• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राहुलने धोतर फेडले… शिव, शिव, शिव!

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
July 11, 2024
in मर्मभेद
0

एखाद्या देवऋष्याला लाजवतील इतक्या चमत्कारिक वेशभूषा करून सतरा कॅमेर्‍यांच्या साक्षीने ठिकठिकाणी ऊग्र मुद्रेने पूजापाठ करणार्‍या आणि संविधान सर्वोपरि असलेल्या संसदेत धर्मदंड प्रस्थापित करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष संसदेत हिंदूंच्या एका दैवताचे चित्र दाखवले जाण्याचा विरोध करतो आहे, असे चित्र कधी दिसेल, याची कल्पना कधीच कोणी केली नसेल… पण, हे अघटित विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नव्या लोकसभेतील पहिल्याच भाषणात घडवून आणले… ते भगवान शंकराची प्रतिमा दाखवून त्यातील प्रतीकांच्या आधारे हिंदू धर्माची शिकवण सांगू पाहात होते आणि साक्षात पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह हे सगळे संकेत पायदळी तुडवून त्या भाषणात अडथळा आणत होते… सदनात शिवशंकराची प्रतिमा दाखवल्याने हिंदू धर्माचा अपमान झाला, अशी आवई उठवण्याची वेळ भाजपवर आली, यातच त्यांच्या भोंदू हिंदुत्वाचे धोतर राहुल यांनी किती सहजतेने फेडले, ते दिसून येते. शिव शिव शिव!!
यावेळी जे झाले ते अनेक अर्थांनी वेगळे आणि महत्त्वाचे होते.
आतापर्यंत लोकसभेत काय घडायचे? राहुल गांधी यांनी संसदेत जोरदार, मुद्देसूद भाषण करावे आणि नंतर मोदींनी त्या भाषणातील एकाही मुद्द्यावर न बोलता काँग्रेस, नेहरू, गांधी घराणे यांची टिंगलटवाळी करणारी घासून गुळगुळीत झालेली टेप आणखी विखारी पद्धतीने वाजवावी आणि गोदी मीडियाने मोदींच्या त्या पदाची गरिमा घालवणार्‍या गरळबाजीचा उदोउदो करावा, तेच व्हायरल व्हावं, असा आजवरचा रिवाज होता. पण, आता देशाचीच हवा बदलली आहे आणि आपण ज्याला हजारो कोटी रुपये खर्चून पप्पू ठरवण्यासाठी जंग जंग पछाडले तो काही बाबतीत आपला ‘पप्पा’ ठरण्याच्या बेताला आहे, याची कल्पना नसलेल्या भाजपेयींना राहुल यांनी लोकसभेत ४४० व्होल्टचा झटका दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार आपल्या सभांमधून भाजपच्या शेंडी-जानव्याच्या बनावट हिंदुत्वावर कठोर ताशेरे ओढत असतात. तोच धागा पुढे नेऊन राहुल यांनी लोकसभेत भाजपच्या पायाखालचे हिंदुत्वाचे जाजमच खेचून घेतले. पंतप्रधान, त्यांचा पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडे काही हिंदुत्वाची मक्तेदारी नाही. या देशातला बहुसंख्य समाज हिंदूच आहे आणि त्याचा अहिंसेवर विश्वास आहे. भाजप आणि संघ परिवार यांच्या भुलाव्यात आलेली मंडळी परधर्मद्वेषाचे हिंसक विचार पसरवतात, ही राहुल यांची मांडणी सडेतोड आणि बिनतोड होती.
लगेच पंतप्रधानांनी आपल्या प्रदीर्घ आणि अतिशय कंटाळवाण्या उत्तरात राहुल यांना बालकबुद्धी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी त्यांच्या भाषणात सगळ्या हिंदूंना हिंसक ठरवल्याचा, आपल्या पदाला न शोभणारा नेहमीचा विपर्यासही करून पाहिला. पण, त्यातले काहीच प्रभावी ठरले नाही. या मुद्द्यावर रान उठवण्याचे केलेले सगळे प्रयत्न तोंडघशी पडले. कधी नव्हे ते आधी राहुल यांनी केलेले भाषण अधिक लोकांनी पाहिले आणि मोदींच्या भाषणाकडे लोकांनी सपशेल पाठ फिरवली.
राहुल यांनी लढाईची पहिली फेरी आरामात जिंकली.
राहुल विरुद्ध मोदी अशी लढाई झाली तर ती असमान असेल, राहुल यांच्या अपरिपक्वतेपुढे मोदी (जणू ते परिपक्वतेचा महासागरच आहेत!) कधीही श्रेष्ठ ठरतील, अशी कल्पना गृहीत धरून राहुल यांना शहजादे, पप्पू वगैरे ठरवण्याचा पद्धतशीर कार्यक्रम २०१४पासून सुरू होता. त्यात गोदी मीडियातल्या अर्णब गोस्वामीसारख्या मोदीभक्ताला मुलाखत देऊन हात दाखवून अवलक्षण करून घेण्याच्या राहुल यांनी हाराकिरी करून घेतली होती. त्यामुळे करण थापर यांच्या टोकदार प्रश्नांना उत्तरेच न देता आल्यामुळे ततपप झालेल्या मोदींनी मुलाखत सोडून जाण्याचा केलेला पळपुटेपणा आणि आजवर एकही पत्रकार परिषद घेण्याचंही धारिष्ट्य न दाखवणं ही वस्तुस्थिती झाकली गेली होती. मात्र, भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधी हे राखेतून उभे राहिलेल्या फिनिक्सप्रमाणे उसळून बाहेर आले आणि इंडिया आघाडीने मोदींचा चारशे पार निघालेला अहंकारी रथ पंक्चर करून टाकला.
आता संघपरिवार आणि पक्षाला विचार करण्याची सवडही न देता, घाई करून, धाकदपटशाने अभिषेक करून घेऊन मोदी एनडीएच्या प्रमुखपदावर येऊन बसले आहेत; ‘नीतीश/नायडू डिपेंडंट अलायन्स’ हे एनडीए सरकारचं स्वरूप लक्षात न घेता मोदी जुन्याच खाक्याने वागू पाहात आहेत, पण आता त्यांच्याकडे ना ते संख्याबळ आहे, ना नैतिक बळ. त्यांनी पुन्हा एकदा अहंकारी आत्ममग्नतेचं दर्शन घडवलं तर त्यांची रवानगी सन्मानपूर्वक मार्गदर्शक मंडळात करण्याची संपूर्ण तयारी नागपूरमध्ये झालेली आहे, याची त्यांनाही कल्पना आहेच. म्हणूनच मोदी मंत्रिमंडळापासून लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत सगळीकडे मोदींचे जुने भरवशाचे शिलेदार नेमले गेले आहेत. पण घर फिरले की घराचे वासे कसे फिरतात, याचा अनुभव ज्यांना मोदींनी दिला आहे ते शिवराज मामा चौहान आणि मोदींना कायमच सलणारे योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेते जेव्हा उसळी घेतील, तेव्हा मोदींचे शिलेदार एका घटकेत संघाचे आज्ञाधारक स्वयंसेवक बनतील, यात शंका नाही.
या पार्श्वभूमीवर ज्या मुद्द्यावर भाजपने १० वर्षे अनिर्बंध सत्ता उपभोगली, त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच राहुल यांनी मोदींची थेट कोंडी करून दाखवली आहे. एका विशिष्ट धर्माचा द्वेष म्हणजेच हिंदुत्व, अशी सोपी व्याख्या करून हिंदू धर्माचे कट्टरीकरण करण्याचे प्रयत्न यशस्वी होण्याची मर्यादा आता गाठली गेली आहे, याचे भान मोदींना आणि त्यांच्या भक्तांना येणे कठीण आहे… ते त्यांच्या परिवाराला वेळेत आले, तर बरे. नाहीतर विधानसभा निवडणुकांमध्ये जनताच पुढाकार घेऊन यापुढची वस्त्रे फेडायला सक्षम आणि उत्सुक आहेच!

Previous Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

साता-याचे दैव आणि दैवाचा सतारा!

Next Post

साता-याचे दैव आणि दैवाचा सतारा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.