दुसर्या महायुद्धानंतर त्या महायुद्धात झालेल्या नरसंहारासारखा नरसंहार पुन्हा होऊ नये यासाठी एक जागतिक सरकार असलं पाहिजे, अशी एक कल्पना पुढे आली. तीच युनोची कल्पना. आजही काही लोक युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना असा शब्दप्रयोग करत असले तरी आता या संघटनेचं नाव बदलून यूएन म्हणजे संयुक्त राष्ट्रे एवढेच राहिले आहे. युनो ही संघटना स्थापन झाल्यापासून तिच्यावर हिटलरला पराजित करणार्या दोस्त राष्ट्रांचा पगडा होता. आज ही संघटना अमेरिकेच्याच कलाने चालते. जगात जेव्हा जेव्हा दोन देशांमध्ये संघर्ष उद्भवतो तेव्हा ही संघटना त्या संघर्षात हस्तक्षेप करते आणि त्यात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. पण, आंतरराष्ट्रीय राजकारण हे हितसंबंधांचे राजकारण आहे. ते ननैतिक आहे. मानवी नीतीमूल्यांची चाड जिथे राखली जात नाही तिथे युनोच्या हस्तक्षेपाला विचारतो कोण? त्यामुळे एकेकाळी यू नो, युनो डझंट नो, असे विनोद केले जायचे. १९८० साली इराण इराक यांच्यात जेव्हा युद्धाच्या तोफा धडाडत होत्या, तेव्हा युनो ते युद्ध रोखण्याचे केविलवाणे प्रयत्न करत होती. त्यावर बाळासाहेबांनी हतबलते तुझे नाव युनो, असं सांगणारं हे व्यंगचित्र मुखपृष्ठासाठी काढलं होतं… आता एकीकडे रशिया युक्रेनला चिरडतोय, दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्टीवर हिटलरी आक्रमण केलं आहे… यूएनची अवस्था मात्र ४४ वर्षांपूर्वी होती तशीच आहे… हतबलतेची!