूच राहील. मुंबई शिवसेनेचीच आहे हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.