चाळीत एकमेकांची उणीदुणी काढणारी माणसंच जास्त का असतात असा प्रश्न वयात आल्यावर मोरवेकरांच्या रमेशने त्याच्या पिताश्रींना विचारला तेव्हा त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर न देता खाडकन् त्याच्या कानाखाली वाजवली. मोरवेकरांचा स्वभावच मुळी तापट. मुळात त्यांना असलाच काय कुठलाच प्रश्न विचारायचं धाडस रमेशने करायला नको होतं. पण त्याला मिसरूडं फुटल्यावर त्याच्या कोणीतरी मित्राने असा मित्रत्वाचा सल्ला दिला होता की, आता आपल्या पिताश्रींशी मित्रासारखं वागायचं, त्यांना पूर्वीसारखं वचकून राहायचं नाही, त्यांच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारायच्या- त्या जोरावर रम्याने हे धाडस केलं होतं.
वडील म्हणाले, तुला या नसत्या उचापती करायला सांगितल्या कुणी? अभ्यास सोडून कोण कुणाची उणीदुणी काढतो याकडे लक्ष द्यायला वेळ कधी मिळतो तुला?
– लॉकडाऊनच्या काळात सरकारने घरी बसा सागितलं म्हणून चोवीस तास घरातच कोंडून घ्यायचं नसतं पप्पा. आम्हीही पाय मोकळे करतो. गच्चीवर गप्पा मारत बसतो. यावेळी काही गोष्टी कानावर पडतात, काही प्रत्यक्ष बघायला मिळतात. कान सशासारखे असले ना मग ते टवकारले नाही, तरी सारं काही ऐकू येतं.
रम्याला वाढत्या वयाबरोबर फारच अक्कल आलेली दिसतेय हे पिताश्री समजून गेले आणि याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, हे उमगून ‘बेअक्कल’ ही ठेवणीतली उपमा हासडून ते पेपरात डोपं खुपसून बसले. काही वेळाने रम्या हिरमुसल्या चेहर्याने गच्चीवर आला. पाण्याच्या सिमेंटच्या टाकीखाली आडोशाला बसून स्वतःशीच काही पुटपुटत होता. वयाने वाढले तरी तरुणाईतला तोच टारगटपणा कायम असलेले चाळीतलं मित्रमंडळ तिथेच शेजारी रमीचा डाव मांडून बसलं होतं. रम्याचा चेहरा पाहिल्यावर सगळेच थबकले. काय झालं ते विचारल्यावर रम्याने झालेला प्रकार सांगितला. त्याबरोबर आमच्यातला संदेश धामणस्कर भडकला. म्हणाला, रम्या, घाबरू नकोस. तुझ्या बापाला आम्ही लहानपणापासून ओळखतो. तो कधीही आमच्या मित्रमंडळीत मिसळला नाही. त्याचा एकलकोंडा स्वभाव चाळीत सर्वांनाच खटकायचा. चाळीतल्या कुठल्याही कार्यक्रमात, समारंभात तो सहभागी व्हायचा नाही. सगळ्या जगाचा भार जणू आपणच वाहत आहोत, असा चेहरा असायचा त्याचा. जीवनात शिस्त हवी, एवढं एकच पालुपद तेवढं म्हणायचा. म्हणजे आम्ही त्याचे समवयस्क सारे बेशिस्त होतो असं त्यांचं म्हणणं. तुझी आई गरीबाघरची लेक होती म्हणून याच्या पदरात पडली. तिने म्हणून संसार चांगल्या रीतीने सांभाळला. ती शांत आणि सुस्वभावी आहे. म्हणून तुमच्या घराला शोभा आहे. नाही तर याच्या संशयी स्वभावाने वाट लागली असती त्या माऊलीची. सारखा पाळतीवर असायचा तिच्या. जरा कुठे घराच्या बाहेर जिन्यावर आली तरी संशय घ्यायचा. ती कुणाशी बोलते, कुणा शेजार्यांच्या घरात जाते यावर बारीक नजर असायची त्याची. तुझ्या वडिलांबद्दल आम्ही तुझ्याशी असं बोलणं योग्य वाटत नसलं तरी या गोष्टी तुला कळायला हव्या असं आम्हाला वाटतं. बिचारीने खूप भोगलंय, पण स्वभावाला औषध नसतं अशी स्थिती आहे तुझ्या पप्पांची. त्यामुळे तूच तुझ्या आईचा खरा आधार आहेस. तिला मात्र कधी दुखवू नकोस. पपा कसेही वागले ना तरी त्यांना त्रास होईल असं आपणही नाही वागायचं. त्यांच्याशी चांगलं बोलायचं, त्यांचं ऐकायचं. कधी ना कधी त्यांना त्यांची चूक समजेल.
– होय रम्या. आम्हीही तुझ्या वयाचे असताना यासारखे अनेक अनुभव घेतले आहेत. या वयात अनेक प्रश्न पडतात. काही गोष्टींचं नव्याने ज्ञान होत असतं. या वयात चौकस नजर असेल तर चाळीतल्या अनेक अनुभवांवरून खूप शिकता येतं. माणसांचे स्वभाव कळतात, स्वभावाचे अनेक नमुने समजतात. माणसांची पारख करता येते. खरं म्हणजे चाळ हे एक पुस्तकच असतं. चाळीतील अनुभवावरून खूप शिकायला मिळतं. तू फक्त एकमेकांची उणीदुणी काढणारी माणसं चाळीत पाहिली असशील. पण त्यापलीकडे शेजारधर्माला जागणारी, संकटकाळी हवी ती मदत करणारी, दुसर्याच्या घरातील कार्य आपलंच समजून वावरणारी, अगदी हक्काने हवे ते मागून घेणारी आणि देणारी माणसे इथेच सापडतील. वेळप्रसंगी साध्याशा कारणावरून भांडणारी, आकांडतांडव करणारी माणसं इथे असतात, तशीच जिवाला जीव देणारी आणि रात्रीअपरात्रीही हाकेला ओ देणारी माणसे इथेच असतात. अरे या टमाट्याच्या चाळीचा इतिहास गिरणगावाचा असला ना तरी भविष्यकाळ आदर्श भवितव्याचा आहे. गरिबीतून शिकून मोठे झालेले आपल्या चाळीतले वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनीअर, बिल्डर, बँक मॅनेजर अशा कितीतरी क्षेत्रांतील नावांची यादी जर तू पाहिलीस ना तर तुझा विश्वास बसणार नाही. ही सगळी चाळीतील कष्टकर्यांचीच मुलं होती. कौटुंबिक कारणामुळे आज ती दुसरीकडे मोठ्या घरात राहायला गेली असतील, तरी त्यांचं चाळीवरचं प्रेम आटलेलं नाही. आता तुमची पिढी तयार होतेय. एक दिवस तीही मोठी होऊन भर्रकन उडून जाईल. आम्ही फक्त त्या आठवणी जपत राहू. जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्या सर्वांना सांगत राहू.
रम्याला ते पटलं आणि मनावरचा ताण नाहीसा झाल्यासारखा तो गच्चीचे जिने उतरू लागला.
– श्रीकांत आंब्रे
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)