पंतोजी आपल्या दफ्तरी बसल्या खुर्चीत पहुडलेले. हातात घटनांनी शिळा आणि वेदनांनी नवा असा पेपर आहे. गुन्हे जुन्याच प्रकारचे असले तरी पीडित चेहरे नवे आहेत. पेंगलेले पंतोजी पेपर तोंडावर ओढतात नि मेजावर पाय टाकून घोरू लागतात. घोरताना मेजावरल्या फायलींना धक्का लागतो नि त्यातील शक्ती कायद्याची फाईल अडगळीत पडते. पंतोजी भर झोपेत केवळ स्मितहास्य करतात आणि पाय आणखी पसरतात. त्याने उरलेल्या फायली खाली पडतात. पण फरक काय पडतो? त्यातल्या कुठल्या फाईल लोकहिताच्या की कुठल्या बगलबच्यांच्या हिताच्या, हे सांगणारं त्यांच्याशिवाय दुसरं आहेच कोण इथं?
ही खुर्ची साधारण नक्कीच नाही. तिला तीन पाय. तिन्ही भक्कम. त्यामुळे झोप निर्ढावलेली. आपलं कोण बिघडवतं? ह्या थाटाची. अर्थात इतक्यात कुठल्या सूत्रावरून कर्णपट्टिका सुजवून घेतलीय. पण त्यांना त्याची जराही शरम नाही. शरम आणि पंतांचा तसा फार संबंध नाहीच. दिल्लीपतीच्या पायी चाकरी करायची म्हणजे शरम आणि ज्ञान-विज्ञान यांना त्यागणं हीच पात्रता आहे. असो.
एवढ्यात तसं वेष पालटून कुणाला मोहित करायला बाहेर पडावं लागलेलं नाही. पण निशाचरागत फिरण्याची सवय असल्याने ते असे वामकुक्षी घेतात. तसा दिल्लीपतींचा अठरा-अठरा तास काम करण्याच्या थापांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. पंतोजी मोठ्याने घोरतात. त्यांच्या घोरण्याला एक ताल-सूर निश्चित आहेच, त्यांच्या धर्मपत्नीपेक्षा अधिक; पण हे धर्मपत्नीला सांगण्याची त्यांची छाती नाही. ते घोरतात, तसा बाहेरील शिपाई आत डोकावतो. दफ्तरीचं दार हळूच ओढून घेत दाराला जेवणाची सुट्टी असल्याचा फलक लावतो नि बाहेरल्या खुर्चीवर शिदोरी सोडून खाण्यास बसतो. फायलींतील झुरळं मिश्या काढून बाहेर डोकावतात. पाली कपाटामागून घड्याळामागून बाहेर पडतात. बिळातून बाहेर डोकावलेले उंदीर नव्या फायलीच्या शोधात धावतात. पंतोजी सुमधुर घोरू लागतात. कारभार्याचा कारभार उंदीर-घुशी झुरळं आणि पाली हाकू लागतात.
अचानक उंदीर फडताळ धुंडाळत काही खास फायलीपर्यंत पोहोचतो. त्यावरली लाल फीत हळूच ओढताना ती फाईल पंतोजींच्या डोक्यात पडते. पंतोजी दचकून घाईने उठतात. तोंडावरला पेपर काढून त्याला कचर्याच्या खोक्याचं वर्तमान दाखवतात. स्वत: जाऊन दार उघडून झोपमोड होण्याचं कारण शोधू लागतात. शिपाई पंतोजींच्या अवचित येण्यानं गडबडतो. ‘ना खाने दूँगा!’चा मंत्र यांनाही आठवला की काय? असं वाटून शिपाई हिरमुसतो. पण त्याकडे अजिबात लक्ष न देता पंतोजी नजरेनं खर्या गुन्हेगारास शोधू लागतात. पण आसपास कुणी न दिसून पुन्हा आत येतात. नेमकं काय लागलं डोक्याला, हे शोधण्यासाठी पूर्ण खोलीत नजर फिरवतात. पूर्ण दफ्तरी केवळ पंतोजींच्या उठण्यानं दबकलेले उंदीर, झुरळं आणि पाली वगळता कुणी नाही. मग हा अगोचरपणा केला कुणी असेल? उंदीर घाबरून बिळात शिरतो. पंतोजी कोपर्यात बघतात. ढाल-तरवार जागच्या जागी आहेत. झाडू वगैरे हललेले नाहीत. मग झालं काय? त्यांना आठवल्यानुसार काही फटका डोक्याला बसलेला स्मरतो. ते डोक्याला हात लावून बघतात. जखम वगैरे नाही ना? वा पर्वत शिखरे? हाताला काहीही न जाणवल्याने ते सुटकेचा नि:श्वास सोडतात. पण ही आगळीक केली कुणी? विचार करत मेजाजवळ येत पुन्हा खुर्चीवर बसतात तो दार उघडल्याने उजेडाची जी तिरीप आत येते ती थेट खाली पडलेल्या फाईलवर पडते. त्याने फाईल चकाकते. पंतोजी ती फाईल उचलतात. उघडतात. वाचू लागतात. काय आहे त्यात? काही लक्ष वृक्षांची दिल्लीपतीच्या मित्राच्या खजिन्यासाठी आहुती देण्याचं काही आहे त्यात.
पंतोजी डोक्याला हात लावून खुर्चीत बसतात. नरुतात्याला खुश करण्यापेक्षा त्याच्या मित्रांना खुश करण्यात अर्धा वेळ आणि कारभारातलं अर्ध लक्ष द्यावं लागतं. याचं त्यांना अधिक दु:ख आहे. आता ही आहुती दिल्यावर मिळालेला खजिना नेला कुठे जाणार आहे? याची ते पडताळणी करू लागतात. तो समुद्रमार्गे बाहेर जाणार याची खात्री झाल्यावर कशाला हवी याला मंजुरी? असं पुटपुटत ते शिक्कामोर्तब करून परवानगी देऊन टाकतात. नाही म्हणायची त्यांची धडगत नाहीच. पण आताशी खिशाची समृद्धी आटलीय आणि दरवेळी मालकाच्या मित्राच्या खजिन्याची चिंता किती वाहायची? म्हणजे रोज जोखीम उचलून लूट करावी नि दुसर्याचा खजिना भरावा. ह्या दफ्तरी बसून आपलाच झोला का रिकामा ठेवायचा? नाही म्हणायला किलो-किलोचं प्लास्टिक काही फुकट आलं नाहीच. पण मागल्या पाच वर्षांतील माया आता बर्यापैकी आटलीय. तेव्हा नवीन मिळवावीच लागेल ना?
पंतोजी शेंडीवर हात फिरवतात. ते विचार करतात! गृहच्या लिलाव पद्धतीने बदल्या करून काही माया कमवावी का? पण छे! थोड्या फार बदल्या इतक्यात घडू गेल्यात. मग महसूल? की इतर? ते पुन्हा शेंडीला हात घालतात. त्याही बदल्यांत इतकी माया मिळणार नाही, याचं गणित ते मांडतात. आता पर्याय काय? दालनाची सजावट करावी? दुरुस्ती वगैरे वगैरे? त्यातील आकड्यांत पाच बटु सुद्धा जेवू घालता येणं शक्य नाही! पंतोजी खंतावतात.
मग नवा उड्डाणपूल? छे! त्यात ‘ऊ’ इतकीच मलई मिळते. मग जलसंधारणची कामे? तीच सुप्रसिद्ध कामे? नाही, आता त्यात कार्यकर्त्यांच्या आठवडा जेवणावळीचा खर्च सुद्धा निघणं अशक्य! मग कुठला पुतळा उभारावा? काही पुतळ्यांच्या कोसळण्यामुळे मागे वादंग झालेला. त्यात पुतळे खाणं म्हणजे दफ्तरी बसून दात कोरण्यासारखं झालं हे! आता काय डोकं लावावं? पंत पुन्हा शेंडी ओढू लागतात. एखादं भवन? एखादी दुग्धशाळा? गरजूंचा शिधा? पंत दोन्ही हातांनी डोकं खाजवतात. जे जे म्हणून सुचतंय, त्यात संधी फक्त पै-पैच्या कमाईची साधनं मिळत आहेत. ठोस-भरीव-भक्कम अशी कुठलीही साधनं वा मार्ग मात्र त्यांना मिळून येत नाही.
त्याच चिंतेत असताना ते कपाटाची कवाडं विनाकारण उघडझाप करू लागतात. त्यानं आतल्या उभ्या फायलींतील एक फाईल अवचित बाहेर पडते. पंत चिडून ती फाईल मेजावर टाकतात, आदळतात आणि पुन्हा जुन्याच चिंतेने डोकं धरतात. लडतरी महोदयांना सांगून एखादा नाकाच बांधून घ्यावा का? काही क्षण पंतोजींच्या मनी विचार तरळतात. पण नाक्यावर गुंडगिरी करत पैसे हिसकावणं आपल्याकडून सहजपणे शक्य होणार नाही, यांची त्यांना कल्पना आहेच. शिवाय एकदोन बुटके सोडल्यास अशी कामं करणारं कुणीही सोबत नाहीच, याचं त्यांना वाईट वाटतं. हे असंच चालू राहिलं तर चक्कीचं पीठ मिळणं देखील अशक्य होईल, ह्या भयाने त्यांची गाळण उडते.
मध्येच दफ्तरी वारं शिरतं, त्याने मेजावरील फाईल उलगडू लागते. पंतोजी ती विस्मयाने बघू लागतात. अरे, ही तर कुबेर नगरीच्या खजिन्याची वाट! ते घाईने ती फाईल पुढ्यात ओढतात. स्थगित, रद्दच्या मागणीच्या रेट्यानंतरही सुरक्षित ठेवलेली ती प्राणप्रिय फाईल. काय नाहीय त्यात? केवळ मैलभर लांबीसाठी शे-सव्वाशे कोटींच्या मुद्रा खर्च करण्याची तरतूद. त्यातून केवळ काही मैलांत भरगच्च मैला… क्षमस्व!… मलई मिळण्याची खात्रीशीर सोय. असं सगळं काही. त्यातून तालुक्या-तालुक्यांत रावण दशपुते निर्माण करण्याची ताकद. वगैरे, वगैरे!
पंतोजी ती फाईल अत्यानंदाने हाती घेतात नि ‘आली माझ्या घरी ही दिवाळी,’ या गाण्यावर फेर धरत नाचू लागतात. आता चक्कीसह पीठ मिळणार. ह्या विचारानेच ते आनंदून जातात. फक्त विरोधाचं एक चिटोरं उडत पुढं येतं. त्यावरील आक्षेप बागायती शेती. घाटमाथ्याची जैवविविधता. जमिनीचा मोबदला. वगैरे प्रश्न असतात. पण पंतोजी ते फाडून फेकतात. उलट मालकांच्या मित्रासाठी नवीन मार्ग समुद्रात उतरण्यासाठी करतोय, हे परिणामकारक कारण दिलं की अर्धी प्रजा चपापेल. उरलेल्यांना ठगपूर ते धोवा जलद प्रवासाचं स्वप्नं दाखवलं की जनता खुळी होतेच की? हां आता जुना मार्ग असताना समांतर नवीन का? हे विचारायला येणार्यांसाठी थोडी मलई काढून तयार ठेवावी म्हणजे झालं. मालकाच्या मित्रांसोबत आपलीही समृद्धी चक्कीपीठात शोधण्याच्या ह्या अचाट कल्पनेनं पंतोजी शहारून जातात. ते लागलीच त्या फाईलवर मंजुरीचं शिक्कामोर्तब करून देतात. खिश्याची समृद्धी अश्याप्रकारे चक्कीचं पीठ खाऊन वाढवण्याच्या त्यांच्या कल्पनेला धुमारे फुटतात.
ते शिपायाला हाक मारून ती फाईल पुढल्या मेजावर धाडण्यासाठी टाळी वाजवतात, पण शिपायाचा काहीही मागमूस लागत नाही. ते पुन्हा टाळी वाजवतात आणि पुन्हा आवाज देतात.
‘अरे कुणी आहे का? हा चक्कीपीठ मार्ग मोकळा करा.’
‘रांडच्या! का लोकाईच्या जीवावर उठलाईसा? फाड आधी त्यो!’ मागून एक भारदस्त आवाज घुमतो, त्या जबरी आवाजानेच पंतोजींची पाचावर धारण बसते.