• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मवाळ हळवा सूर!

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 11, 2025
in मनोरंजन
0

काही संगीतकार, साहित्यिक वा विचारवंत हे कालातीत असतात. मदन मोहन यांच्यावर या क्षेत्रातील बड्या बॅनर्सनी काहीसे दुर्लक्षच केले. अगदी सुमार संगीतकारांना संधी देणार्‍या निर्मात्यांनी मदन मोहन यांच्याकडे पाठ फिरवली… असे का झाले असेल? माहित नाही, पण झाले खरे. ते खूप लवकर हे जग सोडून गेले.
– – –

युद्ध म्हटले की बंदुका, तोफा, मशिनगन्स, युद्धनौका, विमाने, बॉम्ब, गडगडाट, परिसर दणाणून सोडणारे आवाज वगैरे डोळ्यासमोर येतात. या सर्व गदारोळात संगीत कसे असणार? फार फार तर मिलिटरी बँड एवढाच काय तो संगीताशी संबंध असणारा भाग. बाकी सर्व मन आणि शरीराला भयकंपित करणारेच असते. भारतीय सैन्यात असाच एक तरुण सामील झाला होता. इराकमधल्या बगदाद शहरात रायबहादूर चुन्नीलाल नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जन्मलेल्या या तरुणाने बालपणाचा पाच वर्षांचा काळ बगदादमध्येच घालवला होता. रायबहादूर साहेब इराकी पोलिसात अकाऊटंट जनरल होते. लहानग्या मदनला रेकॉर्ड ऐकण्याचा भारी सोस. घरात एखादा पाहुणा आला की चुन्नीलाल मदनला विशिष्ट रेकॉर्ड पाहुण्यांना ऐकवायला सांगत असत. तोही त्वरित ती रेकॉर्ड काढून देत असे. खरे तर मदनमोहन यांचा बालपणीच्या काळात संगीताशी यापलिकडचा संबंध आला नव्हता.
एकदा त्याच्या वाढदिवसाला आईबाबांनी त्याला एक ड्रम भेट म्हणून दिला. इराकी पोलिसांचे पथसंचलन अनेकदा त्याच्या घरावरून जात असे. तो छोटासा ड्रम घेऊन लहानगा मदन त्या पथ संचलनात सहभागी झाला. पोलीस बँडच्या तालावर तो स्वत:चाही ड्रम वाजवत निघाला. इकडे घरी सगळे हैराण. हा गेला कुठे? मग दोन तासांनी तो त्याच पथसंचलनात सापडला. लहानग्या मदनला नकळतपणे जणू त्याचा मार्ग सापडला होता. इराक ब्रिटिश जोखडातून मुक्त झाल्यावर रायबहादूर चुन्नीलाल यांच्यासमोर दोन प्रस्ताव होते. पहिला इराकी नागरिकत्व घेऊन तिथेच राहणे वा नोकरीचा राजीनामा देऊन इराक सोडणे. चुन्नीलाल यांनी दुसरा पर्याय निवडून भारतीय संगीतप्रेमींवर उपकारच केले म्हणावे लागेल. नाहीतर या मदनास आपण मुकलो असतो.
रायबहादूर आपल्या मूळ गावी म्हणजे झेलम जिल्ह्यातील चकवाल येथे कुटुंबासह परतले. मदनमोहन यांचे आजोबा म्हणजे चुन्नीलाल यांचे वडील योगराज हे एक प्रसिद्ध हकीम होते. त्यांचा बंगला योगा आश्रम म्हणून ओळखला जात होता. थोडक्यात मदनमोहन यांचा भूतकाळ अशा अनेक गोष्टींशी निगडित होता.
१९३२मध्ये रायबहादूर कुटुंबाला तेथेच सोडून काम शोधण्यासाठी मुंबईत आले आणि नंतर सिनेमा व्यवसायात एक मोठे प्रस्थ बनले. ‘बॉम्बे टॉकीज’ व ‘फिल्मिस्तान’ या त्या काळच्या नावाजलेल्या सिनेनिर्मिती संस्थेत ते भागीदार झाले. मदनमोहन यांची आई एक प्रसिद्ध कवयित्री आणि संगीतात रुची असणारी संपन्न व्यक्ती होती. मदनमोहन यांनी संगीतात जे एक वेगळे वळण आणले त्याचा पाया हा असा होता. वयाच्या सातव्या वर्षी त्याला गायचा छंदही जडला आणि मित्र-नातेवाईक त्याला गाण्यासाठी आग्रहही करू लागले. रायबहादूर यांना जरी संगीतात फार रुची नसली तरी वडील हकीम योगराज व काका प्रकाश यांना मात्र लहानग्या मदनचे वेगळेपण जाणले होते. अनेकदा लहानग्या मदनसमोर ते आरोह-अवरोह, नोटेशन व संगीतातील नोट्सवर चर्चा करीत असत. मदनचा संगीतातला पाया हा असा टप्याटप्प्याने मजबूत होत होता.
चकवाल हे छोटेसे गाव असल्यामुळे चुन्नीलाल यांनी मदनच्या शिक्षणासाठी आधी लाहोर आणि नंतर कुटुंब मुंबईला आणले. त्या काळात ते हिमांशू रॉय आणि बाम्बे टॉकीज यांच्या सहवासात रुजले. याच काळात त्यांनी मदनला एक रेडिओही घेऊन दिला. याच रेडिओने मदनचा ‘संगीतकार मदन मोहन’ होण्यात मोठी भूमिका निभावली. संगीतातील लय, ताल, मेलडी आणि शब्दांच्या विविध रूपांची गोडी याच रेडियोने त्यांना लावली.
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह भागात चुन्नीलालचे कुटुंब राहत होते, त्याच्या जवळच ‘शॅटो (हा प्रâेंच शब्द आहे) मरीन’ या बिल्डिंगमध्ये त्या काळची अफाट प्रसिद्ध असलेली एक गायिकाही रहात होती, जद्दनबाई. पुढे याच जद्दनबाईच्या मुलीने बॉलिवुडची प्रख्यात अभिनेत्री म्हणून डंका वाजवला आणि नर्गिस म्हणून अजरामर झाली. मदनने या जद्दनबाईच्या घरी सुरांनी भिजलेल्या अनेक रात्री घालविल्या होत्या, उगाच नाही मदनमोहनने गझलांचे मनोरे उभे केले. शाळकरी वयात मदनने आकाशवाणीवरून मुलांसाठी प्रसारित होणार्‍या अनेक कार्यक्रमांत सहभागही नोंदवला होता. याच ठिकाणी एका कार्यक्रमात मदनची एका बडबड्या आणि गुटगुटीत मुलाशी ओळख झाली. चौकशीअंती त्याला समजले की हा अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा थोरला मुलगा राज कपूर आहे. पुढे ओळखीचे रूपातंर मैत्रीत झाले.
एके दिवशी मदन एका मुलीला आपल्यासोबत आकाशवाणीत घेऊन आला. ही खूप सुंदर गाते असे त्याने अधिकार्‍याला सांगितले खरे, पण ती मुलगी गोंधळून न गाताच परत गेली. काही दिवसांनी मदन त्याच मुलीला पुन्हा घेऊन आला, यावेळी मात्र ती छानच गायली. इतकी छान की नंतर ती चित्रपट जगतातील मोठी गायिका अभिनेत्री झाली… सुरैय्या! आयुष्याची ही सर्व वळणे मदनला सुरांच्या वाटेकडेच नेत होती. हा काही ठरवून केलेला प्रवास नव्हता, तो सहजपणे होत होता. त्याच्या आतल्या कप्प्यात हे सर्व संचित जमा होत होते त्याच्याही नकळत! अन्यथा तो सैन्यात तरी का दाखल झाला असता? तरुण मदन १९४३ साली सैन्यात दाखल झाला खरा, पण त्या वातावरणात त्याचे मन रमेना. बंदुकीच्या गोळ्या वा मशिनगन्सचे आवाज त्यांच्या कानावर जेव्हा पडत, तेव्हा त्याच्या मनात खोल कुठेतरी सतारीच्या तारा झंकारत. अलवार सूर खुणावत… शेवटी १९४५मध्ये त्याने सैन्यातील नोकरीला बाय बाय केले आणि आवडत्या क्षेत्रात काहीतरी करावे म्हणून मुंबईला आला. दुसर्‍या महायुद्धाचा अखेरच्या कालखंडात २२ वर्षाचा हा तरुण शेवटी ऑल इंडिया रेडिओ, लखनौ येथे एकदाचा नोकरीला लागला आणि येथूनच मदन मोहन कोहली या तरुणाचा ‘संगीतकार मदन मोहन’ असा प्रवास सुरू झाला.
ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांची गाठ पडली संगीतातील दोन महान दिग्गजांशी. शहनाई नवाज उस्ताद बिस्मिल्ला खान व उस्ताद फैय्याज खान. त्याचवेळी संगीतकार रोशन देखील या रेडिओ स्टेशनवर कामाला होते. स्वत: मदन मोहन यांनी रुढार्थाने संगीताचे असे शिक्षण घेतले नव्हते, मात्र या नोकरीच्या वास्तव्यात त्यांनी या दोन दिग्गजांकडून संगीतातले मर्म आत्मसात केले. मदन मोहन नेहमी म्हणत, ‘संगीत फक्त गुरूच्या पायावर डोके ठेवूनच शिकता येते असे नाही, तर त्यासाठी संगीताचा उत्तम कान लागतो, मात्र संगीताचे पायाभूत ज्ञान आणि नियम माहिती असायलाच हवेत’. नोकरीच्या काळात आकाशवाणीत अनेक दिग्गज कलावंताचे कार्यक्रम प्रसारित केले जात. यामध्ये सरोद नवाज अली अकबर खान, किराणा घराण्याचे दिग्गज गायक वाहीद अब्दुल खान, सारंगीवादक पंडित रामनारायण, गझाल सम्राज्ञी बेगम अख्तर, सतार नवाज विलायत खान, गायिका रोशन आरा बेगम, तलत मेहमूद, फय्याज खान वगैरेंसारख्या महान कलावंतांना प्रत्यक्ष सादरीकरण करताना बघता आले, त्यांना भेटता आले. संगीतक्षेत्रातल्या या महान कलाकारांनी मदन मोहन यांचे भावविश्व भारून टाकले म्हणूनच तर त्यांना अप्रतिम चाली सुचत गेल्या.
मदन मोहन यांना चित्रपटात संधी मिळाली ती मास्टर गुलाम हैदर या संगीतकारामुळे. मात्र संगीत दिग्दर्शनाची नाही तर गाणे गाण्याची. ‘शाहीन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी चक्क लताजींबरोबर दोन गाणी गायली. पुढे १९५०मध्ये मात्र संगीत दिग्दर्शनाची पहिली संधी ‘आँखे’ (१९५०) या चित्रपटाद्वारे मिळाली. त्यांचे मित्र अभिनेते शेखर हे या चित्रपटाचे मुख्य नायक. देवेंद्र गोयल या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक. यातील ‘प्रीत लगाके मैंने ये फल पाया’ हे त्यांचे संगीतकार म्हणून ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. या चित्रपटाचा प्रिमिअर शो बघण्यासाठी त्यांनी वडिलांना आवर्जून बोलावले. त्या काळातील चित्रपट क्षेत्रातील दिग्गज होते ते. मुलाच्या विनंतीला मान देऊन ते आलेही. संपूण शो शांतपणे बसून बघितला. कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. शो संपल्यावर शांतपणे उठून बाहेर जात कारमध्ये बसले. मुलगा धावत बाहेर गेला. वडिलांच्या डोळ्यांतले अश्रू गालावर ओघळत होते. मुलांकडे बघून राय बहाद्दूर चुन्नीलाल म्हणाले, ‘बाळा, तुला संगीत नुसतेच येत नाही तर संगीताच्या भावनाही तुला समजतात. तू अगदी अचूक क्षेत्र निवडले आहेस. तुझ्या यशासाठी मी नेहमीच प्रार्थना करेन.’ नंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या आयुष्यात एक रुखरुख मात्र नेहमीच राहिली. अशा गुणी मुलाला त्यांची भागीदारी असलेल्या ‘फिल्मीस्तान’ या चित्रपट संस्थेतील एकाही चित्रपटात ते संधी देऊ शकले नाहीत.
१९५६मध्ये एव्हीएम या दक्षिणेतल्या प्रसिद्ध बॅनरचा किशोरकुमार व अशोककुमार अभिनीत ‘भाई भाई’ हा चित्रपट आला. यातील जवळपास सर्वच ११ गाणी खूप गाजली आणि मदन मोहन यांना यशाची पहिली चव चाखता आली. ‘कदर जाने ना’, ‘ए दिल मुझे बता दे’, ‘ठंडी ठंडी हवा’… ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर सहज येतात. बेगम अख्तर हा मदन मोहन यांचा वीक पॉईंट. त्यांच्या गझला आणि भारतीय वाद्ये मदनमोहनच्या नसानसात भिनलेले होते. मुशायरात म्हटली जाणारी गझल व नज्म त्यांनी चित्रपटात आणली, तेथून ती प्रेक्षकाच्या घरात व मग थेट हृदयात पोहोचली. याचे श्रेय संगीतातील सर्वच दिग्गज संगीतकार खुल्या मनाने मदन मोहन यांना देतात, ते योग्यच आहे.
१९७६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लैला मजनू’मधील गाण्यांनी त्या काळी रसिकांना चांगलेच मंत्रमुग्ध केले. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मदन मोहन यांनी हे जग सोडले होते. या चित्रपटात बर्‍याच कालावधीनंतर त्यांनी साहिर लुधियानवी यांच्याबरोबर काम केले होते. नऊ गाण्यांपैकी सहा गाणी त्यांनी ध्वनिमुद्रित केली होती. मात्र ‘कहना एक दिवाना तेरी’ हे अर्धवट गाणे आणि ‘लैला मजनू दो बदन एक जान’ व ‘ये दिवाने की जिद है’ ही नंतरची दोन गाणी जयदेव यांनी संगीतबद्ध केली. जयदेव हाही अनेक रसिकमनांचा हळवा कोपरा आहे. ते मदन मोहनपेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. अगदी मोजकेच संगीत जयदेव यांनी दिले, पण जे दिले ते अप्रतिमच. ‘लैला मजनू’मध्ये मदन मोहन आणि जयदेव अशी दोन महान संगीतकाराची नावे एकत्रित दिसतात. या चित्रपटातील संगीताने इतके यश प्राप्त केले की हयातभर मदन मोहन यांना जी प्रसिद्धी मिळाली नाही ती यातील गाण्यांनी मिळवून दिली. १९७७मधील ‘बिनाका गीतमाला’मध्ये ‘हुस्न हाजीर है…’ हे ग्ााणे १८ आठवडे सर्वोच्च स्थानी होते. या चित्रपटाने सुवर्ण महोत्सव साजरा केला. मदन मोहन यांच्या संपूर्ण आयुष्यातील हा एकमेव गोल्डन ज्युबली चित्रपट होता. मात्र हे यश बघण्यासाठी ते जिवंत नव्हते. ही नियतीची क्रूरता म्हणावी का? असेच काहीसे ‘पाकिजा’चे संगीतकार गुलाम मोहम्मद आणि संगीतकार नौशाद अली यांच्याबाबत झाले होते. गुलाम मोहम्मद नौशादपेक्षा मोठे होते, पण त्यांचे सहकारी सहाय्यक होते. ‘पाकीजा’तील संपूर्ण गाणी रेकॉर्ड होण्याअगोदरच गुलाम मोहम्मद यांचा मृत्यू झाला आणि उर्वरित काम नौशादजींनी पूर्ण केले. याही चित्रपटातील संगीताने सर्व रेकॉर्ड तोडले. मात्र गुलाम मोहम्मद हे यश अनुभवयास जिवंत नव्हते.
या चित्रपटातील नायकाची सर्वच गाणी मोहम्मद रफीसाहेबांनी गायली होती आणि त्यासाठी मदनजी स्वत: आग्रही होते. २४ वर्षांच्या ऋषी कपूरसाठी ५२ वर्षांच्या रफीसाहेबांनी ही गाणी आव्हान स्वीकारून गायली आणि ते यशस्वी झाले.
मदन मोहन यांना अभिनयाचीही आवड होती. फिल्मिस्तानच्या ‘शहीद’मध्ये त्यांनी अभिनय केला आहे, तर ‘पर्दा’ नावाच्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका केली होती. नीलम ही अभिनेत्री त्यांची सहनायिका होती. या चित्रपटात त्या काळचे प्रसिद्ध अभिनेते चंद्रशेखर यांचीही त्यात छोटीशी भूमिका होती. नंतर ते मदन मोहनचे जवळचे मित्र बनले. अर्थात अभिनयाच्या क्षेत्रात मदन मोहन यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. मग कधीकधी ते गमतीने म्हणत, ‘माझ्यातल्या संगीतकाराच्या व्यग्रपणामुळे चित्रपटसृष्टीने एक महान अभिनेता गमावला’ हे मात्र चांगलंच झालं, नाही तर अभिनेत्याच्या नादात आपण एका थोर संगीतकाराला मुकलो असतो.
त्यांना क्रिकेटचेही अफाट वेड होते. आताच्या ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जागी पूर्वी एक मोकळे मैदान होते, जिथे मदन मोहन तास न् तास क्रिकेट खेळत असत. बेगम अख्तरचे सूर, सैन्यातील कठोर शिस्त आणि क्रिकेटचं वेड हे तिन्ही गुण त्यांना संगीत देताना खूप उपयोगी पडले. एस. डी. बर्मन व सी. रामचंद्र यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम केले, पण त्यांच्या संगीतावर मात्र त्या दोघांचा प्रभाव पडला नाही. अतिशय मोजक्या वाद्यमेळासह ते गाणे तयार करत. सतार, तबला ढोलकी, सॅक्सोफोन यांचा अप्रतिम वापर त्यांच्या संगीतात बघायला मिळतो. त्यामुळे गायकांच्या गाण्याचे, आवाजाचे सर्व तपशील त्यांच्या गाण्यात आढळून येते. ‘अनपढ’ चित्रपटाचे ‘आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे’ या एका गाण्याच्या मोबदल्यात संगीतकार नौशाद आपला गाण्याचा सर्व खजिना लुटायला तयार होते. ‘हकीकत’ या युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटातील रफीचे ‘कर चले हम फिदा जान-ओ-तन साथियों…’ हे गाणे म्हणजे त्यांनी भारतीय सैन्याला दिलेली मानवंदनाच आहे. तर याच चित्रपटातील ‘हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा…’ हे गाणे म्हणजे भारतीय जवानांच्या हृदयाच्या छेडलेल्या ताराच आहेत. ‘नौनिहाल’मधील ‘मेरी आवाज सुनो’ हे रफीचे गाणे पंडित नेहरूंना अर्पण केलेले गाणे होते. उस्ताद रईस खान यांच्या सतारीचा वापर अनेक गाण्यात त्यांनी इतका अप्रतिम केला आहे की स्वत: लतादीदी ‘आज सोचा तो आंसू भर आये’ या गाण्यातील सतारीचे सूर ऐकून हळव्या झाल्या होत्या. ‘वो चूप रहे तो’ (जहाँ आरा), ‘रस्मे उल्फत में’ (दिल की राहे), ‘नैनो में बदरा छाये’ (मेरा साया), या गाण्यांतील सतारीचे सूर आजही अंग मोहरून टाकतात.
राजा मेंहदी अली खान, राजेंद्र कृष्ण आणि वैâफी आजमी या तीन गीतकारांसोबत त्यांचे खूप सुंदर ट्युनिंग होते. यांच्यासोबत केलेली त्यांची सर्वच गाणी खूप गाजली. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांत ब्लॉकबस्टर सिनेमे अपवादानेच होते, मात्र सगळ्या चित्रपटांतील गाणी खूप गाजली. लोक चित्रपट विसरले, पण गाणी विसरू शकले नाहीत. जवळपास १०० चित्रपटांना संगीत दिलेल्या मदन मोहन यांना पुरस्कार मात्र कमीच मिळाले. १९७०मधील ‘दस्तक’ चित्रपटातील ‘बैयाँ ना धरो’ या गाण्याने मात्र त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. ‘आपकी नजरों ने समझा…’ (अनपढ) आणि ‘लग जा गले की…’ (वह कौन थी?) या दोन गाण्यांना फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाले, पण पुरस्कार मिळाला नाही. अनेकदा अनेकांना नाही मिळत पुरस्कार, पण त्यामुळे त्यांच्या स्थानाला काहीच धक्का पोहोचत नाही. आजच्या काळातही जेव्हा एक १०-११ वर्षांची मुलगी अत्यंत तन्मयतेने ‘लग जा गले की आज ये..’ गाऊ लागते, तेव्हा तिला हेही माहीत नसते की ज्या संगीत दिग्दर्शकाचे ती गाणे गातेय त्याच्या काळात तिच्या वडिलांचाही कदाचित जन्म झाला नसेल.
काही संगीतकार, साहित्यिक वा विचारवंत हे कालातीत असतात. मदन मोहन यांच्यावर या क्षेत्रातील बड्या बॅनर्सनी काहीसे दुर्लक्षच केले. अगदी सुमार संगीतकारांना संधी देणार्‍या निर्मात्यांनी मदन मोहन यांच्याकडे पाठ फिरवली… असे का झाले असेल? माहित नाही, पण झाले खरे. त्यांनी जे काही दिलं ते मात्र अस्सल दिलं… निर्माता कोण? चित्रपट तारे कोण? याचा विचार न करता. खरं तर ५१ वर्षे हे काही एक्झिट घेण्याचं वय नाही. मदन मोहन खूप लवकर हे जग सोडून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक गझला, नज्म, कविता, शायरी यांना अनाथ झाल्यासारखं नक्कीच वाटलं असेल…

Previous Post

सोमीताईचा सल्ला

Next Post

घटस्फोटानंतरची ‘नातीगोती’!

Next Post

घटस्फोटानंतरची ‘नातीगोती’!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.