• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पहिल्या महायुद्धाची नेपथ्यरचना

- निळू दामले (युद्धाची चटक)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 11, 2025
in घडामोडी
0

पहिलं महायुद्ध.
१९१४ ते १९१८.
१ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झालं व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपलं.
ऑस्ट्रियाचा युवराज फ्रँझ फर्डिनंड याचा खून या घटनेनं युद्ध युरोपमध्ये सुरू झालं. नंतर ते जगातल्या सर्व खंडांमधे आणि सर्व समुद्रांमध्ये पसरलं. युरोपीय युद्ध जागतिक झालं. या महायुद्धात एकंदर ३३ देश सामील होते. त्या सर्वांचे मिळून ६ कोटी सैनिक रणांगणात उतरले होते. १.६ कोटी माणसं मेली. त्यात सैनिक होतेच पण तेवढ्याच संख्येनं नागरिकही होते. युद्ध जर्मनीनं सुरू केलं.
१९१४ सालची युरोपमधली परिस्थिती आणि राजकीय तोल…
युरोपात जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया (त्यात हंगेरीही आलं), रशिया आणि ऑटोमन साम्राज्यं होती. युरोप खंडापासून एका छोट्या खाडीनं वेगळा झालेल्या ब्रिटनचंही एक साम्राज्य होतं. युरोपच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर पार केला की अमेरिका होती आणि अमेरिकेचंही एक साम्राज्य होतं. प्रत्येक साम्राज्यात घटक देश होते, प्रत्येक घटकाला स्वतंत्र वांशिक, धार्मिक भाषिक, सांस्कृतिक ओळखी होत्या. जर्मनीच्या साम्राज्यात आफ्रिकेतले काही देश वसाहतीच्या रूपात होते. ब्रिटीश साम्राज्यात भारत होता.
ऑस्ट्रियन साम्राज्यात हंगेरी होता, काही स्लाव देश होते. ऑटोमन साम्राज्यात मध्य पूर्वेतले देश होते, बाल्कन देश होते. रशियात अनेक पूर्व युरोपीय देश आणि मध्य आशियातले देश होते.
साम्राज्याला एक राजा असे. राजाचा एक दरबार असे, कारभार करणारं एक मंडळ असे. ऑटोमन साम्राज्य वगळलं तर इतर साम्राज्यांचा राजा ख्रिस्ती असे. त्या राज्यात चर्च ही एक संस्था महत्वाची असे आणि ती कधी राजाच्या सोबत असे कधी राजाशी स्पर्धा करत असे. खरे सत्ताधारी आपणच आहोत असा दावा राजा आणि चर्च करत असत. राजा असो की चर्च, सर्व मंडळी जमीनदार होती. जमीनदारच सरदार असे, त्याच्याजवळ त्याचं सैन्य असे. चर्चजवळही जमीन होती. जमीन (आणि जनावरं) हेच त्या काळचं मुख्य संसाधन (रिसोर्स) होता. थोडक्यात असं की जमीनदार, जमीनदारी हा राज्याच्या आधार असे. जमीनदार, राजा आणि चर्च मिळून राज्य चालवत.
अठराव्या शतकापर्यंत या साम्राज्यात शेती व्यवस्था होती, शेती हेच महत्वाचं उत्पन्नाचं आणि जगण्याचं साधन होतं. बहुसंख्येनं असलेले शेतकरी शेती व इतर मालाचं उत्पादन करत असत. राजा, दरबारी, लष्कर, कारभारी, चर्च, बलुतेदार, व्यापारी इत्यादी मंडळी शेतमालाच्या उत्पादनात नसत, शेतमाल ते विकत घेत असत किंवा हिसकावून घेत असत.
समाजगटांची, माणसांच्या समूहांची ओळख अनेकांगी होती. माणसं उत्पादनाच्या हिशोबात शेतकरी, काश्तकार, कामगार इत्यादी असत. भाषेच्या हिशोबात ती कुठली तरी भाषा बोलत असत. विभागांच्या हिशोबात ती कुठल्या तरी विभागात कित्येक पिढ्या रहात असल्यानं त्या विभागाची असत. प्रत्येक समाजगटाला एक बृहत धर्म असे आणि त्या धर्मातला एखादा पंथ असे. एकाच साम्राज्यात अशा नाना ओळखी असलेली माणसं राजाच्या छत्राखाली नांदत. बाहेरचं आक्रमण आणि त्रासापासून संरक्षण राजा करत असे, म्हणून तो या समाजगटांचा प्रमुख असे. कधी काळी चर्चकडेही सैन्य होतं, चर्च प्रमुख राजाच असे.
राज्य चालवण्यासाठी लष्कर आणि कारभार करणारी नोकरशाही आवश्यक असे. नोकरशाही लष्कराचं नियंत्रण करत असे. राज्य वाढवणं हा कुठल्याही राज्याचा मुळातला उद्योग असे, राज्याची तीच एक प्रमुख प्रेरणा असे. जेवढं राज्य मोठं तेवढा राजा मोठा, तेवढी राजाची आणि राज्याची प्रतिष्ठा मोठी.
राज्य विस्तार करण्याची गरज पडत असे कारण प्रत्येक राजाला आणि राज्याला राज्य चालवण्यासाठी आवश्यक साधनं कालांतरानं, काही कारणांनी कमी पडत. ही साधनं वाढवण्याची एक वाट म्हणजे शेजारच्या किंवा आणखी पलिकडच्या राज्यावर आक्रमण करून तिकडली साधनं आपल्या राज्याला जोडायची. नवा प्रदेश, तिथली उत्पादनं आणि तिथल्या लोकांकडून मिळणारा कर.
पहिल्या महायुद्धाच्या आधी वर वर्णन केलेली साम्राज्यं, त्यांच्या पोटातली राज्यं यांचा एक तोल तयार झालेला होता. तोल याचा अर्थ प्रत्येक साम्राज्य पसरण्याची खटपट करत असे, पण ती करत असताना इतर साम्राज्यांशी मैत्री, तणाव, दादागिरी, हिसकाहिसकी यांचा एक तोल तयार करत. हुशार मांजर किंवा हुशार प्राणी आधी समोरच्या प्राण्याच्या शक्तीचा अंदाज घेतो आणि नंतर त्या प्राण्याच्या असहाय्य किंवा बेसावध क्षणी हल्ला करून त्या प्राण्याचं भक्ष्य करत असतो. समोरचा प्राणी अधिक ताकदवान किंवा बेरकी निघाला तर प्राणी हुशारीनं शेपटी घालून पळ काढतो. इतरांना जिंकण्याचा प्रयत्न करायचा, ते जमलं नाही तर जमेल तितकं एकत्र नांदायचं. यालाचा राजकीय तोल असं म्हणायचं. हा तोल साम्राज्यांनी साधला होता.
हा तोल सिद्ध झाला होता १८७० साली. त्या काळातल्या प्रशियन साम्राज्यानं दादागिरी करून जर्मनीतला प्रदेश एकत्र केला, फ्रान्समधला काही प्रदेश गिळला, ऑस्ट्रियाचा काही प्रदेश गिळला आणि जर्मन साम्राज्य तयार केलं. ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन, इटाली, ऑस्ट्रिया इत्यादी देश-साम्राज्यं दातओठ खात, कधीतरी जर्मनीचा वचपा काढला पाहिजे असा विचार मनात दाबून ठेवत स्वस्थ बसली होती. रशियाची झारशाहीही अशीच गप्प होती. १८७०पासून १९१४ या काळात युरोपातली साम्राज्यं तोल सांभाळून गप्प होती. शांत होती याचा अर्थ त्यांनी आपल्या महत्वाकांक्षा त्यागल्या होत्या असं नव्हे. आपापल्या परीनं लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य वाढवण्याचे भरपूर प्रयत्न या साम्राज्यांनी केले होते.
या काळात औद्योगिक क्रांती झाली, वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक आणि एकूणच ज्ञानाच्या प्रांतात झालेल्या बदलामुळे युरोप समृद्ध झाला होता. कोळसा खाणीतून काढणं, कोळशाची उर्जा वापरून लोखंड खाणीतून काढणं, कोळशाच्या ऊर्जेचा वापर करून लोखंडाचं रुपांतर विविध प्रकारचे गुणधर्म असलेल्या पोलादात करणं. नवी उत्पादनं तयार झाली, त्यातून नव्या प्रक्रिया तयार झाल्या. रूळ झाले, डबे झाले, इंजिनं झाली, रेल्वे सिद्ध झाली. पोलादी पत्रे तयार झाले. महाकाय बोटी तयार झाल्या. विमानं झाली. बंदुका तयार झाल्या. बंदुकी हलक्या वजनाच्या झाल्या, अचूक मारा करू लागल्या. बंदुकीचं तंत्र विकसित झालं. एका मिनिटाला शेकडो गोळ्या झाडता येऊ लागल्या आणि तोफेचे गोळे कित्येक मैल अंतरावर अचूक पडू लागले.
हे सगळे बदल युद्धाच्या हिशोबात महत्वाचे होते. अगदी कमी वेळात हज्जारो सैनिक शेकडो मैल दूरवरच्या आघाडीवर पोहोचवता येऊ लागले. त्यांना लागणारी रसदही पोहोचवता येऊ लागली. सैनिकांनी एकास एक भिडून एकमेकांचा जीव घेणं ही फार वेळ खाणारी प्रक्रिया होती. बंदुका, तोफा, विमानं, रणगाडे या साधनांचा वापर झाल्यावर दूरवरूनच शत्रू सैनिकाला मारणं सहजसाध्य झालं. रणगाडे आणि तोफा कित्येक मैलावरून शत्रूचा नायनाट करू शकत होते.
पूर्वी एखादं युद्ध समजा दहा वर्षं चालत असेल तर ते आता काही दिवसातच संपवणं, पूर्वीच्या तुलनेत कितीतरी अधिक सैनिक मारणं, नवीन तंत्र आणि उत्पादनं यांच्यामुळे शक्य झालं. पहिलं महायुद्ध काही महिन्यात संपेल असं युद्ध आखणार्‍यांना वाटलं. पण घटनाच अशा घडत गेल्या की ते चार वर्षं लांबलं. पूर्वी अर्धे सैनिक रोगराईनंच मरत असत. आघाडीवर चिखल, घाण, सडलेली प्रेतं असत. नाना रोग होत. डास, पिसवा माणसांचे बळी घेत. गोळ्या आणि गोळे यांच्यापेक्षा मलेरिया आणि कॉलरानंच जास्त सैनिक मरत. वैज्ञानिकांनी डीडीटी शोधलं, क्विनाईन शोधलं (पेनिसिलिन हाताशी यायला मात्र अजून वेळ होता). मादाम मेरी क्युरी यांचं एक्सरे यंत्र फ्रेंच आघाडीवर सैनिकांना मदत करू लागलं.
अन्न, औषधं, सैनिकांना रेल्वेमुळे वेळेवर मिळू लागल्यानं आघाडीवरच्या सैनिकांची स्थिती काहीशी सुधारली होती. सर्व साम्राज्यात कमी अधिक प्रमाणावर सक्तीची सैन्यभरती सुरू झाली होती. कुठं दोन वर्षं तर कुठं चार वर्ष. राखीव म्हणून किंवा आघाडीवर लढण्यासाठी तरुण आणि सक्षम नागरिकांवर कायद्यानं सक्ती करण्यात आली होती.
ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स या देशांत औद्योगिक क्रांती आणि प्रबोधनाचा प्रसार इतर साम्राज्यांच्या तुलनेत अधिक होता. युद्ध जिंकण्यासाठी कराव्या लागणार्‍या गोष्टी ब्रिटन आणि जर्मनी या दोन देशांनी (अमेरिकेनंही) अधिक साधल्या होत्या. त्यामुळे युरोपातील साम्राज्यांमध्ये हे दोन देश अधिक बलवान होते. तुलनेनं रशिया मागासच म्हणायला हवा. रशियाचा झार व्यक्तिगत सत्तेच्या पलिकडे गेला नाही आणि समांतर पातळीवर रशियन समाजातही ज्ञान-तंत्रज्ञानाचे उमाळे निर्माण झाले नाहीत.
पहिलं महायुद्धातले खेळाडू देश/साम्राज्यं महायुद्धाच्या क्षणी कसे होते, कोणत्या स्थितीत होते?

ब्रिटन

ब्रिटीश साम्राज्यातल्या लोकांची संख्या होती ९ कोटी. ब्रिटनचं साम्राज्य सर्वात मोठं होतं, जगभर पसरलेलं होतं. लोकशाही व्यवस्था आकाराला आली होती, हुजूर आणि मजूर असे दोन पक्ष एकमेकांशी स्पर्धा करीत. जमीनदार, मध्यमवर्ग आणि कामगार या तीन वर्गांत आपापलं हित साधण्याची स्पर्धा चाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनच्या लक्षात आलं होतं की आपलं जगणं आणि वैभव वसाहतींवर अवलंबून आहे, अन्नासाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. पण या वसाहतींचं खरं नाही हे ब्रिटनला कळू लागलं असावं. भारतात चलबिचल होती, भारतातली माणसं स्वातंत्र्य मागू लागली होती. युद्धबिद्ध झालं तर आपलं जगणं कठीण होईल हे ब्रिटनच्या लक्षात आलं होतं. जर्मनीसारख्या शक्तिवान देशाशी स्पर्धेत टिकणं, साम्राज्य टिकवणं आणि वाढवणं या चिंतेत ब्रिटन होता. जर्मनी आर्थिकदृष्ट्या जोरात आहे, स्वत:चं नौदल आणि लष्कर अधिक बलवान करत आहे हे ब्रिटनच्या लक्षात आलं होतं. ब्रिटन आतून हलला होता.

फ्रान्स

लोकसंख्या ४ कोटी. फ्रेंच वसाहतीतली माणसं धरून एकूण फ्रेंच साम्राज्याची लोकसंख्या होती ९.५ कोटी. राज्यक्रांतीचे परिणाम अजूनही फ्रान्समध्ये दिसत होते. समाज विघटित होता. राजाला मानणारा जमीनदारांचा वर्ग, चर्चचे पाठिराखे आणि शेतकरी. ब्रिटनसारखी लोकशाही व्यवस्था तिथं तयार झाली नाही. समाजवादी चळवळ आणि संघटना प्रबळ होत्या. शेतकर्‍यांना औद्योगिक प्रगतीत रस नव्हता, जमीनदार आणि चर्चही आपापले हितसंबंध जपत होते. समाजवादी संघटना संघर्षात अडकलेल्या असत, औद्योगिक विकास हा त्यांचा अग्रक्रम नव्हता. त्यामुळे जर्मनी किंवा ब्रिटनप्रमाणे ताकदवान अर्थव्यवस्था फ्रान्समध्ये निर्माण झाली नव्हती. जर्मनीनं १८७१मध्ये अल्सेस आणि लोरेन हे प्रदेश आपल्याकडून हिसकावले याचा सल फ्रान्सच्या मनात शिल्लक होता. जर्मनीशी वितुष्ट, ब्रिटनशी पुरातन वितुष्ट अशा स्थितीत रशिया एवढा एकच मित्र फ्रान्सच्या बाजूनं होता.

रशिया

लोकसंख्या १६.५ कोटी. झार शाही. रशियन समाज आतून खदखदत होता, असंतुष्ट होता. हा समाज शेतीप्रधान होता, १८६१ साली शेतकरी गुलामीतून मुक्त झाल्यावर स्वतंत्र झाला, तरी शेतीची मालकी त्याच्याकडे नव्हती. जमीनदारांकडे किंवा किवा सरकारांकडे किंवा चर्चकडे मालकी होती. शेती खंडानं करावी लागत असे. उत्पादन-उत्पन्न आणि उपजीविका यात मेळ बसत नव्हता. जमीनदार, सरकार शेतीत गुंतवणूक करायला तयार नसल्यानं शेतीची धूळधाण झाली होती. बहुसंख्य शेतकरी प्रजा असंतुष्ट होती. शेतकर्‍यांवर ऑर्थोडॉक्स रशियन चर्चचा प्रभाव होता. औद्योगिकरण झालेलं नव्हतं. ते झालं तर कामगार मागण्या करू लागतील अशी भीती झारला वाटत होती. मध्यमवर्ग रशियन व्यवस्थेत किंवा फ्रान्समध्ये शिकलेला होता. तो सतत सुधारणांच्या मागण्या करत होता.
१९०५ साली जपानशी युद्ध झालं आणि जपाननं रशियाचा दारुण पराभव केला. रशियन अर्थव्यवस्था मागास होती, युद्धाचं आर्थिक ओझं रशियाला पेलता आलं नाही. आघाडीवरून सैनिक परतले, त्यांना सामावून घेण्याची अर्थव्यवस्थेची ताकद नव्हती, सरकारनंही काही केलं नाही. मेलेल्या हजारो सैनिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळाली नाही. सैनिकांचा मोठाच असंतोष निर्माण झाला होता. १९०५ साली क्रांती झाली. कामगारांनी संप केले. ट्रॉटस्की या क्रांतीचे नेते होते. त्यांना अटक झाली. झारनं आंदोलन, क्रांती दडपली.
अंतर्गत अशांतता असली, अस्थैर्य असलं की राजे लोक युद्धाचं झेंगट काढतात. म्हणजे एक शत्रू निर्माण करतात. प्रजाजनांवर संकट येतं. देशप्रेमाचं आव्हान केलं जातं, भावनात्मक ब्लॅकमेलिंग होतं. सामान्यत: जबरदस्ती, अटळता यामुळे जनतेमध्ये निदान युद्धकाळापुरती तरी एकी होते. झार युद्धाच्या शोधात होता. स्लाव माणसं रशियात भरपूर आहेत, रशियन स्वत:ला स्लाव म्हणवतात. सर्बिया, बोस्निया इत्यादी ठिकाणच्या स्लाव लोकांना उचकवून त्यांना आपल्याकडं खेचण्याचा डाव झार टाकतच होता. जर्मनीशी पटत नव्हतंच.

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य, लोकसंख्या ५.२ कोटी. ऑस्ट्रियन साम्राज्य हे ऑस्ट्रियन आणि हंगेरीयन (माग्यार) समाजाचं एक मिश्र साम्राज्य होतं. पैकी माग्यार लोक स्वत:ला श्रेष्ठ मानत. त्यांच्या लेखी आसपासचे स्लाव लोक कमी प्रतीचे होते. म्हणजे युगोस्लाव, क्रोएट्स, रोमानियन, सर्बियन इत्यादी. संधी मिळाली की माग्यार सेना स्लाव लोकांवर तुटून पडत असे. एकूणातच ऑस्ट्रियाला स्लाव प्रांत गिळायचा होता. युद्ध सुरू होण्याच्या आधी आठ वर्षं त्यांनी बोस्निया गिळला होताच. आता सर्बिया गिळायच्या पवित्र्यात ऑस्ट्रिया होतं.

जर्मनी

लोकसंख्या ६.८ कोटी. युरोपचा समतोल बिघडवायला सर्वात जास्त उत्सुक असणारा देश म्हणजे जर्मनी. अर्थव्यवस्था मजबूत होती, ब्रिटनच्या तोडीस तोड जर्मनी श्रीमंत होता. जर्मन संस्कृती सर्वच बाजूंनी समृद्ध होती, तिच्यातला लष्करप्रेम हा घटक सर्वात जास्त प्रभावी होता. बिसमार्कनं लष्कराच्या जोरावर युरोपात लढाया मारल्या होत्या. लष्करी गणवेषाबद्दल जर्मन लोकांमध्ये भारी प्रेम होतं. प्रत्येक प्रतिष्ठित कुटुंबात एक तरी माणूस सैन्यात उच्च पदावर असे आणि ही माणसं जर्मन समाजात आब राखून असत, त्यांना मानमरातब असे. ते सार्वजनिक ठिकाणीही देखण्या लष्करी पेहरावात वावरत असत.
जर्मनीत राईशस्टॅग, लोकसभा होती. देशाचं बजेट लोकसभा ठरवत असे, पण त्याला राजाची मंजुरी असावी लागे. लोकसभेनं कोणतेही निर्णय घ्यावेत, त्यावर राजाचं, कैसर विल्यमचं शिक्कामोर्तब लागे. राजा हे जर्मन समाजाचं एक सर्वात प्रिय चिन्ह होतं. चॅन्सेलर कारभार प्रमुख असे. चॅन्सेलर बिसमार्कची प्रतिष्ठा जबरदस्त होती आणि त्यांच्याकडे व्यवहार कौशल्य होतं. राजे कैसर विल्यम आणि लोकसभा यातला दुवा म्हणून ते काम करत. पण बिसमार्कच्या मृत्यूनंतर राजाचा प्रभाव एकतर्फी रीतीनं वाढला.
जर्मनीचं औद्योगिकरण वाढलं, कामगार चळवळ प्रबळ झाली, सोशल डेमॉक्रॅट्सचा प्रभाव वाढला. वाढत्या औद्योगिकरणात आर्थिक विषमताही वाढीस लागली. १९०५ साली रशियात क्रांतीचा प्रयत्न झाल्यावर राजांची चिंता वाढली, राजसत्ता उलथवून लावतील अशी भीती त्यांना वाटली. थोडक्यात जर्मनी आर्थिकदृष्ट्या प्रबळ होता पण आतून अस्थिर होता. युद्ध आणि सैन्य या दोनच गोष्टी राजसत्ता वाचवू शकणार होत्या.
जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात तणाव होते. जर्मनी आणि रशियात वितुष्ट होतं. ब्रिटन आणि जर्मनी यांच्यात तणाव होते. साम्राज्यं ठिणगीची वाट पहात होती.

(क्रमश:)

Previous Post

कुठे जपान, कुठे आपण?

Next Post

आंब्राई

Next Post

आंब्राई

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.