मराठी माणूस
मराठीचा हा बसता हिसका
आसन त्यांचे डळमळले
फडणवीसांचे सगळे चेले
लाथ बसता कळवळले
एकजुटीची अखंड ताकद
दिसली तेव्हा लटपटले
आत्ता काही खरे नाही
मनात हळूहळू पुटपुटले
मुंबई जिंकणे सोपे नाही
कळल्यावरती सटपटले
वङ्कामुठीचा दणका बसता
शरणागतीने फरफटले
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
पक्ष फोडणे मळ हाताचा
गद्दारांचा जमवून मेळा
अनुभव नाही कामी आला
झाला कटाचा लोळागोळा
किती बोललो खोटे-नाटे
किती हिंदीचे बोट चाटले
बोलविता धनी होता दुसरा
बोलून माझे भाग्य फाटले
नाही खपवून घेत आपले
लोक मराठी शूर बाण्याचे
शेपूट घालून बसले आता
दाढीवाले वीर ठाण्याचे
—– —– —–
मराठी भाषाभिमानी
हिंदी लादण्या बालमनावर
टपले होते भाजप बोके
तीन-तीन भाषांचे ओझे हे
नव्हते केवळ पोकळ खोके
फुलपाखरे शाळेमधली
मुक्त मनाने बागडणारी
त्यांना चिरडून ओझ्याखाली
जात हरामी धोपटणारी
ढ नेत्यांची किती मुजोरी
मराठीची ना कळली शक्ती
अकलमंद हे मंद बुद्धीचे
का करिती हिंदीची सक्ती?
—– —– —–
अजित पवार
ज्ञानेशांची मायमराठी
का लागला तिच्याच पाठी
आईवरती महाराष्ट्राच्या
का उगारली उगाच काठी
हवी कशाला नवी समिती
जळून गेला तुमचा सुंभ
पीळ तयाचा आहे फुसका
तुम्हासारखा वाटे शुंभ
गप्प बसा ना कळली ताकद
जग हसले तरी नाही अक्कल
पँट सावरा आधी स्वत:ची
तुटले आहे तिचेच बक्कल
—– —– —–
महाराष्ट्र
विजय मेळावा हा प्रारंभ
श्वास मराठी एकवटले
अफाट त्यांची शक्ती पाहता
सत्तासूर हे लटपटले
कुणीही येतो तुच्छ लेखतो
इतकी नाही दीन मराठी
पाठीत तुमच्या बसेल रट्टा
दिसेल तुम्हा तेज मराठी
तिच्या वाटेला जाऊ नका कुणी
मेळाव्याला दिसला सागर
शेवट करील तुमचा पुरता
बुडेल तुमची सत्ता-घागर