पर्यावरण म्हणजे आजचा शाळेतील शिकण्यापुरता विषय राहिला नाही, देशात जसा औद्योगिक क्षेत्रात विकास होत गेला, नवीन सरकारी असो वा खाजगी प्रोजेक्ट उभे राहिले तसा देश विकासाकडे जाऊ लागला. पण ह्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागला, सरकारी बाबूंनी यातून निर्माण होणार्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले, कारण अर्थकारण वाढले, यामुळे नदी, नाले, भुजल स्तोत्र, तलाव, यांचे पाणी प्रदूषित होऊ लागले.
विकासाच्या नावावर हजारो वृक्षांची कत्तल होऊ लागली, टेकड्या फोडून टेकड्यांवर अतिक्रमणे होऊ लागली, या सर्वांमुळे जैवविविधता लयास गेली. पण आता हे डोक्यावरून जाऊ लागले आहे, निसर्गाचा समतोल बिघडला आहे, ऋतु बदल होऊ लागले, वर्षात कधीही पाऊस पडतो यामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले, आजारपणं वाढली, विकासाची गती ही निसर्गाची अधोगती करायला लागली, मनुष्याची विस्तारवादी भूमिका जंगलांमध्ये घरे बांधण्यापर्यंत गेली. त्यामुळे जंगली प्राण्यांचे हल्ले वाढले अशा बातम्या येऊ लागल्या, पण आपण वन्यप्राण्यांच्या घरात गेलोय हे काही आपण मान्य करायला तयार नाही.
याचे उत्तम आणि जवळचे उदाहरण म्हणजे मुंबईचे फुफ्फुस आरे कॉलनी वृक्षतोड, पुण्याची फुफ्फुसे तळजाई, वेताळ टेकड्या यांवर पुणे मनपाकडूनच हातोडा टाकण्याचे काम केले जात आहे. कमी म्हणून काय तर परदेशी पक्षी फ्लेमिंगो दरवर्षी पुण्यातील मुळा-मुठा संगमाजवळील सलीम अली पक्षी अभयारण्य येथे येतात, त्यावर अतिक्रमण झाले होते. त्या विरोधात आणि तळजाई टेकडी वाचवण्यासाठी मी स्वत: त्यावेळी जबाबदार पर्यावरणप्रेमी म्हणून त्यावेळचे महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांना विधानभवन पुणे येथे थांबवून निवेदन दिले होते. त्यावेळी माझ्यासोबत पुणे शहरातील सजग पर्यावरणप्रेमीही उपस्थित होते. त्या निवेदनास तत्पर उत्तर देत मा. मंत्री साहेबांनी पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांस आम्हास भेटावयास पाठवून सविस्तरपणे विषय समजून घेतला आणि लवकरच आदित्यजी ठाकरे यांनी स्वत: खात्याचे जबाबदार मंत्री म्हणून सलीम अली अभयारण्याला भेट देऊन सरकारी यंत्रणा उभी करून आम्हाला आणि सलीम अली अभयारण्याला न्याय दिला. याउलट आत्ता महाराष्ट्रात पर्यावरण मंत्री आहेत का असा प्रश्न पडला आहे?
माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरेंच्या हातून अजून एक चांगला कायदा अस्तित्वात आला होता. हेरिटेज ट्री आणि वृक्षतोडीसाठी ‘२००हून अधिक वृक्ष असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांऐवजी राज्य वृक्ष प्राधिकरण यांस निर्णय घेण्याचे अधिकार’ या कायद्यामुळे त्यावेळी अनेक ५० वर्षाहून अधिक वृक्षांची हेरिटेज ट्री म्हणून सरकार दरबारी नोंद झाली त्यामुळे त्यांना संरक्षण मिळाले.
पण पुणे शहरातील मुळा नदीवरील होऊ घातलेल्या ‘रेड’ म्हणजे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट या ‘नदी काठ सुशोभीकरण प्रोजेक्ट’साठी दहा हजारांवर नदी काठावरील जुनी, पक्ष्यांचे वास्तव्य असणारी, हिरवीगार झाडे तोडली जाणार होती, त्यासाठीसुद्धा मंत्री म्हणून आदित्यजी यांनी अनेकवेळा भेटी दिल्या, चर्चा केल्या. असे कर्तव्यदक्ष पर्यावरण मंत्री महाराष्ट्राला लाभले होते, पण मागील वर्षी झालेल्या घाणेरड्या, कपटी राजकारणात त्यांना मंत्रीपदापासून दूर जावे लागले, शेवटी खोके सरकारने आदित्य ठाकरे यांचा हेरीटेज ट्री आणि वृक्षतोड विषयावरील महत्वाचा कायदा रद्द केला आणि आजपर्यंत खोके सरकारमुळे मुंबई आरे कॉलनी आणि पुण्यातील नदीपात्रातील हजारो झाडे तोडण्यात आली, पुण्यातील वेताळ टेकडी फोडविरोधात आंदोलन करणार्या पर्यावरणप्रेमींना साथ देण्यासाठी आणि पुण्याची हिरवाई टिकून राहावी म्हणून स्वत: आदित्य ठाकरे यांनी वेताळ टेकडीवर येऊन पाहणी केली होती आणि प्रशासनाशी यावर चर्चाही केली.
पर्यावरण मंत्री म्हणून आदित्यजी ठाकरे यांनी त्या पदाला न्याय मिळवून दिला आणि महाराष्ट्रातील पर्यावरण प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले. पर्यावरण विषयावर नुसते मोठे मोठे लेख लिहण्यापेक्षा जागेवर जाऊन काम केले पाहिजे, तरच निसर्ग सुरक्षित होईल यासाठी आदित्यजी तुम्ही पुन्हा पर्यावरण मंत्री व्हावे आणि पर्यावरणाचा ‘आदित्यउदय’ व्हावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे.