काँग्रेसने मला ९१वेळा शिव्या दिल्या होत्या, हा आरोप पंतप्रधान मोदीजींनी केल्यावर कोट्यवधी भारतीयांप्रमाणे माझा परमप्रिय मानलेला मित्र पोक्या याचीही तार सटकली. त्याचं डोकंच फिरलं. तो तावातावाने माझ्याशी वाद घालू लागला. मी म्हटलं, त्यापेक्षा तू मोदींना भेटून खातरजमा का करून घेत नाहीस? मोदी अजिबात खोटं बोलणार नाहीत. ज्याअर्थी त्यांनी ९१ हा शिव्यांचा आकडा दिला, त्याअर्थी त्यात सत्याचा अंश नव्हे तर मोठा डोस असणार. तू त्यांना भेटून खात्री करून घे. त्यावर पोक्या म्हणाला, आजपर्यंत आपल्यालाही कोणी मटक्याचा आकडा इतक्या खात्रीलायकपणे दिला नव्हता. मी प्रत्यक्ष दिल्लीला जातो आणि त्यांची मुलाखत टेप करून आणतो… आज ती मुलाखत माझ्या टेबलावर आहे. ती ऐकाच तुम्ही.
– नमो नम: मोदीजी. खास तुमची मुलाखत घेण्यासाठी सकाळच्या फ्लाईटने मुंबईहून दिल्लीला आलो.
– मला तसे संकेत मिळाले होते. तू मला त्या ९१ शिव्यांबद्दल विचारणार आहेस ना?
– तुम्ही कसं ओळखलंत?
– आता मला त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधल्या नेत्रासारखी दिव्य शक्ती प्राप्त झालीय. सर्व देवांचे स्मरण करून कपाळावर उजवा हात धरला की मला भविष्यकाळ आणि भूतकाळातील घटना दिसतात. मला काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत कितीवेळा शिव्या दिल्या हा प्रश्न मी त्या दिव्य शक्तीला विचारल्यावर तिने माझ्या डोळ्यांसमोर ९१ हा आकडा झगमगीत प्रकाशझोतात उघडझाप करताना दाखवला.
– पण तुम्ही त्यावर विश्वास कसा ठेवलात! मला तर स्वप्नात काय वाटेल ते दिसतं. एकदा तर मी गृहमंत्री झाल्याचं दिसलं. जाग आल्यावर मात्र मी निराश झालो.
– तुमची गोष्ट वेगळी आणि माझी वेगळी. संकेत मिळाल्यावर मी काही गप्प बसलो नाही. सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. कोणत्या काँग्रेस मंत्र्याने कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि कोणत्या स्थळी मला कोणत्या शिव्या दिल्या त्याची तपशीलवार नोंद मी मागवली. २०१३पासून १ एप्रिल २०२३पर्यंतची नोंद आता माझ्या कॉम्प्युटरमध्ये फीड केलीय. त्याशिवाय त्या त्या शिव्यांच्या प्रसंगाचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही कॉम्प्युटरमध्ये एकत्र करून सुरक्षित ठेवलंय. वाटल्यास मी तुलाही ते दाखवू शकतो. काही काँग्रेस नेत्यांनी मला एकाच भाषणात दोन किंवा चार शिव्या दिल्या असल्या तरी मी एकाच भाषणात एकच शिवी दिल्याची अधिकृत नोंद गृहित धरली आहे. अन्यथा एकूण शिव्यांची संख्या ४९१ एवढी झाली असती. शेवटी, राजकीय सभ्यतेची चाड काँग्रेसला नसली तरी भाजपला नक्कीच आहे. मला तर असला शिव्याबिव्यांचा पाचकळपणा अजिबात आवडत नाही. आमची ती संस्कृतीच नाही. आम्ही थेट हिशोब कसे करतो ते तुम्हाला माहीतच असेल.
– काय असतं, मोदीसाहेब, भाषण करतेवेळी अनेक नेत्यांची जीभ घसरते. काहींची सुसाट सुटते तर काहींची थोडीफार वळवळते. भाजपसकट सर्वच पक्षात असे काही नेते आहेत, ज्यांच्या बेताल बडबडीमुळे तो पक्ष अडचणीत येतो. तुम्ही एकच करू शकता, भाषणात कोणी विरुद्ध पार्टीला शिव्या दिल्या तर त्याला आजन्म काळ्या पाण्याच्या शिक्षेचा कायदा पास करून घेऊ शकता.
– माझाही तोच विचार आहे, पण काळे पाणी वगैरे नको. मी काही वेगळ्या शिक्षांचा विचार करतोय.
– पण भाषणात शिव्यांवर बंदी आणली तर नेते शिव्यांचा वापर न करता इतर अपशब्द वापरतील त्याचं काय?
– त्याबाबत माझी गृहमंत्री अमित शहाजी, फडणवीसजी, महाविद्वान किरीट सोमय्याजी यांच्याबरोबर दीर्घ चर्चा सुरू आहे. त्यातल्या त्यात भाषणात वापरता येतील अशा शाकाहारी म्हणजे शिव्यांचा शब्दकोश कोल्हापूरचे पाटीलजी आणि पार्ल्याचे तावडेजी तयार करीत आहेतच. कारण आपल्याला या देशातील विचारस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे. मात्र त्यावर सरकारची सेन्सॉरशिप अर्थातच राहील. ती शिवीसंस्कृतीला कायमची नष्ट करण्यासाठी. हे काँग्रेसवाले मला ९१ शिव्या देऊ शकतात तर इतर नेत्यांची काय कथा!
– तुम्हाला प्रथम आणि नंतर दोन-चारवेळा ज्या काँग्रेस नेत्यांनी शिव्या घातल्या त्यांना तुम्ही ताबडतोब जाब विचारायला हवा होता. तुम्ही तो का विचारला नाही?
– त्याला कारण होतं. त्यांच्याकडे शिव्यांची संपत्ती किती आहे आणि त्यातही शिव्यांची व्हरायटी किती आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. पण ते तर ९१वरच संपलं. त्यांनी शिव्यांची सेंच्युरी मारल्यानंतरच मी हा गौप्यस्फोट करणार होतो. पण ते समाधानही त्यांनी मला लाभू दिलं नाही.
– पण सर, शिव्यांचे कितीतरी प्रकार आहेत, हे तुम्हाला मी सांगण्याची जरुरी नाही. प्रत्येक भाषेत शिव्यांचे कोठार समृद्ध आहे. तुमच्या गुजरातीतही भरपूर शिव्या असतील. हिंदीतही असतील. पण मी तुम्हाला अभिमानाने सांगेन की आमच्या मराठीतील शिव्यांइतक्या शिव्या जगातील कोणत्याही भाषेत नसतील. माणूस शिव्या कधी देतो, तर राग अनावर झाल्यावर. मग तुम्हाला ९१ शिव्या साडेनऊ वर्षांत देणार्या काँग्रेस नेत्यांना तुमचा एवढा राग का बरं यावा?
– कोणत्याही नेत्याने मला शिव्या द्याव्या इतकं वाईट काम मी कधीही केलं नाही. प्रत्येकाच्या खात्यात दहा-पंधरा लाख जमा होतील, महागाई नाहिशी होईल, सगळीकडे आबादी आबाद होईल यांसारख्या अनेक थापा मी २०१४च्या निवडणुकीत मारल्या होत्या. पण त्या थापा होत्या याची कबुलीही मी दिली होती. तरीही काँग्रेसवाल्यांनी त्याचे भांडवल करून मला ९१ शिव्या दिल्या. मी म्हणूनच हे सहन केलं. आमच्या अमित शहाजींच्या बाबतीत असं घडलं असतं तर त्यांनी या शिवीबहाद्दरांचं काय केलं असतं याची फक्त कल्पना करून पाहा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, शिव्या देणे ही आमच्या पक्षाची संस्कृती नसली तरीही आमचे नेतेही काँग्रेस नेत्यांपेक्षा इरसाल शिव्या देऊ शकतात हे मी लवकरच सिद्ध करून दाखवणार आहे. त्यासाठी काँग्रेसबरोबर शिव्यांची जंगी जाहीर स्पर्धा आयोजित करणार आहे. मग बघाच तुम्ही, कोण जिंकतं ते!