वरळीतल्या एनएससीआय डोममध्ये ५ जुलैला जे चित्र दिसलं ते आजच्या बहुसंख्य मराठी माणसांच्या मनातलं चित्र होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या भावांनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातल्या असंख्य ठाकरेप्रेमींची इच्छा होती. त्यांना दोघांना एकत्र येण्याची जेवढी इच्छा आणि गरज असेल त्याहून अधिक ती महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आणि गरज होती. एका अर्थी ती महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती होती.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल लागल्यानंतर जे मरगळीचं, हताशेचं चित्र होतं ते दूर करणारा त्या अंधारातला एक नवा किरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसला. त्यामुळेच मंचावर हे दोन भाऊ एकत्र आले तेव्हा त्याला जनतेतून इतका उदंड प्रतिसाद मिळाला. आपली लढाई कुणीतरी लढली पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो कोणी पाय रोवून उभा राहील त्याला साथ द्यायला आपण तयार आहोत, हाच वरळीतल्या कार्यक्रमाचा एकमुखी संदेश आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आल्यानं स्टेजवर जितकी ऊर्जा दिसत होती, तितकीच ती त्या गर्दीतल्या प्रत्येक डोळ्यांत जाणवत होती. त्यातून पुढच्या राजकीय वाटचालीचे अनेक अर्थ काढले जात असले तरी तूर्तास महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वातावरणासाठी ही एकी जास्त महत्वाची आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाने प्रचंड फोडाफोडीचं राजकारण बघितलेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांची शकलं झाली. सत्तेसाठी भाजप कुठल्या थराला जाऊ शकतो, हेही याच पाच वर्षांत सार्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतरही जनमताचा जो कौल आला तो मराठी जनतेसाठीच अविश्वसनीय आणि संशयास्पद असा. त्याबद्दलच्या कोर्ट कचेर्या अजूनही चालू आहेतच. पण या सगळ्यात विरोधाची सगळी स्पेसच संपवून टाकण्याचा जो घातक प्रयत्न चालू झाला आहे तो धोकादायक.
या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं आशादायी आहे. दोन्ही बंधूंनी भाजपचा सर्व अर्थांनी जवळून अनुभव घेतला आहे. दोघांचे परिणाम वेगळेवेगळे असले तरी ठाकरेंच्याकडे बघण्याचा भाजपचा दृष्टिकोन एकच आहे. ठाकरे हा ब्रँड संपवणं हेच भाजपचं अंतिम लक्ष्य आहे. कारण त्याशिवाय ते महाराष्ट्रात आपली ताकद वाढवू शकणार नाहीत. उद्धव ठाकरेंना त्यांनी पक्ष फोडून संपवण्याचा प्रयत्न केला, तर राज ठाकरेंना जवळ घेऊन. राज ठाकरे महायुतीचा प्रत्यक्ष भाग नसले तरी विधानसभा निवडणुकीत ते जाहीरपणे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं सांगत होते, मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबाही जाहीर केला होता. पण एवढं सगळं करूनही त्यांच्या वाट्याला एकही आमदार आला नाही. अगदी माहीम मतदारसंघात त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. म्हणजे भाजपच्या मदतीची इतकी साधी परतफेडही त्यांना मिळाली नाही. निकालानंतर राज ठाकरेंबद्दल सहानुभूतीची भाषा भाजप वापरत असली, त्यांना एखाददुसरी विधान परिषद द्यायचीही त्यांची तयारी असली तरी अशा दारुण पराभवानंतर आपला ब्रँड दुसर्यासाठी वापरण्याऐवजी तो स्वत:साठीच का वापरू नये असा विचार कदाचित त्यांच्याही मनात आला असावा.
उद्धव ठाकरे यांनी तर भाजपविरोधातल्या या लढाईत आपल्या बर्याच गोष्टी पणाला लावल्या आहेत. भाजपविरोधातली लढाई ते प्रामाणिकपणे लढतायत याबद्दल आता कुणाच्या मनात शंका नाही. याच ठाकरे नावाच्या जोरावर उद्धव ठाकरे आपल्याला जुमानत नाहीत याची भाजपला कल्पना आहे. राज ठाकरेही ठाकरे नावाच्या जोरावरच भाजपसाठी उपद्रव मूल्य टिकवून आहेत. ते आपल्या त्रासाचं ठरू नये इतकी काळजी भाजप आजवर घेत आला आहे. एक ठाकरे दूर गेल्यानंतर दुसरे ठाकरे सोबत असले पाहिजेत इतकी काळजी म्हणूनच भाजपला होती. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडल्यानंतर म्हणूनच तर राज यांची हिंदुत्ववादी भूमिका उग्र झाली होती. त्यांच्या महायुतीच्या नेत्यांच्या गाठीभेटीही वाढल्या होत्या. हे सगळं त्याच रणनीतीचा भाग होतं. पण विधानसभा निकालानं त्यात भाजपचा इंटरेस्ट कुठपर्यंत असतो हे दिसून आलं.
एकनाथ शिंदे यांच्या हातात पक्षाचं धनुष्यबाण आणि नाव सोपवत हीच खरी शिवसेना असं चित्र भाजप आणि महाशक्ती करू पाहत आहे. तेच खरे बाळासाहेबांचे वारसदार असं सांगत शिवसेनेचे आमदार फोडायला प्रचंड धनशक्ती त्यांच्या पाठीशी उभी केली गेली. पण म्हणून ती खरी शिवसेना ठरू शकत नाही… जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना असते. वरळीतल्या कार्यक्रमाने हीच शिवसेना अधिक बळकट झाली पाहिजे… हाच ठाकरे ब्रँड बळकट झाला पाहिजे ही भावना सामान्यांनी अधोरेखित केली आहे. निवडणुका येतील जातील, परिणाम काहीही होवोत… पण सगळ्यांनी सत्तेला शरण जाऊ नये, कुणीतरी पाय रोवून उभं राहणारंही हवं असंच जनतेला वाटत असतं. त्यामुळेच जे लोक राज-उद्धव यांच्या राजकारणाचे समर्थक नसतील तेही ठाकरेंच्या एकीचं चित्र पाहून सुखावल्याचं दिसत होतं, आतून त्यांना बरंच वाटत होतं. त्याचं कारण हेच आहे.
मराठीच्या मुद्द्यावर महायुती सरकारनं आयती संधी उपलब्ध करून दिली. तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या निर्णयावर सरकारनं जीआर पहिल्याच विरोधानंतर मागे घेतला असता, तर कदाचित या मुद्द्यावर इतकं वातावरण तापलं नसतं. ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची सर्वाधिक कोंडी होणार आहे. एकीकडे बीएमसी निवडणुकीसाठी पुन्हा पैसा फेको तमाशा देखो करत एकेक नगरसेवक उचलण्याचं काम त्यांनी चालू केलं होतं. महाशक्तीच्या नजरेत पुन्हा भरण्यासाठी किंवा आपला दबदबा सत्ता गेल्यानंतरही कायम आहे हे दाखवण्यासाठी त्यांना काहीही करून आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे. पण ठाकरेंच्या एकत्रित येण्यानं त्यांच्या सगळ्याच वाटचालीला मर्यादा येणार आहेत. एकतर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा होणार आहे की सध्या या दोन्ही पक्षांतून तिकडे होणार्या पक्षांतराला आळा बसणार आहे. बरं यात भाजपचा स्वार्थ असा की त्यांचे इनकमिंग बिनभोबाट चालू आहे. कारण त्यांना काँग्रेसचे नेते उचलायचे आहेत. एकनाथ शिंदेंसाठी या इनकमिंगसाठी जे मार्केट आहे त्या मार्केटलाच कुलूप लागतंय, कारण दोन ठाकरे बंधु एकत्रित येतायत. एकदा महाराष्ट्रात मुख्यमंत्री बसवल्यानंतर भाजपसाठी शिंदेंचा उपयोग तसाही कमी झालेला आहे.
भाजपचा इतिहास पाहता, ते मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंमधील मतभेदांना चिथावण्याचा प्रयत्न करू शकतात. भूतकाळातील वैयक्तिक आणि राजकीय संघर्षांचा फायदा घेऊन भाजप त्यांच्यातील अविश्वास वाढवण्याचा नक्की प्रयत्न करेल.
राज-उद्धव युती निवडणुकीसाठी आहे का मुंबई महापालिकेसाठी आहे का.. हा म मराठीचा नाहीय तर महापालिकेचा आहे अशी टीका भाजपच्या वर्तुळातून सुरू झाली आहे. पण मुळात याच भाजपने सत्तेसाठी इतक्या तडजोडी केल्या आहेत, इतक्या खालच्या पातळीचे राजकारण केले आहे की त्यांना या मुद्द्यावर तोंड उघडायची सोय उरलेली नाही. म्हणजे ठाकरेंच्या या राजकारणावर टीका करण्यासाठी भाजपमध्ये जबाबदारी कुणावर आहे तर ती राणे कुटुंबावर… जे राणे कुटुंब स्वत: शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान पक्ष ते भाजप असा प्रवेश करून आलेलं आहे. इथेच हा विनोद संपला पाहिजे.
टोकाच्या विरोधी भूमिका असलेले पक्ष एकत्रित येऊ शकतात, तर मग दोन भाऊ एकत्रित का येऊ शकत नाहीत?.. बाकीच्यांची जुनी वक्तव्ये लोक विसरू शकतात, तर मग दोन भावांची जुनी विधानं विसरायला काय हरकत आहे?.. इतक्या आघाड्या बनताना बिघडताना लोकांनी पाहिल्या आहेत की त्यांच्यासाठी हे काही तितकं अवघड काम नाही.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाजपला रोखू शकणार का, मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेऊ शकणार का, यापेक्षाही आत्ता या दोघांनी किमान आपण ही विरोधाची लढाई लढायला तयार आहोत, त्यासाठी येणारी सगळी आव्हानं पेलायला तयार आहोत, हा संदेश दिला तरी जनता त्यांना डोक्यावर घ्यायला तयार होईल. मराठी भाषेच्या निमित्तानं हा महाराष्ट्र धर्म पुन्हा पेटवण्याची संधी नियतीनं ठाकरेंना उपलब्ध करून दिली आहे. कदाचित प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे या दोघांनीही मराठी मातीसाठी दिलेल्या योगदानाचीच ती परतफेड असेल. उत्तर भारतीय आक्रमणात, महाराष्ट्राबाहेरच्या सत्ताधीशांच्या अमर्याद सत्तेत हा महाराष्ट्र झुकलेला असताना म्हणूनच ताठ मानेनं उभं राहण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यायला हवं.