एका मुस्लीम गृहिणी शिवसेनेत येते… नेटाने लोकसंपर्क वाढवते… आणि थेट गावातल्या नगर परिषदेतले सरपंच पद मिळवते. हा एक चमत्कारच झाला आहे. नाझनीन के. पटेल असे या मुस्लीम महिलेचे नाव असून रायगड जिल्ह्यातील आपटा या गावी शिवसेनेची सरपंच म्हणून निवडून येऊन त्यांनी इतिहास घडवला आहे. गेल्या सहा दशकांमध्ये एक मुस्लीम महिला सरपंचपदावर विराजमान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. हे सरपंच पद नाझनीन यांनी भगवा फेटा परिधान करून स्वीकारले. विशेष म्हणजे यावेळी नाझनीन यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या असंख्य मुस्लीम तरूणींनी भगवा हिजाब घातला होता. एकीकडे हिजाब प्रश्नावरून अनेक राज्यांमध्ये गदारोळ उठलेला असतानाच नाझनीन यांनी घातलेला भगवा फेटा आणि त्यांच्या अभिनंदनासाठी आलेल्या महिलांनी घातलेला भगवा हिजाब हा कौतुकाचा विषय ठरला आहे.
रायगड जिल्ह्यातील आपटा गावात अकरा सदस्यांची पंचायत आहे. २०२१ वर्षात गावात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले तर उर्वरित जागांवर महाविकास आघाडीचे सदस्य विराजमान झाले. यंदा सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे हे पद नगरसेविका नाझनीन पटेल यांना मिळाले. महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांनुसार आपण केवळ गावाच्या विकासावरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे नाझनीन यांनी पद स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या गावात १० हजार लोकसंख्या असून यात वेगवेगळ्या जातीधर्मातील लोक राहतात. यात मराठा, कोळी, ब्राह्मण, मुस्लीम वगैरे सर्वच लोकांचा समावेश आहे.
आपटा गावात १४ वाड्या आहेत. या सर्वच वाड्यांमध्ये अनेक सोयी-सुविधा अजूनही हव्याच आहेत. गावात मॅटर्निटी हॉस्पिटल नाही, आंगणवाडी गट विकसित होण्याची गरज आहे, अशा आणखीही काही मागण्या गावकर्यांच्या आहेत. त्या पूर्ण करण्यावर आपला पहिला भर असेल असे नाझनीन म्हणाल्या. आपटा हे गाव पाताळगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. या गावात शिवसेनेचे प्रभुत्व आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीच्या धर्तीवर यंदाच्या निवडणुकीत या गावातही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी केली होती. यामुळेच या गावातील निवडणुकीवर राज्यभरातील लोकांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले असून राज्यातल्या आगामी निवडणुकांची ती नांदी ठरेल, असा विश्वास नाझनीन यांचे पती खलील पटेल यांनी व्यक्त केला.