दक्षिणेतल्या किंवा इतर प्रादेशिक सिनेमांच्या नायकांप्रमाणे मराठी सिनेमांतल्या अभिनेत्यांना स्टार सुपरस्टारचा दर्जा का नाही मिळत कधी?
– रेवणनाथ पारपल्लीवार, सावली
कारण दक्षिणेकडचे किंवा इतर प्रदेशातले प्रेक्षक मराठी सिनेमा बघत नाही.. म्हणून मराठी अभिनेत्यांना सुपरस्टारचा दर्जा मिळत नाही (आणि मराठी प्रेक्षक दक्षिणेच्या इतर प्रादेशिक चित्रपटातील कलाकारांना स्टार बनवण्यात बिझी असल्याने त्यांच्याकडून मराठी अभिनेत्यांना स्टारचा दर्जा मिळण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. बिचार्या मराठी प्रेक्षकांनी काय काय करायचं?..) मराठी कलाकार तरी दुसर्या मराठी कलाकाराला कुठे स्टार समजतात? (कलाकार किती मोठा आणि महान असला तरी ते त्याला आपला लंगोटी यार किंवा काका ‘मामा’ समजतात..)
मराठी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनाच अनुदान देण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते?
– मनीषा इंगळे, धुळे
छान कल्पना आहे. कोणी मराठी चित्रपटाच्या विरोधात बोललं, तर अनुदान घेणारे ‘मायबाप’ प्रेक्षक, विरोधात बोलणार्याची ‘आय-माय’ काढतील आणि एखादा मराठी चित्रपट अगदीच टुकार असला तरी तो चालवण्यासाठी मोहीम चालवतील. किंवा तो चित्रपट फ्लॉप झाला तरी हिट झाला म्हणून बोंबाबोंब करतील.
एप्रिल फूल नुकताच साजरा झाला. तुम्हाला कधी कोणी मूर्ख बनवलं आहे का? आणि तुम्ही कुणाला?
– परवेझ शेख, मिरा रोड
(तुम्ही विचारलंत म्हणून माझा मूर्खपणा सांगतोय. प्लीज आपल्यातच ठेवा). मला २०१४ साली मूर्ख बनवले गेले (कोणी? असा मूर्खासारखा प्रश्न विचारू नका.. तुम्ही विचारलंत तरी कोणी मूर्ख बनवलं हे सांगण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. (महत्त्वाचं म्हणजे मला मूर्ख बनवण्याचा आणि राजकारणाचा संबंध जोडण्याचा मूर्खपणा करू नका). मी मात्र कधीच कोणाला मूर्ख बनवू शकलो नाही, कारण तेवढा मी शहाणा नाही.
सकाळच्या वेळेला ग्रामीण भागात ‘रामाच्या पारी’ म्हणतात, शुद्ध मराठीत ‘रामप्रहर’ म्हणतात; दुपारच्या वेळेला काय म्हणतात आणि संध्याकाळच्या वेळेला काय म्हणावं?
– रेवणनाथ शिंदगी, नेवासे
हे कळल्याने आपला ‘दोन वेळचा’ प्रश्न सुटणार आहे का? आपल्यासारख्यांना राम राम करताना कामधाम पण करावं लागतं (तरी तुमचा हाच प्रश्न असेल तर दुपारच्या वेळेला ‘राम मध्यान’ म्हणा आणि संध्याकाळला ‘रामकाळ’ म्हणा… फक्त कोणाला ‘हे राम’ बोलायला लावू नका… ‘जय राम श्रीराम’ तर अजिबात बोलू नका.. ते लोक बोलतीलच.. ‘योग्य वेळी’)
एक उमेदवार तुम्हाला देवदर्शन घडवणार आहे, दुसरा तुम्हाला रोख रक्कम देतो आहे, तिसरा तुम्हाला घरगुती वापराची वस्तू वाटतो आहे आणि चौथा संसदेत देशाच्या हिताचे प्रश्न मांडण्यास, चर्चा करण्यास सक्षम उमेदवार आहे. तर तुम्ही कोणाला मत द्याल?
– इरगोंडा जैन, अकोले
आधी सांगा, मतदान पेपरवर करायचंय की मशीनवर करायचंय?… मग ठरवतो. कसंय, एरवी आपल्या मताला कोणी मोजत नाही (असं मला वाटतं) पण तुम्ही विचारताय म्हणून जरा भाव खातोय.
हल्ली कोकणात कुणी भुतांच्या गोष्टी सांगत नाही, देवचारांच्या गोष्टी सांगत नाही; कोकणातले मुंजे, हडळी, साती आसरा वगैरे गेले कुठे?
– अमोल सोनावणे, हुक्केरी
कोकणातलं सगळं कोकणातच आहे. आपण कोकण सोडून शहरात आलोय. चित्रपट आणि सिरीयलमध्ये भुताबितांच्या गोष्टी बघायला मिळत असताना, कोकणातल्या गोष्टींना कोण विचारतंय? (गावाकडे काजळ आंबा सडून जातो.. शहरात आम्ही विकत घेऊन खातो.. इतकी कर्म’श्रीमंत’ आहोत आम्ही कोकणी माणसं!)
हल्ली ९० टक्के मराठी सिनेमे महाराष्ट्रापेक्षा लंडनमध्येच अधिक चित्रित होतात, काही कलावंत, तंत्रज्ञ तिकडेच स्थायिक झालेत म्हणे! आता मराठी प्रेक्षकांना कधी नेतायत तिकडे कायमचे राहायला?
– श्रीनिवास भेगडे, भोकरदन
लंडनचे नाव भोकरदन झालं की लगेच!