शरद गोविंदराव पवार हे नाव महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात कायमचे अढळपदावर स्थानापन्न आहे. राजकारणात सतत ५६ वर्षांपासून एकदेखील पराभव न पहाता आमदार, खासदार म्हणून निवडून येणे हा भारतातच नाही तर जगातील लोकशाहीत एक विक्रम ठरलेला आहे. पवार लोकांमध्ये जाऊन, लोकशाही मूल्यांना शिरोधार्य मानून प्रत्येक निवडणूक लढवतात आणि विजय मिळवतात. त्यासाठी त्यांना आजवर ना जय बजरंग बली म्हणावे लागले ना जय श्रीराम! वैचारिक व्यभिचार करून त्यांनी कधी निवडणुकीत विजय मिळवले नाहीत. शरद पवार कोणा संस्थानिकांचे, राजघराण्यांचे वा राजकीय घराण्याचे वारस नाहीत, तर बारामतीच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले ते एक सर्वसामान्य भूमिपुत्र होते. शिक्षणासाठी पुण्याला आले आणि पदवीचे शिक्षण घेत असतानाच सक्रीय राजकारणात उतरले. वयाच्या २७व्या वर्षी कोणतेही आर्थिक आणि राजकीय पाठबळ नसताना महाराष्ट्र विधानसभेत प्रस्थापित दिग्गजांना हरवून आमदार म्हणून निवडून गेले होते. अर्थात, याचे मोठे श्रेय महाराष्ट्राचे पहिले ‘साहेब’ यशवंतराव चव्हाण यांच्या पारखी नजरेला द्यावे लागेल. प्रथम आमदार झाल्यानंतर ११ वर्षांनी, वयाच्या ३८व्या वर्षी शरद पवार देशातील सर्वात शक्तिशाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सत्ता कायम त्यांच्यासोबत सावलीसारखी चालली. देशाचे ते संरक्षणमंत्री झाले, कृषी मंत्री झाले. इतकी वर्षे राज्य अथवा देशस्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करणे आजवर फक्त पवार आणि तामिळनाडूचे दिवंगत नेते एम. करुणानिधी या दोघांनाच जमले आहे.
मुंबईत दोन मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन समारंभात त्यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सहजपणे पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची जाहीर घोषणा केली. या घोषणेनंतर सुरुवातीला सभागृहात टाळ्या पडल्या, म्हणजेच पवारांनी नक्की किती गंभीर घोषणा केली, याचा सभागृहालाही आधी अंदाज आला नव्हता. इतके हे राजकीय ट्रेडमार्क झालेले शरद पवारांचे जबरदस्त धक्कातंत्र होते. वयाच्या ८३व्या वर्षीदेखील जो माणूस उठता-बसता दिवसाचे बारा पंधरा तास ज्या प्रकारे लोकांचे प्रश्न ऐकून घेतो, तोडगा काढतो, राज्याचेच नाही, तर देशाचे राजकारण, समाजकारण यांत सक्रिय रहातो, क्रीडाविश्वात वावरतो, साहित्य संमेलनात रमतो, चित्रपटविश्व, उद्योगविश्वात वावरतो आणि एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा ताकदीने खेडोपाडी प्रवास करतो, त्या माणसाला अचानक वैराग्य येणार आणि तो वानप्रस्थाश्रमात जाणार, हे या महाराष्ट्राला धक्कादायक होते. शिवाय ते पटेल तरी कसे? पवारांच्या प्रत्येक धक्कातंत्राची पटकथा आणि त्याचे दिग्दर्शन पवार स्वतः करत असले, तरी राजकीय नाट्यातली पात्रे वेगवेगळी असतात, पण यावेळी या धक्कातंत्रातील मुख्य पात्र देखील ते स्वतः होते. हे धक्कातंत्र बंद खोलीतून अथवा मुलाखतीतून न वापरता जाहीर अराजकीय कार्यक्रमातून डागणे हे देखील नवीनच होते.
एरवी पवार साहेबांच्या अशा समारंभाला महाराष्ट्रातील झाडून सर्व पक्षाच्या प्रमुखांनी, मोठमोठ्या उद्योगपतींनी हजेरी लावली असती. पण साहेबांनी इतर पक्षांतील मित्र व हितचिंतकांना यावेळी बोलावलेच नव्हते तर फक्त राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आरक्षित केल्यासारखा हा कार्यक्रम आखला गेला होता. तो का त्याचा उलगडा त्यांनी केलेल्या धक्कादायक घोषणेतून झाला.
हा निर्णय हा एका राजकीय नाट्याचा भाग होता की काय अशी शंका घेण्यास नक्कीच वाव राहतो. कारण निवृत्ती जाहीर केल्यावर त्यांनी पुढील निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या पक्षाच्या समितीवरही पवारांचेच वर्चस्व स्पष्ट दिसत होते. दोन दिवसांनी या शीर्षस्थ समितीची बैठक झाली आणि त्यात निवृत्तीचा निर्णय नामंजूर केला गेला व सरतेशेवटी परत शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते, आहेत आणि राहणार हे अधोरेखित झाले. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर करताना पदाचा राजीनामा देतो आहोत, असं एकदाही म्हटलेलं नव्हतं. सर्वोच्च समितीने निर्णय नामंजूर केल्यावर तो न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा अधिकार पवारांना होताच. म्हणजेच पवारांची निवृत्ती ही एक छोटीशी टाचणी होती, भाजपाचा फुगा फोडला. महिनाभर राष्ट्रवादी आता भाजपासोबत जाणार असा हा फुगा फुगवला गेला होता. त्यातली हवाच पवारांनी काढून टाकली.
देशात आज सर्वच प्रादेशिक पक्षांवर भाजपाचा पाशवी वरवंटा फिरतो आहे. त्यांच्या अमानुष तोडफोडीतून स्वतःचे अखंडत्व आणि अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू आहे. महाराष्ट्रात तर रात्रच नव्हे, तर दिवसही वैर्याचेच आहेत. राष्ट्रवादीच्या काही सदस्यांना काही भुरळ पडली असणे शक्य आहे. पण, पवारांची साथ सोडून जाणे ही राजकीय आत्महत्या ठरेल, याचे भान पवारांनी एकाच खेळीत त्यांना आणून दिले आहे.
गेला महिनाभर प्रसारमाध्यमांनी हा एक खेळ रंगवला होता, तारखा दिल्या जात होत्या, अजित दादांना टार्गेट केले जात होते. ते नॉट रिचेबल आहेत, अशा ब्रेकिंग न्यूज दाखवल्या जात होत्या. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा पवार हे भाजपाच्या संपर्कात आहेत, अशा बातम्यांना ऊत आला होता. अजितदादांनी वारंवार खुलासे केले, वैताग व्यक्त केला, पण ‘बातम्या’ थांबल्या नाहीत. अजित दादा भाजपसोबत संधान बांधण्याचे तयारीत आहे, अशी बातमी ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी दिली होती. पहाटेच्या शपथविधीचे भाकित करणारे आणि त्यावर आधारित चेकमेट या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक ब्रेकिंग न्यूज देतात, तेव्हा त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असते. या विश्वासार्हतेमुळेच पुढचे सगळे रामायण घडून आले.
याला कारणीभूत आहे ती महाराष्ट्रात कधीही नव्हती इतकी भयंकर राजकीय अस्थिरता. महाशक्तीच्या नादाने शिवसेनेशी गद्दारी करून गेलेल्या गद्दारांचे सरकार वाममार्गाने स्थापन झाल्यानंतर ही कायमस्वरूपी अस्थिरता राज्याच्या वाट्याला आली आहे. शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याची तलवार गद्दारांच्या डोक्यावर टांगलेली आहे, तशी ती तथाकथित महाशक्तीच्या डोक्यावरही टांगलेली आहे. हा निकाल येण्याच्या आधीच सत्तेची भाकरी फिरवली जाणार, अशा चर्चांना ऊत आला होता. मग पर्यायी समीकरणे काय असू शकतात, याच्या जुळवणीत अजितदादांकडे नजरा वळल्या. मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांच्या गटातील १६ आमदार निलंबित झाले, तर सरकार वाचवता येणार नाही, त्यासाठी आता दुसरा पक्ष फोडावा लागेल, ही सत्तालोलूप महाशक्तीची मजबुरी त्यामागे आहे. इथली जमीन थोडीफार मऊ लागते, असं वाटल्याने खोदकामे देखील सुरू झाली होतीच. अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर का उगाच झळकले असतील? मुख्यमंत्री शिंदे तीन दिवस रजा टाकून गावी का गेले असतील? कर्नाटक प्रचाराची रणधुमाळी असताना अमित शहा यांनी मुंबईला धावती भेट का दिली असेल?
शरद पवार या सर्व राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. सजग होते. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणातल्या कुचंबणेने त्रस्त होऊन पवारांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासूनच पक्षाच्या जहाजाचे सुकाणू त्यांनी कसलेल्या कप्तानासारखे सांभाळले आहे. स्थापनेपासून सतत ४० ते ७१ आमदार सतत निवडून आणले आहेत. देशभरात भाजपाला जे जमले ते महाराष्ट्रात नाही जमले, कारण इथे त्यांच्या स्वघोषित चाणक्यांची गाठ खर्याखुर्या महाचाणक्याशी आहे. सध्याचा राज्यातील आणि देशातील राजकीय प्रवाह प्रतिकूल आहे, वातावरण अनुकूल नाही तर वादळी आहे आणि समोर भाजपा नावाचा खडक उभा आहे, अशावेळी दैवाला दोष देत त्या खडकावर आपटून राष्ट्रवादी पक्षाचे जहाज फुटू देणे अथवा सुकाणू फिरवून ते सहीसलामत बाहेर काढणे या दोन पर्यायांमधील दुसरा पर्याय पवारांनी वापरला. राजकीय कसब वापरून पक्ष सुरक्षित करताना त्यांनी त्याला ओरखडा देखील येऊ दिला नाही, इतकेच काय, जहाजातील उंदरांना देखील उडी मारून बाहेर जाऊ देण्याची संधी त्यांनी दिली नाही.
पवारांना व त्यांच्या पक्षाला बरेचदा चार खासदारांचा पक्ष असे हिणवले जाते आणि इतके कमी खासदार असून पंतप्रधान व्हायची घाई असलेले नेते असे उपहासाने म्हटले जाते (हे बरळण्यात महाराष्ट्रातले विशिष्ट विचारांचे लोक आघाडीवर असतात, यात काही आश्चर्य नाही).
पवार ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर त्यानंतरचा पुढचा मोठा राजकीय टप्पा आपसूकच देशाच्या पंतप्रधानपदाचा असतो. त्यात काही गैर नाही. गुजरातसारख्या महाराष्ट्रापेक्षा सर्व क्षेत्रांत पिछाडीवर असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जर ते स्वप्न पडू शकतं, तर पवार देशातल्या सगळ्यात शक्तिशाली राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. काँग्रेसने जर मजबूत प्रादेशिक नेतृत्त्वाचे खच्चीकरण करण्याचे दरबारी राजकारण केले नसते तर शरद पवारच नव्हेत, तर पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी असलेल्या ममता बॅनर्जी देखील आज ना उद्या पंतप्रधान बनू शकल्या असत्या. संख्याबळ नसल्याने पवार पंतप्रधान बनू शकले नसले तरी पदांच्याही पलिकडे जाऊन जे राजकारणी मोठे होतात, त्यात त्यांची गणना होते. देशाच्या, राज्याच्या जडणघडणीतील योगदान पाहून जनता हे अढळपद देते. पवारांनी स्वतःच्या मतदारसंघाचा कायापालट केला हे तर सर्वज्ञात आहे पण त्यांचे योगदान आजच्या महाराष्ट्रात सॉफ्टवेयर उद्योग, वाहन उद्योग, बांधकाम व्यवसाय, कृषी आणि खाद्य उद्योग, साखर व इथेनॉल उद्योग, आयपीएलसारखा खेळातून मनोरंजन करणारा उद्योग असे अनेक उद्योगांना लागणारी पोषक परिस्थिती आणि पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यात देखील फार मोठे आहे. महाराष्ट्र आज प्रगत राज्य आहे आणि पुरोगामी देखील आहे, यात शरद पवारांचा वाटा सर्वात मोठा आहे (त्यामुळेच ते राज्यातल्या धर्मांध टोळ्यांच्या टार्गेटवर नेहमी असतात).
पवारांच्या धक्कातंत्राने महाविकास आघाडीही सुरक्षित झाली आहे. आज राज्यात महाविकास आघाडीचीच हवा आहे. पोटनिवडणुकीचे निकालही तेच सांगतात आणि राज्यभर सुरू असलेल्या वङ्कामूठ सभांना मिळणारा प्रतिसादही तेच सांगतो. तरीही ज्यांना शंका असेल, त्यांनी फक्त एकच विचार करावा, प्रचंड धनशक्ती, राज्याची एकहाती सत्ता आणि आसुरी सत्ताकांक्षा असूनही भारतीय जनता पक्ष निवडणुका का घेत नाही? राज्यातील वातावरण मिंध्यांना अनुकूल नाही, सत्तेसाठी भाजपने केलेल्या खेळीने मोठ्या प्रमाणात मतदार दूर गेला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर फोडाफोडीचे राजकारण करण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी याच मार्गाने पुन्हा खिळखिळाr करण्याच्या महाशक्तीच्या इराद्यांना पवारांनी एक सुरुंग लावला आहे… अर्थात लढाई फार दूरवरची आहे. एक तात्पुरता विजय दिलासा देऊ शकतो, पण त्यावर विसंबून राहून चालणार नाही. या काळात महाशक्तीचे डाव उलथवून टाकण्यासाठी पवार सक्रिय राजकारणात आहेत, ही राष्ट्रवादीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी जमेची गोष्ट आहे.