सोमीताई म्हणजे सोशल मीडिया ताई. सगळ्या जगाला व्यापून दशांगुळे वर उरलेल्या सोशल मीडियाच्या संदर्भात जे काही प्रश्न पडतील, ते आमच्या सोमीताईंना विचारा… त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात… ‘सोमी’तज्ज्ञ आहेत ना त्या!
– – –
जनतेनेच यांना नाकारावे!
प्रश्न : सोमी, सोशल मीडियावर काही बंधने आवश्यक झाली आहेत का?
उत्तर : मी तर सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर किमान पाच वर्षं बंदी घालावी अशा धाडसी विचारापर्यंत पोहोचले आहे. सोशल मीडियाच्या नावाखाली जो काही उन्माद गेल्या काही दिवसांत अनुभवला आहे तो अत्यंत वेदनादायी आहे. काही दिवसांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी विमान अपघात देशात घडला. संपूर्ण देश दु:खात बुडालेला असताना काही
सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आणि डिजीटल पत्रकार यांनी या घटनेचा जो काही किळसवाणा वापर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि लाइक वाढवण्यासाठी करून घेतला तो प्रकार संताप आणणारा होता. या अपघाताविषयी गैरसमज निर्माण करणार्या खोट्या बातम्या पसरवणे, मृतांचे फोटो वापरणे, त्या फोटोंपासून एआयच्या मदतीने व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न करणे, हा घात होता की अपघात याच्या भडक आणि खोट्या बातम्या तयार करणे, वाचलेल्या एकमेव प्रवाशाविषयी संभ्रम निर्माण करणे, तो अतिरेकी असल्याच्या थाटात त्याचे वर्णन करणे असे प्रकार सर्रास घडताना दिसले. शेवटी मरण पावलेल्या लोकांच्या काही कुटुंबांनी सोशल मीडियावर या लोकांना हात जोडून हे प्रकार थांबवण्याची आणि त्यांच्या मृत नातेवाईकांच्या फोटो, व्हिडीओचा गैरवापर थांबवण्याची विनंती करण्याची वेळ आली, तेव्हा संपूर्ण देशाची मान लाजेने खाली गेली. मनाला येईल ते खोटे नाटे पसरवणार्या आणि त्यात फक्त स्वत:चा फायदा बघणार्या अशा ’मन की बात’ना कुठेतरी आवर घालायलाच हवा आहे. आणि कायदा त्याचे काम करण्याची वाट न बघता सुज्ञ जनतेने अशा लोकांना नाकारण्याची जास्त गरज आहे.
– निराश सोमी
या ‘अंकल’ लोकांचे काय करायचे?
प्रश्न : सोशल मीडियावर वावरणारे काही ज्येष्ठ नागरिक इतरांना कायम तुच्छ का समजतात?
उत्तर : कारण या ज्येष्ठ नागरिकांचा बुद्ध्यांक अपरंपार असतो. काल एका ज्येष्ठ नागरिकांना नवीन ईमेल खाते उघडून देण्याचे समाजकार्य केले. नाव, आयडी इ. भरून झाल्यावर गाडी पासवर्डपाशी आली.
ज्येष्ठ नागरिक : काय ठेवू पासवर्ड?
मी : तुम्ही शेअर्स, बँक अशा महत्त्वाच्या कामांसाठी वापरणार आहात ना हे खाते? मग जरा ‘कडक’ पासवर्ड हवा. शक्यतो दोन शब्द एकत्र असणारा, सहज कोणाच्या लक्षात न येणारा आणि मुख्य म्हणजे एक अक्षर
कॅपिटल आणि पासवर्डमध्ये एखादा आकडा असलेला जास्ती चांगला आणि सुरक्षित. तुमचे नाव, मुला-मुलीचे नाव किंवा गाडीचा नंबर नको. ते असुरक्षित आहे. (हुश्श!)
ज्येष्ठ नागरिकांनी ऊर्ध्वावस्थेत जाऊन तब्बल दोन मिनिटे विचार केला.
ज्येष्ठ नागरिक : हां… टाका, ‘लवथवती विक्राळा १२४/ब’.
– थक्क झालेली सोमी
हा भस्मासुर सत्तेच्या सोयीचा!
प्रश्न : सोशल मीडियावर अराजकता वाढली आहे का?
उत्तर : सोशल मीडियामुळे अराजकता वाढली आहे खरे तर. बोटावर मोजता येतील इतके लोक या सोशल मीडियाचा उत्तम वापर करत असताना इतर असंख्य लोक याचा गैरवापर करताना दिसतात. मात्र कोणाला त्याचे काहीही पडलेले नाही. जोवर एखाद्या मंत्र्याचे, सेलिब्रिटीचे खाते हॅक होत नाही, त्यावरून काही गैरवर्तन घडत नाही तोवर सोशल मीडिया नावाच्या भस्मासुराचा उत्पात कोणालाही जाणवत नाही. मग अचानक सोशल मीडियाचा गैरवापर, कायद्याची गरज, सध्याचा कायदा कसा दुबळा आहे, भविष्यात काय काय अनर्थ घडू शकतो यावर धुरंधर लोक व्यक्त होऊ लागतात, रकानेच्या रकाने या संदर्भातील बातम्यांनी भरायला लागतात. मग चार दिवसांत नवे काही प्रकरण घडते आणि सगळे काही मागे पडते.
सोशल मीडिया नावाच्या भस्मासुराची ओळख काही हुशार लोकांना पूर्वीच पटली होती आणि त्याचे धोके देखील लक्षात आले होते. ज्याप्रमाणे बँक खात्याला ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) जोडण्याची सक्ती केली आहे, अगदी तसाच नियम सोशल मीडियाच्या प्रत्येक खात्यासाठी केल्यास सगळे दूषित वातावरण क्षणात बदलून जाईल. पण असे केले तर आपल्याच पायावर कुर्हाड मारण्यासारखे आहे हे धोरणी राजकारणी चांगले ओळखून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून उभे केलेले विकासाचे फसवे डोलारे कोसळायला लागले आणि खोट्या देशभक्तीच्या डोळ्यावर बांधलेल्या पट्ट्या सुटायला लागल्या तर मग अवघड!
– स्पष्टवक्ती सोमी
जाणकारांना आवरा!
प्रश्न : ताई, सोशल मीडियावर अत्यंत ठामपणे खोटी माहिती पसरवणार्या तथाकथित जाणकारांना कसे आवरावे?
उत्तर : दादुस, ह्या जाणकारांना ते जाणकार आहेत असे वाटत असले तरी इतर लोक निव्वळ मनोरंजन म्हणून त्यांच्याकडे बघता असतात. मी उद्या विराट कोहलीने बॅट कशी पकडावी याबद्दल मार्गदर्शन केले तर लोक त्याकडे किती गांभीर्याने बघतील? आमच्या एक विदेशी काकू आहेत. म्हणजे मूळ भारतीय पण आता विदेशात स्थायिक आहेत. ह्या काकू स्वत:ला प्रगतिशील विचारांची, विद्रोही, बंडखोर, काळाच्या पुढचा विचार करणारी आणि सगळ्यातले सगळे समजणारी म्हणवून घेतात. ह्यांचा एक ठरावीक सदस्यांचा ग्रुप आहे. इतरांना तिथे प्रवेश नाही आणि तिथली चर्चा देखील वाचता येत नाही. सोशल मीडिया अथवा इतर माध्यमात ज्या ज्या लोकांचे कौतुक होते, सन्मान मिळतो अशा सर्व लोकांची यथेच्छ टवाळी उडवणे, त्यांच्या कार्याची खिल्ली उडवणे आणि सदर माणूस कसा मूर्ख आहे, नाटकी आहे यावर चर्चा करणे हे या ग्रुपचे प्रमुख कार्य. इथले सदस्य देखील काकूंनी स्वत: निवडलेले, अर्थात सर्वांची विचारसरणी एकाच जातकुळीची. मी देखील इथे सदस्य आहे हा भाग वेगळा.
तर काही दिवसांपूर्वी इथल्याच सदस्यांशी डोनाल्ड ट्रम्प या मुद्द्यावर मतभेद झाल्याने काकू रुसल्या आणि त्यांनी स्वत: ग्रुप सोडला. त्यानंतर त्यांनी एक नवा ग्रुप चालू केला आणि त्याचे आमंत्रण देण्यासाठी माझ्या मेसेज बॉक्समध्ये अवतरल्या. मग ट्रम्प कसा चोर आहे आणि व्यापारी वृत्तीचा आहे ह्यावर काकूंनी काही ज्ञानतुषार माझ्यावर सांडले आणि त्यावर माझे मत विचारले. मी काकूंना फक्त इतकेच म्हणालो की, काकू स्वत: गोळा केलेल्या २८ समविचारी लोकांना तुम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हा लोकांना एकमेकांच्या विरोधी मताचा देखील आदर करता येत नाही आणि ट्रम्पने देश कसा सांभाळावा आणि नेत्यानाहूने इस्राइली जनतेची कशी काळजी घ्यावी यावर ज्ञान का पाजळता आणि मुख्य म्हणजे जे पाजळता ते लोकांनी ज्ञान समजावे आणि तुम्हाला वंदन करावे अशी आशा का बाळगता? ब्लॉक केले राव काकूंनी मला.
– सोमी टोमणेवाली
सोमी आत्या लाज आणते!
प्रश्न : ताई तुझे नातेवाईक सोशल मीडियावर आहेत का?
उत्तर : माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढीतील अर्धे नातेवाईक माझ्या भीतीने सोशल मीडियावर आलेले नाहीत आणि जे आलेले आहेत त्यांनी मला ब्लॉक केलेले आहे. नव्या पिढीची पोरं येत असतात आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत असतात. ’सोमी आत्या लाज आणते राव!’ असे त्यांचे माझ्या विषयीचे स्पष्ट मत आहे.
– सोमी लाजवंती
तज्ज्ञांचे ऐकतो कोण?
प्रश्न : सोमी, आजकाल सोशल मीडियावर विविध तज्ज्ञांचा सल्ला लोक मोठ्या प्रमाणावर वाचत आहेत. तू पण असे एखादे पेज का सुरू करत नाहीस?
उत्तर : मुळात मी तज्ज्ञ नाही. दुसरे म्हणजे लोकं तज्ज्ञांचा सल्ला वाचतात ऐकतात हा आपला भ्रम आहे. मला देखील असाच भ्रम होता, तो आमच्या राजमातेने दूर केला.
क्रिकेटच्या मॅचमध्ये दोन इनिंग्जच्या मध्ये थर्ड अंपायर, फोर्थ अंपायर वगैरे नावाचे भिकार कार्यक्रम वाहिन्या दाखवतात. या कार्यक्रमाकडे प्रेक्षक नक्की काय भावनेने बघतात, हे मला कायम कोडे असायचे. काल आमच्या राजमातेने ते सोडवले. काल रात्री कुठलीच टुकार मराठी मालिका (ही द्विरुक्ती आहे ह्याची कल्पना आहे) नसल्याने, किंवा सगळ्यांचेच रिपीट टेलिकास्ट देखील बघून झाल्याने आमच्या राजमातांनी क्रिकेटकडे मोर्चा वळवला होता. त्या क्रिकेट बघताना प्रेक्षक कमी आणि सल्लागार प्लस टीकाकार जास्त असतात. ’आता त्या जडेजाला कशाला बोलिंग दिली? केवढ्या रन देतो तो. त्याला खरेतर घ्यायचेच नाही! घेतले की मग त्याला बोलिंग द्यावी लागते’ किंवा ’घ्या! पुन्हा चार धावा. एक माकड काय मागे बॉल
अडवायला उभे नसते!’ अशा विविध मार्गदर्शनपर वक्तव्यांसह ती सामन्याचा आनंद घेत असते. हां, तर झाले काय, की काल एक इनिंग संपली आणि ते थर्ड का फोर्थ अंपायर लागले. त्यानंतर मग दुसरी इनिंग सुरू झाली. काही वेळाने राजमातांनी घड्याळ बघितले, तर बारा वाजून गेलेले. ’बाप रे!’ असे उद्गार काढत मग त्या टीव्ही बंद करून झोपायला निघाल्या. टीव्ही बंद करता करता म्हणाल्या, ’त्या तिघा चौघांनी आणि त्या बाईने बडबड करण्यात विनाकारण वेळ घालवला, त्यामुळे मग आपली बॅटिंग सुरू व्हायला उशीर झाला!’
– अज्ञ सोमी