१ जुलै… भारतातील प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर तसेच पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिन आणि त्यांची पुण्यतिथीही याच दिवशी असते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस भारतीय ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त देशातील डॉक्टरांची व्यथा मांडणारा लेख…
– – –
– डॉ. अंजली मुळके
भारतात कदाचित असं एकही कुटुंब नसेल, ज्यातील पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवण्याची इच्छा नसेल! परंतु, डॉक्टर बनण्यासाठी लागणारी मेहनत, वेळ आणि डॉक्टर बनल्यानंतर सतत आयुष्यभर असणारी आव्हाने, याचं गणित मात्र कोणी समजून घेत नाही.
सर्वात आधी बारावी सायन्स करणार्या विद्यार्थ्यांना, मेडिकलसाठी नीट, सीईटी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या वर्षीच्या संदर्भात सांगायचं झालं तर, जवळपास २५ लाख मुलांनी नीट परीक्षा दिली, त्यातून चाळून चाळून खाली १२.७ लाख मुले नीट पात्र झाली. सध्या भारतात जवळपास ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यातून शासकीय आणि खाजगी तसेच इतर प्रकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांत केवळ एमबीबीएससाठी सुमारे एक लाख दहा हजार जागांमध्ये ही मुलं समावतात… इतर जण इतर वैद्यकशास्त्रांच्या, म्हणजे दंतवैद्यक, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच फिजिओथेरपीसारख्या इतर कोर्सेससाठी प्रवेश घेतात.
सामान्यत: प्रवेश परीक्षेपासून ते डिग्री, इंटर्नशिप, दोन वर्षांची अनिवार्य ग्रामीण आरोग्य सेवा हे सर्व जवळपास आठ वर्षांचे खाचखळगे पार पडल्यानंतर फक्त प्लेन ग्रॅज्युएशनची डिग्री हातात मिळते. त्यानंतर लगेचच प्रॅक्टिसमध्ये उतरणारे महारथी अत्यंत कमी असतात. कारण फक्त ग्रॅज्युएशनवर दवाखाना चालवून उपजीविका भागवणे, हे वैद्यकीय जगतातील स्पर्धात्मकदृष्ट्या अत्यंत कठीण असते. म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, एमडी, फेलोशिप, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आदींसाठी पुन्हा प्रवेश परीक्षेची तयारी, त्यासाठी एखाददोन वर्षे घालवावी लागतात… त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा दोन, तीन वर्षांचा कालावधी जातो… असेच करता करता शिक्षण पूर्ण करून एखादा विशेषज्ञ म्हणून बाहेर पडण्यासाठी सरासरी १३-१४ वर्षांचा किमान कालावधी जातो. त्यानंतर प्रचंड मोठ्या आरोग्यसेवा क्षेत्रात हे डॉक्टर पाय ठेवतात.
डॉक्टरांना शासकीय नोकर्यांची कवाडे आपल्या राज्यकर्त्यांनी बंदच केली आहेत, असं खेदाने म्हणावं लागेल. उघडलीच तर अगदी बारीक फटीएवढी उघडली जातात. त्यातून पर्मनंट नोकर्या अत्यंत मोजक्या आणि अस्थायी, कंत्राटी भरती प्रचंड अशी अवस्था असते. त्यामुळे, खाजगी प्रॅक्टिस करणे, हाच एक पर्याय उरतो. यात पाय रोवून स्वत:चं पोट भरण्याकरिता, जनरल प्रॅक्टिसपासून ते स्पेशालिस्ट ते आणखी पुढे काही वर्षे डोक्याचा भुगा करून शिकून पुढे सुपर स्पेशालिस्ट अशा एकएक गोंडस वाटणार्या पण प्रत्यक्षात आव्हानात्मक प्रॅक्टिससाठी एकएक डॉक्टर सज्ज होतो.
जनरल प्रॅक्टिसमध्ये एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस इ. पॅथींच्या डॉक्टरांचा अथांग सागर पसरलेला असतो. सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत कमी शुल्काच्या मोबदल्यात उत्तम मूलभूत आरोग्यसेवा देण्याचे सर्वात मोठे काम याच जनरल प्रॅक्टिशनरांच्या जमातीवर असते. खरं सांगायचं झालं तर, अगदी मर्यादित असणार्या व लोकसंख्येच्या मानाने तुटपुंज्या पडणार्या शासकीय आरोग्यसेवांच्या व्यतिरिक्त, अत्यंत कमी शुल्कात उत्तम मूलभूत आरोग्य सेवा देणारी जनरल प्रॅक्टिशनरची खाजगी आरोग्य फळी म्हणजे सर्व ‘भारतीय आरोग्य यंत्रणेचा पाया’ म्हणावा लागेल. कारण, हेच जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर खेडोपाडी, गाव, तालुक्यात किंवा शहरांत प्रत्येक गल्लीत आपल्या आरोग्यसेवा देताना दिसतात. परंतु स्वत:च्या अस्तित्वाची मोठी स्पर्धात्मक आव्हाने यांच्यासमोर असतात.
प्रॅक्टिस करताना अनेक ओपीडी ते अत्यवस्थ रुग्ण हे लोक व्यवस्थित हाताळताना दिसतात. कित्येकदा हे डॉक्टर कित्येक गरीब रुग्णांना कसलेही शुल्क न आकारता आरोग्यसेवा देत असतात. परंतु त्याचं कौतुक काय, त्याची जाणीवही कोणाला नसते. उलट आपल्या भारतीय जनतेला डॉक्टरांना फी देणे म्हणलं की पोटात कळ येते जणू… अगदी कमी शुल्क असले तरी बर्याच पेशंटची डॉक्टर्सची फी देण्याची ऐपत असली तरीही मानसिकता मात्र नसते. दारू, गुटखा, खानपान, कपडे इत्यादींवर अनावश्यक हजारो खर्च करतील, पण स्वत:च्या आरोग्यावर आवश्यक खर्च करताना मात्र, ‘डॉक्टर विनाकारण पैसे घेतात विनाकारण टेस्ट सांगतात’, अशी भावना बर्याचदा पाहायला मिळते. या व्यक्तीने इतक्या मेहनतीने ही पदवी घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणाचे एकमेव हेच आर्थिक साधन आहे, यातूनच याची उपजीविका चालते, हे असलं काही आपल्या मायबाप जनतेच्या बर्याचदा गावीही नसतं.
त्यानंतर स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट लोकांच्या आव्हानांचा वेगळाच पाढा पाहायला मिळतो. त्यांच्या रुग्णालयासाठी लागणारी जागा, त्यातील महागडी वैद्यकीय संसाधने, वेगवेगळ्या सोयीसुविधा, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, लॅब, डायग्नोस्टिक सेंटर इत्यादिंसहित, स्वच्छता, मेडिकल, वीज, पाणी इतर मेंटेनन्स, त्यांचा स्टाफ, त्यांचे पगार यांचा डोलारा उभा करण्यासाठी प्रचंड भांडवल लागतं. कारण खाजगी रुग्णालये म्हणजे रुग्णांना आराेग्यसेवेसोबतच आरामदायक राहण्या-खाण्याच्या व इतर सुविधा असाव्यात ही वरचढ अपेक्षा रुग्णांना असतेच. त्यासाठी कमाई आधीच भांडवल जमवून कर्जाचा डोंगर आधीच डोईवर घेऊन रिस्क घेत या तलावात उडी मारावी लागते. याचं गणित भारतीय लोकांच्या खिजगणतीतही नसते.
त्यात बर्याचदा गैरसमज असा होतो, की यात टाकलेले भांडवल, कर्ज आणि सरप्लस यासाठी रुग्णांकडून अवाजवी सेवाशुल्क आकारले जाते. काही ठिकाणी हे सत्य होतानाही आढळते, यात दुमत नाही. परंतु, इतका मोठा डोलारा सांभाळत, रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवेसोबतच आरामदायक सुविधा देण्यासाठी पैसा लागतोच. तो खर्च काही प्रत्येक रुग्णामागे हे डॉक्टर्स भरू शकत नसतात. तरी बर्याचदा बिलांचे शुल्क कितीतरी पटीने डॉक्टर्सकडून स्वत:हून कमी केले जाते. ‘महात्मा फुले जन आरोग्य’सारख्या वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या अंतर्गत आरोग्य सेवा कित्येक खाजगी रुग्णालये वाजवी दरात उपलब्ध करून देतात. किंवा कुठल्या योजनेत बसत नसतानाही आमची डॉक्टर मंडळी रुग्णाची परिस्थिती पाहून हजारोंची बिलं कित्येकदा कमी करतात. तरीही रुग्ण डिस्चार्ज करताना बिलासाठी राजकीय दबाव, अरेरावी, मारहाण, रुग्णालयांमध्ये मोडतोड असे अनुचित प्रकार घडताना आपण पाहतो. हे सर्व प्रकार प्रामाणिक भावनेने रुग्णांचा जीव वाचवणार्या आणि स्वत:च्या जिवाच्या पलीकडे जाऊन रात्री अपरात्री रुग्णांना आरोग्यसेवा देणार्या डॉक्टरांसाठी प्रचंड वेदनादायक आणि नैराश्य आणणारे असतात. याच नैराश्यातून दुर्दैवाने काही डॉक्टरांच्या आत्महत्यासुद्धा घडल्या आहेत.
डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्या पूर्ण क्षमतेने होईल तितक्या उत्तम आरोग्यसेवा आपल्याला पुरवतात, तेव्हा सामान्य नागरिकांनी देखील त्यांची मेहनत आणि रुग्णांच्या प्रति असलेली प्रामाणिक भावना समजून घेतली पाहिजे. काही डॉक्टरांच्या अत्यंत हव्यासी, आर्थिक फायद्याच्या आणि रुग्णांच्या प्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे तसेच काही गुन्हेगार डॉक्टर्समुळे वैद्यकीय क्षेत्र अधूनमधून बदनाम होत असतं. या क्षेत्रात घुसवलेली आर्थिक गणिते, सामान्य रुग्णांची परवड करतात. त्याचं समर्थन मी आणि कुठलाही प्रामाणिक डॉक्टर कधीही करणार नाहीच. परंतु, त्या मोजक्या लोकांच्या वर्तणुकीचे खापर सरसकट सर्वच डॉक्टरांवर सतत फोडणे कितपत योग्य आहे?
एक निष्णात डॉक्टर बनण्यासाठी आयुष्याचा किमान दीड ते दोन दशकांचा कालावधी एखादी व्यक्ती देते. केवळ अभ्यास, प्रॅक्टिस आणि दिवस वा रात्र, कुठल्याही वेळेला डोकं तितकंच शाबूत ठेवून अत्यंत क्लिष्ट असणार्या गोष्टी ज्ञानाचा संपूर्ण उपयोग करत रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने करते. डॉक्टर एखादं औषध लिहून देतो, त्यामागे, त्या रुग्णाच्या शरीराचा, त्याच्या विशिष्ट व्याधीचा, तात्कालिक कारणांचा, त्यासाठी कोणती औषधे किती प्रमाणात लागतील, त्या औषधांचा उपयोग व त्याचे परिणाम दुष्परिणाम याचा आणि त्या रुग्णांच्या शरीरात होणार्या बदलांचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीचा अभ्यास त्यामागे असतो. आणि प्रत्येक रुग्ण वेगळा असतो. प्रत्येकाला उपचार देताना तेवढेच कसब लावावे लागतात. प्रत्येक रुग्णांचे योग्य निदान आणि उपचार करताना, सर्व प्रकारचा अभ्यास पणाला लावावा लागतो, कारण हा एका जीवाचा प्रश्न असतो, यंत्राचा नाही. ‘केवळ औषध लिहून दिले यात काय मोठं काम केलं. एका औषधाच्या नावासाठी इतकी फी कशासाठी’ असा विचार करण्याआधी या मेहनतीचा विचार जरूर करावा.
कित्येक निष्णात डॉक्टर्स विविध मोफत आरोग्य शिबिराअंतर्गत, मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच विविध मोठमोठ्या शस्त्रक्रियांपासून ते ओपीडी स्तरापर्यंत अगदी एकही पैसा न घेता मोफत कार्य करतात. तेही नियमित कालावधीने अगदी आनंदाने! यात ते कित्येक तास शस्त्रक्रियांसारखी सूक्ष्म स्तरावरील कामं न थांबता करतात. कोरोनासारख्या महामार्या भारतीय डॉक्टर्सनी किती सक्षमपणे हाताळल्या आहेत, हे जगाने पाहिले आहे. परंतु, त्याची नागरिकांकडून कितीशी दाखल घेतली जाते? इतर बहुतेक देशांमध्ये आरोग्यसेवा भारताच्या मानाने फार महागड्या असतात. तसेच त्या देशांत बर्याचदा कित्येक शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना महिनोन्महिने वेटिंगवर वाट बघावी लागते. म्हणूनच कित्येक परदेशी लोक, कमी वेळेत व कमी खर्चात उत्तम उपचार घेण्यासाठी ‘मेडिकल टूरिझम’अंतर्गत आपल्या देशात येत असतात. एक उदाहरण घ्यायचं झालं तर, ‘बायपास’ ही हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी भारतात सरासरी पाच ते सहा लाख भारतीय रुपये खर्च होतो. परंतु तीच शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेत किमान एक कोटींच्या वर खर्च होतो. आपल्याला मात्र आपल्याकडे असलेल्या सर्वोच्च बुद्धिमत्तेची कदर नसावी, याहून काय दुर्दैव असावं!
शेवटी डॉक्टरदेखील कुठून परग्रहावरून आलेला नसतो. तो देखील तुमच्याचसारखा हाडामांसाचा माणूस असतो, ज्याला मन असतं, भावना असतात आणि त्यालाही तुमच्यासारखं एक कुटुंब असतं, ज्याच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर असते. कित्येकदा रुग्णांसाठी उपलब्ध राहताना डॉक्टरांना कुटुंबासाठी वेळ काढणं दुरापास्त होतं. एवढंच काय, तर कित्येक डॉक्टरांना कामाच्या ताणात स्वत:च्या आरोग्यासाठी देखील वेळ देता येत नाही. कित्येकदा शासकीय किंवा खाजगी डाॅक्टर्स, २४ ते ४८ तासांची सलग ड्युटी करतात. तेही झोप, भूक, आराम अशा शारीरिक व मानसिक गरजा डावलून. परिणामी, या देशात कित्येक डॉक्टर्स अत्यंत कमी वयात मधुमेह, रक्तदाब इ. व्याधींनी ग्रस्त होत आहेत. कित्येक डॉक्टर्स कर्तव्य बजावत असताना अचानक मृत्यू पावले आहेत.
भारतात सध्याच्या आकडेवारीनुसार, जवळपास १३ लाख ८६ हजार नोंदणीकृत अॅलोपॅथी डॉक्टर्स आणि सात लाख ५२ हजार आयुष डॉक्टर्स आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार डॉक्टर : रुग्ण प्रमाण किमान एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे असले पाहिजे, आपल्याकडे ८११ लोकांमागे एक डॉक्टर आहे. म्हणजे पुरेसे डॉक्टर्स आपल्याकडे आहेत, तरीही आपल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असतो. कारण सर्वत्र सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नसतात. कुठे संसाधने नसतात, कुठे औषधे नसतात तर कुठे इतर सुविधांची वानवा. यातून डॉक्टरांवर प्रचंड कामाचा ताण वाढत चालला आहे, त्यात नागरिक उलट कुठल्याही घटनांना जबाबदार केवळ डॉक्टरांना ठरवून त्यांच्यावर हल्ले देखील करून मोकळे होतात. संपूर्ण आरोग्य यंत्रणा चालवण्यासाठी, शासन प्रशासनापासून ते अगदी नागरिकांच्या स्वत:पर्यंत कित्येकांची जबाबदारी असते. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास, हलगर्जी व कामचुकारपणा यंत्रणेच्या नेमक्या कुठल्या स्तरावर आहे, ते समजून घेऊन योग्य त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करण्याची वृत्ती आपण ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळी डॉक्टरच दोषी नसतात.
वैद्यकीय क्षेत्र हे खरं तर एक अत्यंत उदात्त क्षेत्र आहे. परंतु जिवाच्या पलीकडे हे नोबल वर्क करूनही, सामाजिक व राजकीय स्तरावरील सतत अवहेलना आणि अनपेक्षित वागणुकीने या क्षेत्रात दिवसेंदिवस भारतात डॉक्टरांना तग धरणे अवघड होत चालले आहे. यातून त्यांचा मानसिक ताण वाढत चालला आहे. नका डॉक्टरांना देव वगैरे म्हणू… किमान माणूस तरी समजून वागा!
(लेखिका माजी वैद्यकीय अधिकारी आणि समाजसेविका आहेत.)