हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सच्च्या शिवसैनिकाने गेल्या काही वर्षांत एकच स्वप्न पाहिलं होतं… शिवसेनेपासून दुरावलेल्या राज ठाकरे यांनी परत फिरावं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात हात मिळवावा आणि या दोघांनी एकदिलाने एकत्र येऊन महाराष्ट्रद्रोह्यांना सप्तपाताळांमध्ये गाडावं… हे स्वप्न कधी पूर्ण होईल का, याबद्दल अनेकांच्या मनात सार्थ शंका होती. किंबहुना हे दोघे एकत्र येताच कामा नयेत, यासाठीच अनेक ‘मित्र’ देव पाण्यात घालून बसले होते. पण, लोकांच्या कल्पनांप्रमाणे वागतील ते ठाकरे कसले? त्यांनी दिला ठाकरी दणका! आम्ही एकत्र येणार नाही म्हणता काय; हे पाहा, आलो एकत्र, म्हणत दोघांनी वरळीमध्ये एकाच मंचावर एकत्र प्रवेश केला आणि महाराष्ट्राचं मन भरून आलं… मात्र, हे महाराष्ट्राच्या अस्तनीतल्या निखार्यांच्या छातीत धडकी भरवणारं दृश्य होतं… हिंदी सिनेमात खलनायकांनी मनात विष कालवलेले दोन भाऊ वेगवेगळे होतात, खलनायक दोघांनाही बहकवून भयंकर गैरकृत्यं करत राहतो… पण त्याच्या पापांचा घडा भरतो तेव्हा दोघेही एकत्र येतात आणि त्यानंतर खलनायकाला पळवून पळवून मारतात… ती पाहताना सगळं थिएटर उसळत असतं… दुरावलेले भाऊ एकत्र आले की काय होणार, हे माहिती असलेले प्रेक्षक ही धुमश्चक्री पाहायला सरसावून बसतात… तसंच काहीसं चित्र महाराष्ट्रात ५ जुलै रोजी तयार झालं.
महाशक्ती नावाच्या अघोरी, राक्षसी शक्तीने शिवसेनेवर घाव घालून गद्दारसेना उभी केली… अमित शहा यांच्यापुढे सरपटून ‘जय गुजरात’ची हाळी देणारे हे यत्किंचित जीव बाळासाहेबांचा वारसा आपल्याकडेच आहे, असं सांगतात, तेव्हा त्यांनी भाडोत्री आणलेली माणसंही ख्यॅ ख्यॅ हसत असतील… या महाशक्तीने शरद पवारांचाही पक्ष फोडला… बाप, काका, चिन्ह, नाव चोरून झाल्यावर विधानसभेची निवडणूकही चोरली. विकल केलेला विरोधी पक्ष आपलं काय बिघडवणार, अशी गुर्मी या दिल्लीच्या चपराशांना चढली आहे. कोणीही सांगितलेलं नसताना तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करायची, शेतकर्यांच्या उरावर, सुपीक जमिनीवर बुलडोझर फिरवून ‘मालकां’च्या सोयीचा शक्तिपीठ महामार्ग उभारायचा, सगळ्या विरोधकांचा गळा घोटणारं जनसुरक्षा विधेयक रेटायचं (आणि हे भोंदू लोक आणीबाणीच्या नावाने गळे काढतात, त्या ताकदवान बाईने आणीबाणी घोषित करण्याची हिंमत दाखवली होती, ती अघोषित पद्धतीने लादण्याचा बुळगेपणा केला नव्हता), असले विघातक उद्योग हे सरकार सतत करताना दिसतं. शिवाय तिघांच्या तंगड्या नको त्या पद्धतीने एकमेकांत अडकलेल्या आहेतच. कधी हा याला उताणा करतोय, कधी तो याला! अरे, महाराष्ट्राला काय काय दाखवाल?
आपले हे सगळे धंदे इथे खपून जातील, आपल्याला अडवायला आहेच कोण, ही जी गुर्मी चढली होती ना, ती उतरवायला आता ठाकरे घराण्याचे दोन वाघ मैदानात अवतरले आहेत. दिल्लीतल्या आपल्या संभाव्य भविष्याची गोड गुलाबी स्वप्नं खरी ठरावीत, म्हणून अनाजीपंतांनी हा हिंदीसक्तीचा डाव टाकला. उत्तर भारतीयांना खूष करण्याशी मतलब. ही सक्ती मागे घेतली जाणार होतीच. पण टायमिंग चुकलं. ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता दिसताच राज यांच्याकडे शिष्टाईला माणसं पाठवणं सुरू झालं. ‘ऐकून घेईन पण ऐकणार नाही,’ हा ठाकरी बाणा राज यांनी दाखवल्यावर सक्तीविरोधी मोर्चा निघण्याच्या आधीच जीआर मागे घेतला गेला. पण तोवर उभय बंधूंनी हा कावा ओळखला होता. मोर्चा नाही, आता विजयाची सभा, अशी घोषणा झाली, अलोट गर्दीत ती सभाही झाली आणि तिच्यात दोघे बंधू एकत्रही आले. आम्ही दोघे एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी हा निर्वाळाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उभय बंधूंच्या भेटीनंतर महायुतीची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. एकीकडे या दोघांची ताकद ती काय, असं म्हणायचं आणि आपल्या टिल्ल्यापिल्ल्याचिल्ल्यांना कुत्री सोडल्यासारखं दोघांच्या अंगावर सोडायचं, दिवसरात्र ठाकरेंच्या नावाने बोटं मोडायची- एवढ्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर आपोआप पापमुक्ती झाली असती, रेडे कापावे लागले नसते, गंडे, दोरे, धुपारे, मिरची हवनं करायची वेळ आली नसती. तुमची ताकद विधिमंडळात, आमची ताकद रस्त्यावर, हे राज यांनी ठणकावून सांगितलं आहेच. यापुढेही दोघांच्या मार्गात खीळ आणण्याचे प्रकार होणारच आहेत. त्याला हे बंधू पुरून उरतील, याची महाराष्ट्राला खात्री आहे.
मुळात हिंदी भाषेला आपला अजिबात विरोध नाही, ती महाराष्ट्राला येतेच; तिची पहिलीपासून सक्ती केलेली चालणार नाही, हे दोन्ही बंधूंनी वारंवार सांगितलं आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात अनेक इतरप्रांतीय, इतरभाषिक इतकी वर्षं गुण्यागोविंदाने नांदत आहेतच. कटेंगे तो बटेंगे वगैरे बाष्कळ घोषणाबाजी यांना सुचण्याच्या खूप आधी महाराष्ट्राने सगळ्यांचाच उदारमताने स्वीकार केला आहे. मात्र, कितीही वर्षं महाराष्ट्रात राहिलो तरी इथली भाषा शिकणार नाही, ही गुर्मी मराठी माणूस खपवून कसा घेईल? आणि हे मराठी लोकांनी निवडून दिलेले मराठीचे मारेकरी सत्ताधारी त्या परप्रांतीयांची कड घेतात?
यांच्या दळभद्री राजकारणासाठी आपल्याच देशातल्या काश्मीर, केरळ, बंगाल, पंजाब या राज्यांची गलिच्छ बदनामी या नीच विचारसरणीने केली आहे. आता हिंदीसक्तीच्या विषयाला वेगळा रंग देऊन ते महाराष्ट्रावर घसरले आहेत. लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे, इथे घसराल तर घसरत घसरत अशा ठिकाणी पोहोचवू की तिथून वर यायचा मार्गच शिल्लक नसेल.
राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्याचं जे काम खुद्द बाळासाहेबांना जमलं नाही, ते अनाजीपंतांनी करून दाखवलं, त्याबद्दल सगळा महाराष्ट्र ऋणी आहे त्यांचा. महाराष्ट्रात स्वत्त्व जागवण्याच्या त्यांच्या या कार्याची बक्षिसी म्हणून त्यांनी आणि त्यांच्या गुजरातसेवक साजिंद्यांनी महाराष्ट्राची आणखी वाट लावण्याच्या आधीच त्यांना सत्तेतून पायउतार करून ही पार्सले त्यांच्या प्रिय प्रांतांमध्ये पाठवून दिली पाहिजेत.
पिक्चरचा ‘द एंड’ तेव्हाच होईल!