– अॅड. नोएल डाबरे
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी एप्रिल महिन्यात एक मुलाखत देऊन आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची बनल्याचे जाहीर केले. अमेरिका, चीन, जर्मनी या जगातल्या पहिल्या तीन क्रमांकांच्या अर्थव्यवस्था आहेत. जपानला मागे टाकून चौथे आपण. प्रत्यक्षात ती माहितीही खरी नव्हती. अजूनही जपानची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे. या वर्षाअखेरीस भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची होईल असे अनुमान आहे.
या मुलाखतीमुळे देशातल्या वातावरणात काही काळ थरार निर्माण झालेला होता. माध्यमे चेकाळली. जागतिक महासत्ता म्हणून आपण अधिक मजबूत झालो आहोत, अशी वातावरणनिर्मिती केली गेली. त्याचवेळेला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण पाकिस्तानला नमवले, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि प्रसारमाध्यमांनी जाहीर केल्याने या बातमीचे वजन अधिक वाढले. पुढे मोदींचा फुगा त्या बाबतीत फुटला, तसाच तो या बाबतीतही फुटला.
अर्थव्यवस्थेच्या या क्रमांकांना वास्तवात काही अर्थ नसतो. या क्रमांकामुळे जगात एखाद्या देशाचा दबदबा तयार होतो, असेही नाही. सतराव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशालाही जगात मान असतो. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था सतराव्या क्रमांकाची आहे. आपण पाचव्या क्रमांकावर असूनही आपले नागरिक तेथे नोकरीसाठी जातात. तेथील कोणी इथे नोकरीसाठी येत नाही. हे एक उदाहरण पुरेसे आणि बोलके आहे. सौदी अरेबियाला जगातील महासत्ता मान देतात. त्यांच्या राजप्रमुखांचे शाही थाटात आदरतिथ्य केले जाते. थोडक्यांत अर्थव्यवस्थेच्या क्रमांकावर देशाची पत ठरत नाही. अर्थव्यवस्थेने मानवी जीवनावर किती सकारात्मक परिणाम केला आहे त्यावर जागतिक पातळीवर देशाचे महत्व अधोरेखित होते. मानवी जीवन किती सुसह्य आहे, किती सुरक्षित आहे, मानवी जीवनाची किती कदर आहे, हे पाहणे सगळ्यात महत्वाचे मानले जाते.. या तिन्ही बाबतीत जपान आपल्यापेक्षा फार पुढे आहे. त्याचा अभ्यास करून आपल्याला आपले जीवन कसे सुसह्य, सुरक्षित आणि सन्मानजनक करता येईल ते पाहिले पाहिजे. १८५० साली जपानने पाश्चिमात्य ज्ञानावर आधारित देशाची उभारणी केली आणि जपान बदलला. चीनच्या सन याट-सेनने जपानचा कित्ता गिरवला आणि अवघ्या शतकाच्या आत चीनचा कायापालट झाला. आता आपली वेळ येऊन ठेपली आहे.
जपान हा वृद्ध आणि बालकांसाठी स्वर्ग आहे. तरुणांसाठी आणि प्रौढांसाठी संधींचा सागर आहे. जपान भारतापेक्षा शंभर पटीने श्रीमंत आहे. विशेष म्हणजे ही श्रीमंती समाजातल्या सर्व थरांपर्यंत पोहचलेली आहे. रस्त्यावरून चालताना श्रीमंत कोण आणि गरीब कोण हे आपण ओळखू शकत नाही. जपानमध्येही होमलेस पीपल (आपल्याकडे आपण भिकारी असं म्हणतो त्यांना) असतात, पण, दहा हजारांत एखाददुसरा. अन्यथा सारा जपान सुटाबुटात आढळतो. जपानमध्ये फुटपाथ रस्त्यापेक्षा अधिक रुंद असतात. जपानमध्ये नळातून मिळणारे पाणी सर्वात सुरक्षित असते. आपण ते थेट पिऊ शकतो. वातावरणात कायमचा एक आल्हाददायक सुगंध असतो. निळेभोर आकाश आणि जलस्रोतातील स्फटिकाप्रमाणे असलेले पाणी पाहायचे असेल तर जपानला भेट देणे आवश्यक आहे. रस्त्यांवर भटकी कुत्री जाऊ द्या, एखादी स्कूटर देखील आढळत नाही.
मागे एकदा मी मुकायजिमा या नगरात फिरत होतो. मी चालत असलेल्या रस्त्यालगत गटार असल्याचे मला जाणवले. दुर्गंधीचा वास कसा येत नाही म्हणुन माझ्या नाकाच्या ग्रंथी चाळवल्या गेल्या. झुळुझुळु वाहाणार्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. मी जागीच थबकलो. जाऊन पाहतो तर चपापलो. त्या गटाराच्या पाण्यात छोटे छोटे मासे फिरत होते. शेवाळाशिवाय तेथे काहीच नव्हते. पाणीही शुद्ध. खालचा तळ दिसत होता. मी बराच वेळ जागीच खिळून राहिलो. जपानला हे कसे काय शक्य झाले या विचारात डुंबून गेलो.
पहिल्यांदा जपानला गेलो होतो, तेव्हा आश्चर्यांच्या मालिका पाहिल्या होत्या. आमचे विमान टोकियोतील विमानतळावर उतरले. आमचे हॉटेल विमानतळापासून साठ किलोमीटर अंतरावर होते. या पूर्ण मार्गाच्या दुतर्फा विविधरंगी झाडांच्या रांगा होत्या. वातावरणात निरव शांतता होती. कुठेच ट्रॅफिक लागली नाही. कुठेही हॉर्न नाही. जणूकाही एका स्वप्ननगरीतून आम्ही प्रवास करीत होतो. टोकियोत जागोजागी सार्वजनिक सोई आढळल्या. प्रशस्त मैदाने, भव्य दिव्य बगिचे, उद्याने, सम्राटाच्या राजवाडा, वैज्ञानिक संस्था, प्राचीन, अर्वाचीन इतिहासाचे अवशेष जतन केलेल्या वास्तू, प्राणी संग्रहालये, मोजता येणार नाहीत इतक्या पुस्तकांच्या लायब्रर्या, खास तरुणांसाठी राखीव ठेवलेला अकिहाबारा परिसर पाहून मन दडपून जाते. एका खरोखरच्या महान संस्कृतीचा परिचय आपल्याला स्तिमित करून सोडतो.
बरे हे चित्र एकट्या टोकियोचे असते तर समजून घेतले असते. क्योटोमध्येही तेच चित्र, ओसाकामध्येही तेच चित्र, नारामध्येही तेच चित्र. त्या त्या ठिकाणांची वैशिष्ट्ये जपून सारा जपान सजला आहे असे सर्वत्र चित्र आहे. पुढच्या खेपेस हिरोशिमा येथे गेलो. अवघ्या पंचाहत्तर वर्षांपूर्वी हे शहर बेचिराख झाले होते असे त्याकडे बघून वाटले नाही. सर्वत्र देखण्या इमारती. प्रत्येक इमारत तिची वैिशष्ट्यपूर्ण रचना जपणारी. जणू स्वर्गातून उतरलेली एखादी स्वप्ननगरी! स्वच्छतेच्या बाबतीतही अविश्वसनीय वाटाव्या अशा सुविधा जपानमध्ये मी पाहिल्या. प्रवासाने अंग शिणल्यावर आपण वाटेवर कुठेतरी स्वच्छतागृह पाहतो. पंचतारांकित हॉटेलनाही लाजवतील अशी जपानमध्ये वाटेवरची स्वच्छतागृहे आहेत. आजुबाजूला बागबगीचा आणि विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था केलेली असते. आपला थकवा कुठच्या कुठे निघून जातो. जपानच्या चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने हे शक्य केलेले आहे.
जपानच्या या वर्णनात मी काही वेगळे सांगितले नाही. ते सगळ्यांना ठाऊक आहे. पण ते कशासाठी परत सांगायचे त्यांची कारणे आहेत. या सोईसुविधा सामान्य लोकांना उपलब्ध होण्यास कारणे आहेत. नागरिकांच्या उत्पन्नामधील कमीत कमी तफावत हे प्रथम कारण आहे. एखाद्या कंपनीमधील सर्वोच्च अधिकारी आणि त्या कंपनीतील सगळ्यात हलकी नोकरी करणारा कामगार यांच्या पगारातील फरक केवळ पंधरा पटींपर्यंत असतो. कामगाराचा वार्षिक पगार तीन लाख रुपये असेल तर सर्वोच्च अधिकार्याचा पगार पंचेचाळीस लाख रुपये असतो. आपल्याकडे भीषण तफावत आढळते. आपल्याकडे ती दोनशे ते तीनशे पटींत असते. कधी कधी हजार पटींतही असते. त्यामुळे जपानमध्ये आर्थिक विषमता आढळत नाही. आर्थिक विषमता नसल्यामुळे जपानमध्ये बेरोजगारी हा प्रश्न नाही. अगदी गेल्या महिन्यात जपानमध्ये तीन लाख नवीन नोकर्या उपलब्ध झाल्या. मोदी म्हणतात वर्षाला दोन कोटी नोकर्या उपलब्ध करतो म्हणून. जपान ते प्रत्यक्ष करून दाखवतो. आर्थिक विषमतेला जपानमध्ये विविध योजना आखून थोपविले जाते.
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत इनहेरिटन्स टॅक्स हा मुद्दा कमालीचा गाजला. मोदींनी आणि माध्यमांनी हा प्रचाराचा एक मुख्य मुद्दा बनवला होता. काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेप्रमाणे भारतातही इनहेरिटन्स टॅक्स लावला पाहिजे असे मत एका मुलाखतीत मांडले होते. त्यावर मोदींनी आणि माध्यमांनी आकांडतांडव केले. भारतीय जनतेवर इनहेरिटन्स टॅक्स लावून काँग्रेस त्यांची संपत्ती स्वाहा करू पाहतो असा आरोप लावला गेला. हा टॅक्स लावल्यास संपत्तीचा बराच भाग सरकारजमा होईल अशी भीती मोदींनी आणि माध्यमांनी जनतेला दाखवली. त्याचा काँग्रेसने इतका धसका घेतला की सॅम पित्रोदांच्या वक्तव्यांनी पक्षाचा काहीच संबंध नाही असे त्यांना जाहीर करावे लागले. प्रत्यक्षात इन्हेरिटन्स टॅक्स जनतेसाठी खरोखर वाईट आहे का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. जपानमध्ये इनहेरिटन्स टॅक्स पंचावन्न टक्के आहे. जगातील सर्वात जास्त. या टॅक्सची भीती कोणी बाळगावी? बहुसंख्य भारतीयांनी तर अजिबात भीती बाळगू नये. भारताची लोकसंख्या जरी दीडशे कोटी असली तरीही शंभर कोटी लोकांकडे म्हणावी इतकी संपत्ती नाही. त्यांच्याकडील संपत्ती पाच लाखांच्या खालीच आहे. ज्यांची संपत्ती पाच कोटी रुपयांच्या पलीकडे आहे, त्यांना इन्हेरिटन्स टॅक्स लावण्यात काय हरकत आहे? भारतामध्ये पाच कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या लोकांची संख्या पंधरा टक्क्यांहून अधिक आहे. इन्हेरिटन्स टॅक्स म्हणजे मृत्यूनंतर वारसांना जी संपत्ती मिळते त्यावर आकारला जाणारा कर. जपानमध्ये या कराने चमत्कार घडवला आहे. तो सर्व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी वापरला जातो. त्याचा थेट फायदा जनतेला होतो. म्हणूनच जपानमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भारतातही श्रीमंत लोकांना हा कर लागू केल्यास अनेक सार्वजनिक सुविधा जनतेला उपलब्ध होतील. सध्याची दुरवस्था त्यामुळे दूर होईल. राज्यकर्त्यांनी हा कर लागू करण्याची आग्रही मागणी केली पाहिजे. इथे मोदींच विरोध करतात. भारतीयांची दिशाभूल करतात.
भारतात २०२३-२४ या वर्षात २० लाख कोटी रुपये आयकर वसूल करण्यात आला. जपानमध्ये याच काळात ८० लाख कोटी रुपये कर गोळा करण्यात आला. जपानची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपेक्षा दहा पटीने कमी आहे. हे गणित लक्षात घेतले तरीही जपानचा आर्थिक दर्जा आपल्या लक्षात येतो. त्यामुळे भारत जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे किंवा बनणार आहे, या बातमीमुळे गर्वाने फुगून जावे असे काही नाही. ही एक प्रकारची बनवाबनवी आहे. चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताला जपानसारखे जगामध्ये मिरवायचे असेल तर प्रथम भारतामध्ये आर्थिक समानता आणावी लागेल. सध्या मोदींची राजवट पाहता ते सगळे दिवास्वप्न ठरेल असे म्हणावे लागेल.