एक माणूस. ज्याचे नाव-गाव माणूसच आहे. तो मंत्र्याच्या दालनात अपॉईंटमेंट घेऊन पोहचतो. साधासरळ दिसणार्या या माणसासोबत एक मध्यमवर्गीय बाई आहे. ती काहीशी शांत, गूढ आणि अबोल. त्या माणसाची एक मागणी आहे, जी स्पष्ट आणि थेट. ती म्हणजे ‘मंत्र्याने राजीनामा द्यावा!’ मंत्र्याच्या केबिनमध्ये त्याच्या पीएसमक्ष हा माणूस वारंवार ही मागणी करतोय. सारेजण अवाक होतात, चक्रावून जातात. विक्षिप्त, विकृत, वेडसर असा वाटणारा हा माणूस स्वत:ची नीट ओळखही देत नाही. या दोन तासांच्या भेटीसाठी रीतसर परवानगी, अनुमतीही त्याच्याजवळ आहे. ‘जनतेचा संवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत तो आलाय. पोलीस, सुरक्षा रक्षक यांना बोलावण्याचाही प्रयत्न होतो. पण हा ‘माणूस’ ठाम आहे. त्याबरोबरच तो तसा विनम्रही आहे. तो म्हणतो, ‘जे सत्तेवर असतात त्यांनी प्रामाणिक असायलाच हवे! जो उपदेश इतरांसाठी करतात तो त्यांनी स्वतः आधी आचरणात आणायला हवा! नाहीतर आम्ही जनतेने त्यांच्यावर विश्वास तरी कसा काय ठेवायचा? तुम्ही मंत्रीपदाचा आधी राजीनामा द्या, नव्हे, तो तुम्हास द्यावाच लागेल!’
हे नाट्य आहे रशियन नाटककार व्हॅलादलीन दोझोर्ल्सेव यांचे. त्याचा इंग्रजी अनुवाद ‘लास्ट अपॉइंटमेंट’ असा केलाय. पु. ल. देशपांडे यांनी त्याचे रूपांतर ‘एक झुंज वार्याशी’ या नाटकाच्या रूपाने केलं आणि १९८८च्या सुमारास हे नाटक प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर अवतरले आणि आज ३५ वर्षांनंतर या नाटकाचे प्रयोग हे व्यावसायिकवर होत आहेत. या मध्यंतरात अनेक हौशी, प्रायोगिक नाट्यसंस्थेने याचे प्रयोग केलेत. स्पर्धेतही या नाट्याने बाजी मारली आहे. यातील संवादाचे वाचन, नाटकाचे अभिवाचनही यापूर्वी झाले आहे. एक अभ्यासपूर्ण, अर्थपूर्ण संहिता म्हणून ‘पुलं’ची नाट्यकृती प्रत्येक पिढीला खुणावते आहे.
‘मंत्रीपदाचा राजीनामा’ ही मागणी तशी बेधडक. पण हा विषय हिंदुस्थानातला नव्हे, तर मूळचा रशियातला. तरीही तो आपल्याकडेही आजही अगदी फिट्ट शोभून दिसतो. यातला ‘माणूस’ मिंधा किंवा विकला जाणारा नाही. तो मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहे. त्यामागे त्याचा युक्तिवाद आहे. एक घटना, गोष्ट आहे, तिचा पाठपुरावा तो करतोय. त्याचा तसा वैयक्तिक संबंध, प्रश्न जरी नसला तरी तो जागृत कॉमन मॅनचं कर्तव्य बजावतोय.
या नाट्यात एकूण चार पात्रे. एक उपमंत्री डॉ. देशमुख. दुसरे त्यांचे पीए डॉ. चौधरी, तिसरा अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस आणि पत्रकाराची पत्नी चित्रा वाढारकर. आज मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले हृदरोगतज्ञ महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व. ज्यांनी हार्ट पेशंटवर विक्रमी शस्त्रक्रिया केल्यात. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेत. त्यांच्यासोबत तेव्हापासून सहाय्यक असलेले डॉ. चौधरी आता उपमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आहेत. दोघांचे चांगले जुळले आहे. एक पत्रकार वाढारकर निष्ठेने पत्रकारिता करतोय. त्याने या दोघांच्या दुष्ट कृत्याचा तपास केलाय. त्यांची काळी बाजू जगाआड आहे. उलट दुसरीकडे यांना पुरस्कार बढती, प्रसिद्धी मिळाली आहे. या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर जाब विचारणारा एक लेख पत्रकार वढारकर यांनी केलाय. पत्रकाराचे कर्तव्य म्हणून तो संपादकांकडे प्रसिद्धीसाठीही दिलाय. पण तो लेख प्रसिद्धीपूर्वीच डॉक्टरांकडे पोहचतो आणि दबावामुळे तो प्रसिद्ध होऊ शकत नाही. त्यातून निराश झालेला पत्रकार हा अखेर व्यसनाधीन होतो. आणि आपली कारकीर्द संपवितो. सत्याचा घेतलेला मागोवा प्रकाशात येऊ शकत नाही, हे त्याचे दुःख होते. याचा जाब हा पुराव्यासकट विचारण्यास आलेला माणूस आणि त्याची हताश पत्नी चित्रा यांचे हृदय हेलावून सोडणारे हे नाट्य. प्रभावी संवादाच्या जोरावर दोन तास खिळवून ठेवते.
या कथानकाबद्दल नाटककार पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘या नाटकातला संघर्ष आणि मनुष्यस्वभावाचे दर्शन हे सार्या मानवजातीला लागू पडणारे आहेत. ते केवळ एकाच भाषेशीच निगडित नाही. मूळ नाटकातील व्याजी आणि त्याची नाट्यमय अभिव्यक्ती मला भावली आणि मूळ नाटकातील पात्रांच्या जागी मला मराठी बोलणारी माणसं दिसायला लागली.’ तसे हे नाटक, त्याची संहिता हा नाट्यविषयक संशोधनाचा भाग आहे. आजही नाट्य अभ्यासकांसाठी या नाट्याची संहिता ही अभ्यास म्हणून घेतली जाते. पुलंनी ज्या दर्जेदार नाट्यसंहिता रंगभूमीला दिल्यात त्यात हे नाटक. म्हणूनच अनेक संस्था, नवनवीन कलाकार हे याचे प्रयोग आजवर करीतच असतात.
‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’तर्फे नाट्यप्रकल्प म्हणून हे नाटक निवडले गेले. त्यावेळी याचे दिग्दर्शन प्रा. वामन केंद्रे यांनी केले. रूपांतर आणि सादरीकरण हे आपल्या मातीतलं वाटावं याची पुरेपूर दक्षता ही पुलं आणि प्रा. केंद्रे यांनी घेतली होती. मूळ प्रयोगात वसंत सोमण (मंत्री), सयाजी शिंदे (पीए चौधरी), गौरी केंद्रे (अबोल पत्नी चित्रा) आणि दिलीप प्रभावळकर (माणूस) ही टीम होती. चौघांच्या नाट्यप्रवासातले हे एक लक्षवेधी नाटक ठरले. आज या प्रयोगात ‘माणूस’ या मध्यवर्ती भूमिकेत या नाटकाचे दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर आहेत. देहबोली आणि संवाद यातून माणूस ताकदीने उभा केलाय. प्रायोगिक ते व्यावसायिक रंगभूमीवरली त्यांची झेप ही विलक्षण आहे. काही संवादात शब्दांसह जाब विचारणारी नजर ही लक्षात राहते. मंत्रिपदाच्या बढतीच्या वाटेवर आहे अशा श्रीमंती थाटाचा उपमंत्री सुगत उथळे यांनी दिमाखात उभा केलाय. त्यांची सेवा करणारा, बाजू सांभाळणारा सहकारी पीए डॉ. चौधरीच्या भूमिकेत आशुतोष घोरपडे याचा वावर सहज सुंदर आणि शोभना मयेकर (पत्रकार पत्नी) चौघा कलाकारांचे ‘टीमवर्क’ उत्तम.
यातील संवादांवर एक अभ्यास म्हणूनही स्वतंत्रपणे भाष्य करता येईल. शब्दातले नाट्य प्रभावी ठरते. उच्चारशास्त्रातही ते आव्हान आहे. यातील ‘माणूस’ या पात्राच्या तोंडी ४२ शब्दांचे एक भलेमोठे वाक्य आहे. त्यात श्वास कुठे घ्यायचा आणि तो कुठे सोडायचा याची कसरत दिसते. भाषा उच्चार आणि त्याचा परिणाम या दृष्टीनेही त्यात अनेक बाबी आहेत. विशेषतः र्हस्व, दीर्घ याच्या उच्चारावरही कलाकारांना अभ्यास करावा लागतो. ‘तो टॅक्सीतच मेला नाही’ इथपासून ते ‘हॉस्पिटलच्या दारात येऊन पोहचली होती!’ या एका वाक्यामुळे अक्षरश: दम लागतो तरीही ‘नाट्य’ म्हणून ते परिणामकारक ठरते. गंभीर आशयाचे नाट्य असले तरी काहीदा त्यात थोडा ‘रिलीफ’ जरूर आहे. अशी संवादप्रधान नाटके बरेचदा फसण्याचा धोका असतो. पण ‘पुलं’ची लेखणी आणि सोबत नव्या दमाचा दिग्दर्शक यामुळे यातील नाट्य मस्त बहरले आहे.
ज्येष्ठ व कल्पक नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांचे नेपथ्य ‘मंत्र्याची केबिन’ जिवंत करते. त्याची रंगसंगती आणि रचनाही शोभून दिसते. केबिनबाहेरची लॉबी सुरेखच. हालचालींना पूरक नेपथ्य आहे. एकच स्थळ आणि सलग दोन तासाचे नाट्य, त्यात चांगले बांधले आहे. रंगभूषा-वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत यात विशेष असे काही नाही. जे नाट्याला न्याय देणारे.
मराठी नाट्यसृष्टीत आज ‘विनोदासाठी विनोद’ असलेल्या नाटकांची एकच गर्दी झालीय. काही अपवाद जरूर असतील, पण ‘विनोदी नाटके म्हणजे मराठी नाटके,’ असे नवेच समीकरण जगापुढे येत आहे, जे दुर्दैवी आहे. या भाऊगर्दीत अशी दर्जेदार नाटके ही गंभीर वाटली तरी दिशादर्शक ठरतात. ज्याचे रसिकांनी स्वागत करावयास हवे. कारण बुकिंग विंडोच्या अर्थचक्रात कदाचित अशी नाटके जरी दोन पावले मागे दिसली, तरीही ती नाट्यवळणावरली मैलाचे निशाण आहेत. त्याची जपवणूक व्हावी ही अपेक्षा स्वाभाविकच वाटते.
एकेकाळी जिथे लष्कराचा मुक्काम जिथे पडायचा तिथल्या गावातील लोकांसाठी कुठलाही मोबदला न घेता गावकरी भाकर्या करायचे म्हणजे त्यांच्या जेवणखाण्याची व्यवस्था करायचे. त्यावरूनच ‘घरचे खाऊन, लष्करच्या भाकर्या भाजणे,’ हा वाक्प्रचार पुढे आला. समाजकारण, राजकारण करीत असतानाही हा वाक्प्रचार वारंवार ऐकण्यात येतो. त्याच प्रकारे इथेही नाटकातला हा माणूस लष्कराच्या भाकर्या भाजण्याचं काम करतोय. त्याला काही संदर्भ नसला तरी हे स्वखुशीने काम त्याने हाती घेतले आहे. यातील एक खटकणारी बाब म्हणजे पत्रकाराचा लेख हा प्रसिद्धीपूर्वी ज्यावर टीका केलीय त्याला वाचायला देणे आणि प्रसिद्ध करण्यास नकार करणे हे पटत नाही. अर्थात याचे कूळ-मूळ हे परकीय आहे. असो.
महाराष्ट्र शासनाने दर्जेदार नाटकांचे नव्या संचात चित्रिकरण करून एक दस्ताऐवज म्हणून संग्रही करण्याची जी योजना आखली आहे, त्यात ‘पुलं’चे ‘एक झुंज वार्याशी’ या नाटकाचा समावेश करावा ही अपेक्षा आहे. तसेच अशा नाटकाचे अधिकाधिक प्रयोग होण्यासाठी निर्मात्यांनी पद्धतशीर प्रयत्न करावेत.
एक झुंज वार्याशी!
लेखन – पु. ल. देशपांडे
दिग्दर्शन/संगीत – श्रीनिवास नार्वेकर
नेपथ्य – बाबा पार्सेकर
प्रकाश – सिद्धेश नांदलस्कर
सुत्रधार – राकेश तळेगांवकर / सुप्रिया गोविंद चव्हाण
निर्माता – श्रीनिवास नार्वेकर
निर्मिती – व्हिजन