शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांचे विरोधकही नेहमी आदराने ‘दिलदार विरोधक’ असा उल्लेख करत. बाळासाहेबांनी राजकारणात प्रतिस्पर्ध्यांवर कठोर टीका केली, लेखणीचे तिखट प्रहार केले, कुंचल्याचे बोचकारे वाटतील असे फटकारे ओढले, पण कोणाशीही शत्रुत्व बाळगलं नाही. राजकारणाच्या, पक्षीय विचारांच्या चौकटीपलीकडे जाऊन त्यांनी अनेकदा दोस्तीचा हात पुढे केला, राज्यात भलतीच वेगळी समीकरणंही निर्माण करून दाखवली. हे १९७९ सालातलं व्यंगचित्र पाहा. यात तेव्हाच्या बलाढ्य काँग्रेसचे तीन सर्वोच्च बलाढ्य नेते इथे आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील. हे सगळे बाळासाहेबांचे प्रमुख विरोधक. त्यांच्यावर टीका करणारी व्यंगचित्रे बाळासाहेबांनी काढली, भाषणांमधून त्यांचा समाचार घेतला. तरी तेच बाळासाहेब एकंदर महाराष्ट्रहित लक्षात घेता या तिघांनी एकत्र यावं, त्यांच्यात दिलजमाई व्हावी, हे महाराष्ट्राचं स्वप्न आहे, असं व्यंगचित्र रेखाटतात, ही त्यांची दिलदारी!! आज त्यांच्या हयातीत ज्यांच्यात दुरावा आला होता, ते राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात मराठीच्या, महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर जे मनोमीलन घडून आले, ते पाहून बाळासाहेबांना किती आनंद झाला असता? महाराष्ट्राबरोबरच त्यांच्याही अधुर्या स्वप्नाची पूर्तताच यानिमित्ताने झाली आहे!