□ छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर – नितीन गडकरी.
■ एकतर छत्रपती शिवाजी महाराजांना गडकरींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. गडकरी यांनी सगळा गाव फिरून त्यांच्या पक्षात आलेल्या आणि हिंदू मुल्ला बनायची घाई झालेल्या राज्यातल्या काही मंत्र्यांना हे सांगायला हवं… शिवप्रेमींना हे आधीच माहिती आहे.
□ राज्यातील ९४ बालगृहे अद्याप सुरू का नाहीत? – हायकोर्टाने सरकारला खडसावले.
■ बालगृहांची अवस्था अशी असते की ती सुरू नाहीत, हे बालकांसाठी बरेच आहे, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे दुर्दैवाने.
□ पवित्र गोदावरीचा नाला झाला – महंत रवींद्रपुरी महाराज यांचा संताप.
■ कोणती नदी अशी शिल्लक आहे, जिचा नाला झालेला नाही? कुंभ मेळा भरणार म्हणून एकाच नदीचा सोयीस्कर कढ येणार असेल, तर उपयोग काय? सगळ्याच नद्या माता आहेत ना? मग सगळ्यांच्याच अवस्थेवर बोला आणि नाला करण्यात कशाकशाचा वाटा आहे, तेही नीट तपासा. तरच त्यावर काही खर्याखुर्या उपाययोजना होतील.
□ मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणार्या महिलेच्या संपर्कात असलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यामागे पोलीस चौकशीचा ससेमिरा.
■ विचहंटिंग असा इंग्लिशमध्ये शब्दप्रयोग आहे… ते या सरकारचं, खासकरून गृहखात्याचं धोरण असल्याचं दिसतंय. आम्ही असू लाडके असा माज संशयास्पद पद्धतीने जिंकलेल्या निवडणुकीच्या बळावर करणार असतील, तर जनता लाडक्यांचे दोडके कसे बनवते आणि मग त्यांचं कसं भरीत करते, तेही कळेलच. अति तिथे माती, यात काळे-गोरे भेद नाही.
□ वर्मा कॅशकांड इफेक्ट; सर्वोच्च न्यायालयातील ३३ न्यायमूर्ती आपली वैयक्तिक संपत्ती जाहीर करणार.
■ हा रामशास्त्री बाणा झाला. तो अभिनंदनीय आहेच. पण त्यांच्याकडून यापलीकडच्या अपेक्षा आहेत. मुळात न्यायालयात न्यायच मिळावा, जस्टीस फॉर कॅश अशी व्यवस्था चालू नये, यासाठी जी काही भगदाडं बुजवायला लागणार असतील, त्या दिशेने पावलं उचलली जायला हवीत. नाहीतर ही फक्त निरर्थक प्रतीकात्मक कृती ठरेल.
□ अमेरिका भारताकडून वसूल करणार २७ टक्के कर.
■ माय फ्रेंड डोलांड काही ऐकत नाहीत. या कराचे अतिशय गंभीर परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहेतच. त्याच्या हेडलाइन होऊ नयेत म्हणून वक्फ बोर्डाच्या विधेयकाचं चर्हाट लावण्यात आलं होतं आणि हे सगळं सुरू असताना डोलांड यांचे घनिष्ट मित्र चिरकुट देशांकडून सत्कार करून घेत फिरत होते… कोंबडं झाक म्हातारे कितीही… सूर्य उगवणार आहेच.
□ फ्रान्सने अमेरिकेतील गुंतवणूक थांबवली; चीनने अमेरिकेवर ३४ तर कॅनडाने २५ टक्के कर लादला.
■ कॅनडा, फ्रान्स, चीन हे सगळे हिंमतवान देश आहेत. त्यांच्याकडच्या ट्रोल टोळ्या आणि मेंदूगहाण भक्तांना आपला देव ५६ इंची छातीचा आहे, जगातला सगळ्यात भारी नेता आहे, अशा थापा स्वत:लाच मारत राहाव्या लागत नाहीत… ते अमेरिकेसारख्या शक्तिमान देशाच्या अरेलाही कारे करून दाखवतात थेट. व्यावहारिकतेची सबब सांगून शेपूट घालत नाहीत. कुठे तो निक्सनच्या सातव्या आरमाराला न जुमानता पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवणारा भारत आणि कुठे आजचा बुळबुळीत देश!
□ मुंबईकरांचा यंदाचा पावसाळादेखील खड्ड्यात.
■ नुसता खड्ड्यात नाही जाणार, ठिकठिकाणी केलेल्या अनावश्यक काँक्रिटीकरणामुळे मुंबईच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात रूपांतरित होऊ शकते.
□ अर्जुन खोतकरांनी जिथे बोट लावले तिथे माती केली – अंजली दमानिया यांचा जालन्यात आरोप.
■ खोतकरांवर विशेष लोभ कशाला? कोणते नेते आहेत महायुतीचे, ज्यांनी बोट लावलं तिथे सोनं केलं?… स्वत:चं नव्हे, जनतेचं.
□ महायुती सरकारचा १०० दिवसांचा कृती आराखडा फेल; मुदत संपत आली तरी कामे रखडलेलीच.
■ कसला आराखडा नि कसलं काय? यांच्यापाशी काही करण्यासारखं नाही. कसलंही व्हिजन नाही, कसलीही सकारात्मक दृष्टी नाही. इथे आगी लाव, तिथे तेल ओत, तिकडे कुणाची तरी धन कर, दिल्लीश्वरांच्या आदेशांचं पालन कर, महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांध, हेच उद्योग सुरू आहेत १०० दिवस. कृती आराखडा फेल नाही, सरकारच फेल आहे हे.
□ मिंधे गटाच्या कुरापती; कामराच्या शोची तिकीटविक्री थांबवण्यासाठी ‘बुक माय शो’ला पत्र.
■ राजा उंदराशी लढाई लढायला लागला तर हसं उंदराचं होत नाही, राजाचं होतं… अर्थात त्यासाठी राजा ओरिजिनल असावा लागतो, तमाशातल्या एखाद्या एक्स्ट्राला राजाचा पोषाख चढवला म्हणून तो राजा बनत नाही.
□ शेतकर्यांची एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात जिल्हाबंदी.
■ बुक माय शो ला धमक्या देऊन कोल्हापूरच्या कार्यक्रमांवरही बंदी घाला आणि शुंभराजांना टायरचे ट्रक घेऊन धाडा कोल्हापुरात. चांगला धडा शिकवा!
□ व्यापारी मित्रांसाठी भाजपचा वक्फच्या जमिनींवर डोळा.
■ आज ज्यांना आसुरी आनंद होतो आहे त्या भाजपेयी भोंदुत्वाच्या नादी लागलेल्या हिंदूंनी हे लक्षात ठेवावं, हीच वेळ मंदिरांच्या जमिनींवरही येणार आहे… व्यापारी राजा फक्त नफेखोरी जाणतो!