लोकशाही
इतके निगरगट्ट मन
कोणी नाही पाहिले
मृत्यूतांडव सुरू याचे
भान नाही राहिले
मुडद्यांच्या पडल्या राशी
यांना सोयरसुतक नाही
तुटून पडले विरोधकांवर
हास्य-विनोदाची घाई
दोन मिनिटांत शोक आटपून
चालू झाला यांचा तमाशा
घाटकोपरला तेच केले
गुंडाळला जनतेने गाशा
—– —– —–
सामान्य मतदार
इतका मार खाऊनसुद्धा
सुंभ जळाला कायम पीळ
आता तोंड लपवायला
नाही सापडत मोठे बीळ
निवडणुका जिंकण्यासाठी
हिंदुत्वाच्या मारती गप्पा
अतिरेकाची हद्द झाली
जनतेचीही मर्जी खप्पा
रोज होते गर्वहरण
तरीही जात नाही माज
उंचावरूनी खाली घसरण
तरीही वाटत नाही लाज
—– —– —–
राहुल गांधी
रोज आता लोकसभेत
देतो लाफे सणसणीत
आहे आमचे सच्चे नाणे
वाजते कसे खणखणीत
काँग्रेस काँग्रेस आणीबाणी
का करता हा उगाच घोष
दहा वर्षांत दिवे पाजळलेत
शोधा आधी आपले दोष
राष्ट्रपती मुर्मूसुद्धा
लिहून दिलेले वाचती भाषण
मोदी-शहांच्या सांगण्यावरून
काँग्रेसला त्या देती दूषण
—– —– —–
नरेंद्र मोदी
लोक म्हणतात हरलो तरीही
पंतप्रधान झालो कसा
पाशवी बहुमत नसले तरीही
ढोंगीपणाचा घेतलाय वसा
स्वप्नातही विरोधक दिसतात
माझ्यावरती येती चालून
सर्वांगाला घाम फुटतो
अंगावरही घेतो पांघरूण
राहुल बोलण्यास उठतो तेव्हा
मनात वाटते खूप भीती
नजर माझी झुकते खाली
दर्पोक्तीची होते माती
—– —– —–
अंधभक्त
मोदींमुळेच देशात आली
हिंदुत्वाची मोठी लाट
आम्ही बुडून तरलोसुद्धा
जनतेने जरी टाकली खाट
मोदी म्हणजेच विश्वगुरू
आम्ही त्यांचे गातो गान
त्यांनीच स्वत:ला मोठे केले
जरी लोकांनी केले लहान
टाळ्या वाजवून गजर करतो
आम्ही म्हणतो मोदी मोदी
देश गहाण पडला तरीही
फाटणार नाही त्यांची गादी