भीती म्हटली की तिचा अर्थ संदर्भाप्रमाणे, व्यक्तिगणिक अनेक प्रकारे बदलू शकतो. कोणाला भुताखेताचे भय वाटेल तर कोणाला आगीची-पाण्याची भीती; कोणाला ज्ञाताची भीती तर कोणाला अज्ञाताची… पण मरणाची भीती मात्र प्रत्येकाच्या मनात असते. या भीतीचं भूत मानगुटीवर बसलं की भल्याभल्या व्यक्ती विवेक हरवून बसतात आणि नकळत ही मंडळी कर्मकांडांच्या आहारी जातात. श्रद्धा असावी, पण ती आंधळी नसावी. विज्ञानाची कास धरून भीती घालवता येऊ शकते हे सांगण्याचा प्रयत्न ‘पंचक’ या चित्रपटात करण्यात आला आहे.
कोकणातील एका गावात खोतांच्या वाड्यात घडणारी ही गोष्ट. घरातील अनंताभाऊ (दिलीप प्रभावळकर) यांचा मृत्यू झाला आहे. अंत्यविधी करण्यासाठी जोशी गुरुजी (विद्याधर जोशी) येतात आणि पंचांग पाहून सांगतात, की अनंताभाऊचे निधन पंचक काळात झालं आहे, म्हणजेच अनिष्ट नक्षत्रात झालं आहे. यामुळे येत्या वर्षात कुटुंबातील किंवा त्यांच्या जवळील मित्र मंडळींपैकी कुणा पाच व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून अंतिमसंस्कार करताना पिठाच्या कणकेच्या बनवलेल्या पाच पुतळ्या मृतदेहासोबत सरणावर ठेवून त्यांच्यावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार करावा. म्हणजे पंचक दोषमुक्त करावा असा सल्ला ते देतात. परंतु, पुरोगामी विचारांच्या अनंताभाऊंनी निधनापूर्वी गावातल्या मेडिकल कॉलेजला ‘देहदान’ केलेलं असतं. त्यांची शेवटची इच्छा अनंताभाऊंचा शास्त्रज्ञ असलेला मुलगा माधव (आदिनाथ कोठारे) पूर्ण करतो. या गोष्टीने घरातील दुसरा मुलगा डॉ. अजय (सागर तळाशीकर), विजय (आशिष कुलकर्णी), आत्मा (आनंद इंगळे), अनुया (संपदा कुलकर्णी), वीणा (दीप्ती देवी), भाग्या (गणेश मयेकर), नम्रता (आरती वडगबाळकर) हे सदस्य बिथरतात. त्यांना संभाव्य आपत्तीची भीती संत्रस्त करते. उत्तराआत्या (भारती आचरेकर) धक्क्यानं बेशुद्ध होतात. अनंताभाऊंचे ज्येष्ठ बंधू बाळ (सतीश आळेकर) यांच्या पायावर माडावरचा नारळ पडतो आणि घरातील सून कावेरी हिच्या (नंदिता पाटकर) डोक्यावर वंशवृक्षाची फांदी पडते. अशा एकामागोमाग घडणार्या अनाकलनीय घटनांनी घरातली मंडळींच्या मनावर भीतीचे सावट पसरतं. त्यापैकी पोटुशी असलेल्या कावेरीच्या मानगुटीवर ‘पंचका’चं भूत तर अधिकच गच्च बसतं. हे भूत उतरवण्यासाठी कथानायक काय शक्कल लढवतो, याचं उत्तर सिनेमा पाहिल्यावर मिळेल.
हल्ली हॉलिवुडच्या किंवा दक्षिणेतल्या एखाद्या भाषेत बनलेल्या चित्रपटाची अधिकृत किंवा अनधिकृत कॉपी करून सिनेमा बनवला जाण्याचं प्रमाण वाढतंय. या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील, रूढीपरंपरावर आधारित गोष्टीवर पंचकची कथा लिहिली गेली आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. मोठं कुटुंब म्हटलं की पात्रं भरपूर आणि त्यांचा परिचय करून देण्यात खूप वेळ जातो. पण या पटकथेत मृत व्यक्तीच घरातील सर्व पात्रांची ओळख करून देते आणि तीही खास तिरकस विनोदी पद्धतीने. त्यामुळे विषय जरी मृत्यूचा असला तरीही सिनेमांची गोष्ट विनोदी अंगाने पुढे जाणार आहे, हे समजतं.
दिग्दर्शक राहुल आवटे हे हिंदी सिनेमातील अनुभवी (सलाम-ए-इश्क, चॉपस्टिक्स) पटकथा लेखक असल्यानं पंचक सिनेमाची पटकथा ‘पंचक’ सोडून इतर कोणत्याही विषयावर भटकत नाही. ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीखाली वावरणार्या कुटुंबाची गोष्ट आणि त्याचं कथाबीज रंजक आहे. पण, या बीजापासून सिनेमाचा वटवृक्ष होतानाचा प्रवास मात्र तितका बहरलेला दिसत नाही. पटकथेची बांधणी पडद्यावर कमकुवत दिसते. उत्तरार्धात गोष्ट फुलवताना काही प्रसंगांची खेळी फसलेली वाटते. परिणामी प्रेक्षकांवरील प्रसंगांचा प्रभाव मर्यादित राहतो. अंधश्रद्धेवर भाष्य करताना काही प्रसंग मजा आणतात. उदा. एक रिक्षाचालक इडा पिडा टळावी म्हणून रिक्षावरून बारा लिंबं ओवाळून टाकतो. आजूबाजूची लहान मुलं लिंबं गोळा करून त्याच लिंबाचे सरबत बनवून रिक्षावाल्याला विकतात.
कोकणातील कथेसाठी केलेल्या कलाकारांची निवड सार्थ आहे. सर्वच कलाकारांनी आपापल्या परीनं उत्तम काम केलं आहे. नंदी बैल फिरवताना काढला जाणारा बुगु बुगु आवाज, पोतराजाचा कडाडणारा आसूड, वेळी अवेळी आरवणारा कोंबडा… या पार्श्वध्वनींचा समावेश असलेलं पार्श्वसंगीत उत्तम जमलं आहे. पंचक शांती आणि फ्रेंच ऑपेरा हे जुगलबंदी गीत या सिनेमातील हायलाइट आहे. कोकणातील सौंदर्य टिपणारी प्रथमेश अवसरे याची सिनेमॅटोग्राफी नजरेत भरणारी. सिनेमाचे दुसरे दिग्दर्शक जयंत जठार (‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘बालक पालक’) उत्तम संकलक असल्यानं सिनेमा एकसंघ दिसतो. अभिनेत्री माधुरी दीक्षित निर्माती असून तिने पाहुणा कलाकार म्हणून काम केलं नाही, हे चांगलं झालं; नाही तर मूळ गोष्टीवरचा फोकस कमी झाला असता.
एकंदर भीतीचा मागोवा घेणारा आणि अंधश्रद्धेवर मात करायला शिकवणारा पंचक एकदा पाहायला हरकत नाही.