व्हॉट्सअपचा, फेसबुकचा डीपी कधीच न बदलणार्या माणसाचा स्वभाव कसा असतो?
– रोहित सोनवणे, औरंगाबाद
याला म्हणतात स्वत:चा डीपी ठेवायचा झाकून नी दुसर्याचा बघायचा व्ह्यू करुन (डीपीत दिसतो तसा माणूस नसतो.. आधार कार्डवर दिसतो तसा असतो).
आपोआप स्वच्छ होणार्या काचांच्या चष्म्यांचा शोध कधी लागेल?
– अभिजीत घोडके, सातारा
स्वच्छ मनाने बघायची सवय लागेल तेव्हा खराब चष्म्यानेसुद्धा स्वच्छ दिसेल (असं बोलायचं… लिहायचं… हमखास टाळ्या मिळतात.)
कुत्रा जगातला सगळ्यात इमानदार प्राणी आहे, असं माणूस म्हणतो, पण मग तो कुत्र्याकडून काही शिकत का नाही?
– श्रीराम पाचपोर, पाचोरा
पण कुत्र्याने माणसाला शिकवायला हवं ना… कुत्र्यांना एव्हाना कळलं असेल माणसाला कितीही चांगलं शिकवा… तो त्याच्या जातीवरच जाणार… (माणसाच्या जातीवर जाणार).
शेतकर्यांच्या प्रश्नावर शेतकरी नसताना ट्वीट करणारा सचिन तेंडुलकर कुस्तीगीर महिलांच्या आंदोलनावर, स्वत: खेळाडू असूनही, का व्यक्त होत नसेल?
– दीपक जोशी, दादर
तुमच्या मुलाला, मुलीला करियर करायचं नसेल, म्हणून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल…
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देण्यासाठी कोणता मुहूर्त शोधला जातोय?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे
असे मुहूर्त निवडणूक आयोगाच्या पंचांगाप्रमाणेच शोधावे लागतात ना?? (असं मी ऐकून आहे.)
बायको भाकर्या करत होती. मी जाऊन भाकरी फिरवण्याचा प्रयत्न केला आणि तवा बायकोच्या पायावर पडला. तिने नंतर त्यानेच मला चटका दिला. हे असं का घडलं असेल?
– रामसिंग यादव, पोलादपूर
भाकरी फिरवणं ही गोष्ट भाकरी खाण्याएवढी सोपी नाही. त्यासाठी ‘लोक आपल्या सांगाती’ असले तरी बायकोला विश्वासात घ्यावं लागतं. अशा करामती करायला डोकं १२ मतीचं लागतं.
माणसाने वयाच्या ८३व्या वर्षीसुद्धा निवृत्त होता कामा नये, असा आग्रह धरणार्या लोकांचं प्रेम आसुरीच नाही का हो पवार साहेब?
– माधवी शेंडे, अमरावती
ज्यांच्यावर प्रेम करावं ते जवळचे, नात्यावर सुरी फिरवून लांब जाणार असतील. तर आसुरी प्रेम करणारे लांबचे, जवळ करावे लागतात.
‘यदाकदाचित भाग २’ घेऊन येत आहात तुम्ही, त्याबद्दल अभिनंदन. पण, पहिला भाग आला तेव्हाचं वातावरण वेगळं होतं, आता भावना दुखावण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. तुम्हाला भीती नाही वाटत?
– सुगंधा चापेकर, चिंचवड
आतली गोष्ट ही आहे की हे नाटक पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे या नाटकात भावना दुखावून घ्यायला काही निमित्त नाही सापडलं, तर काहींच्या भावना दुखावतील, याची मला भीती वाटते.
अनेक नवरे बायकोचा मोबाइल हक्काने तपासतात. तुमच्याकडे काय स्थिती?
– रोहित पाटील, पनवेल
नवरे हक्क गाजवतात ही अंधश्रद्धा आहे आणि आमच्याकडे अशा अंधश्रद्धेला थारा नाही. आम्ही पुरोगामी असलो तरी आमच्याकडच्या बायका वाडवडिलांची परंपरा पाळणार्या आहेत.
मला दारू सोडायची आहे, पण दारू मला सोडत नाही, मी काय करू?
– पवन नारदे, कोल्हापूर
जग सोडेपर्यंत दारू धरून बसा. तुमच्या प्रश्नावरूनच कळतंय तुम्हाला चांगल्या शब्दात सांगितलेलं कळत नाही. त्यामुळे अशा शब्दात सांगितल्यावर कदाचित तुम्ही दारू सोडली तर सोडली.
जो उथळ स्वभावाचा चमकेश तरुण असतो, त्याच्यावर अनेक तरुणी मरतात आणि साध्या सज्जन माणसाकडे त्या ढुंकूनही पाहात नाहीत. नंतर नवरा सज्जन नाही म्हणून ओरडण्यात काय अर्थ?
– बाळकृष्ण खुळे, नागपूर
ज्या पदरात पडलाय तो पदर पवित्र माना. उगाच आता ओरडण्यात काही अर्थ नाही. बाळकृष्ण राव असा खुळेपणा करू नका.