अलिप्ततावादी चळवळीचे एक प्रणेते म्हणून संपूर्ण जगात (खरोखरचा) मान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचा आदर्शवाद त्यांना भोवला आणि हिंदी चिनी भाई भाई असे गोडवे गात असतानाच चीनने पाठीत खंजीर खुपसून भारतावर आक्रमण केले. तिकडे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या काश्मीर सीमेवर. या आक्रमणाला सडेतोड लष्करी उत्तर द्यायला हवे, नुसते खलिते इकडून तिकडे धाडणार्या मुत्सद्देगिरीतून त्यावर मार्ग निघणार नाही, या आशयाचा सल्ला इथे पंडितजींना छत्रपती शिवाजी महाराज देत आहेत. पंडित नेहरू हे स्वत: काश्मिरी ब्राह्मण असल्याचा संदर्भही बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र रेखाटताना अगदी चपखलपणे वापरला आहे. आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी काय चित्रित केले असते? तिकडे लडाखच्या जनतेवर इकडून राष्ट्रीय शेठजींचे कॉर्पोरेट आक्रमण सुरू झालेलं आहे आणि तिकडून चीनने जवळपास चार हजार चौ. किमी. प्रदेश बळकावला आहे. उठता बसता नेहरूंच्या नावाने खडे फोडणारे आणि त्यांचे वाभाडे काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत आहेत? पंतप्रधानपदाची कामे सोडून ठिकठिकाणच्या मंदिरांमधल्या अनुष्ठाने आणि पूजाअर्चा करण्यात घालवलेल्या वेळातून कमावलेला अनुभव वापरून ते चीन सीमेवर पेटलेल्या आगीवर दोन पळ्या पाणीही शिंपडताना दिसत नाहीत… असल्या भ्याडांपुढे साक्षात शिवरायही हतबुद्ध होतील!