यशस्वी जैस्वालने मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. क्रिकेटबरोबरच कबड्डीसारख्या अनेक क्रीडा प्रकारांमध्ये हे राज्यबदल अनेक वर्षे होत आहेत. क्रीडा संस्कृती असलेल्या दिग्गज राज्यांना नकोसे खेळाडू छोट्या राज्यांना हवेहवेसे का वाटतात? या उभयपक्षी फायद्याच्या राज्यबदल नीतीचा हा आढावा.
– – –
यशस्वी जैस्वाल हा दमदार तरुण खेळाडू पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळणार आहे, इतकेच नव्हे तर तो त्या संघाचे नेतृत्वही करणार आहे. ही ‘आयपीएल’ सुरू होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतरची घोषणा चर्चेत आली आहे. मुंबई किंवा तत्सम दिग्गज संघांमधील गुणवान खेळाडूंना जेव्हा ११ जणांमध्ये स्थान मिळवण्यात अडचण येते, तेव्हा असे खेळाडू वेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतर करून कारकीर्द वाचवतात. परंतु यशस्वीच्या बाबतीत तसे काहीच नव्हते. नुकत्याच संपलेल्या स्थानिक हंगामात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या क्रिकेटपटूंना संघात स्थान देताना मुंबईला अडचण आली. श्रेयस अय्यर वगळता बाकी सर्व जण झगडतानाच आढळले. मुंबईच्या निवड समिती अध्यक्षांनीही जाहीरपणे नाराजी प्रकट केली होती. पण, इथे तीही शक्यता नव्हती. यशस्वीला मुंबई क्रिकेट असोसिएशनने ना हरकत प्रमाणपत्र बहाल केले आणि त्याचा मार्ग सुकरही केला. पण, प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असते. स्वाभाविकच यशस्वीच्या घटनेमागेही काहीतरी असायलाच हवे, ही शंका ४८ तासांत खरी ठरली. इतक्यात यशस्वी का गेला, याच्या बातम्या बाहेर पडू लागल्या.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग यांच्यातील सामन्यात यशस्वी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. या सामन्यात यशस्वी दक्षिणेचा फलंदाज रवी तेजाला वारंवार डिवचत (स्लेजिंग करत) होता. पंचांनी बर्याचदा ताकीद देऊनही यशस्वीचे डिवचणे सुरूच होते. अखेरीस रहाणेने त्याला मैदानाबाहेर जाण्याची शिक्षा दिली. तेव्हापासून यशस्वी धुमसत होता. मग खराब फटके खेळून बाद होण्याच्या त्याच्या कृत्याबाबतही रहाणे आणि प्रशिक्षक ओमकार साळवी यांनी त्याला अनेकदा धारेवर धरले. वांद्रे येथील शरद पवार क्रिकेट मैदानावर झालेल्या जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात संताप अनावर झालेल्या यशस्वीने रहाणेच्या क्रिकेट साहित्याच्या बॅगवर लाथ मारल्याचे प्रकाशझोतात आले आहे.
यशस्वी हा मुंबईकर नव्हताच, तो उत्तर प्रदेशचा. मुंबईत नशीब आजमावायला येणार्या असंख्य व्यक्तींप्रमाणेच तो एक. वडिलांचे हार्डवेअरचे दुकान. पण, या पठ्ठ्याला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची होती. वयाच्या १०व्या वर्षी यशस्वीने मुंबई गाठली. ज्वाला सिंग या प्रशिक्षकाने त्याला पैलू पाडले. ज्वाला म्हणजेच पृथ्वी शॉचा प्रशिक्षक. यशस्वीने डोक्यावर छप्पर आणि पैसे नसताना आझाद मैदानात तंबूत राहून वेळप्रसंगी पाणीपुरी विकल्याच्याही कथा त्यावेळी चर्चेत आलेल्या. यशस्वी का गेला? यात कुणाचे चुकले? यापेक्षा जो मुंबईचा नव्हता, तो दुसर्या राज्यातला खेळाडू तिसर्या राज्यात गेला. हीच या घटनेची फलश्रुती.
देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या जवळपास ३६पर्यंत जाते. काही राज्ये काही क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवतात. तिथली क्रीडा संस्कृती घडते. काही राज्यांमध्ये ती घडूच शकलेली नाही. त्यामुळे क्रीडा संस्कृती असलेल्या राज्यांमधील ‘नकोशी’ असलेली किंवा अतिरिक्त झालेली गुणवत्ता छोट्या राज्यांमध्ये जाते. यशस्वी ज्या गोव्यात जाणार आहे. त्या गोव्याने दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ९२ पदके कमावत ऐतिहासिक कामगिरी केली होती. पण, ती कमावणारे बहुतांश खेळाडू मूळचे अन्य राज्यांचे होते. त्यामुळे हे यश निर्भेळपणे गोव्याचे नव्हते. काही दिवसांपूर्वी विदर्भाने रणजी करंडक जेतेपदावर नाव कोरले. विदर्भाच्या यशाचा शिल्पकार करुण नायर हा मूळचा कर्नाटकचा. याशिवाय दिल्लीच्या ध्रुव शौरीचाही संघात समावेश होता. विदर्भ हा संघ काही वर्षांपूर्वी खिजगणतीतही नव्हता. या राज्याला आपण रणजी करंडक जिंकू शकू, हा विश्वास मुंबईकर प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी दिला. त्यामुळे हा संघ गेल्या आठ वर्षांत तीन वेळा विजेतेपद पटकावू शकला.
मुंबईकर क्रिकेटपटू अन्य राज्यांच्या आश्रयाला जाणे, हे तसे नवे नाही. मुंबईच्या प्रवीण अमरेने रेल्वे, राजस्थान, बंगालचे प्रतिनिधित्व केले होते. चंद्रकांत पंडित हेसुद्धा आसाम आणि मध्य प्रदेशकडून खेळले होते. अमोल मुझुमदारने आसाम आणि आंध्र प्रदेशचेही प्रतिनिधित्व केले. वसिम जाफरलाही २०१५-१६च्या हंगामात विदर्भाकडे स्थलांतर करावे लागले होते. आपल्या राज्यात स्थान मिळवण्यात अपयश आले किंवा मतभेद झाल्यास अन्य राज्याकडे जावे लागते, हे स्पष्टच आहे. नायरच्या बाबतीतही तेच घडले.
काही वर्षांपूर्वी यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाचा बंगाल क्रिकेट संघटनेशी झालेला वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे साहाने त्रिपुराचा सहारा घेतला. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज आर. विनय कुमार काही वर्षांपूर्वी पुदूचेरी संघाचे नेतृत्व करायला गेला होता. अष्टपैलू अंबाती रायुडूची कारकीर्द खेळाडू आणि पंचांशी वादांमुळे चांगलीच गाजली. रायुडू मूळचा आंध्र प्रदेशचा. मग हैदराबादकडून खेळू लागला. हैदराबाद क्रिकेट संघटनेशी त्याचे मतभेद झाल्यामुळे पुढे त्याने बडोद्याला जाण्याचा निर्धार केला. पण, काही वर्षांतच तो हैदराबादकडे परतलाही. क्रिकेट कारकीर्द अस्ताला जात असल्याची जाणीव झालेला रायुडू २०२३मध्ये वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झाला. तिथेही एका पक्षात तो टिकला नाही. दोन महिन्यांत तो जन सेवा पार्टीमध्ये सहभागी झाला.
यष्टीरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पाला २०१७मध्ये कर्नाटक संघात स्थान मिळवणे कठीण झाले, तेव्हा तो केरळकडून खेळला आणि सातत्याने धावा केल्या. फिरकी गोलंदाज पियुष चावला मूळचा उत्तर प्रदेशचा. पण, त्यालाही आपली देशांतर्गत आणि ‘आयपीएल’ कारकीर्द सावरण्यासाठी गुजरात गाठावे लागले होते. त्याने सलग दोन हंगामांमध्ये गुजरातकडून सर्वाधिक बळी मिळवले होते.
जी गत गोव्याची, तीच ‘अष्टलक्ष्मी’ असे गौरवल्या जाणार्या उत्तर-पूर्वेच्या म्हणजेच नैऋत्येच्या राज्यांची. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांमध्ये बर्याचदा अन्य राज्यांचे खेळाडू सहज स्थलांतर करतात. त्यातला वाईट भाग म्हणजे स्थानिक खेळाडूंच्या जागा कमी होतात. पण, सकारात्मक बाब म्हणजे या कीर्तिवान खेळाडूंच्या सान्निध्यात नवोदित स्थानिक खेळाडू खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सराव, तंदुरुस्ती, आदी अनेक तंत्रं शिकतात. क्रीडात्मक उंची गाठण्याच्या इराद्याने ते दिग्गज राज्यांचे नकोसे खेळाडू मोठ्या मनाने आपलेसे करतात. त्रिपुरात फुटबॉल सामन्यांना प्रचंड गर्दी होते. तिकीट काढून प्रेक्षक ते पाहायलाही जातात. तसेच तीन वर्षांपूर्वी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने नियम करण्याआधीपर्यंत स्थानिक संघांमध्ये नायजेरिया, लायबेरिया, बांगलादेश, आदी देशांचे खेळाडू त्रिपुरातील स्थानिक क्लबकडून खेळायचे.
कबड्डीत काय चालते?
देशांतर्गत क्रिकेटप्रमाणेच कबड्डीतही हा राज्यबदल प्रकर्षाने जाणवतो. संघटक आणि खेळाडू यांच्या राज्यबदलासाठी कबड्डीत गोवा नेहमीच अग्रेसर असते. पण, हे राज्यबदल उत्तरेत तीव्रतेने होतात. दोन वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा देत दिल्लीच्या पवन शेरावतने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोकरी स्वीकारली. त्यानंतर चंडिगढचे प्रतिनिधित्व करीत त्याने या संघाला नावारूपाला आणले. हरयाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या उत्तरेच्या राज्यांमध्ये हीच मिलिभगत पाहायला मिळते. एखाद्या राज्यात संधी न मिळताच, हा खेळाडू लगेच दुसर्या उत्तरेच्या राज्यात दिसतो. सेनादल, रेल्वेमध्येही उत्तरेच्या कबड्डीपटूंचा मोठा भरणा आहे. रेल्वेकडे राष्ट्रीय पातळीवर एकापेक्षा अधिक संघ खेळवण्याची क्षमता आणि गुणवत्ता आहे. त्यामुळे रेल्वे आणि सेनादलाला नकोशा खेळाडूंना उत्तरेची राज्ये पायघड्या पसरतात.
देशातील क्रीडा स्पर्धांमध्ये रेल्वेला राष्ट्रीय संघाचा दर्जा दिला. परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक घोळ घालून ठेवला आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत सेनादलाला प्रवेश असतो, पण रेल्वेला स्थान नसते. व्यावसायिक संघांमध्ये नोकरीसाठी स्थान मिळवणार्या खेळाडूंना आपल्याच राज्याविरुद्ध मैदानी लढाई करावी लागते. रेल्वे, सेनादल, बीएसएनएल यांसारख्या संघांना राष्ट्रीय दर्जा देण्याऐवजी राष्ट्रीय व्यावसायिक क्रीडा स्पर्धा सुरू केल्यास हे खेळाडू आपापल्या क्रीडा प्रकारांमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व करू शकतील. व्यावसायिक संघांना नकोसे खेळाडू आपल्या किंवा अन्य राज्याकडून खेळतात. परंतु आपल्या नोकरीचा संघ प्रतिस्पर्धी म्हणून समोर येताच, त्यांना मैदानाबाहेर ठेवण्याचा नियमही दाखवायला हे संघ कमी करीत नाहीत.
तूर्तास, यशस्वी प्रकरण ताजे असतानाच हे राज्यबदल आणि त्याचे फायदे-तोटे यांची चर्चाही ऐरणीवर आहे. पण, वर्षानुवर्षे भारतात अनेक क्रीडा प्रकारांमध्ये हे घडत आलेले आहे. त्यामुळे ‘पाहिजेत राज्याचे’ ही भूमिपुत्रांना न्याय देणारी मागणी इथे गौण ठरते. आता यशस्वी गोव्याला यश मिळवून देतो, का ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.