□ राज्य सरकारने २० हजार कोटींची जमीन अदानींच्या घशात घातली; दुग्धविकास खात्याच्या साडेआठ हजार हेक्टर जमिनीचा घोटाळा.
■ ज्याला जे येतं, तेच तो करतो. मिंधे, गद्दार घोटाळ्यांपलीकडे काय करणार?
□ क्रिकेटपटूंच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस कशासाठी? मुंबईकरांचा संतप्त सवाल.
■ सगळा सोहळाच गुजरातला घेऊन गेले नाहीत ते नशीब समजा. अशीही मुंबई आणि महाराष्ट्र गुजरातच्या थाळीत सजवून वाढण्यासाठीच इथले तीन वाढपी बसवलेले आहेत.
□ अक्कलकोटमध्ये भाजपच्या माजी आमदाराची दहशत.
■ यांच्या माजी आमदाराचीही दहशत असत असेल, तर आजी आमदार काय करत असतील?
□ मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसची दुरवस्था.
■ अजून तो अडाणीला विकलेला नाही? एवढी मोठी जमीन देशाच्या मालकांच्या नजरेला कशी पडली नाही?
□ एसएनडीटीमधील शिक्षक भरती रखडली; जाहिरात निघून आठ महिने उलटले तरी पदे भरली नाहीत.
■ काय करायचंय मुलींनी शिकून? नाहीतरी चूल आणि मूल यांतच बाईच्या जगण्याचं सार्थक आहे, असं मानणार्यांचीच सत्ता आहे.
□ लालबागच्या महात्मा गांधी रुग्णालयात बेकायदा कॅण्टीनचा धोका.
■ कायदेशीर कँटीनमधून तरी रुग्णांना, नातेवाईकांना फार आरोग्यवर्धक आणि सकस पदार्थ मिळत असतील काय?
□ मुंबईत फुटपाथवर पाय ठेवायला जागा राहणार नाही – हायकोर्टाने व्यक्त केली गंभीर चिंता.
■ आत्ता आहे? हायकोर्टाच्या न्यायाधिशांची एक फुटपाथसहल काढली पाहिजे संपूर्ण मुंबईत. ज्याची ते भीती दाखवत आहेत, ती परिस्थिती इथे येऊन, स्थापित होऊनही बराच काळ लोटला आहे.
□ सरकारने मागण्या लटकवल्याने मोरबे प्रकल्पग्रस्त जॅकवेलवर चढले, धरणाचे गेट तोडले.
■ कधीतरी मुंबईचा पाणीपुरवठा रोखला जाईल, तेव्हाच सरकारला प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या संदर्भात जाग येईल.
□ इतिहासाचे पुरावे हायकोर्टाने तपासायचे का? मराठा आरक्षणप्रश्नी हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला सवाल.
■ सगळं काही हायकोर्टांनीच करायचं आहे, कोर्टांनीच करायचं आहे; उर्वरित स्तंभांकडून आता आशा नाही कसलीच.
□ ठाण्यात चार दिवसांची ‘नौटंकी’- महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी बाहेर पडलेच नाही.
■ वाढीव हप्ते पोहोचले की सगळीकडच्या कारवाया थांबतात, हा इतिहास आहे. वर्तमानात त्यात बदल होण्याची काही शक्यता का असेल?
□ पंतप्रधान आणि अनुराग ठाकूर लोकसभेत सपशेल खोटे बोलले – काँग्रेसची लोकसभा अध्यक्षांकडे लेखी तक्रार.
■ ते काय करणार आहेत? त्यांच्याकडून तटस्थतेची अपेक्षा ठेवणं म्हणजे मोदी कधीतरी खरं बोलतील अशी अपेक्षा ठेवण्यासारखंच व्यर्थ आहे.
□ मिंधेंनी महाराष्ट्राला कर्जाच्या दरीत लोटले; राज्यावर ७ लाख ८२ हजार ९८१ कोटींचे कर्ज.
■ नाहीतरी आता कायमचं घरीच बसायचं आहे, होऊ दे खर्च!
□ ब्रिटनमध्ये ४०० पार! कीर स्टार्मर नवे पंतप्रधान; ऋषी सुनक पायउतार.
■ सुनक पायउतार झाल्यामुळे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाने बनून नाचणारे इकडचे मोदीभक्त जरा गार पडतील, हा एक मोठा फायदा आहे! सनातन संस्कृतीने इंग्लंडवर कब्जा केल्यासारखाच ज्वर चढला होता त्यांना.
□ बेकायदा बांधकामे वाढताहेत, पालिका प्रशासन झोपलेय का? – हायकोर्ट कडाडले.
■ ते जागे आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, रेट ठरवत आहेत, त्यानुसार पटापट व्यवहार होत आहेत, ऑल इज वेल!
□ मंत्र्यांच्या सगेसोयर्यांचा डांबर घोटाळा – जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप.
■ मंत्र्यांचे सगेसोयरे फायदा घेणार नाहीत तर कोण घेणार, जयंतराव? सग्यासोयर्यांना फायदाच होणार नसेल, तर मग मंत्री बनायचं कशाला?
□ मिंधे सरकार मंत्रालयाची जागाही गुजरातला देईल – आदित्य ठाकरे यांचा घणाघात.
■ आधी अजून ती आपल्याकडे आहे की अदानीच्या नावे झाली आहे, तेच चेक करायला हवं आदित्यजी!
□ भाजप आमदाराच्या कोविड उपचार घोटाळ्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल.
■ जेव्हा काम करून दाखवायचं होतं, तेव्हाही घोटाळेच करत होतात? आता भोगा निवडणुकीत.
□ मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांचा ‘मॅनेज’ विजय उच्च न्यायालयाच्या तडाख्यात.
■ तिथे न्याय झाला तर बोलक्या पोपटाचा पोपट करून वायकरांना दिलेल्या सगळ्या क्लीन चिट पण वाया जातील.
□ नागपूरमध्ये शेतकर्यांच्या मदतीचे लाखो रुपये सरकारी बाबूंनी लाटले – शिवसेनेने केली घोटाळ्याची पोलखोल.
■ बाबू लोकांचे बॉस कोण आहेत, तेही उघडकीला आलं पाहिजे. वरून आशीर्वाद असल्याशिवाय एवढी हिंमत होत नाही.
□ फडणवीस, गडकरींच्या भूमीत मिंधे सरकारचा मेट्रो प्रकल्पात भ्रष्टाचार.
■ त्या भूमीतच सगळ्या अनाचाराची मूळ बीजं आहेत, तिथे घोटाळे होणारच.