जागतिक स्तरावर ड्रग्ज माफियांपेक्षा मोठे, सुसंघटित आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणारे रॅकेट म्हणजेच ह्यूमन ट्रॅफिकिंगचे (मानवी तस्करी) रॅकेट होय. यात अनेक प्रकार येतात, त्यातला सगळ्यात मोठा क्लेशदायक व संपूर्ण समाजाला कलंक असलेला व्यवसाय म्हणजे ‘वेश्या व्यवसाय’ होय. भारतीय कायद्याप्रमाणे एकटी सज्ञान स्त्री तिच्या इच्छेने वेश्या व्यवसाय करू शकते. परंतु तिच्या या व्यवसायातून मिळणार्या पैशावर दुसरा कोणी उपजीविका करीत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. मायनर (अल्पवयीन) मुलींना तिच्या इच्छेनेही वेश्या व्यवसाय करता येत नाही किंवा कोणालाही तिची इच्छा असली तरीही, तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेता येत नाही.
ज्या वयात पुढे येणार्या संसाराची स्वप्ने पडण्यास सुरुवात होते, अशा वयातच अशा भीषण रॅकेटच्या जाळ्यात सापडून वेश्या व्यवसायासाची वेळ एखाद्या मुलीवर येत असेल तर ती तिच्यासाठी व तिच्या कुटुंबासाठी किती भयंकर असेल, याचा विचार न केलेलाच बरा! अहो, आपल्या घरातील मुलीला किंवा मोठ्या स्त्रीला साधा ‘ब्लँक कॉल’ आला तरी एका क्षणात सगळे घर डिस्टर्ब होते, ती मुलगी तर किती डिस्टर्ब होते आणि इथे तर त्या मुलीचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याने तिच्या मनावर प्रचंड आघात झालेला असतो आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
या ह्युमन ट्रॅफिकर्सच्या जाळ्यात सापडलेली अशीच एक भोळी मुलगी… तिची गोष्ट आज तुम्हाला सांगतो.
गोष्ट २०१०ची आहे, मी पुणे पोलिसांत सामाजिक सुरक्षा विभागाचा प्रमुख म्हणून काम करीत होतो. त्या विभागाच्या अंतर्गत माझ्याकडे जी काही कामे होती, त्यातील एक म्हणजे बेकायदा सुरू असणार्या वेश्या व्यवसायाला आळा घालणे. एक दिवस नेहमीप्रमाणे कार्यालयात बसलो होतो, दुपारची वेळ होती. ज्येष्ठ पत्रकार मित्र सुनील कडुसकर यांचा मला फोन आला. आमचे बोलणे झाल्याप्रमाणे ते माझे कार्यालयात आले. त्यांच्यासोबत दोन तरुण मुले होती.
त्या दोन मुलांचा मित्र संदीप (बदललेले नाव) वेश्यागमनासाठी पुण्याच्या बुधवार पेठेतील एका वेश्यालयात गेला. तेथे गेल्यानंतर त्याने एक तरुण मुलगी निवडली. त्याच्यासोबत आलेल्या मुलीने खोलीचा दरवाजा बंद होताच आसवे गाळण्यास सुरुवात केली. हा मुलगा तिला काही विचारणार तेवढ्यात त्या मुलीने बोलू नका म्हणून त्याला खूण केली. खुणेनेच कोणीतरी ऐकत असेल असे सांगितले आणि आपला डावा हात पुढे केला. हातावर ‘प्लीज रेस्क्यू मी’ असे इंग्रजीत लिहिलेले होते. संदीपचे पाय घट्ट धरून ती ढसाढसा रडू लागली. हे सारे बघितल्यावर त्या मुलाला काही सुचेना. त्याने तिला तिचे नाव विचारले असता तिने कुसुम (बदललेले नाव) असे नाव सांगितले. सुदैवाने तो मुलगा सहृदय होता. बाहेर आल्यानंतर त्याने ही गोष्ट आपल्या दोन मित्रांना सांगितली आणि आपल्याला कुसुमला सोडवायचे आहे, असेही सांगितले. त्याचे मित्र वर्तमानपत्र वाचणारे होते आणि त्यामध्ये प्रसिद्ध होणार्या लेखांमधून त्यांना पत्रकार कडुसकर माहीत होते. म्हणून त्यांनी कडुसकर यांना फोन करून ही माहिती दिली आणि त्या मुलीला सोडवा अशी विनंती केली. कडुसकर यांनी त्या दोघांना बोलावून घेतले, हकीगत विचारली, ती कथा ऐकून त्यांचेही डोके सुन्न झाले. त्यामुळे त्या मुलांना घेऊन ते माझ्या ऑफिसमध्ये आलेले होते.
या माहितीवरून मी ताबडतोब आमची रेडिंग टीम बोलावून घेतली, त्यामध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर, एपीआय विमल बिडवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री मोरे, सौ. भंडलकर, हवालदार सुभाष कांबळे, अविनाश कळसकर इत्यादी कर्मचारी होते. आधी त्या मुलांपैकी एकाला मी डिकॉय कस्टमर (खोटा ग्राहक) म्हणून बुधवार पेठेतील त्या वेश्यालयात, ती मुलगी आहे किंवा कसे याबद्दल खात्री करण्यासाठी, पाठवले. सुदैवाने संदीपने त्या मुलीचा फोटो मोबाइलवर काढला होता. संध्याकाळी जाऊन ती मुले खात्री करून आली की मुलगी त्याच ठिकाणी होती. त्याप्रमाणे ट्रॅप लावण्यात आला आणि त्यांच्यापैकी एका मुलाला आत पाठवले. ठरल्याप्रमाणे वेश्यालयाच्या आजूबाजूला ते ठिकाण दिसेल अशा रीतीने चहाची टपरी, पानटपरी इत्यादी ठिकाणी आमचे लोक कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा रीतीने पांगून उभे राहिले. ती मुलगी तेथे असेल तर मुलाने गॅलरीत येऊन स्वत:चे डोके खाजवावे अशी खूण ठरली. मुलगा बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही. रेडिंग टीम काळजीत पडली.
थोड्या वेळाने तो मुलगा खाली उतरला व त्याने सांगितले की वेश्यागृहाची मालकीण मला विचारत होती की तुला हीच मुलगी कशासाठी हवी आहे, दुसर्या अनेक मुली आहेत. यावरून तिला संशय आला असावा, असे मला वाटते. त्यामुळे त्यावेळी लावलेला सापळा (ट्रॅप) देवकरांनी काढून घेतला आणि ऑफिसला परत आलो. दोन तासांनी कडूसकरांसोबत आलेल्या दुसर्यात मुलाला डिकॉय कस्टमर म्हणून तयार केले, त्याला सूचना दिल्या, काय खूण करायची हे सांगितले. त्याप्रमाणे सापळा लावण्यात आला. तो मुलगा बोगस कस्टमर म्हणून आत गेला, तेव्हा कुसुम तेथे आढळून आली.
या मुलाने तिची मागणी केली आणि तो गॅलरीत आला, त्याने डोके खाजवून इशारा दिला. त्याबरोबर रेडिंग पार्टी, पंचांसह त्या वेश्यागृहामध्ये घुसले, परंतु हा ग्राहक गॅलरीत का गेला याचा संशय ब्रॉथेल मालकिणीला आल्यामुळे तिने रेडिंग पार्टी आत येईपर्यंत कुसुमला तिथून गायब केले. ती कोठे गेली याची चौकशी करता व फ्लॅटची झडती घेता ती मुलगी मिळून आली नाही. अशी कोणी मुलगी नव्हतीच, याने दुसरी मुलगी बघितली असेल म्हणून एक वेगळीच मुलगी पुढे आणली गेली, ही तीच मुलगी आहे असे सांगितले.
परंतु रेडिंग टीममधील स्टाफ अनुभवी असल्याने त्यांना तिथल्या मुली लपवण्याच्या जागा माहीत होत्या, एकेक करून त्या जागा बघायला सुरुवात केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, किचन ओट्याखाली सिलिंडर ठेवण्याच्या मागच्या बाजूला एक प्लायवूडचा सरकता दरवाजा होता. ते बाहेरून कपाट वाटतच नव्हते. त्याला सरकवून बाजूला केले, तेव्हा त्याच्या आतमध्ये साधारणत: दहा ते बारा इंच एवढीच जागा होती आणि त्या जागेमध्ये त्या मुलीला कोंबून बसवलेले होते आणि दरवाजा लावलेला होता. ती जागा इतकी अडचणीची होती की अर्धा तास जरी अजून गेला असता तर कुसुम गुदमरून मेली असती. तिला बाहेर काढण्यात आले. कुसम आमच्या एका महिला कर्मचार्यांच्या गळ्यात पडून प्रचंड रडत होती, हुंदके देत होती. तिला शांत करायलाच आम्हाला जवळजवळ वीस-पंचवीस मिनिटे लागली.
यानंतर या मालकिणीला पकडून क्राईम ब्रँचला आणण्यात आले आणि कुसुमची सुटका करण्यात आली. तिच्याकडून कळलेली हकिगत फार भयंकर होती. कुसुम आसाममध्ये राहणारी होती. तिथे ती अकरावीत शिकत होती, अभ्यासात ती अत्यंत स्कॉलर होती, तिला डॉक्टर व्हायचे होते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घरच्यांचा त्याला विरोध होता. एक दिवस तिची पुण्यात काम करणारी मैत्रीण गावी आली असताना तिला भेटली. तिने डॉक्टर व्हायची गोष्ट तिला सांगितली. तू पळून पुण्याला ये, मी तुला डॉक्टर करते आणि शिकत असताना तुला एखादी छोटी नोकरीही लावून देते म्हणजे तुझ्या शिक्षणाचा खर्च तुलाच करता येईल, असे आश्वासन या मैत्रिणीने दिले, म्हणून कुसुम घरातून पळून पुण्याला आली. नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तिला एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. हॉटेलमध्ये कुसुमला वेश्यालय मालकिणीला पन्नास हजार रुपयांना विकून टाकण्यात आले. तुला होस्टेलमध्ये ठेवायचे आहे, तुझी बॅग वगैरे घेऊन ये, म्हणून वेश्यालय मालकिणीने तिला सांगितले. ती बॅग घेऊन आली असताना तिला दुपारच्या वेळी थेट वेश्यालयात आणण्यात आले. आत जात असताना तेथील वातावरण पाहून कुसुमला शंका आली. तिने तसे त्या मालकिणीला बोलून दाखवत, ‘इथे जागाच मिळत नाही म्हणून अशी जागा नाइलाजाने घेतली आहे’ असे खोटे सांगितले. तिच्या गोड बोलण्यावर कुसुमचा विश्वास बसला. तिला आत नेल्यानंतर, एका खोलीत बंद करण्यात आले.
वेश्यालय मालकिणीने त्यावेळी तिला सांगितले की मी तुला पन्नास हजार रुपयाला विकत घेतलेले आहे आणि इथून पुढे तुला शरीरविक्रय करावा लागेल, त्यावेळी तिने खूप आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, परंतु खोलीच्या बाहेर तिचा आवाज जात नव्हता. तिला मारहाण करण्यात आली चार-पाच दिवस उपाशी ठेवण्यात आले, चक्कर येत होती, तिला चटके वगैरेही देण्यात आले. तिला आसामी सोडून मराठी किंवा हिंदी भाषा येत नव्हती, थोडेफार इंग्रजी येत होते. परंतु इंग्रजीत ती बोलणार कोणाशी? पोलिसांकडे जाण्याचा विचारही करू नकोस, पोलीस आमचेच आहेत. ते तुलाच आत टाकतील आणि तुझ्यावर खोटी केस करतील, तू दहा बारा वर्षांसाठी जेलमध्ये जाशील, असे मालकिणीने तिला वारंवार सांगितले. तिचा नाईलाज झाला आणि ती शरण आली.
सुदैवाने त्या मुलाशी तिची गाठ पडली, तिने हातावर लिहून त्याला दाखवले तोही सहृदय निघाला. त्यामुळे तिची त्या ठिकाणाहून सुखरूप सुटका झाली. पुढे तिला फसवणार्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली. कोर्टात त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. तो मुलगा कुसुमला भेटला नसता तर तिचे आयुष्य कायमस्वरूपी उद्ध्वस्त झाले असते.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)