मनोज कुमार यांनी आपल्या काळात अनेक कलावंताना ब्रेक दिला जे नंतर मोठे स्टार झाले, मात्र त्यांनी कधी मनोज कुमारचे नाव घेतले नाही. ही बोच त्यांना अखेरपर्यंत राहिली. तसे त्यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीतही सांगितले होते.
– – –
हल्ली देशभक्तीचे सर्वच आयाम बदललले आहेत. सत्ताधीश आता भारतीय नागरिकांसाठी तुम्ही ‘देशभक्त’ आहात की नाही यासाठी काही पूर्वनियम लागू करत आहेत. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्ही अमुक तमुक केले पाहिजे तरच आम्ही प्रमाणपत्र देऊ असा विचित्र सूर आळविण्यात येत आहे. देशभक्तीच्या नावावर सत्तेची पोळी खरपूस भाजली जावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीमाध्यमांनी आता स्वत:चीही काही विचारधारा असतं यावर विश्वास ठेवणे सोडून दिले आहे. आम्ही सांगू तोच खरा विचार, बाकी सर्व झूठ इथपर्यंत विचार लादणे सुरू असताना आज अचानक मनोजकुमार यांच्या निधनाची बातमी आली आणि मन ४०-५० वर्षे मागे गेले.
२०१५ची घटना आहे. भारताची राजधानी दिल्लीत एक भव्य पुरस्कार सोहळा चालू होता. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता. भारतीय चित्रपट जगतातला हा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा होता. स्वर्ण कमळ आणि १० लाख रुपये रकमेच्या या पुरस्काराची घोषणा झाली. बंद गळ्याचा भगवा शर्ट, सूटबूट, टाय आणि कपाळावर भगव्या रंगाची पट्टी अशा वेषात व्हीलचेअरवर बसून आलेल्या या बुजुर्ग कलावंताचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार जेव्हा राष्ट्रपतीने या कलावंतास प्रदान केला तेव्हा त्याने सर्वप्रथम राष्ट्रपतींना चरणस्पर्श केला. भारतीय संस्कृती आणि देशभक्ती नसानसात भिनलेल्या या कलावंताचे राष्ट्रपतींना असे वंदन करणे उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीस वंदन करणे ही झाली भारतीय संस्कृती आणि भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्या व्यक्तीस नमन हे देशप्रेम.
हरीकिशन गिरी गोस्वामी उर्फ मनोज कुमार यांना २०१५चा हा पुरस्कार दिला गेला तेव्हा तो फक्त त्याच्यातील कलावंताचा नाही तर एका सच्च्या देशभक्ताचाही गौरव होता. चित्रपटक्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना फक्त चित्रपटाच्या वेडापायी आणि स्वत:च्या आत्मविश्वासावर या क्षेत्रात आपल्या कर्तृत्त्वाने छाप सोडणे हे नक्कीच सोपे काम नाही. आताच्या पाकिस्तानमधील अॅबोटाबाद येथे जन्मलेला हरीकिशन गोसावीने फाळणीनंतर सर्वप्रथम दिल्लीतील विजयनगरमधील निर्वासित छावणीत आश्रय घेतला. येथील हिंदू कॉलेजमध्ये त्याने शिक्षण पूर्ण कले. फाळणीचे किंचितसे ओरखडे कदाचित त्याच्या बालमनावर उमटले असावेत. कारण निर्माता म्हणून तयार केलेल्या चित्रपटात देशभक्तीची बीजे त्यावेळी अजाणतेपणी रुजली असावीत. इतर मुलांना चित्रपटाचे जसे आकर्षण असते तसेच त्यांनाही होते. त्यावेळी दिलीप कुमारच्या अभिनयाने एका पिढीवर जो प्रभाव टाकला त्यात हरिकिशन पण होता. १९४९मध्ये दिलीप कुमारचा ‘शबनम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील नायकाचे नाव मनोज कुमार असे होते. यातील दिलीप कुमारच्या अभिनयाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चक्क आपले नाव बदलून मनोज कुमार हे नाव ठेवले.
मनोज कुमार आणि धर्मेंद्र या दोघांनीही आपला मुंबईतला संघर्ष एकत्रितच सुरू केला होता. धर्मेंद्र मुंबईत स्ट्रगलर म्हणून आला तेव्हा त्याच्याकडे खूप कमी पैसे होते. या दरम्यान दोघांची भेट झाली. दोघांचीही पंजाबी पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांची लवकर मैत्री झाली. दोघेही एकाच रूममध्ये भाड्याने राहात असत आणि माटुंग्याच्या रेल्वे कॅन्टीनमध्ये जेवण करत असत. दोघेही दिलीप कुमारचे चाहते होते आणि विशेष म्हणजे दोघांनीही नंतर आपल्या आवडत्या दिलीपजींबरोबर कामही केले. धर्मेंद्रने ‘अनोखा मिलन’ या चित्रपटात दिलीप कुमारसोबत काम केले तर मनोज कुमार आणि दिलीप कुमार ‘आदमी’मध्ये एकत्र होते.
मनोज कुमार सतत कुठल्या ना कुठल्या सेटवर चकरा मारत असत… कुठले का होईना काम मिळावे. धर्मेंद्र एकदा मुलाखतीत म्हणाले होते की, ‘मी, मनोज आणि शशी कपूर फिल्मिस्तान स्टुडिओतल्या एकाच बाकड्यावर बसून मुलाखतीची वाट बघत होतो.’ मनोज कुमार यांचेकडे एक अधिकचा प्लस पॉइंट होता, तो म्हणजे ते उत्तम लिखाण करू शकत. पुढे याच गुणाच्या जोरावर ते निर्माते व पटकथाकार बनू शकले. एकदा मनोज कुमार एका सहाय्यक संवादलेखकास भेटावयास गेले. त्यावेळी ते संवादलेखक एका चित्रपटाचा सीन लिहायची धडपड करीत होते. त्यावेळी मनोज कुमार यांनी अगदी सहज सोप्या भाषेत काही पॉइंटस् त्यांना सांगितले. ते त्यांना इतके आवडले की त्यांनी मनोज कुमारला लिखाणाची ऑफरच दिली आणि भविष्यातल्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलावंताला ११ रुपयाचे मानधन त्या संवादलेखकाने दिले.
मात्र धर्मेंद्रची गाडी काही पुढे जात नव्हती. त्यात पैसे संपत आलेले म्हणून मग त्यांनी गावी परत जायचे नक्की केले. तिकिटाची बुकिंग करून जाण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी मनोजच्या नावे एक चिठ्ठी लिहिली की मी परत गावी जात आहे. मनोजला चिठ्ठी मिळताच तो रेल्वे स्टेशनला धावला आणि त्याचे मन वळवले. त्याला मिळालेले ११ रुपये त्याने धर्मेंद्रला दिले आणि आणखी काही दिवस परत न जाण्याचा सल्ला दिला. आजही धरमजी मनोजचा हा मोठेपणा खुल्या दिलाने मान्य करतात. विशेष म्हणजे काही दिवसातच धर्मेंद्र यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर आली.
मनोज कुमारचा पहिला चित्रपट होता फॅशन (१९५७). पण त्यात भूमिका खूपच नगण्य होती. १९६०मध्ये ‘कांच की गुडिया’ या चित्रपटात पहिल्यांदा नायकाची भूमिका मिळाली, पण चित्रपट चालला नाही. ओळख मिळाली ती १९६२मधील विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रस्ता’ या चित्रपटाद्वारे. यात माला सिन्हाबरोबर त्यांची जोडी चांगलीच हिट झाली. शिवाय यातील गाण्यांमुळेही हा चित्रपट खूप चालला. पुढे १९६५मध्ये हीच जोडी घेऊन विजय भट्ट यांनी ‘हिमालय की गोद में’ तयार केला जो सुपरहिट झाला. या सर्व चित्रपटातील त्यांच्या भूमिका रोमँटिक नायकाच्या होत्या. त्यांच्यावर दिलीप कुमारच्या अभिनयाचा खूपच प्रभाव होता, त्यामुळे रोमँटिक भूमिकेत ते स्पष्ट दिसून येई. हाताचे एक बोट ओठावर ठेवून बोलण्याची ढब असो की संवादातील चढउतार… दिलीप कुमारची छाप स्पष्ट दिसून येते.
१९६५मध्ये क्रांतीवीर शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारीत ‘शहीद’ हा चित्रपट आला. मनोज कुमार यांनी यात भगतसिंगाची सुंदर भूमिका केली. यातील क्रांतिकारी गाणी शहीद रामप्रसाद बिस्मिल व प्रेम धवन यांनी लिहिली होती. संगीतकार प्रेम धवन होते. सर्वच गाणी आजही स्फुल्लिंग चेतवणारी आहेत. या चित्रपटात कामिनी कौशल या अभिनेत्रीने भगतसिंगच्या आईची भूमिका केली होती आणि नंतर मनोज कुमारच्या सर्वच चित्रपटांत कामिनी कौशल त्यांची आई बनली. कधीकाळी कामिनी कौशल दिलीपकुमारची नायिका होती, म्हणूनही कदाचित मनोज कुमारच्या मनात या अभिनेत्रीबद्दल आदर असावा.
मनोज कुमार हे उच्च कोटीचे अभिनेते म्हणून भलेही ओळखला जात नसतील, पण एक पटकथाकार आणि दिग्दर्शक म्हणून मात्र नक्कीच यशस्वी झाले. तसेही मनातून त्यांना दिग्दर्शकच व्हायचे होते. त्यामुळे सिनेतंत्राचा त्यांनी उत्तम अभ्यास केला. चित्रपटाचा आत्मा पटकथेत असतो हे त्यांनी व्यवस्थित ओळखलेले होते आणि स्वत: चांगले लेखक असल्यामुळे चित्रपटकथेवर त्यांची चांगलीच पकड होती. ‘वह कौन थी’, ‘अनिता’, ‘गुमनाम’, ‘साजन’, ‘नील कमल’, ‘सावन की घटा’ इत्यादी चित्रपटातला वेगळा नायक त्यांनी रंगवला.
‘शहीद’मधील त्यांचा भगतसिंग तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनाही भावला होता. त्यावेळी त्यांचा नारा होता ‘जय जवान जय किसान.’ मनोज कुमार यांनी या विषयावर एखादा चित्रपट तयार करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे दिल्लीहून मुंबईला परत येईपर्यंत मनोज कुमार यांनी चित्रपटकथेचा पूर्ण आराखडाही तयार केला. १९६७मध्ये या कथेवर त्यांनी ‘उपकार’ तयार केला. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला. फिल्मफेअरचे सहा पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. याच चित्रपटात मनोज कुमारने सर्व प्रथम प्राणला खलनायकीतून बाहेर काढले. यातील ‘मलंग चाचा’ आणि त्याच्या तोंडी असलेले ‘कस्मे वादे प्यार वफा सब…’ हे गाणे दोन्ही अजरामर झाले. प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ‘आजही मेरे देश की धरती’… हमखास लागतेच. या चित्रपटानंतर मनोज कुमार भारत कुमार म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्याने स्वत: निर्मित व दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात भारतीय संस्कृतीचे दर्शन हमखास बघायला मिळतं. ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा मकान’, ‘क्रांती’, ‘जयहिंद’ या चित्रपटांत मनोज कुमार भारत कुमारच्याच भूमिकेत होते. ‘रोटी, कपडा और मकान’चा विषय देखील त्या काळातला संवेदनशील विषय होता. यातील ‘मै ना भुलूगाँ’ व ‘आयी महंगाई’ या गाण्यामुळे हा चित्रपट चर्चेत राहिला. मला स्वत:ला मात्र त्यांचा सर्वाधिक आवडलेला चित्रपट म्हणजे ‘शोर’. यात ते निर्माता, दिग्दर्शक, कथाकार, संकलन व अभिनेता अशा पंचरंगी भूमिकेत होते. यात कथा खूपच सशक्त होती आणि ती दिग्दर्शक म्हणून खूप सुंदर हाताळली देखील होती. एका अपघातात मुलाचा आवाज जातो आणि एक पिता त्याचे बोल कानावर पडावे म्हणून तळमळत राहतो. जेव्हा मुलाचा आवाज परत येतो नेमक्या त्याच वेळी पिता बहिरा होतो… अत्यंत संवेदनशील कथा मनोज कुमारने लिहिली आणि तितक्याच ताकदीने दिग्दर्शित केली. यातील गाण्यांनेही चित्रपटात गहिरे रंग भरले. लता-मुकेशचे ‘एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है…’ संतोष आनंद यांनी लिहलेल्या या गाण्याला लक्ष्मी-प्यारे यांनी अप्रतिम चाल लावली आहे. गाण्याच्या सुरुवातीचे व्हायोलिनचे सूर आजही मन गडद करतात.
१९८१मध्ये दिलीप कुमार या आपल्या दैवताला घेऊन त्यांनी ‘क्रांती’ तयार केला. हा चित्रपट मला बराच भडक वाटला. मात्र यातील ‘जिदंगी की ना टुटे लडी…’ हे गाणे भाव खाऊन गेले. १९६५चा शहीद ते ८१चा क्रांती यात १६ वर्षाचे अंतर. नवीन पिढीची रुची बदललेली. त्यामुळे देशभक्तीचा जज्बा प्रेक्षकांत कमी झालेला. पण चित्रपट चांगला चालला. मला वाटतं, हा क्षण मनोज कुमारसाठी सर्वोच्च आनंदाचा असावा. ‘शबनम’ चित्रपटातील दिलीपकुमारचे मनोज हे नाव धारण करणारा मनोज कुमार स्वत: चित्रपट निर्मित करून दिलीपकुमारला दिग्दर्शित करतो, एक आवर्तन पूर्ण होते; आणि काय योगायोग पाहा, यानंतर मनोज कुमारच्या चित्रपटाला ओहोटी लागायला सुरूवात झाली. खरे तर त्यांनी त्यांच्या काळात अनेक कलावंताना ब्रेक दिला जे नंतर मोठे स्टार झाले, मात्र त्यांनी कधी मनोज कुमारचे नाव घेतले नाही. ही बोच मात्र अखेरपर्यंत राहिली, तसे त्यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीत पण सांगितले होते.
उत्तरकाळात ते शिरडीच्या साईबाबाचे भक्त झाले. त्यांच्यावर त्यांनी चित्रपटही बनवला जो बर्यापैकी चालला देखील. अनेक नामवंत व्यक्तीचा श्रद्धा वा भक्ती हा जरी व्यक्तिगत पातळीवरील विषय असला तरी त्यांच्या या वर्तनाचा सर्वसामान्य जनतेवर प्रभाव पडतोच. चित्रपटातील अभिनेता आणि वैयक्तिक आयुष्यातील माणूस यांच्यात अनेकदा ताळमेळ बसेलच असे नाही. चित्रपटासाठी लिहिलेले विचार हे त्या अभिनेता/अभिनेत्रीने प्रत्यक्ष आचरणातही आणावेत असे कितीही वाटले तरी ते शक्य होईलच असे नाही. मनोज कुमार यांनी चित्रपटांतून देशभक्तीचा विचार काही प्रमाणात रुजवला हे मात्र नाकारून चालणार नाही. देशभक्तीचा विचार रुजवताना साईबाबांच्या चमत्कारावरही त्यांचा विश्वास बसावा हे मात्र माझ्यासारख्याला पचवता येत नाही.
१९८१मध्ये त्यांनी आपला मुलगा कुणाल गोस्वामी याला ‘क्रांती’ या चित्रपटाद्वारे लाँच केले, पण आठ-दहा चित्रपटानंतर त्याची कारकीर्द बहरू शकली नाही. माझी एक आठवण कुणाल गोस्वामीच्या ‘दो गुलाब’ या चित्रपटाविषयी आहे. महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील ‘सेल बेस्ट’ नावाच्या जाहिरात कंपनीत मी काम करत होतो, तिथे त्याच्या या चित्रपटाचे पोस्टर्स, बॅनर्स व इतर प्रसिद्धी कामे होत, कुणाल नियमित येत असे. गप्पाही होत. आज मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी आली आणि सर्व काही डोळ्यांसमोर तरळले.
मनोज कुमार बराच काळ आजारपणामुळे विस्मृतीतच गेले होते. चित्रपटीसृष्टीची मोठी मौज आहे, कोणत्याही अभिनेता/ अभिनेत्री/ संगीतकार/ कवी यांच्या बहराच्या काळातील प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली जाते. त्यांना डोक्यावर विराजमान करण्याची चढाओढ सुरू असते, मात्र बहर ओसरू लागताच त्यांना अलगदपणे विस्मृतीच्या काळोखात ढकलून दिले जाते. हा काळ या कलावंतासाठी अत्यंत वेदनादायी असतो. भूतकाळातील रम्य आठवणीशिवाय त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरलेले नसते. म्हणूनच कदाचित जे कलावंत रुपेरी पडद्याबाहेर आपली नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडू शकत नाहीत, ते त्यांच्या उत्तरकाळात विजनवासात जात असावेत. गंमत म्हणजे त्यांच्या निधनानंतर मग त्यांनी किती संपत्ती मागे ठेवली यावर चर्चा करण्यात वाहिन्या मग्न असतात. हे सर्व किती विसंगत आहे…
असो… आपण मात्र आपल्या पडद्यावरच्या लाडक्या भारत कुमारला आठवू या.