देशात सध्या वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये लीगचा ढीग दिसतो आहे. पण क्रिकेटशिवायच्या अन्य क्रीडाप्रकारांना हे शिवधनुष्य पेलणे अवघड झाले आहे. ‘आयपीएल’सारखी आपल्याही खेळाची लीग खेळवू, ही महत्त्वाकांक्षी स्वप्नपूर्ती करणे किती कठीण आहे, याची प्रचिती अनेक क्रीडाप्रकारांनी घेतली आहे. आर्थिक गणित आणि प्रक्षेपण करार हे महत्त्वाचे घटक सांभाळता न आल्याने लीगपुढील अडचणी वाढत जातात.
– – –
महाराष्ट्र आंतर-जिल्हा युवा अजिंक्यपद कबड्डी लीग दोन दिवसांत बंद करण्याची नामुष्की संयोजकांवर ओढवली. आर्थिक गणित कोलमडल्यामुळे ही लीग गुंडाळावी लागली. गेल्या काही दिवसांत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल आणि प्रो कबड्डी लीग (पीकेएल) या दोन देशातील महत्त्वाच्या लीगसुद्धा आर्थिक कारणास्तव छोट्या स्वरूपात सादर केल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर चर्चेत असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फायद्यात सुरू आहे. प्रक्षेपण हक्क, मुख्य प्रायोजक आदी आकडे विश्वविक्रमी झेप घेत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आर्थिक पाठबळावर देशातील अनेक राज्यांमध्येही क्रिकेट लीग यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. जूनमध्ये सात राज्यांमध्ये क्रिकेट लीग चालू होत्या.
क्रिकेटमध्ये यशस्वी ठरणारे हे लीगचे सूत्र अन्य क्रीडाप्रकारांमध्ये अपयशी का ठरते? याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे पैसा. कशाचेही सोंग घेता येते; पण पैशाचे सोंग आणता येत नाही. ‘आयपीएल’च्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी अर्थदैनिकाने प्रकाशित केले होते. जिओ हॉटस्टारची प्रेक्षकसंख्या २८ कोटींहून अधिक झाल्याचे या वृत्तात ठळकपणे म्हटले होते. नेटफ्लिक्सची जागतिक प्रेक्षक संख्या ३० कोटी आहे. या आकड्याच्या जवळपास ही झेप जाते, हेसुद्धा मांडण्यात आले होते. जिओ आणि स्टार स्पोर्ट्स यांच्या विलिनीकरणामुळे आधी विभागले गेलेले डिजिटल आणि टीव्ही हक्क आता जिओस्टार या एकाच कंपनीकडे आले. त्याचे हे फलित असले तरी ‘आयपीएल’ सलग १८व्या वर्षी उत्तम सुरू आहे. ‘आयपीएल’ची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे १२ अब्ज डॉलर इतकी आहे. सर्वात लोकप्रिय संघ अशी ख्याती असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड व्हॅल्यू १२.२ कोटी डॉलर आहे. यावरूनच या लीगच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो.
२००८पासून सुरू झालेली ही लीग अनेक अडथळे येऊनही भक्कमपणे उभी आहे. निवडणुका, करोनाची साथ अशा काही कारणास्तव काही वेळा या लीगचे सामने परदेशातही खेळवण्यात आले. कोची टस्कर्स केरळ, पुणे वॉरियर्स इंडिया, डेक्कन चार्जर्स यांच्यासारखे काही संघ आर्थिक मतभेदांमुळे ‘आयपीएल’मधून हद्दपार करण्यात आले. ललित मोदीवर आर्थिक घोटाळ्यामुळे आजीवन बंदी घालण्यात आली. पण तरीही ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ची अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही. ‘बीसीसीआय’ आपल्याकडे येणार्या नफ्याचा वाटा राज्य संघटनांना देते. त्यामुळे राज्य संघटनांच्या तिजोरीतही श्रीमंती नांदते. त्यामुळे संलग्न राज्य संघटना टी-२० मुंबई लीग, महाराष्ट्र प्रीमियर लीग, आदी अनेक लीगचे अर्थकारण पेलू शकतात. महाराष्ट्र प्रीमियर लीगला अदानी हे मुख्य पुरस्कर्ते होते. असे असंख्य पुरस्कर्ते त्यांनी मिळवले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संलग्न २१ जिल्ह्यांनाही आपल्या फायद्यातला वाटा देते. म्हणजे ही श्रीमंती जिल्हा संघटनांपर्यंतही सहजपणे दिसून येते. त्यामुळे क्रिकेटमधील या लीग सुबत्तेतून धडे घेण्याची गरज अन्य खेळांना आहे.
‘आयएसएल’चे भवितव्य अधांतरी
‘आयएसएल’ फुटबॉलच्या पर्वाला २०१४पासून गाजावाजा करीत प्रारंभ झाला. पण या फुटबॉल लीगची आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. ‘आयएसएल’चे प्रक्षेपण, राष्ट्रीय संघासह भारतीय फुटबॉलचे व्यावसायिकरण, आदी मुद्द्यांचा अंतर्भाव असलेला करार अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) या कंपनीशी केला होता. या करारान्वये ‘एफएसडीएल’ भारतीय फुटबॉल महासंघाला दरवर्षी ५० कोटी रुपये देते. २०१०पासून झालेला हा १५ वर्षांचा करार संपुष्टात आला असून, जोवर नवा करार होत नाही, तोवर ‘आयएसएल’चे भवितव्य अधांतरी आहे. ‘आयएसएल’चा हंगाम दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होतो. परंतु भारतीय फुटबॉलच्या वार्षिक कार्यक्रमपत्रिकेतही त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. याचे आणखी एक कारण म्हणजे भारतीय फुटबॉल महासंघ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. या निकालानुसार, महासंघाची निवडणूक नव्याने घ्यावी लागू शकते.
‘आयएसएल’चे वास्तव अधिक भीषण आहे. कोलकाता, गोवा, केरळ, त्रिपुरा, अशा काही राज्यांशिवाय ही लीग देशात रुजू शकली नाही. प्रâँचायझींचा (संघांचा) प्रवास, खेळाडूचे मानधन, सोयी-सुविधा, इत्यादी खर्च आवाक्याबाहेर असल्याची कबुली काही संघांनी दिली आहे. प्रत्येक हंगामासाठी ५० ते ८० कोटी रुपये खर्च करावे लागतात. पण तिकीटविक्री किंवा पुरस्कर्ते याद्वारे हा पैसा वसूल होत नाही. ‘आयपीएल’मधील प्रत्येक संघाला वर्षाकाठी अंदाजे ४२५ कोटी रुपये मिळतात, तर ‘आयएसएल’मधील प्रत्येक संघाला १३-१६ कोटी रुपये वर्षाला मिळतात. ही आकडेवारी बरेच फरक सहजपणे स्पष्ट करते. ‘आयएसएल’च्या पहिल्या हंगामात प्रेक्षकसंख्या २५,४०८ होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या हंगामात मोहन बागान, ईस्ट बंगाल यांच्यासारख्या प्रतिथयश संघांचा समावेश असतानाही प्रेक्षकसंख्या ११,०८४ इतकी घटली आहे. ‘आयएसएल’ची टीव्ही प्रेक्षकसंख्या २०१४मध्ये ४२.९ कोटी होती. परंतु मागील हंगामात ती १३ कोटींच्या नजीक असल्याची आकडेवारी प्रसारित झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे एफसी पुणे सिटी संघाने गाशा गुंडाळला आहे. हैदराबाद एफसीचीसुद्धा धडपड चालू आहे. दिल्ली डायनामोज खर्च कमी करण्यासाठी ओडिशा सरकारच्या आश्रयाला गेला आहे. ओडिशा सरकारने त्यांना मोफत स्टेडियम सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. लीगच्या प्रारंभापासून असलेला दोन वेळा विजेता चेन्नईयन एफसी हा संघसुद्धा आर्थिक घडी बसवण्यासाठी स्थानबदल करू इच्छितो. ‘आयएसएल’ रिलायन्स चालवत असल्यामुळे टिकली. रिलायन्सची स्वत:ची जिओस्टार ही टीव्ही-डिजिटल प्रक्षेपण कंपनी असल्यामुळे त्यांना हे अर्थकारणही जपता येते. परंतु ‘आयएसएल’च्या आराखड्यात मोठा बदल होणार हे निश्चित मानले जात आहे.
प्रो कबड्डीची खर्चकपात!
प्रो कबड्डी लीगच्या गौरवशाली अध्यायालाही २०१४मध्येच प्रारंभ झाला. पहिल्याच हंगामात ४३ कोटी, ५० लाख प्रेक्षकसंख्या कमावल्याने देशातील दुसर्या क्रमांकाची लोकप्रिय लीग असा नावलौकिकही प्रो कबड्डीने मिळवला. हे डोळे दिपवणारे यश मिळवले, ते समालोचक चारू शर्माने आपले नातलग उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या आर्थिक पाठबळावर निर्माण केलेल्या मशाल स्पोर्ट्सने. सोन्याचे एकेक अंडे मिळवण्यापेक्षा ते अंडे देणारी कोंबडीच आपल्या मालकीची असावी, हे धोरण अवलंबून डिस्ने स्टारच्या व्यवस्थापनाने दुसर्या हंगामाआधी प्रो कबड्डीवरच आधिपत्य मिळवले. प्रक्षेपण कंपनीच मालक झाल्यामुळे प्रक्षेपण हक्क आणि त्यातून मिळणारा नफा हे समीकरण पूर्णत: स्टारच्या नियंत्रणात राहिले. भारतीय हौशी कबड्डी महासंघाशी असलेला हा करार १० वर्षांचा होता. जो गतवर्षी हंगामाआधीच संपल्याचे स्पष्ट झाले असले तरी या करारात स्वयं-नूतनीकरणाचा मुद्दा असल्याचेही म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांत प्रâँचायझींची (संघचालक) खर्च वाढला असतानाही फायद्याचे गणित मात्र वाढले नसल्याने नाराजी प्रकट होत आहे. त्यात जिओकडे स्टार स्पोर्ट्सची मालकी आल्यामुळे स्वाभाविकपणे मशाल स्पोर्ट्सही त्यांच्या आधिपत्याखालीच आले आहे. पण प्रो कबड्डीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार ही शक्यता खरी ठरत आहे. ऑगस्टच्या मध्यावर प्रो कबड्डीच्या १२व्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. पण खर्चकपात करण्याच्या हेतूने दोन मोठी पावले उचलली जाणार आहेत. हा हंगाम १३ आठवड्यांऐवजी फक्त सहा आठवड्यांत संपेल आणि बहुशहरांऐवजी फक्त एकाच शहरात सर्व सामने होतील. प्रो कबड्डीवर ही स्थिती का ओढवली? मागील म्हणजे ११व्या हंगामात २२ कोटी, ६० लाख इतकी प्रेक्षकसंख्या होती. जी मुळीच समाधानकारक नाही. प्रो कबड्डीच्या मागील दोन हंगामांमध्ये मुख्य प्रायोजक नसल्याचीही उणीव भासते आहे. म्हणजेच प्रो कबड्डी लीग १२व्या हंगामाकडे वाटचाल करताना आर्थिकदृष्ट्या संपन्न नसली तरी पैशाचे गणित नीटपणे जुळवलेले आहे.
लीगच्या अपयशाची कारणे
देशातील लीगच्या अर्थकारणातील प्रमुख फरक हा प्रक्षेपणाच्या उलाढालीवर अवलंबून असतो. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘आयपीएल’च्या प्रक्षेपणासाठी प्रक्षेपण कंपन्या पैसे मोजतात. परंतु अन्य लीगसाठी संयोजकांना प्रक्षेपण कंपनीला पैसे द्यावे लागतात. ‘आयएसएल’ आणि प्रो कबड्डीच्या पाठीशी रिलायन्स असल्यामुळे जिओस्टारद्वारे प्रक्षेपणाचा प्रश्न सुटला आहे. पण तेवढेच. त्यामुळे क्रिकेटच्या ‘आयपीएल’चे लीगसूत्र अन्य क्रीडाप्रकारांत यशस्वी ठरले नाही. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होण्यासाठी प्रीमियर बॅडमिंटन लीगचे २०१६ ते २०२० या कालावधीत पाच हंगाम झाले. पण सहावा हंगाम आजतागायत झालेला नाही. २०१३पासून सुरू झालेली हॉकी इंडिया लीग सहा वर्षांच्या स्थगितीनंतर काही महिन्यांपूर्वी पुन्हा परतली. अभिनेता अमिर खानने रिंगणात आणलेली सुपर बॉक्सिंग लीग पहिल्या हंगामानंतर कधीच दिसली नाही. कुस्तीची प्रो रेसलिंग लीगसुद्धा चार हंगाम झाल्यावर २०१९नंतर बंद पडली आहे. यूबीए प्रो बास्केटबॉल लीगचे चार हंगाम २०१५ ते १७ या कालावधीत झाले. त्यानंतर एलिट प्रो बास्केटबॉल लीगची २०२२मध्ये घोषणा झाली. पण प्रत्यक्षात अद्याप ती अवतरलेली नाही. बर्याच वर्षांपूर्वी महाकबड्डी लीग दोन हंगामांनंतर आर्थिक कारणास्तव बंद पडली. अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम २०२२मध्ये झाला. त्यावेळी ६ कोटी, ४० लाख प्रेक्षकसंख्या मिळाली. त्यानंतर गतवर्षी दुसरा हंगामही झाला. नव्याच्या नवलाईमुळे प्रेक्षकसंख्या वाढली असली तरी ती आगामी काळात टिकेल का?
आवाक्याबाहेरचा खर्च आणि परताव्याची शक्यता अत्यंत कमी हे लीगचे समीकरण अन्य क्रीडा प्रकारांना साध्य न झाल्याचे प्रमुख कारण आहे. ‘आयपीएल’ आणि प्रो कबड्डी टिकवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी क्रीडाप्रकारांमधील नायक प्रकाशझोतात आणले. कोणत्याही कथेला नायक आणि खलनायक असतो. नायक खलनायकावर मात करून इप्सित साध्य करतो, हेच कोणत्याही सामन्याचे कथासूत्र असते. त्यामुळेच ‘आयपीएल’चे अर्थकारण आजही आदर्शवत आहे.