□ गवळींच्या ‘भावना’ पायदळी; हिंगोलीत भाजपचा बंडखोर.
■ अरेरे, वाईट झालं… असंही म्हणता येणार नाही… हेच होणार होतं, तेच झालं… अशीच एकेक फाइल क्लोज होत जाणार.
□ ‘कोरोना योद्ध्यांची चौकशी कशासाठी?’ हायकोर्टाने विचारताच मिंध्यांची बोलतीच बंद.
■ फक्त ठाकर्यांना आणि शिवसेनेला त्रास द्यायला, असं उत्तर देण्याची हिंमत असती तर मुळात गद्दारी केली असती का?
□ अजब न्याय ‘जाती’चा… रश्मी बर्वे यांना निवडणूक लढण्यास मनाई, पण नवनीत राणा यांना मात्र दिलासा.
■ न्यायालयात न्याय मिळत नाही, न्यायालयात मिळतो त्याला न्याय म्हणायचं असतं, असं म्हणतात, त्याचा पडताळा येतो कधी कधी…
□ भाजपला मदत होईल असे काम मी करणार नाही – आनंदराज आंबेडकर.
■ ये हुई ना बात! इतकी स्पष्टता पाहिजे. तर आंबेडकर आडनाव लावण्याला काही अर्थ.
□ राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून.
■ आता हे निकाल न्यायालयात नाही, जनतेच्या न्यायालयात लागणार आहेत… तिथे घड्याळ काट्यांसह भंगारात जाणार आहे.
□ मिंधे सरकारने पालिकेची ९५ लाखांची पाणीपट्टी थकवली.
■ यांचे शेपूमंत्री पालिकेत ऑफिस थाटून मुंबईच्या भकासीकरणाला पूर्णत्वाला नेण्यासाठी जातीने देखरेख करायला बसले होते, ते काय उगाच?
□ काही निर्णय रातोरात घेता, तेव्हा तत्परता कुठून येते? – हायकोर्टाने मिंधेंचे कान उपटले.
■ कशाला बिचार्यांचे कान उपटता? त्यांना कसलीच पावर नाय! दिल्लीतून आदेश आला की त्याची पूर्तता करावीच लागते हुकमाच्या गुलामांना.
□ विखे-पाटलांच्या साखर कारखान्यात १९१ कोटींचा घोटाळा.
■ भाजपमध्ये आहेत ना? मग कसला घोटाळा नि कसलं काय? ईडी आणि सीबीआयवाले ईडी फुंकत आय पॅडवर सिनेमा बघत बसले असतील!
□ ‘मॉब लिंचिंग’ रोखण्यासाठी कोणती पावले उचललीत? – हायकोर्टाचा मिंधे सरकारला सवाल.
■ केंद्र सरकारने आजवर उचलली तीच, हे एकमेव उत्तर असू शकतं या प्रश्नाचं.
□ मोदींच्या आशीर्वादाने बिहारमध्ये नवी घराणेशाही.
■ सगळ्या देशभरात दुसरं काय आहे? काँग्रेसला नावं ठेवायची, त्यांच्याकडचे सगळ्यात भ्रष्ट लोक उचलून घ्यायचे, त्यांना पदं द्यायची, घराणेशाहीच्या नावाने शंख करायचा आणि तीच घराणेशाही आपल्याकडे चालवायची… रेटून खोटं बोलत राहायचं फक्त…
□ पुढचे २० दिवस झोपू नका; बच्चू कडू यांचे भावनिक आवाहन.
■ तुम्ही हव्या तशा कोलांटउड्या मारा, असंगांशी संग करा आणि आता भावनिक आवाहनं करा! उपयोग काय त्यांचा?
□ कर्नाटकात भाजपात बंडखोरी; के. एस. ईश्वरप्पा अपक्ष लढणार.
■ चला, एकामध्ये तरी दम आहे म्हणायचा!
□ दहा वर्षे खासदारकी भोगूनही जनता श्रीरंग बारणेंना ओळखत नाही – संजोग वाघेरे यांचा मिंधे गटावर पलटवार.
■ बारणे यांच्या नशिबी आता हारणे आहे म्हणायचे! मग घरी बसून माशा मारणे!
□ भ्रष्टाचार दडपण्यासाठीच तटकरेंनी घेतल्या भाजपच्या कुबड्या.
■ जाहीर आणि घाऊक कुबड्यावाटप त्यासाठीच केलेलं आहे भाजपने. दिव्यांगांसाठीचा हाच एक खराखुरा कार्यक्रम आहे त्यांचा!
□ चिराग पासवान यांना झटका; पक्षातील २२ नाराज पदाधिकाऱ्यांचा राजीनामा.
■ चिराग विझणार बहुतेक आता राजकारणातून कायमचा!
□ मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भीषण पाणीटंचाई.
■ एकेकाळी तलावांचं शहर म्हणून ओळख होती की नाही, आता पाणीटंचाईचं शहर ही ओळख झाली… हेच ते बदलते ठाणे!
□ मद्यधोरण घोटाळा भाजपने केला, मोदी सरकारने नाहक केजरीवालांना गोवले – आप नेते संजय सिंह यांचा गौप्यस्फोट.
■ आधीच मर्कट, तशातही मद्य प्यायला, अशी भाजपची पहिल्यापासूनची अवस्था आहेच… त्यात पुन्हा नवा घोटाळा करायची गरज काय पडली?
□ शिंदे-फडणवीस सरकारमध्येही गैरव्यवहाराचे प्रयत्न; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट.
■ प्रयत्न कसले, घसघशीत गैरव्यवहारच आहेत थेट… फक्त या सुपारीबाजाला ते दिसणार नाहीत… इतका दूध का धुला असेल तर निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्याबद्दल बोल की रे बाबा! तो तर जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे!
□ बंगळुरू बॉम्बस्फोटात हात; भाजपच्या कार्यकर्त्याला अटक.
■ …आणि म्हणे आम्ही दहशतवाद गाडून टाकला!
□ निम्मे खासदार आणि आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात; वडेट्टीवार यांचा दावा.
■ आता उपयोग काय? गद्दारांना दारं बंद म्हणजे बंद!
□ लालू कवितेतून म्हणाले, नरेंद्र मोदी खोटारडे.
■ त्यासाठी कविता करण्याची गरज काय? शिवाय देश का बच्चा बच्चा तो वैसे भी जानता है…
□ कंगना राणावतचे डोके फिरले; म्हणे सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान.
■ तिला मुंध्रा पोर्टवर फिरवून आणा… स्वच्छ हवा मिळावी म्हणून हो!
□ ईडी, ईओडब्ल्यूला हायकोर्टाचा दणका; पीएमसी घोटाळा प्रकरणात वाधवान पिता-पुत्राला जामीन.
■ चुकीच्या माणसांना अकारण अटक केल्याबद्दल या यंत्रणांच्या प्रमुखांना सक्तमजुरीवर धाडण्याची तरतूद होत नाही, तोवर यांची गुर्मी उतरणार नाही.