रात्रीचे दोन वाजले होते पण त्या हॉलमधल्या लखलखाटाने जणू दुसरा सूर्य पृथ्वीवर आणून उतरवला होता आणि त्या सूर्याच्या साक्षीने अनेक तारे तिथे मुक्तपणे पार्टीचा आनंद लुटत होते. हे सर्व जण खरे खुरे तारे नसले, तरी लाखो करोडो लोकांच्या नजरेतले तारे आणि गळ्यातले ताईत नक्की होते. जवळपास अर्धे बॉलिवुड त्या पार्टीला हजर होते म्हणा ना. सलग तीन फ्लॉप चित्रपटांनंतर अभिनेत्री स्वप्नाचा ’धूल का फूल’ हा चौथा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि त्या निमित्ताने तिने ही जंगी पार्टी दिली होती. खरे तर चित्रपटातील तिची भूमिका एका फुले विकणार्या नॉन ग्लॅमरस स्त्रीची होती. मात्र चटर्जीदांसारखा दिग्दर्शनाच्या क्षेत्रातला दादा माणूस हा चित्रपट करतोय हे कळल्यावर ती अखेर तयार झाली. चटर्जीदा देखील आधी ह्या भूमिकेसाठी एका नव्या, नॉन ग्लॅमरस चेहर्याच्या शोधात होते. स्वप्नाची एकूण कारकीर्द बघता त्यांनी तिला ह्या भूमिकेसाठी निवडणे हे आश्चर्यच होते. मात्र ह्या क्षेत्रात अनेक अनपेक्षित गोष्टी सर्रास घडत असतात, हे देखील तेवढेच खरे होते…
…पार्टीत स्वप्नाचा मॅनेजर अली जातीने सगळ्यांवर लक्ष ठेवून होता. कुठे जरा देखील चूक होणार नाही ह्याची काळजी घेत होता. चटर्जीदा अशा पार्ट्यांपासून लांबच राहत असत, मात्र त्यांनी कास्टिंग डायरेक्टर अमरच्या हातून त्यांच्या वतीने एक पुष्पगुच्छ आणि एक सुंदर कविता छापलेले ग्रीटिंग स्वप्नासाठी पाठवले होते. रात्री सव्वा तीनच्या सुमाराला एकेक तारे हळुहळू अस्ताला जायला लागले आणि साडेतीनपर्यंत पार्टीची शान पूर्ण ओसरली. वेटर्सनी शेवटची आवराआवरी सुरू केली आणि अली एका सोफ्यावर जरासा विसावला. मात्र आज त्याच्या नशिबात आराम लिहिलेला नसावा. इव्हेंट मॅनेजमेंटच्या टीममधील एका पोरीने जोरदार किंकाळी मारली आणि उरले सुरले सर्व लोक त्या दिशेने धावले. किंकाळी मारणारी पोरगी जमिनीवर बेशुद्ध पडली होती आणि ती जे काही दृश्य बघून बेशुद्ध पडली होती, ते होते स्टेजच्या मागच्या भागात पसरलेल्या अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्याचे आणि त्यात पडलेल्या स्त्रीच्या कलेवराचे.
अलीने हिंमत करून त्या स्त्रीच्या प्रेताला सुलटे केले आणि उपस्थित सर्वांना जबर धक्का बसला. ती तरुणी म्हणजे ह्या क्षेत्रात अलीकडेच पुढे येत असलेली नवोदित अभिनेत्री मेघना होती. तिचा चेहरा दिसताच स्वप्नाला प्रचंड धक्का बसला. मेघनाने देखील स्वप्नाच्या आधी ’धूल का फूल’साठी ऑडिशन दिली होती आणि चटर्जीदांची पहिली निवड देखील तीच होती, अशी चर्चा होती. मात्र स्वप्नाच्या ऑडिशननंतर अचानक चित्र बदलले आणि मेघना मागे पडली. त्या घटनेनंतर दोघींच्यात सारे काही आलबेल नसल्याची देखील चर्चा होती. मात्र मेघनाने स्वप्नाच्या पार्टीला हजेरी लावून तिच्या बाजूने मनात काही खेद नसल्याचे दाखवून दिले होते. स्वप्ना मटकन बाजूच्या कोचावर बसली आणि इकडे अलीने थरथरत्या हाताने पोलिसांना फोन लावला.
– – –
फोरेन्सिकची टीम आपले काम आटपेपर्यंत इन्स्पेक्टर रत्ना शांतपणे एका बाजूला उभी राहून परिस्थितीचा आढावा घेत होती. मेघनाचा गळा धारदार हत्याराने चिरल्याचे स्पष्ट दिसत होते, मात्र झटापट झाल्याच्या काही खुणा बाहेरून तरी दिसून येत नव्हत्या. टीम फोटोग्राफर्सचे लखलखाट संपले, इतर सोपस्कार पार पडले आणि इन्स्पेक्टर रत्नाने आता चपळाई दाखवली.
’येस डॉक?’
’खून गळा चिरून झाला आहे हे तर स्पष्ट दिसते आहेच. एखादी पातळ आणि धारदार सुरी वापरण्यात आली असावी. केटरिंगच्या वस्तूंमध्ये अशा काही सुर्या आहेत. त्या आम्ही ताब्यात घेतल्या आहेत. बहुदा खुन्याने खून केल्यानंतर सुरी व्यवस्थित धुऊन पुन्हा इतर भांड्यांमध्ये ठेवून दिली असावी. लॅबमध्ये केमिकल प्रोसेस केल्यावर काय ते समोर येईल. पण अशा परिस्थितीत फिंगरप्रिंटस मिळणे अवघड आहे.’
’इतर काही पुरावे?’
’बॉडीच्या उजव्या कानाच्या पाळीखाली छोटासा खरचटल्याचा व्रण आहे. बहुदा खुन्याने गळा चिरला तेव्हा त्याचे ब्रेसलेट अथवा अंगठी तिथे जोराने घासली गेली असावी.’
रत्नाने पुन्हा एकदा प्रेताचे नीट निरीक्षण केले आणि मेघनाची बॉडी हालवण्यात आली. हवालदार मोरे आणि तावडेंना बरोबर घेऊन इन्स्पेक्टर रत्नाने स्टेज आणि आजूबाजूची पुन्हा एकदा तपासणी करायला सुरुवात केली आणि इतर पोलीस दलाने हॉलचा ताबा घेतला. संशयास्पद असे कुठेच काही आढळले नाही. तपासणीचे काम उरकून आता रत्नाने उपस्थितांकडे मोर्चा वळवला. मेघनाचे प्रेत सापडताच बहुतेकांनी पळ काढलेला होता. इव्हेंट मॅनेजमेंटचे मोजके लोक, स्वप्ना आणि मॅनेजर अली तेवढे तिथे हजर होते. स्वप्नाची अवस्था बघता रत्नाने आपला मोर्चा अलीकडे वळवला.
’मी अली हसन, स्वप्ना मॅडमचा
मॅनेजर..’ रत्नाशी हात मिळवणी करत अलीने परिचय दिला.
’मेघनाला तुम्ही कसे काय ओळखता?’
’एकदोनदा स्टुडिओमध्ये गाठ पडली होती आणि आणि काही पार्टीजमध्ये देखील. अर्थात हाय हॅलोच्या पलीकडे फारशी ओळख नाही. आणि त्यातून चटर्जीदांचा चित्रपट स्वप्ना मॅडमला मिळाल्यापासून ती सरळ सरळ मला टाळायला लागली होती.’
’असे का?’
’त्या चित्रपटासाठी मेघनाने देखील ऑडिशन दिली होती आणि हा चित्रपट स्वप्ना मॅडमने तिच्याकडून हिसकावून घेतला असे बहुदा तिचे मत झाले होते.’
’ती तसे काही बोलली? किंवा दाेघींमध्ये काही वाद?’
’आमच्या क्षेत्रात एकमेकांवर कितीही राग असला, तरी तो प्रत्यक्षात कधीच व्यक्त होत नसतो. आडून आडून किंवा इशार्याने तो दर्शवला जातो.’
’मेघनाने असे काही केले होते?’
’स्पष्टपणे नाही, पण एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने ह्या क्षेत्रात प्रस्थापित लोक नवोदितांना कसे डावलतात ह्यावर तिरकस भाष्य केले होते आणि चार दिवसांपूर्वी तिचे अमरशी देखील वाद झाले होते म्हणे.’
’अमर?’
’धूल का फूल’चा कास्टिंग डायरेक्टर.’ रत्नाने समजल्याप्रमाणे मान डोलवली आणि अमरचा पत्ता आणि नंबर टिपून घेतला.’
’आज अमर देखील इथे आला होता?’
’हो आला होता, पण दोघांनी एकमेकांकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. रादर, मेघना येताच महत्त्वाच्या व्यक्तींचा निरोप घेत अमर अवघ्या पंधरा मिनिटात बाहेर देखील पडला.’
’आणि मेघना?’
’ती त्यावेळी पार्टीच्या गर्दीत हरवली होती.’
’साधारण किती लोक असतील त्या वेळेला?’
’अंदाजे शंभर दीडशे तरी नक्की.’ रत्ना काही क्षण विचारात पडली आणि मग तिने आपला मोर्चा स्वप्नाकडे वळवला.
’मला खयच काय माहिती नै..’ लडखडत्या जिभेने स्वप्ना बोलली. तिची एकूण अवस्था बघता तिच्याशी ती व्यवस्थित शुद्धीत आल्यावरच बोलावे हे रत्नाच्या लक्षात आले. इव्हेंट मॅनेजमेंटवाले बिचारे पर्याय नसल्याने तिथेच थांबलेले होते. कामात प्रचंड गर्क असलेल्या त्या पोरांकडून फारशी काही माहिती हाताला लागणे शक्य नव्हते. त्यांच्याकडे जुजबी चौकशी करून त्यांचे डिटेल्स टिपून घेतल्यावर रत्नाने त्या सगळ्यांना घरी पिटाळले. अर्थात अशी विचित्र वेळ असल्याने त्या ग्रुपमधल्या पोरींची जाण्याची सोय तिने पोलीस जीपमधून केली.
’मॅडम आमच्या काही वस्तू तुमच्या लोकांनी जप्त केल्यात.’
’हो काही सुर्या आम्ही ताब्यात घेतल्यात. त्यापैकी एकीचा वापर खुनाचे हत्यार म्हणून केला गेलाय का हे लॅबमध्ये टेस्ट करून तपासायचे आहे. रक्ताचे डाग धुतले तरी केमिकल प्रोसेसने ते वस्तूवर शोधता येतात,’ रत्नाने माहिती दिली आणि पोरं बाहेर पडली.
स्वप्नाच्या पार्टी हॉलमधून रत्ना बाहेर पडली आणि तिने ड्रायव्हरला थेट अमरच्या घराकडे गाडी घेण्यास सांगितले. त्याच्या घराजवळ काही अंतरावर साध्या वेषातले दोन पोलीस दिसताच तिने गाडी कडेला घेण्यास फर्मावले.
’सावंत काय बातमी?’
’मॅडम तुम्ही फोन केल्या केल्या आम्ही इथे हजर झालो. अमरच्या घरावर आम्ही लक्ष ठेवून होतो, पण आतापर्यंत घर बंद होते. आता पाच मिनिटांपूर्वी अमर घरी आला आहे.’
’इतक्या उशिरा?’ मनातल्या मनात आश्चर्य व्यक्त रत्नाने अमरच्या घराकडे कूच केली.
डिंग डाँग बेलचा आवाज पहाटेच्या वातावरणात चांगलाच घुमला.
’कल दे दिया ना पेपर का बिल..’ चिडक्या आवाजात अमरने दार उघडले आणि समोर पोलीस बघून तो हडबडला. दारूचा वास सर्वांच्याच नाकाला जाणवून गेला.
’मिस्टर अमर अग्रवाल?’
’येस?’
’काल रात्रभर तुम्ही कुठे होतात?’
’ते मी तुम्हाला का सांगावे?’ अमरची नशा आता जरा उतरायला लागली असावी पण गुर्मी कायम होती.
’अभिनेत्री मेघना जैस्वालचा खून झालाय आणि त्या केसमध्ये तुम्ही प्राइम सस्पेक्ट आहात!’ धारदार आवाजात रत्ना म्हणाली आणि अमरने आधारासाठी पटकन शेजारचे दार पकडले.
सावंतांच्या निगराणीत चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन अमर बाहेर पडला तेव्हा तो जरा सावरलेला दिसत होता.
’येस मिस्टर अमर, काल रात्री तुम्ही कुठे होतात?’
’आधी तर मी स्वप्ना मॅडमच्या पार्टीला हजेरी लावली आणि त्यानंतर मी सरळ पिटर्स पॅरेडाईजला गेलो आणि रात्रभर तिथे दारू पीत बसलो.’
’दुःखी होतात का घाबरलेला होतात?’
’म्हणजे?’
’रात्रभर दारू पीत बसण्याचे कारण? मनाला काही दुःख झाले होते का हातून घडलेल्या पापाने मनात भीती साठली होती.’
’कसले पाप?’
’मेघनाच्या खुनाचे..’
’नो नो! मी मेघनाला मारलेले नाही. खरे तर काल रात्री तिला पार्टीत पाहिल्यावर मलाच माझे मन खायला लागला होते. श्वास गुदमरायला लागला तिथे. त्यामुळे मी बाहेर पडलो.’
’कारण?’
’धूल का फूल’च्या लीड रोलसाठी मेघना का स्वप्ना असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा मी स्वप्नासाठी चटर्जीदांना फोर्स केले होते. त्यामुळे मेघना माझ्यावर नाराज होती.’
’पण हे तर इथे सर्रास घडते. त्यात नाराजी कसली?’
’धूल का फूल’च्या रोलसाठी मेघनाच सर्वात योग्य होती. तिचा प्रेझेन्स आणि अभिनय दोन्ही ह्या रोलसाठी सर्वात सरस होता. हे मला देखील माहिती होते आणि तिला देखील,’ मान खाली घालत अमर पुटपुटला.
’आणि हे सगळे माहिती असून देखील तू..’
’पन्नास लाख रुपये आणि मी भविष्यात ज्या चित्रपटांसाठी तिला रेफर करेन त्यांच्या कमाईतला हिस्सा कबूल केला होता स्वप्नाने मला.’
’आणि हे सगळे मेघनाला कळले आणि त्यामुळे तुमच्यात भांडण झाले. हे सत्य उघड होऊ नये म्हणून तू तिचा काटा काढलास.’
’काय बोलताय मॅडम हे? खरे तर हे सगळे घडल्यानंतर मला स्वत:चा इतका राग येत होता की आत्महत्या करावी असे वाटत होते. मी खून काय करणार कोणाचा?’
’सध्या तरी मी तुला अटक करत नाहीये अमर. पण शहर सोडून कुठेही जायचे नाही आणि बोलावले की पोलीस चौकशीसाठी लगेच हजर व्हायचे.’
अमरने शहाण्यासारखी मान डोलवली आणि पोलीस पार्टी तिथून बाहेर पडली.
’सावंत माणूस जरा लबाड वाटतो आहे. त्याच्या घरावर लक्ष असेच चालू राहू द्या.’
’येस मॅडम!’
– – –
दुपारी एकच्या सुमाराला स्वप्नाच्या बंगल्यावरून फोन आला आणि इन्स्पेक्टर रत्ना आणि तिची टीम ताबडतोब बंगल्यावर दाखल झाली. स्वप्ना आता बरीच सावरलेली दिसत होती. तिच्या सोबतीसाठी अली देखील हजर झालेला होता. अलीशी हस्तांदोलन करत रत्ना स्वप्नाच्या समोर बसली, तेव्हा रत्नाचा चेहरा बराच विचारी दिसत होता.
’काल जे काही घडले त्याचा तुम्हाला धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण आम्हाला आमची चौकशी पुढे न्यायलाच लागणार.’
’मी समजू शकते. विचारा तुम्हाला काय विचारायचे आहे ते.’
’अमरच्या चौकशीत आम्हाला तुमच्या आणि त्याचा गुप्त कराराबद्दल समजले,’ रत्नाच्या बोलण्यावर स्वप्नाचा चेहरा झटकन पडला आणि तिने गोर्यामोर्या चेहर्याने अलीकडे पाहिले.
’कसला करार?’ अली देखील बुचकळ्यात पडलेला दिसला.
’त्या कराराबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. अलीला देखील..’
’चित्रपटात रोलच्या बदल्यात पन्नास लाख आणि पुढे तो मिळवून देणार्या प्रत्येक रोलसाठी वेगळे पैसे त्याला द्यायचे तुम्ही कबूल केले होतेत तर?’
’अमर प्रचंड हुशार आहे आणि कोणाला कुठला रोल फिट होईल, हिट जाईल ह्याची त्याला व्यवस्थित समज आहे. मी खरेतर दोन चार दिवसात त्याला सरळ माझा मॅनेजर होण्याची ऑफर देणार होते. मी तसे त्याला सुचवले देखील होते,’ खाली मान घालत स्वप्नाने कबुली दिली आणि अलीचा चेहरा काळा पडला.
’अली तू एक चांगला मॅनेजर आहेस. पण एकाच वर्षात सलग तीन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर मला एका मजबूत आधाराची गरज होती. आय एम सॉरी,’ स्वप्ना पडेल सुरात अलीला समजावती झाली. अली फक्त मान खाली घालून उभा होता.
’मिस स्वप्ना, आमच्या तपासात असे उघड झाले आहे की खुनासाठी कालच्या पार्टीमधलीच सुरी वापरण्यात आली होती. तिच्यावर रक्ताचे डाग देखील आम्हाला मिळाले आहेत. तुमचा कोणावर संशय आहे?’
’नो!’
’तुमचे आणि स्वप्नाचे काही बोलणे झाले काल?’
’नाही तिने येऊन फक्त माझे अभिनंदन केले आणि लगेच ती पार्टीमध्ये मिक्स झाली. त्यानंतर ती फक्त एक दोनदा माझ्यासमोर आली असेल.’
’मॅडम, लेडी कॉन्स्टेबल सुनंदा गायधनींचा फोन आहे. तुमच्याशी बोलायचे आहे,’ तावडेंनी आपला फोन रत्नाकडे दिला.
काहीशा आश्चर्याने रत्नाने फोन कानाला लावला, ’बोला गायधनी..’
पुढची दोन मिनिटे रत्ना फक्त हुंकारत राहिली आणि क्षणाक्षणाला तिचा चेहरा बदलत गेला. काहीसे स्मितहास्य चेहर्यावर ठेवत तिने फोन कट केला.
’आय विल एक्सपोज हिम… धडा शिकवणार आहे मी त्याला,’ अलीकडे बघत रत्ना पुटपुटली आणि क्षणार्धात त्याचा चेहरा गोरामोरा झाला.
’हेच म्हणाली होती ना मेघना?’ दरडावणीच्या सुरात रत्नाने विचारले आणि पळून जायचा प्रयत्न करणार्या अलीवर तावडेंनी झडप घातली.
’अली काल तुझ्या हातात ब्रेसलेट होते आणि आज ते नाही हे मघाशी हात मिळवताना माझ्या लक्षात आले आणि तेव्हाच मला खरेतर तुझा संशय आला होता. मेघनाचा गळा चिरताना ते तिच्या कानाखाली घासले गेले होते आणि त्याला रक्त लागले होते. मी धुतलेल्या वस्तूंवर देखील रक्ताचे डाग शोधता येतात हे सांगितले आणि तू सावध झालास.
’हे सगळे खोटे आहे. अमरचा मला अडकवण्याचा डाव आहे. त्याला मॅनेजर बनायचे आहे ना.’
’अली, काल जेव्हा इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुलींना घरी सोडले तेव्हा त्यांच्याबरोबर आमच्या गायधनी मॅडम पण होत्या. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका मुलीने घरी फोन लावण्यासाठी फोन हातात घेतला, तेव्हा प्रकाशामुळे गायधनींचे तिकडे लक्ष गेले आणि त्यांना स्क्रीनवर लास्ट डायल नंबर दिसले. त्यातला एक नंबर त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहिला, कारण त्याचे शेवटचे तीन आकडे ७८६ होते. आज जेव्हा मी तुमच्या सगळ्यांचे नंबर सर्व माहिती काढण्यासाठी आमच्या टीमकडे पाठवले तेव्हा तुझा नंबर बघून त्यांना पटकन कालचा प्रसंग आठवला. त्यांनी ताबडतोब त्या मुलीकडे चौकशी केली आणि तू काल तिला कसे भुलवले ते आमच्या लक्षात आले.’
’मी कबूल करतो..’ शांत स्वरात अली म्हणाला. बारा तासात स्वप्नाला बसलेला हा दुसरा धक्का होता.
’गेल्या आठवड्यात मी काही कामासाठी आधी न कळवता थेट बंगल्यावर आलो आणि मला मॅडम आणि अमरचे फोनवरचे बोलणे कानावर पडले. माझ्या जागी अमर आला असता तर मी काय करणार होतो. ह्या वयात कोण मला काम देणार? त्यातही सलग तीन चित्रपट फ्लॉप दिलेल्या अभिनेत्रीच्या मॅनेजरला? मग मी नीट विचार केला आणि एक प्लॅन आखला. मला मिळालेली माहिती मी मेघनापर्यंत पोहोचवली. अपेक्षेप्रमाणे मेघना आणि अमरचे कडाक्याचे भांडण झाले. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे मेघनाने चटर्जीदांकडे न जाता सार्वजनिक ठिकाणी हे सत्य उघड करायचे ठरवले आणि त्यासाठी तिने मुद्दाम ही पार्टी निवडली. माझी त्याला देखील हरकत नव्हती. मॅडमची बदनामी झाली असती, तरी त्यांना अमरने असे करायला भाग पाडले, त्यांच्यापाशी पर्याय नव्हता अशी सहानुभूती मी निर्माण केली असती. अमरचे मात्र करिअर पूर्ण संपले असते. त्याची बदमाश आणि लालची अशी प्रतिमा निर्माण झाली असती. अशा बदनाम माणसाला पुन्हा जवळ करण्याचे धाडस स्वप्ना मॅडमने देखील केले नसते. त्या देखील कचाट्यात सापडल्या असत्या. पण संतापाच्या भरात ती मूर्ख मेघना माझे नाव देखील जाहीर करायला निघाली आणि मी घाबरलो. मी बाहेर राहिलो तर मॅडमचे करिअर वाचवू शकणार होतो आणि स्वतःचे देखील. पण माझेच नाव समोर आले असते तर मॅडमनी मला देखील लाथ मारली असती हे नक्की. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अमरची पार्टीतून बाहेर पडण्याची गडबड सुरू झाली आणि मी धास्तावलो. तिथेच काम करत असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुलीला मी ती कशी सुंदर आहे, मॉडेल बनू शकते असे सांगत गप्पात गुंगवले आणि तिथली एक सुरी पळवली. ’महत्त्वाचा पुरावा द्यायचा आहे’ असे सांगून मी मेघना बॅकस्टेजला बोलावले आणि…’ अलीचा हुंदका दाटून आला आणि त्याने तिथेच जमिनीवर बसकण मारली.