अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच्या गुर्मीत भारतावर २७ टक्क्यांच्या व्यापार करवाढीचा बॉम्ब टाकून पंतप्रधान मोदींना आपलं भारतावरील राक्षसी प्रेम दाखवून दिलं. त्यानंतर माझा मानलेला लाडका परमप्रिय मित्र पोक्याने माझ्याकडे तीव्र संताप व्यक्त केला व ट्रम्पला अस्सल मराठी गावरान शिव्यांची लाखोली वाहिली. ट्रम्पला शिव्या दिल्याबद्दल कुणाल कामराप्रमाणे टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देण्याची धमकी मिळण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे पोक्याने संताप मनसोक्तपणे व्यक्त केला. मोदींशी मैत्रीचे नाटक करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसू पाहणारा हा ट्रम्प पूर्वजन्मी अफझलखानाचा सख्खा भाऊ असावा अशी पोक्याची खात्री पटल्याचं त्याच्या चेहर्यावरून दिसत होतं. अमेरिकेने भारतावर लादलेल्या या प्रचंड व्यापार करवाढीबद्दल महाराष्ट्रातील काही सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यास या मोठ्या जागतिक व्यापारयुद्धाच्या ठिणगीचे भारतासारख्या देशावर काय परिणाम होतील हे समजणं सोपं होईल, असं पोक्याला सांगितलं. पोक्याने तातडीने ही कामगिरी पूर्ण केली. त्याच या प्रतिक्रिया.
एकनाथ शिंदे : भारताचे बलाढ्य पुरुष मोदीसाहेबांइतकंच भारतावर अफाट प्रेम असलेले ट्रम्पसाहेब यांच्या कृतीत नक्कीच भारताचं भावी काळात भलं करण्याचाच प्रयत्न असावा, असं मला वाटतं. आनि म्हनून आपण मोदीसाहेबांच्या मागे सर्वस्व पणाला लावून उभं राहिलं पाहिजे. ट्रम्प हाच खरा भारताचा आधारस्तंभ आहे. क्रिकेटमधला स्टम्प एकवेळ भेदक गोलंदाजीनं उखडून चारशे वीस कोटी चाळीस फूट दूर गौहातीत जाऊन पडू शकतो, पण मोदीसाहेब आणि ट्रम्पसाहेब यांच्या मैत्रीचा पाया इतका खोल गाडला गेला आहे की कमीतकमी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत त्याला उखडण्याची कोणाचीच हिंमत नाही. आनि म्हनून या करभार किंवा कर वजनाने आपल्याला डळमळण्याची मुळीच भीती नाही.
अजितदादा : देशाचे अर्थकारण सांभाळायचे ही सोपी गोष्ट नाही. आजपर्यंत अमेरिकेची आर्थिक अधोगती का आणि कुणामुळे झाली याचा अचूक शोध ट्रम्प यांनी लावल्यामुळे मी त्यांना धन्यवादच देईन. भारताशी आणि मोदीसाहेबांशी मैत्री असल्यामुळे भारतावर त्यांनी त्या मानाने फारच कमी करभार लावला याबद्दल आपण त्यांचे आभारच मानायला हवेत. अमेरिकेत लाडक्या बहिणी नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक धोरणाला फार मोठा धक्का पोचला नाही हे त्यांचं नशीब. इथे महाराष्ट्रात वर्षभराच्या बजेटमधील तरतुदी करताना आमची कशी काशी होते, हे त्या ट्रम्पना समजलं असतं तर त्यांनी मोदीसाहेबांना लाडकी बहीण योजना बंद करण्याचे आदेश द्यायला सांगून अशा योजना मतांसाठी राबवणार्यांचे कान उपटण्याचा सल्लाही दिला असता. असा माझ्यासारख्या खमक्या स्वभावाचा राज्यकर्ता अमेरिकेला लाभला हे खरोखरच अमेरिकनांचे भाग्य आहे. नाहीतर आमच्या इथे बघा. कशात काय आणि फाटक्यात पाय. अस्सा संताप येतो एकेकावेळा की मतांच्या स्वार्थासाठी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करून टाकाव्या आणि महाराष्ट्राची भरभराट करावी असं वाटत राहातं. पण इथे मंत्रिमंडळात आणि भाजपात एकेक नग असे आहेत की तो पालघरमधला काका, काका बोलणारा बोलका कावळा परवडला, पण हे खा खा, खा खा म्हणत जिथे तिथे कमिशन खाणारे मंत्री नाही परवडणार या महाराष्ट्राला. ट्रम्प, तुम्हाला सलाम!
फडणवीस : सत्तावीस टक्के करभार म्हणजे काहीच नाही हो. आणि मोदीसाहेबांची परवानगी आणि सल्ला घेऊनच माननीय ट्रम्पसाहेबांनी हा करभार जाहीर केला असावा. या दोघांची अतूट मैत्री एवढी घट्ट आहे की दोन बाजूला दोन हत्ती दोर लावून ती तोडण्यासाठी लावले तरी ती तुटणार नाही. मागे ज्यावेळी ते भारतात आले, त्यावेळी त्यांचं ओसंडून वाहणारं मोदीप्रेम सार्या जगाने पाहिलंय. एखादी गोष्ट मनात घेतली की ती तडीस न्यायचीच हा दोघांचाही स्वभाव. देशहितासाठी कठोर निर्णय घेण्याच्या बाबतीत दोघांमध्येही साम्य आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी आदरणीय मोदीसाहेबांनी अमेरिकेत जाऊन तिथल्या भारतवासीयांना त्यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं ते अमेरिकेच्या आणि भारताच्या हितासाठीच. या करभाराचं निमित्त करून त्या दोघांच्या मैत्रीत कुणी विष कालवण्याचे काम महाराष्ट्रात करत असेल तर त्याच्यावर शासन कठोर कारवाई करील. त्यातून विरोधी पक्षीयच काय पत्रकारांनाही वगळण्यात येणार नाही. वेळ पडल्यास त्यांच्यावर खटलेही भरण्यात येतील. आदरणीय मोदीसाहेब, पूजनीय ट्रम्पसाहेब या दिव्य विभुती आहेत. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळतीऽऽऽ
केसरकर : मला हेच समजत नाही की हे ट्रम्प असं डोकं फिरल्यासारखे का वागतात? त्यांच्यावर मानसिक उपचार करण्यासाठी त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आणण्याची व्यवस्था माननीय शिंदेसाहेबांवर जबाबदारी टाकून मोदीसाहेबांनी केली पाहिजे. ट्रम्पांचं मानसिक संतुलन ढासळलं असेल तर त्याचा गंभीर परिणाम अमेरिकेच्या आणि भारताच्या अर्थ आणि राजकीय व्यवस्थेवर होईल याची काळजी मला वाटते. आले ट्रम्पोजींच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हा वेडाचार अमेरिकेने आणि भारताने चालू देऊ नये. हे ट्रम्प महाशय आता नव्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, तरी त्यापूर्वी काही वर्षे तेच अध्यक्ष होते ना! तेव्हा अमेरिका आर्थिक डबघाईला गेल्याचं त्यांच्या का लक्षात आलं नाही? तेव्हा तुमचं तोंड कोणी बंद केलं होतं? माझ्यावर जसा आर्थिक अफरातफरी केल्याचा आरोप व्हायरल करून मंत्रिमंडळातून फडणवीस यांनी डच्चू दिला, तसा तुम्हाला कोणी डच्चू दिला नव्हता ना! तुम्हाला एकदम अमेरिकेला आर्थिक खड्ड्यात घालणारे अडतीस देश आठवले आणि तुम्ही त्यांच्यावर अमेरिकेला नाडल्याचे आरोप करून त्यांच्या मानेवर वेटलिफ्टिंगचं आर्थिक वजन ठेवलंत? कुठे फेडाल हे पाप! दुसर्यांसाठी खड्डा खणणारे स्वत: खड्ड्यात जातात हे लक्षात ठेवा ट्रम्प महाशय. तुम्ही ठाण्याला आल्यावर भेटूच आपण. तेव्हा ऐकू तुमचं ट्रम्पेट वादन!