खिडकीचे दार जोरात आदळले आणि त्या आवाजाने शुभ्राला जाग आली. आपण झोपताना खिडकी आठवणीने बंद केली होती, हे तिला चांगले आठवत होते. काय करावे? अशोकला हाक मारावी का? आणि नेमकी ही रजनी कुठे गेली आहे? स्वतःच्याच विचारात शुभ्रा उठली आणि खिडकी बंद करण्यासाठी गेली. मात्र तिचे पाय जमिनीवर खिळून राहिले. खिडकीबाहेर मंद प्रकाशात `ती’ उभी होती. नेहमीसारखीच तांबड्या आलवणात, ओल्या अंगाने…शुभ्राच्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडली आणि ती तिथेच कोसळली.
शुभ्रा भानावर आली तेव्हा तिच्याजवळ रजनी उभी होती आणि पायाजवळ तिचा नवरा अशोक उभा होता. रजनी मायेने तिच्या डोक्यात हात फिरवत होती. रजनी आणि शुभ्रा सख्ख्या बहिणी. दोघींच्या वयात दोन वर्षांचे अंतर. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या, पण दोघींच्यात कमालीचा विरोधाभास. शुभ्रा साधी, भोळी, काहीशी लाजाळू तर रजनी एकदम बिनधास्त. स्वतःची, स्वतःच्या सौंदर्याची विशेष काळजी घेणारी, पुरुष मित्रांच्यात अगदी सहज मिसळणारी, प्रत्येक गोष्टीत पुढे असणारी. पण अशी बिनधास्त रजनी देखील आता काळजीत पडली होती. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.
`भावजी आता आणखी वाट न बघता आपण डॉक्टरांकडे गेलेले बरे. मला हे सगळे प्रकरण विचित्र वाटते आहे.’
`पण माझ्या ओळखीत असे कोणी डॉक्टर नाहीत,’ अशोक म्हणाला.
`माझ्या एका लांबच्या आत्याचे मिस्टर आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात ताईला घेऊन,’ रजनी म्हणाली.
आत्याचे मिस्टर? हां, यशोदा आत्याचे मिस्टर आहेत खरे डॉक्टर पण.. पण ते तर मानसिक रोगांवर उपचार करतात. म्हणजे मला वेड लागलंय असे वाटायला लागले आहे का या लोकांना?… शुभ्रा मनातल्या मनात चांगलीच दचकली. तिने रजनीचा हात घट्ट पकडला.
`रजनी मला वेड लागलंय असे वाटते का गं तुम्हाला?’ तिने दुःखी स्वरात विचारणा केली.
अशोकने तिची नजर टाळली, पण रजनीने तिला कुरवाळत नकारार्थी मान हालवली. `ताई, अगं भास होणे हे अगदी नॉर्मल आहे. कित्येक लोकांना असे भास होत असतात. ते काय सगळे वेडे थोडीच असतात. अगं यावर देखील उपचार असतात.’
`नाही! मला कोणत्याही डॉक्टरकडे जायचे नाही. अशोक… माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच तांबड्या आलवणातली बाई दिसते. अगदी रोज दिसते. मला विहिरीकडे बोलावत असते. मला खरंच खूप भीती वाटते हो. मी तुम्हाला कधीपासून सांगते आहे की आपण हे घर बदलू. ही जागा चांगली नाही, झपाटलेली आहे ही जागा.’ शुभ्राचा स्वर चांगलाच रडवेला झाला होता आणि आवाज भीतीने कातर.
– – –
`या बसा..’ मोहनराव आश्वासक सुरात म्हणाले. आज जवळपास वर्षभराने शुभ्रा मोहनरावांना बघत होती. यशोदा आत्या तशी बाबांची लांबची बहीण. त्यामुळे दोन्ही घरात फारसे येणे जाणे असे नव्हते. लग्न, मुंज अशा महत्त्वाचा प्रसंगीच काय ती भेट होत असे.
`डॉक्टर साहेब..’ अशोक काही बोलत नाही बघून शेवटी रजनीने बोलायला सुरूवात केली.
`तू मला नेहमीप्रमाणे काका म्हणालीस तर जास्ती चांगले,’ हसत हसत मोहनराव म्हणाले आणि वातावरणातील ताण थोडा हलका झाला.
`काका, ताईला काही दिवसांपासून विचित्र भास होत असतात. पण ते भास नसून सत्य आहे असे काहीसे तिच्या मनाने पक्के केले आहे.’
`अच्छा… काय भास होतात बेटा शुभ्रा?’ मायेने मोहनरावांनी विचारले. शुभ्रा आधी थोडी अडखळली, पण मग शब्द शब्द जोडत तिने अडखळत बोलायला सुरूवात केली.
`मला एक बाई दिसते. लाल आलवण घातलेली. तिचे पूर्ण अंग ओले असते, पाणी निथळत असते तिच्या आलवणातून…’ सांगताना देखील त्या आठवणींनी शुभ्राच्या अंगावर शहारा आला होता.
`काही बोलते का ती तुझ्याशी?’
`छे! काहीच बोलत नाही. वर सुद्धा बघत नाही. फक्त मला विहिरीकडे चलण्याची खूण करते.’
`पण आम्हाला कोणालाच ती दिसत नाही काका. आता रजनीला देखील आमच्या घरी येऊन आठवडा झाला. तिला देखील असे कुठेच काही दिसलेले नाही,’ अशोक थोड्याशा रागात बोलला.
`मनाचे खेळ खूप विचित्र असतात अशोकराव. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. एखाद्या घटनेनंतर होणारी प्रत्येकाची प्रतिक्रिया देखील समान असते असे नाही. त्याप्रमाणे त्या घटनेचा प्रत्येकावर होणारा परिणाम देखील एकसारखा असेल असे नाही,’ डॉक्टर मोहनरावांनी अशोकला प्रेमाने समजावले.
`पण डॉक्टर असे एकाएकी भास चालू होणे…’ रजनीने विचारले.
`तेच मला देखील जाणून घ्यायचे आहे. रजनी, तू शुभ्राला घेऊन जरा बाहेर बसतेस? मोहनरावांनी विचारले आणि रजनी समजूतदारपणे शुभ्राला घेऊन केबिनबाहेर पडली.
`हां, अशोकराव, कधीपासून सुरू झाले हे सगळे प्रकार?
`साधारण दोन आठवडे झाले. तसे आम्ही या घरात राहायला येऊन वर्ष होऊन गेले. सगळे काही नॉर्मल होते अन् अचानक शुभ्रा एकदम भेदरलेली दिसायला लागली. संध्याकाळ झाली की, सगळी दारे खिडक्या बंद करून बसायला लागली. मी थोडा वेळ जाऊ दिला; पण नंतर दिवसभर ती दारे खिडक्या बंद करून बसायला लागली, तेव्हा मला विचारणे भाग पडले. आधी ती काही बोलेना; मग जरा विश्वासात घेतले, धीर दिला तेव्हा तिने या होत असलेल्या आभासांबद्दल माहिती दिली.’
`हे भास सुरू होण्याच्या आधी एखादी काही विचित्र घटना किंवा प्रसंग घडला होता का? शुभ्राची एखादी जुनी आठवण किंवा भीती मनाच्या कोपर्यातून वर आणू शकेल असा? किंवा एखादा भयपट, पुस्तक..’
`शुभ्रा आणि भयपट? रक्तपात असह्य होतो म्हणून ती चित्रपट देखील बघत नाही. कथा कादंबरीची तिला फारशी आवड नाही. पण कवितांची पुस्तके वाचत असते. कधीतरी लिहिण्याचा देखील प्रयत्न करत असते. प्रसंग म्हणाल, तर आमच्या दोघांचेही आयुष्य अगदी सरळ वळणाचे आहे. मित्र, नातेवाईक फारसे नाहीत. दोन चार महिन्यांत रजनी कधीतरी चक्कर मारते तोच तिचा विरंगुळा. स्वतःहून कोणाशी ओळखी कराव्यात, इंटरनेटवर जावे असा काही तिचा स्वभाव नाही. तुम्ही तर तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखता.’
डॉक्टरांनी आता अशोकला बाहेर पाठवले आणि रजनीला आता बोलावून घेतले. तिला देखील साधारण तेच प्रश्न त्यांनी विचारले आणि उत्तरे देखील साधारण अशोकप्रमाणेच मिळाली.
`रजनी, तू आणि शुभ्रा सख्ख्या बहिणी. यापूर्वी कधी शुभ्राला असे भास झाले होते?’
`नाही. असते तर तिने मला नक्की सांगितले असते. पण ती खूप घाबरट आहे हे मात्र नक्की. एकदा कॉलेजमधून येताना आम्ही एक अॅक्सिडेंट पाहिला होता. फार भीषण नव्हता पण एका माणसाला गाडीची धडक बसली होती आणि त्याच्या कपाळातून, पायातून थोडे रक्त वाहत होते. पुढे चार पाच दिवस शुभ्राला स्वस्थ झोप नव्हती. हे सगळं विसरायला तिला महिना दोन महिने जावे लागले. तिने तर तो जायचा यायचा रस्ता देखील बदलला आणि…’ बोलता बोलता रजनी एकदम दचकली.
`काय झाले रजनी?’
`तुम्ही आता विचारलेत तेव्हा बोलता बोलता आठवले… दोन तीन महिन्यांपूर्वी मी ताईकडे राहायला आले होते. तेव्हा सहज गप्पा मारता मारता मी तिला म्हणाले की, माझी ऑफिसमधली एक मैत्रीण सांगत होती, या घराच्या आवारात जी विहीर आहे, तिथे म्हणे खूप वर्षापूर्वी इथल्या मालकाच्या विधवा बायकोने उडी मारली होती. पण जलदेवतेने तिला पुन्हा वर आणून सोडले. तुला दिसलीये का कधी जलदेवता?’ आणि मग त्यावर आम्ही दोघी खूप हसलो देखील होतो.
`तिच्या मनात जलदेवता नाही, विधवा मालकिणीने मात्र घर केलेले दिसत आहे,’ कोड्याची उकल झाल्याने हसत हसत मोहनराव म्हणाले. शुभ्राच्या आभासामागचे निश्चित कारण कळल्याने, तिच्यावर उपचार करणे आता अधिक सहज होणार होते. त्यांनी शुभ्राला एकटीला आत पाठवायला सांगितले आणि ते खुर्चीत जरा विसावले.
`ये शुभ्रा.. बस.’
`काका, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. जे काही होत आहे ते माझे भास नाहीत.’
`हे बघ बाळा, आपल्या मनाची रचना…’
`काका एक मिनिट. आजच्या या इंटरनेटच्या आधुनिक जगात, शिकल्या सवरलेल्या माणसांनी भूत, पिशाच्च, पछाडलेल्या जागा यावर कसा विश्वास ठेवायचा? सत्य, आभास यातला फरक कसा ठरवायचा? जे आपल्याला दिसते, ते कोणालाच दिसत नसेल तर ते आभास असतात हे नक्की का? कदाचित जे घडते आहे, दिसते आहे ते फक्त आपल्याच डोळ्यांसाठी असेल तर? हे असे आणि अनेक प्रश्न मी स्वतःला विचारले आहेत आणि उत्तरे देखील मिळवायचा प्रयत्न केलेला आहे. पण पूर्ण विचारांच्या अंती मी तुम्हाला हेच म्हणेन की मला भास होत नाहीत.’
अशा परिस्थितीत देखील तिचा मनावरचा ताबा, विचार करण्याची स्पष्ट पद्धत बघून मोहनरावांना तिचे कौतुक वाटले. तिच्या थोड्या कलाकलाने घेण्याचा त्यांनी विचार केला.
`मला सांग शुभ्रा, तुला या घरात राहायला येऊन वर्ष झाले. ती बाई आताच का बरं तुला दिसायला लागली असेल, बोलवायला लागली असेल? रजनीने तुला त्या वाड्यात घडलेला प्रसंग सांगितला आणि ती बाई अचानक प्रगट झाली. ती खरंच प्रगट झाली आहे का, तुझ्या मनाने तिला जिवंत केले आहे? ती दिसते तर बोलत का नाही? मान वर करून बोलत का नाही? न घाबरता तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न का करत नाहीस? निघून जायला का सांगत नाहीस?’
मोहनरावांच्या प्रश्नांनी शुभ्रा देखील जरा गांगरली. हे सगळे बोलायला ठीक होते. पण भयाण रात्री ती बाई कधी खिडकीबाहेर, तर कधी चक्क माजघरात दिसली की तिचा सगळा धीर तिला सोडून जायचा. हात पाय लटपटायला लागायचे, घशाला कोरड पडायची. दोन तीन वेळा तर ती अस्पष्ट किंचाळी मारत बेशुद्ध देखील झाली होती.
मोहनरावांकडे उपचार सुरू होऊन आता महिना झाला होता. पण शुभ्रा बरी होणे दूर, तिचे भास वाढायला लागले होते. आता तर तिला ती बाई दिवसा उजेडी देखील दिसायला लागली होती. शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी अशोकला दार उघडायला म्हणून ती गेली, तर मागे चक्क ती बाई उभी होती. यावेळी तिने चक्क शुभ्राला नावाने हाक देखील मारली. शुभ्रा तिथेच अशोकच्या अंगावर लोळागोळा होत कोसळली.
– – –
रजनी धावतच घरात शिरली. समोर चार सहा लोकांची गर्दी जमली होती, एका कोपर्यात रडून लाल झालेल्या डोळ्यांनी अशोक एका पोलिसाच्या प्रश्नांची उत्तरे देत होता आणि एका स्ट्रेचरवर शुभ्राचे ओले निष्प्राण शरीर पडलेले होते.
`तुम्ही कुठे होता?’
`माझ्या बायकोवर काही उपचार सुरू होते. डॉक्टरांनी काही दिवस हवापालटाचा सल्ला दिला होता. सकाळी आम्ही रवाना होणार होतो गावाकडे. नेमकी बायकोची औषधे संपली होती, ती आणायला मी मेडिकल्ामध्ये गेलो होतो. परत आलो तर दार सताड उघडे आणि शुभ्रा गायब. मी खूप शोधले. शेवटी माझ्या मनात अभद्र शंका आली आणि मी विहिरीकडे धाव घेतली..’ अशोकच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
`एक नवरा म्हणून निदान मी तरी तिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता,’ खिन्न स्वरात अशोक म्हणाला. मोहनरावांनी हलकेच त्याच्या खांद्यावर थोपटले आणि विषादाने मान खाली घातली. जमलेल्या सर्वांना निरोप देत अशोक आणि रजनी स्मशानभूमीतून बाहेर पडले आणि त्यांनी घराचा रस्ता पकडला.
`घरी गेल्या गेल्या आधी त्या लाल आलवणाचा बंदोबस्त करायला हवा आणि उरलेली रक्कम देऊन रखमाचे तोंड देखील बंद करायला हवे आहे,’ रजनीला जवळ ओढत अशोक म्हणाला.
`आधी मला जरा भीती होती, पण रखमाने अभिनय मात्र जबरदस्त केला बघ,’ रजनी हात त्याच्याभोवती गुंफत म्हणाली.
गाडी लावून दोघेही घरात शिरले आणि त्यांचे पाय जणू जमिनीतच रूतले. खोलीत चंद्राचा प्रकाश पडलेला होता आणि खोलीच्या एका कोपर्यात शुभ्रा बसलेली होती. लाल आलवणात… ओलेत्या अंगाने.