– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर
आता पूजा कोठे वाहू?
पाहता देहीच झाला देवू ।।१।।
भावे पूजन करिता।
देही देव जाला तत्वतः ।।२।।
ताडू गेलो तुळशीपान।
तेथे अवघा मधुसुदन ।।३।।
अन्न गंध पुष्प धूप।
अवघे विठ्ठलस्वरुप ।।४।।
फळ तांबूळ नैवद्य।
पाहता अवघाचि गोविंद ।।५।।
म्हणे लतिफ ब्रह्मज्ञानी।
अवघा पाहता चक्रपाणी ।।६।।
वारकरी संप्रदायातील महान संत म्हणून लतिफांकडे पाहिलं जातं. तुकोबारायांच्या एका अभंगात त्यांचा उल्लेख आला आहे. ‘पवित्र ते कूळ पावन तो वंश। जेथे हरिचे दास जन्म घेती ।।’ या चरणाने त्या अभंगाची सुरुवात होते. ‘वर्णाभिमाने कोण जाले पावन। ऐसा द्या सांगून मजपाशी।।’ असं आव्हानच त्या अभंगात तुकोबाराय देतात. वर्णाभिमानाने कोणीही पावन होत नाही असा तुकोबारायांचा सिद्धांत आहे. ‘अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने।’ असं म्हणून ज्यांना प्रचलित समाजरचना हीन मानते तेच भक्तीच्या बळावर समाजात वंदनीय ठरले आहेत, असं तुकोबाराय सुचवतात. त्यासाठी त्यांनी बर्याच संतांची उदाहरणं दिली आहेत. त्यात त्यांनी लतिफांचा दाखला दिला आहे. ‘कबीर मोमीन लतिफ मुसलमान। सेना न्हावी जाण विष्णूदास ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायांनी लतिफांचा उल्लेख केला असल्यामुळे ते त्या काळातील प्रसिद्ध संत असावेत असं आपल्याला म्हणता येतं. मोरोपंतांनी त्यांच्याविषयी एक आर्या लिहिली आहे. ‘ख्यात तुकारामस्तुत साधुसभाप्राणवल्लभा। लतिफा स्मर त्यासी असो जाति भलती बा।।’ असं मोरोपंत म्हणतात. लतिफ हे प्रसिद्ध आणि तुकोबारायांनी स्तुती केलेले साधूप्रिय संत आहेत असं मोरोपंतांनी सांगितलं आहे. याच लतिफ महाराजांचे काही मोजके अभंग उपलब्ध आहेत. त्यातलाच हा एक अभंग. यात लतिफ महाराजांनी विठ्ठलाच्या मानसपूजेचं वर्णन केलं आहे.
अभंगाच्या पहिल्या चरणात लतिफ महाराज म्हणतात की देवाची पूजा कुठे करायची? असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी देहातच देव आहे याची जाणीव झाली. ‘देह हेच देवालय’ हे तत्त्व बहुजनी परंपरेत आधीपासून चालत आलेलं आहे. सिद्ध परंपराही देहालाच देवालय मानणारी होती. ही सिद्ध परंपरा साधारण सहाव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंतच्या काळात झाली. या परंपरेतील बहुतेक सिद्ध हे शूद्रातिशूद्र जातीजमातीतून आलेले होते. हे सिद्ध वेदप्रामाण्य मानत नव्हते. जातिभेदाला प्रखर विरोध करत होते. बहुतेक सिद्ध शिवोपासक होते. योग ही त्यांची साधना होती.
या सिद्धांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते देहालाच देवालय मानत होते. वैदिक परंपरा मानवी देहाला नरकतुल्य मानते. याउलट सिद्ध परंपरा देहाला देवालय मानते. वारकरी संप्रदायावर सिद्धांचा मोठा प्रभाव होता. स्वाभाविकच वारकरी परंपरेतही देहालाच देवालय मानण्याची धारणा दिसून येते. त्याविषयी ज्ञानदेवांच्या संदर्भात डॉ. रा. चिं. ढेरे लिहितात, ‘ज्ञानदेव हे सिद्धांच्या अन् नाथांच्या परंपरेत वाढलेले आत्मानुभावी महापुरुष असल्यामुळे जे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ अन् ‘जे ब्रह्मांडी ते पिंडी’ हा विचार त्यांच्या दृष्टीने घरचाच आहे. शरीर हे सार्या विश्वरचनेचे लघुरूप आहे, असे त्यांच्या मार्गातले पूर्वसूरी सांगत आहेत. ‘अडुसट तीरथ है घटभीतर’ अशी या घटाची, मानवी शरीराची तीर्थमयता सिद्धयोग्यांच्या परंपरेत पुन्हा पुन्हा घोषित झाली आहे.’ सिद्ध परंपरेत देह देवालयाची जी धारणा होती तीच वारकरी संतांच्या वाड़मयातही आली आहे.
ज्ञानदेव आणि एकूणच वारकरी संतांच्या अभंगात अनेकदा देहालाच देवालय मानलेलं दिसतं. त्यामागे सिद्ध परंपरेचाच विचार आहे. तेराव्या शतकातल्या संतांना तर सिद्धांचा थेट वारसा होता. ‘चौर्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा। तो सुखसोहळा काय वर्णू ।।’ या नामदेवरायांच्या अभंगातून सिद्ध परंपरा अधोरेखित झाली आहे. बहुतेक सिद्धांवर बौद्ध-जैनादी श्रमणधर्मांचा प्रभाव होता. बौद्ध सिद्ध इंद्रभूती यांची लक्ष्मीकरा नावाची बहीण होती. त्यांनी ‘अद्वय सिद्धी’ या ग्रंथात देवनिवास असलेल्या देहदेवळावर चिंतन करण्याचं निरुपण केलं आहे असं विन्टरनित्झ यांचा हवाला देऊन शरद पाटील सांगतात.
सिद्धांचा वारसा लिंगायतांनाही असल्यामुळे लिंगायत परंपरेतही देह देवालयाची संकल्पना आहे. महात्मा बसवण्णांचं एक वचन प्रसिद्ध आहे. त्या वचनात त्यांनी देहालाच देवालय मानण्याचा विचार मांडला आहे. बसवण्णा म्हणतात,
धनवान बांधील तुजसाठी मंदिरे।
काय मी पामरे करावे बा ।।
देहचि मंदिर पाय खांब त्याचे।
शिखर सोनियाचे मस्तक हे ।।
कुडलसंगमदेवा स्थावर जे काही।
कोसळेल पाही काळांतरी ।।
परि जे जंगम चैतन्याने युक्त।
नांदेल शाश्वत शंका नाही ।।
वारकरी संतांना सिद्धांचा वारसा असल्यामुळे त्यांनी देह देवालयाची संकल्पना ठिकठिकाणी मांडली आहे. त्याचप्रमाणे या अभंगात लतिफ महाराज देहालाच देवालय मानतात. देहातच देव आहे असं ते सांगतात. मुळात वारकरी संप्रदायात ‘पूजापाठ’ नाही तर ‘पाठपूजा’ आहे. पूजापाठात आणि पाठपूजेत मूलभूत फरक आहे. पूजापाठात पूजा मुख्य असून त्या पूजेच्या निमित्ताने मंत्रपाठ केला जातो. याउलट वारकरी संप्रदायात पाठपूजा आहे. इथे अभंगपाठासाठी म्हणजे अभंग म्हणण्यासाठी पूजा केली जाते. पूजा हे संतांचे अभंग म्हणण्यासाठीचं एक साधन आहे. पूजापाठात पूजा हे साध्य आणि मंत्रपाठ हे साधन आहे. वारकरी संप्रदायातील पाठपूजेत अभंगपाठ हे साध्य असून पूजा हे एक साधन आहे. भावयुक्त अंतःकरणाने देवाची पूजा करताना देहातल्या देवाचा अनुभव येतो. देहातल्या देवाची पूजा ही अमूर्त असते. त्यामुळे ती एका अर्थाने तात्विक पूजा ठरते. पूजेकरिता गंध, पुष्प, धूप आणि तुळशीपानाची गरज असते.
लतिफांना सगळीकडे एका चैतन्याचाच अनुभव येत होता. ज्या साधनांनी देवाची पूजा करायची ती साधनेच देवस्वरूप आहेत याची जाणीव ते व्यक्त करतात. नैवेद्य, नैवेद्याच्या ताटातील अन्न, फळफळावळ आणि तांबूळ हे सगळं विठ्ठलस्वरूपच आहे. विठ्ठलस्वरूपाची अशी अनुभूती लतिफांना आली होती. त्यामुळेच लतिफ महाराज ब्रह्मज्ञानाच्या भूमिकेवर आरुढ होऊन सांगतात की सगळीकडे त्या चक्रपाणीचाच अविष्कार आहे. वारकरी संप्रदाय सगुणोपासक आहेच. तरीही त्यांना तत्त्वतः अमूर्त चैतन्याची जाणीव आहे. ती जाणीव या अभंगातून लतिफ महाराज प्रकट करतात.
लतिफांच्या या अभंगातला विचार तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगात आला आहे. ‘देही असता देव। वृथा फिरतो निर्दैव ।।’ असं एका अभंगात तुकोबाराय म्हणतात. ‘करावी पूजा मनेचि उत्तम। लौकिकाचे काय काम तेथे ।।’ असं सांगून मानसपूजेचं वर्णन तुकोबाराय करतात. तुकोबारायांनी लतिफांचा उल्लेख केला आहे, त्यावरून त्यांचे काही अभंग आणि कथा तुकोबारायांपर्यंत पोचल्या असाव्यात असं दिसतं. महिपतींनी भक्तिविजयात लतिफांची कथा लिहिली आहे. मोरोपंतांनी आर्या लिहिली आहे. यातून लतिफ महाराज हे प्रख्यात संत होते हे उघडच आहे. लतिफांवर जसा मराठी वारकरी संतांचा प्रभाव होता तसाच उत्तर भारतीय संतांचाही प्रभाव होता. त्यामुळेच त्यांच्या अभंगात जसा नामदेवांचा उल्लेख आहे, तसाच कबीर, मीराबाई वगैरे उत्तर भारतीय संतांचाही आहे. ‘रामनाम नौबत बजाई। पहली नौबत नारद सुंबर। दुसरी नामा कबीर सुनाई ।।’ असा त्यांच्या एका पदात उल्लेख आढळतो. भक्तीपरंपरेचं तत्त्वज्ञान नारदांच्या भक्तीसूत्रात आलं आहे. त्यामुळे इथे लतिफांनी नारदांना आद्यत्वाचा मान दिला आहे. पुढच्या काळात नामभक्तीचा प्रसार केला तो नामदेव आणि कबीरांनी. तो इतिहास लतिफ महाराज सांगत आहेत. नामदेवांमुळे नामभक्तीचा महिमा महाराष्ट्रात आणि उत्तर भारतातही पसरला. त्याचप्रमाणे कबीरांनीही भारतभर हाच विचार पोचवला. नामदेव आणि कबीर हे भारताच्या मध्ययुगीन भक्तीकाळातील प्रमुख संत होते. तेच लतिफांनी नमूद केलेलं आहे. लतिफांच्या या मोजक्या अभंग आणि पदातून वारकरी विचार आणि इतिहासच संक्षेपाने प्रकट होत राहतो. त्यामुळेच लतिफांची नव्याने ओळख होत राहते.