पंचमदा काळाच्या सोबत होते. भारतातच नव्हे, तर जगभरात संगीतावर काय काय प्रयोग केले जात आहेत, कोणकोणती नवीन वाद्ये वापरात येत आहेत यावर लक्ष ठेवून होते. आरडी एकीकडे स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे वडिलांचे सहाय्यक म्हणूनही काम करत होता. ‘आराधना’ या सुपरहिट चित्रपटाचे काम करत असताना ते आजारी पडले आणि सर्व जबाबदारी आरडीवर आली.
– – –
सर्व कलांचा जन्मदाता म्हणजे निसर्ग… आता हेच बघा ना… भारतीय संगीतात जे प्रमुख सात स्वर आहेत त्यांचाही उद्गम प्राण्यांच्या आवाजांच्या कंपनांपासून झाला असं म्हटलं जातं… मोर, गाय, बकरी, क्रौंच, कोकिळा, घोडा आणि हत्ती यांच्या स्वरापासून क्रमश: सा, रे, ग, म, प, ध, नी या सात सुरांचा जन्म झाला. विशेष म्हणजे हे सूर फक्त गळ्यातूनच बाहेर पडतात असंही नाही तर नाभी, कंठ, छाती, टाळू, जीभ व दात या सहा ठिकाणांहून स्वरांची निर्मिती होते. नाभी ते डोके असा व्यापणारा स्वर म्हणजे ‘षड्ज’ जो संगीतातील अत्यंत महत्वाचा स्वर… अर्थात हे सर्व संगीतातील दिग्गजांचे मत… या सात स्वरांपैकी ‘सा’ म्हणजे ‘षड्ज’ आणि ‘प’ म्हणजे ‘पंचम’ हे दोन स्वर शुद्ध मानले जातात. इतर पाच स्वरात ‘तीव्र’ आणि ‘कोमल’ असे दोन भेद आहेत. असो.
अर्थात आपला विषय संगीताचे व्याकरण हा नाही. तरीही स्वरांची थोडी तोंडओळख करून देण्याचे कारण म्हणजे यात ‘पंचम’ नावाचा एक स्वर आहे. बंगाली संस्कृतीत ‘दा’ या शब्दाला वजन आणि मानही आहे. भारतीय चित्रपट संगीतसृष्टीतील पंचमदा म्हणजे एकदम वेगळं रसायन… विज्ञानातील रसायनांप्रमाणेच संगीतातही रसायने असतात. शिवाय ती विज्ञानातील रसायनांप्रमाणेच तीव्र आणि उपयोजित मृदू अशीही असतात… तर सचिनदा नावाच्या एका अफाट रसायनापोटी दुसर्या एका अनोख्या रसायनानं जन्म घेतला… राहुल देव बर्मन उर्फ पंचम…
लहानपणापासूनच आठही दिशांना संगीताचे स्वरजाल असल्यामुळे राहुल त्यात ओढला गेला नसता तरच नवल! बांध्याने अगदीच किरकोळ वाटणारे सचिनदा संगीतात मात्र चांगलेच वजनदार होते. आपल्या मातृभूमीच्या लोकसंगीताचे चित्रपटसृष्टीत अचूक वापर करणार्या मोजक्याच संगीतकारांपैकी ते एक. विविध प्रांतांतल्या शेकडो गुणी कलावंतांना आपल्या हृदयात आवर्जून स्थान देणारी मुंबई म्हणजे सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची कर्मभूमी. आई मीरा देव बर्मन उत्तम गीतकार. आजी राहुलला ‘तबलू’ म्हणायची. पंचम हे नंतरचे नाव. याही नावाची गंमत आहे. तबलू लहानपणी तारस्वरात रडायचा, ज्याचं कंपन पंचमस्वराइतके तीव्र असे म्हणून तो पंचम. आणखी एक किस्सा सांगितला जातो… बाळ तबलू पाच वेगवेगळ्या आवाजांत रडत असे… अशोककुमार यांनी एकदा या बाळाला रडताना बघितले आणि नाव ठेवले पंचम. खरेखोटे सोडा, या बाळाने पुढे जाऊन संगीतातील सर्व सुरांना मस्त बांधून ठेवले, हे खरे.
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याने एका गाण्याला चाल लावली. ज्याचा पुढे सचिनदांनी ‘फंटूश’ या चित्रपटात वापर केला. ‘ऐ मेरी टोपी पलटके आ’ हे ते गाणे. तसेच ‘प्यासा’मधील ‘सर जो तेरा चकराये’ याची चाल पण त्याचीच. सचिनदांनी मनात आणले असते तर कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकीर्दीची वाट मोकळी केली असती. पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणार्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचिनदांनी शब्द टाकला नसावा. मेहमूद हा विनोदवीर निर्माता-दिग्दर्शकही होता. स्ट्रगल करणार्या कलावंतांचे कलागुण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्यांनी आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढण्याचे ठरविले. संगीतासाठी मेहमूद सचिनदांकडे गेले. पण त्यांच्याकडे वेळच नव्हता. तिथे तबला वाजवत बसलेल्या आरडीवर त्यांची नजर गेली आणि त्याने आरडीला संधी दिली. यात विविध मूडची नऊ गाणी होती. मॉडर्न डान्स, विरहगीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत, यापैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी ‘घर आजा घिर आए…’ हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. पंचमची संगीत कारकीर्द या चित्रपटामुळे सुरू झाली, पण ती बहराला येण्यास आणखी पाच वर्षे लोटावी लागली. मात्र या चित्रपटापासून दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली, जी शेवटपर्यंत टिकली.
प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ व तबलापटू पं. सामता प्रसाद या दिग्गजांकडे राहुलदेवने संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्याच्या शास्त्रीय संगीतावरील आधारित चालींचे मूळ बहुदा इथे असावे. संगीतकार सलील चौधरी यांना तो आपला गुरू मानायचा. माऊथ ऑर्गन हे त्याचं अत्यंत आवडीचं वाद्य. सचिनदांच्या ऑर्केस्ट्रात तो हे वाद्य वाजवत असे. तालाचे त्याला पक्के ज्ञान होते. त्याच्या गाण्यातच नाही तर पार्श्वसंगीतातही या तालवाद्यांचा फार मोठा सहभाग आहे.
१९६६मध्ये विजय आनंद दिग्दर्शित ‘तिसरी मंझिल’ या चित्रपटातील गाण्यामुळे खर्या अर्थाने राहुल देव रसिकांपर्यंत पोहचला. खरे तर ‘तीसरी मंझिल’पूर्वी १९५९मध्ये गुरुदत्तचा सहाय्यक निरंजन याच्या ‘राज’ या चित्रपटासाठी सर्वप्रथम आरडीला साईन केलं गेलं होतं. दोन गाणी रेकॉर्डही झाली, पण नंतर चित्रपट डब्यात गेला तो कायमचा. ‘तीसरी मंझिल’मधील सहाच्या सहा गाणी तुफान हिट झाली. आशाबाई आणि रफीसाहब यांच्या जादुई आवाजाला आरडीने पाश्चात्य वाद्यमेळात अनोख्या पद्धतीने गुंफले. विशेषत: पर्कशन वाद्ये, कीबोर्ड, सुशिर वाद्ये आणि तार वाद्ये यांचा अप्रतिम गुलदस्ताच त्यांनी पेश केला. ‘आजा आजा मै हूँ प्यार तेरा’… या गाण्यातील सुरुवातीचे गिटार, बेस गिटार, कोंगा बोंगो व ड्रम्स अफलातूनच आहे. यातील ‘अअ.. अअ आजा… अ अ आजा…’ने धमालच केली. दोन कडव्यांमध्ये पेरलेले संगीताचे तुकडे म्हणजे आरडी यांच्या ताफ्यात असणार्या वाद्य कलावंताचा क्रिएटिव्ह संगीतमेळाच… या गाण्यात वाजविलेल्या काचेच्या तुकड्यांनी देखील बहार आणली आहे.
या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन हर्मन बेंजिमन यानी केले होते. हा एक वाइल्ड डान्स होता. (हे हर्मन म्हणजे ‘गुमनाम’ चित्रपटातील ‘जान पहचान हो.. जीना आसान हो….’ या गाण्याचे नृत्य दिग्दर्शक; विशेष म्हणजे त्यांच्यावरच हे गाणे चित्रित झाले होते.) या गाण्यातील पाश्चात्य वाद्यमेळ आजही मनाला भुरळ पाडतो. प्रसिद्ध गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनी ‘तीसरी मंझिल’चे निर्माते नासिर हुसेन यांच्याकडे आरडीची शिफारस केली होती आणि त्याने या संधीचे सोने केले. पुढे ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’ व ‘यादों की बारात’ या तीनही चित्रपटात मजरूह व आरडी सोबत होते.
१९६८मध्ये पुन्हा एकदा मेहमूद आणि आरडी एकत्र आले. माझे तर स्पष्ट मत आहे की एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावत असतील तर त्याने ‘पडोसन’ मधील ‘एक चतुर नार…’ हे गाणे आत्महत्येपूर्वी एकदा बघावे… मी खात्रीने सांगतो सर्व काही विसरून तो परत कामाला लागेल… यातील मेहमूद, किशोरदा, केश्टो मुखर्जी, मुक्री व राजकिशोर यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यातील ‘मेरी प्यारी बिंदू… बिंदू रे बिंदू रे’ गाण्यानेही धमाल उडविली आहे. यातील संगीताबाहेरील अनेक वस्तूंचा चक्क वाद्ये म्हणून वापर केला आहे. अर्थात याचे सर्व श्रेय त्यांच्या ताफ्यातील सर्व पर्कशनिस्ट कलावंताना जाते.
आरडी एकीकडे स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे वडिलांचे सहाय्यक म्हणूनही काम करत होता. ‘आराधना’ या सुपरहिट चित्रपटाचे काम करत असताना ते आजारी पडले आणि सर्व जबाबदारी आरडीवर आली. असं म्हटलं जातं की यातील ‘मेरे सपनों की रानी’ आणि ‘कोरा कागज था ये मन मेरा…’ या दोन्ही गाण्यांच्या चाली आरडीनेच तयार केल्या. ‘ज्वेल थीफ’मधील ‘होठों पे ऐसी बात…’ हे गाणे अत्यंत मोजक्या अशा गाण्यापैकी एक आहे, ज्यांत जवळपास सर्वच भारतीय तालवाद्ये व पाश्चिमात्य वाद्यांचा अप्रतिम वापर केला गेला. ८ मिनिट आणि २० सेंकद अशा या प्रदीर्घ गाण्याच्या सुरुवातीचा ऱ्हिदमच मुळी दोन मिनिटांचा आहे. ज्यात तुतारीपासून घुंगरापर्यंतची सर्व वाद्ये कानांना स्पष्ट ऐकू येतात. या चित्रपटाचे संगीतकार जरी सचिन देव बर्मन असले तरी खरी करामत पंचम, बासू चक्रवर्ती आणि मनोहारी सिंग यांचीच आहे, यात वादच नाही.
१९७०-७१चे दशक हे संगीतातील अनेक परिवर्तनाचे दशक होते. ‘कटी पतंग’ ‘कारवाँ’ आणि ‘हरे रामा हरे कृष्ण’ हे तीन चित्रपट या दशकातील माईलस्टोन. याच काळात आरडीची ओळख ‘पंचमदा’ अशी झाली. ‘ये शाम मस्तानी’, ‘ये जो मोहब्बत है’, ‘दम मारो दम’ ही गाणी तेव्हाच्या ऑर्केस्ट्रात हमखास असायचीच. संगीताचा संपूर्ण बाज पंचमने बदलून टाकला. गिटार, लॅप स्टील गिटार, बास गिटार, चेलो, बोंगो, कोंगा, की बोर्ड, सिंथेसायजर, ट्रान्सीकॉर्ड, इलेक्ट्रिक ऑर्गन, सॅक्सोफोन, ट्रॉम्बोन इत्यादी प्रेक्षकांना माहीत नसलेली संगीतवाद्यांची नावे पंचमदांनी अत्यंत कुशलतेने हिंदी चित्रपटसंगीतात वापरली.
मूळ थीमनुसार ‘दम मारो दम’ हे गाणे सुरुवातीला द्वंद्वगीत होते. लतादीदी (चांगली मुलगी) व उषा उथुप (वाईट मुलगी) अशा गाणार होत्या. पण नंतर ते सोलो गाणे झाले आणि आशाबाईंनी गायले. पण यातील कडवे संपल्यानंतरचे आ.. आ… आ.. हे आलाप मात्र उषा उथुप यांचेच ठेवण्यात आले. आनंद बक्षी यांच्या या गीताने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांची कारकीर्द पूढे अधिक वेगाने बहरली ती याच गाण्यामुळे… पण मला मात्र आजही लक्षात राहिले ते या गाण्याआगोदर वाजलेले सिंथेसायजर व इलेक्ट्रिक गिटारीचे सूर… ‘‘It’s a montage of creaking synthesizers, psychedelic guitars, and, of course, vocals nailed by Asha Bhosle in an ear-piercing exposition of sound.’’ हे उद्गार वृत्तपत्रीय कॉलम लिहिणारे डॅनियल शिमन यांचे आहेत. यातील ‘सायकेडेलिक’ हा शब्द त्यांनी गिटारीबद्दल वापरला आहे. ७०च्या दशकातील फार मोठी तरुण पिढी एलएसडीसारख्या ड्रगच्या आहारी गेली होती. हिप्पी संस्कृतीचा तो बहराचा काळ होता. ‘सायकेडेलिक’ हा शब्दही याच ड्रगच्या अनुषंगाने वापरला जातो. या ड्रगचे सेवन केल्यानंतर मानवी मेंदूत नक्की काय उलथापालथ होत असावी याचा कयास करून पंचमदांनी या गाण्यासाठी सिंथेसायजर व इलेक्ट्रिक गिटार ही वाद्ये निवडली. या गाण्याच्या अगदी सुरुवातीला ट्रॉन्सीकॉर्ड या वाद्यावर चरणजीत सिंग या कलावंताने वाजवलले सूर व गिटारिस्ट भूपेंद्र यांनी वाजविलेली गिटार लोक आजही विसरले नाहीत (होय… हे तेच भूपेंद्र ज्यांनी अनेक सुंदर गाणी नंतर गायली). वाद्ये आणि सूर मिळून कसे हिप्टोनाइज करू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण. १९७२च्या बिनाका गीतमालाच्या सर्वोच्च शिखरावरील हे गाणे म्हणजे पंचमदांच्या क्रिएटिव्हिटीचा एक अजोड नमुना होय.
पंचमदांवर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता. यात दुमत असण्याचे कारण नाही. पण त्यांनी अस्सल हिंदुस्तानी संगीताचा वापर करून जी गाणी दिली त्यालाही तोड नाही. ‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब – लता) हे मालगुंजी रागातील मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले गाणे मेलडीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. राग तोडी व खमाजमिश्रित ‘रैना बिती जाए’ (अमर प्रेम – लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यांना फोन केला, ‘हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे, शुभेच्छा…’ असं म्हणाले. पण सचिनदा म्हणाले, हे मी नाही, पंचमने केले आहे, तेव्हा मदन मोहन देखील चकित झाले. यमन कल्याण रागवरील ‘बिती ना बिताई’ (परिचय – भूपेंद्र व लता) ‘आयो कहाँ से घन:श्याम’ आणि ‘जिया ना लागे मोरा’ (बुढ्ढा मिल गया), शिवरजंनी रागातील ‘मेरे नयना सावन भादो’ (मेहबूबा), भैरवीत बांधलेले ‘हमे तुमसे प्यार कितना’ (कुदरत) ही सर्व शास्त्रीय रागावरील गाणी आजही आमच्या ओठांवर सहज येतात. १९६७मध्ये ‘चंदन का पलना’ नावाच्या मीनाकुमारी अभिनीत चित्रपटातील जोगिया रागातील ‘ओ गंगा मैया’ हे गाणे आजही हिंदुस्तानी संगीतावरील त्यांची पकड सिद्ध करते. कलावती रागावर आधारित ‘है अगर दुश्मन’ ही कव्वाली आजही कान तृप्त करते.
पंचमदा काळाच्या सोबत होते. भारतातच नव्हे, तर जगभरात संगीतावर काय काय प्रयोग केले जात आहेत, कोणकोणती नवीन वाद्ये वापरात येत आहेत यावर लक्ष ठेवून होते. शिवाय अस्सल भारतीय लोकवाद्यांचा उपयोग ही तितक्याच ताकदीने करत. साधारण ७० साल असावे. देव आनंद यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’चे काम सुरू होते. हा चित्रपट नेपाळच्या पार्श्वभूमीवर चित्रित होणार होता. या चित्रपटात एक गाणे पहाडी ठेक्यावरील होते… पंचमदा, देव आनंद, संगीत संयोजक बासूदा व मनोहारी सिंग चर्चा करत होते. त्यावेळी मनोहारी सिंग यांनी एका युवकाला आवाज देऊन पंचमदांची ओळख करून दिली व म्हणाले, ‘हा पोरगा नेपाळला असतो. तो मूळ दार्जिलिंगचा आहे. तो त्याच्या एका वाद्यासोबत आला आहे. बघा काही करता आले तर…’ पंचमदा म्हणाले, तू आणलेले वाद्य वाजवून एखादे गाणे म्हणून दाखवशील?’ मग त्या पोरसवदा तरुणाने एक नेपाळी गाणे त्या वाद्यासोबत गाऊन दाखवले. देव आनंद ताडकन उठून म्हणाला, ‘येस.. हाच तो पहाडी ठेका आहे’ आणि पुढच्या दोनच दिवसांत दोन गाणी या वाद्यासोबत रेकॉर्ड झाली. पैकी एक लताबाईंचे गाणे ‘ओ री घुंगरू का बोले रे’ व दुसरे ‘कांचा रे कांचा रे…’ रणजीत गझमर हे त्या तरुणाचे नाव व त्याने सोबत आणले होते नेपाळचे राष्ट्रीय वाद्य ‘मादल’. पंचमदांना हे वाद्य आणि तो तरुण दोघेही भावले. प्रेमाने त्या तरुणाला नाव दिले कांचा आणि त्याला आपल्या टीममध्ये सामील करून घेतले. पुढे मग पंचमदांनी अनेक गाण्यांत मादलचा अप्रतिम वापर करून घेतला. आपल्याकडील ढोलकी वा पखवाजासारख्या दिसणार्या या वाद्याचा ऱ्हिदमसाठी पंचमदांनी खूपच सुंदर वापर केला आहे. ‘होगा तुमसे प्यारा कौन…’ (जमाने को दिखाना है), ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले…’ (अजनबी), ‘दिल में जो बाते है…’ (जोशीला) या गाण्यातील ऱ्हिदम याच वाद्यावरचा आहे. ‘तेरे बिना जिया जाए ना’ या ‘घर’ चित्रपटातील गाण्यात मादल आणि डुगी या फक्त दोनच वाद्यांचा वापर करून गाणे बहारदार केले आहे. त्यांच्या शेवटच्या ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापर्यंत मादल हे वाद्य कायम होते. बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग (बासू मनोहारी) हे दोन कलावंत म्हणजे पंचमदांचे दोन हातच… या सहाय्यकांना पुढे मेहमूदने ‘सबसे बडा रुपय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली. (आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..)
मला स्वत:ला ‘शोले’ या चित्रपटातील गाण्यांपेक्षा त्यांच्या पार्श्वसंगीताने अधिक भुरळ पाडली. अगदी सुरुवातीचा प्रसंग आठवा. एक ट्रेन एका रिकाम्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबते, ज्यातून फक्त एकच व्यक्ती उतरते. गंमत म्हणजे प्लॅटफॉर्मवरही एकच व्यक्ती उभी आहे. एक बारीक संवाद होतो. मग दोघे घोड्यांवर बसतात आणि गिटारची एक अप्रतिम धुन सुरू होते. भानू गुप्ता उर्फ भानूदा… ग्रेट गिटारिस्ट… त्यांनी जे काही वाजविले आहे, त्याला तोड नाही. मग पुढे त्यात मनोहारीदाच्या सॅक्सोफोनची भन्नाट जोड… यात पहाडी व राकट ग्रामीण फील येण्यासाठी मादल, कोंगोबोंगा, तबला आणि मध्येच वाजणारी फ्लूटची शीळ… एकूणात टायटल म्युझिकचा ऱ्हिदम इतका सुंदर झालाय की चित्रपट लगेच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. यातील ‘चल धन्नो…’ अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते, तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा. त्याकाळचे प्रसिद्ध तबलापटू आणि पंचमचे गुरू पं. सामता प्रसाद यांच्या जादुई बोटांची ती कमाल आहे. तसेच गब्बरचा जेव्हा जेव्हा प्रवेश होतो त्यावेळचे पार्श्वसंगीत आठवून बघा. पंचमदाचे सहाय्यक वासुदेव चक्रवर्ती यांनी सेलो (व्हायेलिनचाच एक प्रकार) या वाद्यावर हा चिरत जाणारा आवाज काढला होता. हा आवाज संपताच ऐकू येतो, कितने आदमी थे… हा संवाद आणि रिकामा तो हलणारा झोपाळा व त्या मागे उभा असणारा मास्टर अलंकार… काचेच्या ग्लासात चमच्याने आघात करून केलेला ध्वनी धडकी भरवितो. संगीतातील असे अनेक प्रयोग करत प्रेक्षकांना व रसिकांना भुलविण्याची कामगिरी पंचमदांनी चोखपणे केली आहे.
बर्मन घराण्याच्या ऱ्हिदम ताफ्याचे मुख्य शिलेदार म्हणजे मारुती कीर. अगोदर सचिनदा व नंतर पंचमदा या दोन्ही पिढ्यांचे तेच मुख्य ऱ्हिदम संयोजक. अख्ख्या आयुष्यात मारूतराव बर्मन कुटुंबाशिवाय इतरत्र कुठेही गेले नाहीत. नंतर पुढे याच मारूतरावांचे शिष्य अमृतराव पंचमदाचे ऱ्हिदम संयोजक झाले. पंचमदा त्यांना अमृत काका असे म्हणत. अमृतकाका तबला मास्टर. त्यांच्यासोबत पंचमदांनी अनेक प्रयोग केले. रेसो रेसो हे एक आफ्रिकन वाद्य. पोकळ बांबू पासून तयार केले हे वाद्य साइड ऱ्हिदमसाठी वापरले जाते. मुख्य संगीतातील गती व टोकदारपणा या वाद्यामुळे वाढवता येतो. सुरुवातीच्या काळात रेसो रेसो, खंजिरी, कबाज किंवा लाकडी पट्ट्या साईड ऱ्हिदमसाठी वापरत असत व वादक मुख्य ऱ्हिदमवादकांच्या मागे बसत. रेसो रेसो हे वाद्य अमृतकाका शिकले ते मारूतराव यांच्याकडून. भारतीय प्रेक्षकांना या साइड ऱ्हिदमची जादू सर्वप्रथम अनुभवयाला मिळाली ती ‘तीसरी मंझिल’ या चित्रपटातील संगीतामधून. यातील ‘ओ हसीना जुल्फोवाली’, ‘ओ मेरे सोना रे’, ‘आजा आजा मै हूँ प्यार तेरा’ ही गाणी तुम्ही परत एकदा काळजीपूर्वक ऐकली तर या साइड ऱ्हिदमची जादू नक्कीच समजेल. रेसो रेसो या वाद्याने खरी मजा आणली आहे ती, ‘मेरे सामनेवाली खिडकी में…’ या गाण्यात. सुरुवातीचा किशोरदांचा आलाप संपताच केश्टो मुखर्जी झाडूवर कंगव्याने जो आवाज काढतो ते हे रेसो रेसो वाद्य. अगदी शेवटपर्यंत हे वाद्य वाजत राहते. खरं तर रेसो हे साईड वाद्य असताना त्याला मुख्य वाद्य करून मुख्य वाद्यांना साईड ठेवण्याची कला फक्त पंचमदाच करू जाणे. याच वाद्याने या गाण्यात रंगत आणली आहे. असेच दुसरे एक गाणे म्हणजे, ‘कटी पतंग’ या चित्रपटातील आशाताईंनी गायलेले ‘मेरा नाम है शबनम…’ हे बिंदूवर चित्रित केले गाणे. अख्खं गाणं रेसो रेसो व बोंगो या दोन वाद्यांनी आपल्या खांद्यावर तोलून धरलं आहे. या गाण्यात हे वाद्य अमृतकाकांनी प्रचंड वेगाने वाजवले आहे. सागर चित्रपटातील ‘सच मेरे यार है’ हे गाणे देखील याच वाद्यामुळे कर्णमधुर झाले आहे. आजही भारतातील एकमेव रेसो रेसो मास्टर म्हणून अमृतकाका यांचे नाव घेतले जाते. याचे कर्तेधर्ते अर्थात पंचमदा. पुढे १९८२-८३मध्ये अमृतकाकांनी या वाद्यात बदल केला. त्यांनी हे वाद्य धातूपासून तयार केले. याचा वापर ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातील ‘जाने जा… निशा…’ या गाण्यात केला आहे.
पंचमदांनी वेळोवेळी अनेक प्रयोग केले. म्हणूनच ते मला या क्षेत्रातील संगीत वैज्ञानिक वाटतात. आजच्या आधुनिक संगीताचा मजबूत पाया त्यांनी रचला व तोही मेलडी वजा न करता. जगातील अनेक वाद्याचा वापर करताना भारतीय संगीतातील आत्मा शक्यतो हरवू नये याचही काळजी ते घेत. ‘कारवाँ’मधील ‘दइया ये मैं कहां आ फंसी’सारख्या गाण्यात हास्यनिर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे. ‘चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने – मन्नाडे व लता) पाश्चिमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणार्या पंचमदांनी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील तालवाद्यांचा मेळ ऐकण्यासारखा आहे. ‘पल दो पल का साथ हमारा’ (बर्निंग ट्रेन – रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पंचमदांनी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे. शिवाय मध्येच गाडीच्या वेगाचा तुकडाही पेरला आहे.
‘अ आ इ ई मास्टरजी की आ गई चिठ्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी – किशोर, लता) यातील मधूनमधून पेरलेले संजीवकुमार सुचित्रा सेन यांचे संवाद आणि लता-किशोरचा आवाज म्हणजे पंचमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर. ‘चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं) या गाण्यात पाच सहा छोटी छोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे. ‘आप की कसम’ या चित्रपटातील ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते’ या गाण्यातला ऱ्हिदम जर लक्षपूर्वक ऐकला तर लक्षात येईल की गाणं गाताना खास ऱ्हिदमसाठी काही सेकंद दिले आहेत जे बोल संपल्यावर स्पष्ट ऐकू येतात.
पंचम एकदा दार्जिलिंगला गेले असताना एक तरुणी त्यांना भेटली. ती त्यांची जबरदस्त फॅन. तिने आपल्या मैत्रिणीशी पैज लावली की ती पंचमबरोबर सिनेमाला जाऊन दाखवेल. तिने तसे करून दाखविले. रिता पटेल हे तिचे नाव. १९६६मध्ये पंचमदांनी तिच्याबरोबर लग्न केले. पण हा विवाह टिकला नाही. १९७१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ‘मुसाफिर हूँ यारो’ हे गुलजारच्या ‘परिचय’ चित्रपटातील गाणे घटस्फोट घेतल्यानंतर एका लॉजमध्ये बसून तयार केले. अनेक कलावंताच्या अशा अनेक कलाकृतींना अनेकदा वैयक्तिक भावनांचे कंगोरेही असतात. या गाण्यात वाजवलेला ऱ्हिदम लक्षपूर्वक ऐकला तर असे लक्षात येते की कधी तो अचानक वर जातो, तर कधी एकदम खाली… आयुष्याचा प्रवास असाच तर असतो वर खाली… टांग्यात बसलेला जितेंद्र मिनिटा मिनिटाला हादर्यांमुळे वरखाली होत राहतो. किती अचूक मेळ आहे ना हा! एकदा गुलजार, पंचमदा व आशाबाई भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मनसोक्त भटकले. प्रचंड धमाल केली आणि परत आल्यावर एक अल्बम तयार केला. ‘दिल पडोसी है’ हा अल्बम १९८७मध्ये रिलीज झाला. या तिघांची केमिस्ट्री अनुभवायची असेल तर तुम्ही जरूर ऐका. युट्युबवर उपलब्ध आहे.
त्यांनी स्वरबद्ध केलेली दोन गाणी मला प्रचंड आवडतात. यापैकी पहिले ‘लाखो में एक’ या चित्रपटातील ‘चंदा ओ चंदा’ या गाण्यात किशोरदांचा स्वर अप्रतिम तरल लागला आहे. आजही हे गाणे अंतर्मुख करते. छातीत सलते. एकाकीपणाचा तुरुंगवास तसा अनेक कलावंताच्या वाट्याला आला आहे. पण याही स्थितीत कलावंत उत्तमाचा शोध घेणे थांबवत नाही. दुसरे गाणे ‘इजाजत’ या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास है.’ हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पंचमदांकडे पाठवले, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत? याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यांना माहीत होते. पंचमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला. त्याच काळात त्यांच्या आयुष्यात आल्या आशाताई. १९८०मध्ये दोघांनी लग्नही केले. गुलजार, पंचम व आशाताई यांनी मिळून अनेक सांगीतिक गोफ विणले. पण पंचमदाची ही दुसरी इनिंग्ज देखील खूप यशस्वी झाली असेही नाही.
पंचमदांच्या गाण्याची यादी किती लहान किती मोठी याला काही अर्थ नाही. त्यांनी अत्यंत धाडसीपणे या क्षेत्रात प्रयोग केले व ते यशस्वी करून दाखविले ही साधी बाब नव्हे. कोणत्याही क्षेत्रातील पारंपरिक सांगाड्याला धक्का देणे तसे अवघडच. आम्हा भारतीयांना तर कोणताही बदल एकदम रुचतच नाही. त्यामुळे पंचमदाचे असे अनेक धक्के अनेकांना त्यावेळी पचले नाहीत. पण ते आपल्या प्रयोगशीलतेवर ठाम राहिले. त्यांच्या संगीतमय ताफ्यात किमान शे दीडशे वादक होते. भारतीय आणि पाश्चात्य संगीतातील सर्व उत्कृष्ट वादक हे त्याचं बलस्थान होतं. आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि संगीताचं भान त्यांनी कधीच सुटू दिलं नाही. त्यांचे काही सहकारी वादक ज्यांनी सत्तरी ओलांडली आहे ते आजही त्यांच्या आठवणीने व्याकूळ होतात. (युट्युबवर त्यांच्या मुलाखती बघता येतील) प्रत्येक वादक कलावंताशी संगीताच्या पक्क्या धाग्यांनी घट्ट बांधलेले होते पंचमदा…
ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. ‘है अपना दिल तो आवारा’मधील वाजवलेली हर्मोनिका आजही टवटवीत वाटते. ‘शोले’मधील कातरवेळी एकेक दिवा विझवणारी जया भादुरी व पार्श्वसंगीतातील अमिताभने वाजविलेले हार्मोनिकावरील स्वर मनाला स्पर्शून जातात. १९८०च्या आसपास बप्पी लाहिरी या संगीतकाराचा उदय झाला व अनेक निर्माते त्यांच्याकडे वळू लागले. बॉक्स ऑफिसवरही पंचमदांची गाणी तग धरेनात. नासीर हुसेनसारखा निर्माता, ज्याने १९६६पासून त्यांना आपल्या चित्रपटासाठी साईन केले, त्यांनीही पाठ फिरवली. सुभाष घई यांनी ‘राम लखन’साठी त्यांना घेण्याचे वचनही मोडले व तो चित्रपट लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना मिळाला. १९८८मध्ये पंचमदांना हार्टअटॅक आला. शस्त्रक्रियेसाठी ते लंडनलाही गेले. या काळात त्यांनी अनेक चाली तयार करून ठेवल्या. १९८९मध्ये त्यांनी विधू विनोद चोपडाच्या ‘परिंदा’ व ‘१९४२ : अ लव्हस्टोरी’साठी संगीत दिले, जे त्यांच्या मृत्यूनंतर लोकप्रिय झाले. ‘थेनमाविन कोंबथ’ (तामीळ) हा त्यांनी साइन केलेला शेवटचा चित्रपट पण त्याचे संगीत देण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
चित्रपटविश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात सोडून गेले. संगीताच्या क्षेत्रात पर्वतासारखी उंच कामगिरी करणारे पंचमदा कौटुंबिक आयुष्यात मात्र सूर लावू नाही शकले, याची बोचणी मनाला आहेच. शुद्ध स्वराचे प्रतीक असलेला ‘पंचम’ खाजगी आयुष्यात मात्र बेसूर झाला. वयाच्या अवघ्या ५५व्या वर्षी हा शुद्ध स्वर कायमचा विसावला.