अमेरिकेचे परदेश मंत्री अँथनी ब्लिंकन अडीच महिन्याच्या काळात सहाव्यांदा मध्यपूर्वेच्या दौर्यावर रवाना झाले. तुर्की, जॉर्डन, इजिप्त, सौदी अरेबिया इत्यादी देशांमधे पटापट जाऊन ते इसरायलकडे निघाले. गाझा युद्ध हा त्यांचा अजेंडा. त्यांचं एक स्वतंत्र विमान. त्यात त्यांचा प्रचंड स्टाफ. बहुदा विमानात त्यांची कारही.
ब्लिंकन यांचा दौरा अधिकृत होता. त्यांचे विमानात बसतांना, विमानतळावर उतरतांना फोटो प्रसिद्ध झाले. दौर्यात त्यांच्यासोबत अमेरिकेतल्या मोठ्या पेपरांचे बातमीदारही होते. ब्लिंकन विमानात आणि दौर्यात ठिकठिकाणी पत्रकारांना ब्रीफिंग करत होते. ब्रीफिंगमधे अट अशी असते की ते जे सांगतील ते प्रसिद्ध करायचं नाही. ती माहिती बातमीदारांना केवळ विषय कळावा यासाठी दिलेली असते.
कधी काळी हेन्री किसिंजर अमेरिकेचे परदेशमंत्री होते. ते अनेक वेळा गुप्तपणे दौरा करत; सरकारी विमानात बसत नसत; त्यांचं विमान अनमार्क्ड असे, म्हणजे त्याच्यावर कोणत्याही खाणाखुणा नसत. त्या विमानाच्या उड्डाणाची नोंद कुठल्याही विमानतळावर होत नसे. रेडारवर त्या विमानाचा पत्ता लागत नसे, कारण ते विमान ओळखता येत नसे. काही वेळा त्यांचा हा दौरा प्रेसिडेंट निक्सन यांनाही माहित नसे. किसिंजर कुठं तरी नाहीसे झालेत येवढंच प्रेसिडेंटला कळे.
अमेरिकेत प्रेसिडेंट आणि परदेशमंत्री यांच्या एस्टॅब्लिशमेंट्स वेगळ्या असतात. दोन्ही आस्थापना स्वतंत्रपणे निर्णय घेतात, पण त्यांच्यात संयोजन असतं.
ब्लिंकन सहाव्यांदा इसरायलला का गेले?
कारण अमेरिका आणि ब्लिंकन यांची तंतरली आहे. इसरायल जे उद्योग करत आहेत त्याची कल्पना अमेरिकेला नव्हती. जसजसे दिवस पुढं सरकत गेले तसतसा इसरायलला दिलेला पाठिंबा अमेरिकेच्या अंगाशी येऊ लागला आहे. इसरायलनं गाझामधे केलेल्या उद्योगामुळं अमेरिकेचे वांधे झालेत.
हमासनं ७ ऑक्टोबरला इसरायलवर हल्ला केल्यानंतर प्रेसिडेंट बायडन यांच्या डोळ्यात अश्रू तरारले; त्यांनी इसरायलला आपला संपूर्ण पाठिंबा असेल असं जाहीर केलं; इसरायलला शस्त्र पैसा अशी सर्वतोपरी असीम मदत करू असं ते म्हणाले. कारण इसरायली-ज्यूंची एक प्रभावी लॉबी अमेरिकेत आहे. बायडन व्यक्तिगतरित्या इसरायलशी भावनात्मकरीत्या बांधील आहेत. कारण अमेरिकेतल्या दोन्ही राजकीय पक्षांना ज्यू-इसरायली धनिक भरपूर पैसे देतात.
परंतु या पाठिंब्याच्या मर्यादा नेतान्याहूंच्या लक्षात आल्या नाहीत. नेतान्याहूनी गाझावर केलेला हल्ला स्वतःची गादी वाचवण्यासाठी आहे याचाही अंदाज अमेरिकेला नव्हता.
हमासनं केलेला हल्ला क्रूर होता आणि समर्थनीय नव्हता; अमेरिकन जनता आणि पेपर यांनी इसरायलला सहानुभूती दाखवली. आठवडाभर ही सहानुभूती टिकली. पण नंतर इसरायलं घेतलेला सूड भयानक होता. इसरायलच्या मेलेल्या १५०० माणसांच्या बदल्यात इसरायलनं गाझातले २३ हजार लोक मारले. हमासनं निष्पाप माणसांना मारलं, इसरायलं शंभरपटीनं गाझातले निष्पाप मारले.
सुरूवातीला अमेरिकन पेपर, अगदी न्यूयॉर्क टाइम्सही, इसरायलच्या बाजूनं बातम्या देत, गाझामधल्या अत्याचारांकडं दुर्लक्ष करत. न्यूयॉर्क टाइम्समधे कित्येक वर्षं काम केलेल्या बातमीदार आणि स्तंभलेखकांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या पक्षपाती वर्तणुकीवर जाहीर टीका केली आणि पेपरसाठी काम करण्याचं जाहीररीत्या बंद केलं.
अमेरिकेच्या संरक्षण खात्यात काम करणार्या एका वरिष्ठ अधिकार्यानं पेपरात जाहीर मुलाखत देऊन सांगितलं की अमेरिकन सरकारचं इसरायलला शस्त्र पुरवणं अनैतिक, बेकायदा आहे. त्यानं नोकरीचा राजीनामा दिला. अमेरिकेच्या संरक्षण आणि परदेश खात्यात खळबळ होती ती या राजीनाम्यानं उघड झाली.
अमेरिकन राज्यघटनेच्या तरतुदींनुसार प्रेसिडेंट स्वतंत्र असतो, तो स्वतंत्रपणे निर्णय घेतो, तो संसदेला बांधील नसतो. प्रेसिडेंट बायडन इसरायलला शस्त्रं आणि पैसे पाठवत राहिले. पण त्यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या खासदारांना ते मान्य नव्हतं, बायडन अती करत आहेत असं त्यांचं मत होतं. अमेरिका इसरायलला २५ हजार असॉल्ट रायफली पुरवायला निघाली, तेव्हा खासदारांनी तो पुरवठा रोखून धरला, विरोध केला, संबंधित कमिटीसमोर या आणि मंजुरी घ्या असं बायडन यांना सांगितलं. वरील रायफली इसरायली लोक स्वतःच्या संरक्षणासाठी न वापरता गाझातल्या लोकांना मारण्यासाठी वापरतील असं खासदारांनी बायडनना सांगितलं.
अमेरिकेतल्या सर्व युनिव्हर्सिट्यांमधे विद्यार्थी रस्त्यावर उतरले; गाझा युद्ध थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. इसरायलनं चालवलेली कारवाई क्रूर आहे, प्रमाणाबाहेर आहे, संरक्षणात्मक नसून आक्रमण आहे, असं विद्यार्थी म्हणाले. वियेतनाम युद्धाच्या विरोधात जसे अमेरिकेतले तरूण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, तसंच गाझा युद्धाबाबत झालं. प्रकरण इतकं चिघळत गेलं की ज्यू विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीत राहाणं असुरक्षित वाटू लागलं.
गाझामधे तीन निःशस्त्र तरूण पांढरा झेंडा फडकावत आपण दहशतवादी नाहीयेत असं म्हणत इसरायलच्या सैनिकांना सामोरे गेले. कायदा आणि नीतीनुसार इसरायच्या सैनिकांनी त्यांना ताब्यात घ्यायला हवं होतं. सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारलं. तिघंही ज्यू होते, इसरायलचे नागरिक होते, हमासनं त्याना ओलीस ठेवलं होतं. अगदी असंच वर्तन खुद्द इसरायलमधेही इसरायली सैनिक करत होते. अशा बातम्या न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन ही माध्यमं देऊ लागली.
सौदी, कतार, अरब अमिराती ही सर्व मंडळी अरब असूनही अमेरिकेची आणि इसरायलची दोस्त. इसरायलनं गाझाला कूट कूट कुटलं तरी आपलं अरबपण विसरून ही मंडळी गप्प होती. पण या देशातली जनता खवळली. तिथं लोकशाही नसली तरीही असंतोष तर होताच. अरब देशांनी अमेरिकेवर दबाव आणून गाझा युद्ध बंद करा, अशी मागणी केली. त्यातल्या कतारनं तर गाझाला, हमासला उघड उघड मदत आणि थारा दिला. अमेरिकेचं मध्यपूर्वेतलं राजकारण कोसळू लागलं. अगदी वियेतनामसारखी स्थिती. लाखो वियेतनामींना मारून अमेरिकेला नामुष्की पत्करून माघार घ्यावी लागली होती.
खुद्द इसरायलमधलं वातावरण गढूळ झालं होतं. इसरायल सरकारमधले दोन मंत्री उघडपणे म्हणाले की गाझातल्या पॅलेस्टिनींना गाझातून हाकलून दिलं पाहिजे. मंत्री म्हणाले, ‘अमेरिका काय म्हणतेय याची पर्वा आम्ही करत नाही, आम्ही गाझा मोकळं करणार.’
इसरायलच्या जनतेमधे खळबळ माजली. हिटलरच्या नरसंहारानंतर मिळालेली सहानुभूती आता आपण गमावलीय, आपण आता अत्यंत असुरक्षित झालोत, आपण जगात पुन्हा एकटे पडलोत, सारं जग आता आपला सूड घेईल, अशी भावना इसरायली लोकांमधे पसरली. आता इसरायलमधेच नव्हे, तर जगात कुठंही आपण सुरक्षित नाही अशी भावना इसरायलमधे वाढीस लागली. हमासनं उद्ध्वस्त केलेल्या इसरायली खेड्यातले लोक म्हणू लागले की आपण पुन्हा आपल्या गावात परत जाणार नाही, आपण देश सोडून निघून जाऊ.
हमासवर कारवाई करायला हवी हे ठीक, पण म्हणून पॅलेस्टिनींना नष्ट करणं हा काही मार्ग नाही, आपल्याला काहीही करून त्यांच्यासोबत शेजारी म्हणून राहायला शिकायला हवं अशीही भावना इसरायली जनतेमधे विकसित होऊ लागली.
परिणामी ६९ टक्के जनता म्हणू लागली की ताबडतोब निवडणूक घ्यावी आणि नेतान्याहूला हाकलून द्यावं.
या सर्व गोष्टी अमेरिका, ब्रिटन, युरोप इत्यादी ठिकाणच्या माध्यमांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. जर्मनी, जपान, प्रâान्स या देशातले टीव्हीवाले या गोष्टी सांगू लागले. बायडन इसरायलला सोडायला तयार नव्हते, ब्लिंकन त्यांना सांगू लागले की आता इसरायलला कानपिचक्या दिल्या पाहिजेत, युद्ध थांबवलं पाहिजे.
खुद्द अमेरिकेत काय झालं पाहा. ब्लिंकन यांच्या व्हर्जिनियातल्या घरासमोर लोकांनी निदर्शनं केली. ब्लिंकन खुनी आहेत असं सांगणारे फलक त्या लोकांनी नाचवले. ब्लिंकन यांची ऑफिशियल कार असते. या गाडीवर लोकांनी लाल रंग फेकला. रक्तासारखा, पातळ आणि लाल.
ब्लिंकन यांनी ठरवलं की आता नेतान्याहूना सुनवावं लागणार. एक बैठक झाली. केवळ दोघांमधे. ब्लिंकन यांच्या स्टाफवरचे लोक पत्रकारांना खाजगीत म्हणाले की दोघांमधली बैठक तणातणीची होती.
वरील बैठकीनंतर ब्लिंकन अमेरिकेत परतले होते, बायडन यांच्याशी त्यांची चर्चा झाली. त्यानंतर ब्लिंकन पुन्हा इसरायला जायला निघाले.
ब्लिंकन आता काय करणार आहेत याची कल्पना नेतान्याहूना आली. नेतान्याहू आधीच कातावले होते. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना फटकावलं होतं. न्यायालयाला सरकारच्या निर्णयांवर मत व्यक्त करता येणार नाही, अशी तरतूद नेतान्याहू राज्यघटनेत करू पहात होते. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. गेल्या वर्षभरात लाखोलाखो लोकांनी नेतान्याहूंच्या विरोधात निदर्शनं केली होती, सर्वोच्च न्यायालय त्या आंदोलकांबरोबर आहे हे सिद्ध झालं. याचा अर्थ उघड होता. लोक मिळेल ती पहिली संधी घेणार आहेत आणि आपल्याला हाकलणार आहेत, हे नेतान्याहूंना कळून चुकलं होतं. त्यात अमेरिका युद्ध थांबवा असं सांगणार होती. याचा अर्थ तरण्यासाठी असलेला युद्धाचा तराफा अमेरिका नेतान्याहूंच्या बुडाखालून काढून घेणार होती.
ब्लिंकन अमेरिकेतून निघाल्याची बातमी आल्या आल्या नेतान्याहूनी पत्रकार परिषद घेतली. आपण युद्ध थांबवणार नाही, अमेरिका काहीही म्हणो, असं नेतान्याहू म्हणाले.
अमेरिकेच्या दबावामुळं इसरायल युद्ध तहकूब करणार? पाठोपाठ इसरायलमधे निवडणुका होणार? नेतान्याहूना गाशा गुंडाळावा लागणार? नाराज अमेरिकन नागरिक आणि डेमॉक्रॅट कार्यकर्त्यांचा बायडनवरचा राग मावळणार? परिणामी बायडन यांचे पुन्हा निवडून येणं शक्य होणार?
असं आहे राजकारण.
मधल्या मध्ये त्या गाझाचं काय होणार?