मराठी नाटकांना इतकी भरभरून गर्दी होते. मग मराठी प्रेक्षक मराठी सिनेमांना गर्दी का करत नसेल? तुमचा काय अंदाज?
– रोशन कांबळे, दादर
अंदाज हा अंदाज असतो, त्यामुळे उत्तरात अंदाज सांगितल्याने प्रश्नावर तोडगा निघेल, याचा काही अंदाज नाही… त्यापेक्षा मराठी प्रेक्षकावर हिंदी सिनेमा बघण्याची सक्ती केली, तर मराठी प्रेक्षक जागा होईल आणि मराठी सिनेमा बघायला मराठी प्रेक्षक गर्दी करतील… असा अंदाज आहे…
दोन भाऊ एकत्र आले तर हजारो लोकांना वांत्या, जुलाब, जळजळ, मळमळ, आगआग वगैरे व्हायला लागली आहे. हा नवा साथीचा आजार वगैरे आला आहे का?
– मंदार सोमण, कोथरूड, पुणे
येऊ देत हो… जे भाऊ आजाराच्या मुळाला घाबरत नाहीत ते आजाराला काय घाबरणार?? आणि असे नवे आजार आले तर उपचार करणार्या डॉक्टरांची तरी चंगळ होईल? चंगळ काय फक्त आजारी पडणार्यांनीच करायची?
महाराष्ट्रात राहू, इथलंच खाऊ, इथेच पैसा कमावू, अशी गुर्मी दाखवणारे लोक इंग्लंड अमेरिकेत त्यांची भाषा बोलतात का? दक्षिणेत अशी गुर्मी दाखवली तर काय होईल? इथेच कशी मस्ती येते यांना?
– ललिता बाणखेले, जुन्नर
इतिहास काढून बघा इंग्लंड अमेरिका दक्षिणेला गद्दारीचा इतिहास नाहीये. तिथे मस्ती कोणाच्या जिवावर करणार?
ठाण्यात अलीकडे कोणी ‘बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवणारे साहेब’ असं कोणी म्हणालं तर लोक हसू लागतात म्हणे! असं का होत असेल?
– विलास महाडिक, कोपरखैराणे
आ सू प्रश्न छे? आ प्रश्नाने उत्तर माटे विचार करवानी जरूरत नथी, समजी गयो ने के एक्सप्लेन करवानी जरुरत छे… समजी गया तो बोलो मारा संगे जय गुजरात!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला कसला ना कसला राष्ट्रीय सन्मान बहाल न केलेले काही देश जगाच्या पाठीवर अजूनही आहेत म्हणे! यांची देश म्हणून मान्यता काढून का घेतली जात नाही?
– चिन्मय चंदनशिवे, खराडी
मग त्यांनी कुठल्या देशाच्या दौर्यावर जायचं? असं नाही करायचं चंदनराव? तुम्ही कितीही ‘डोलांड’सारखे वागलात बोललात तरी लक्षात ठेवा सगळेच ‘डोलांड’सारखे गळ्यात पडून पट्टा घालणारे नसतात. काहीजण गळ्यात पट्टा घालून, गळाभेट देणारे असतात… आणि आता काळ बदललाय. तुम्ही अमृतकाळात आहात हे लक्षात घ्या. आता कोणी मान देत नसेल तर मान मिळवला जातो… मग त्यासाठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जातो… तसंच ही राष्ट्रंसुद्धा करतील… आपण त्यांची मान्यता काढून घेतली तर ते डोलांडकडे जाऊन मान मिळवतील. मग काय कराल तुम्ही? कुठे जायला असे किती उरलेत आता आपले म्हणण्यासारखे?
समतेचा विचार सांगणार्या संतांच्या, भागवत धर्माच्या वारीत तोच विचार संविधानाच्या आधाराने मजबुतीने मांडणार्यांना अर्बन नक्षलवादी ठरवतात सनातनी राज्यकर्ते? हे मंबाजी देशातून संपणार कधी?
– गुलाबराव पाटील, जळगाव
गुलाबराव अर्बन नक्षलवाद्यांची यादीत तुम्हाला तुमचं नाव बघायची इच्छा आहे का? मंबाजी तयार करण्याचे संस्कार लहानपणापासूनच केले जातात. कारण सदेह वैकुंठाला पाठवूनही विचारांमधला तुका अजून मरत नाही आणि जोवर तो मरत नाही तोपर्यंत मंबाजी तयार होत राहणार. कारण मंबाजी बनणं खूप सोप्पं आहे, त्याला अभंग लिहायचे नसतात, लोकांना शहाणं करायचं नसतं, कोणाचा विरोध सोसायचा नसतो, सदेह वैकुंठाला जायचं नसतं (प्रश्न सरळ आहे म्हणून उत्तर सरळ दिलेय. उगाच तिरका विचार करून स्वत:मधला मंबाजी जागा करू नका.)