सहा फेब्रुवारीच्या सकाळीच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची संपूर्ण भारतवर्षाला शोकसागरात लोटणारी बातमी आली आणि सगळा देश जणू सुना सुना झाला… रविवारचे नैमित्तिक व्यवहार सुरूच होते… पण त्यांच्यात जान नव्हती, उदासीचे सावट होते, मरगळ होती… सगळे सूर मुके झाले होते… क्वचित एखादी लकेर कुठून उमटत होती, तीही लतादीदींच्याच आवाजातली.
खरेतर लतादीदींचे जाणे काही आकस्मिक नव्हते… त्या वयाच्या ९३व्या वर्षी गेल्या… त्यांना या वयात कोरोनाची लागण झाल्याचे कळले तेव्हाच त्यांच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती… त्यावर मात करून त्या काही काळापूर्वी घरी परतल्या तेव्हा सगळ्या देशाचा जीव भांड्यात पडला होता… पण, कोरोना आणि न्युमोनिया यांचा दुहेरी हल्ला त्यांची जराजर्जर कुडी झेलू शकली नाही… या वयात कोणतेही निमित्त पुरते… अत्यंत प्रदीर्घ आणि कृतार्थ आयुष्य जगून त्या अनंतात विलीन झाल्या… तरीही त्यांचे जाणे कोट्यवधी काळजांवर घाव घालून गेले ते का?… दीदी अजरामर आहेत, त्या तशा असल्या पाहिजेत, अशी सगळ्या भारतवर्षाची समजूत का झाली होती?
त्या एक सदेह भूतलावर आलेला, वावरून गेलेला चालता बोलता चमत्कार होत्या.
साधी त्यांची गायनाची कारकीर्द पाहा… ती किती प्रदीर्घ होती, याचा अंदाज घ्यायचा तर आज ७३ वर्षांच्या असलेल्या कोणाही माणसाला नजरेसमोर आणा. हे आजोबा किंवा आजी ज्या वर्षी जन्मले त्या १९४९ साली लतादीदींनी ‘बरसात’ या सिनेमातून हिंदी सिनेसंगीतावर राज्य प्रस्थापित केलं होतं… या एका सिनेमातल्या गाण्यांनी आधीच्या सगळ्या मलिका-ए-तरन्नुमांचं राज्य खालसा झालं आणि हिंदी सिनेमात नायिकेचा एकच एक आवाज उरला… त्यांनी पहिलं गाणं तर त्याच्याही सात वर्षं आधी म्हणजे १९४२ साली गायलं होतं… म्हणजे आज ८० वर्षांच्या असलेल्या माणसाचा जन्म झाला, तेव्हा त्यांचं पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झालं होतं… तिथपासून ८० वर्षं त्या गात होत्या आणि त्यातली किमान ५० वर्षं नायिकांसाठी गात होत्या… ही कल्पना करतानाही धाप लागते आपल्याला… २००६नंतर त्यांनी हिंदी सिनेमासाठी गाणं थांबवलं. नव्या सहस्रकात ‘ओ पालनहारे’ (लगान) ‘लुका छुपी’ (रंग दे बसंती) अशी काही मोजकी गाणी त्यांनी गायली. त्यानंतरही त्या मराठीत, हिंदीत भक्तिसंगीत, भावसंगीत गात राहिल्या. ‘आता विसाव्याचे क्षण’ ही त्यांची भैरवीच होती. त्यांच्या यशवंत वाटचालीच्या ७५ वर्षांच्या सुरुवातीला जे बाल-तरूण होते त्यांच्यापासून ते त्या ७५ वर्षांच्या अखेरीला जे बाल-तरूण होते त्यांच्यापर्यंत म्हणजे किमान १०० वर्षांतल्या भारतातल्या सगळ्या संगीतरसिकांवर या एकाच आवाजाची मोहिनी होती… हा जगात कुठेही घडला नसेल असा चमत्कार होता आणि तो एकमेवाद्वितीय राहणार आहे… कारण, जगात विश्वविख्यात संगीतसर्जक, गायक-गायिका खूप झाले, खूप होतील; पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी ३३ कोटी लोकांचा असलेला देश ७५ वर्षांत सव्वाशे कोटी लोकांचा होईपर्यंतच्या संपूर्ण काळात या महाप्रचंड देशातल्या, अठरापगड जातीधर्मभाषांमधल्या सगळ्या माणसांना जोडून घेणारा आवाज लतादीदींचा होता… हे यश अजस्त्र होतं… त्यांच्या समवयस्कांपासून पंतवंडांच्या वयाच्या मुलांपर्यंत सगळ्यांच्या त्या दीदी होत्या, अख्ख्या देशाच्या लाडक्या दीदी होत्या.
पु. ल. देशपांडे म्हणाले होते, आकाशात चंद्र, सूर्य आणि लताचा स्वर आहे… हे एरवी कशाच्याही बाबतीत अतिशयोक्तीचे ठरले असते, पण लता मंगेशकरांच्या स्वराबद्दल ही अतिशयोक्ती ठरत नाही. लतादीदींच्या निधनाची बातमी कळल्यानंतर एका तरूण श्रोत्याने सहजगत्या उद्गार काढले, ‘आपल्या देशात दिवसभरात आपल्या इच्छेने वा अनिच्छेने लतादीदींचे एक तरी गाणे कानावर पडले नाही, असा कोणाचाही एकही दिवस असणार नाही…’ किती खरे आहे हे!… दिवसाच्या कोणत्याही प्रहरात पृथ्वीतलावरच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्यात लताचे गाणे सुरू असतेच… त्यांनी गाणे थांबवल्यानंतर जवळपास दशक उलटून गेल्यानंतरची ही परिस्थिती आहे… तिच्यात आणखी १०० वर्षे तरी फरक पडेल असे वाटत नाही.
हा चमत्कार कशामुळे झाला?
हिंदी सिनेमात लतादीदींबरोबर अनेक पार्श्वगायक झाले, पार्श्वगायिका झाल्या, प्रत्येकाची लोकप्रियता मोठी होती… पण अढळपदाचा मान फक्त लतादीदींचाच होता… हे का झालं?
कारण, लतादीदींचा भावोत्कट स्वराभिनय बेजोड होता… खरेतर पार्श्वगायकांचे काम सिनेसंगीतात दुय्यम मानायला हवे. प्रतिभावान लेखकाची सिच्युएशन असते, प्रतिभावान गीतकार तिच्यावर चपखल शब्द लिहितो, प्रतिभावान संगीतकार त्याची तर्ज बांधतो; ती आत्मसात करून गाणे गायचे, शब्द लोकांपर्यंत पोहोचवायचे, एवढंच पार्श्वगायकाचं काम. सृजनशीलता आमची आणि लोकप्रियता पार्श्वगायकांना कशी मिळते, असं आजही अनेक गीतकार-संगीतकार कुरकुरत असतात… पण, पार्श्वगायन एवढं सोपं असतं तर प्रत्येक भावगीत गायक उत्तम पार्श्वगायक बनला असता… प्रत्येक बेतास बात गायिका लता मंगेशकर बनली असती! असं झालं नाही, कारण पार्श्वगायन हा स्वराभिनय होता… सिनेमातला प्रसंग काय आणि नायक-नायिका कोण आहेत, त्यांची बोलण्याची ढब काय आहे, याचा विचार करून त्या गाण्यातून्ा अभिनय करण्याची कठीण कामगिरी पार्श्वगायकांना पार पाडावी लागायची. पडद्यावरच्या अभिनेत्यांच्या प्रतिमा आणि पार्श्वगायकाची प्रतिभा यांचा संगम होणे आवश्यक असायचे… त्या हिशोबाने पाहिले तर लतादीदी देशातल्या सर्वात मोठ्या सुपरस्टार होत्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होत्या… त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली त्या अनेक अभिनेत्रींनी हे नमूद केलेलं आहे की गाण्यातल्या अभिव्यक्तीचं सगळं काम दीदींनी आधीच केलेलं असायचं, आम्ही फक्त त्या अभिनयाशी कायिक-वाचिक अभिनयाने बरोबरी करण्याचा प्रयत्न करायचो… फक्त ‘प्रयत्न’… नूतन, मीना कुमारी, नर्गिस, मधुबाला, वहिदा रहमान, रेखा आणि अलीकडच्या काळातल्या माधुरी दीक्षितसारख्या मोजक्या अभिनेत्रींनाच तो उत्तम साधला होता, हे लक्षात घेतलं तर दीदी केवढ्या प्रतिभावान स्वराभिनय सम्राज्ञी होत्या हे लक्षात येईल.
त्यांनी स्वर दिलेल्या प्रत्येक अभिनेत्रीच्या अभिनयाला काही ना काही मर्यादा होती, कोणी गंभीर प्रकृतीच्या भूमिकांमध्ये रमायची, कोणी अवखळ, कोणी उच्छृंखल तर कोणी सात्त्विक व्यक्तिरेखांमध्येच शोभायची. पण त्या सगळ्याजणींच्या त्या सगळ्या भावच्छटांना जिवंत करणारा स्वर एकच होता… लता मंगेशकर. लोरी असो, प्रेमगीत असो, नृत्यगीत असो की भजन असो- आवाज एकच… लता मंगेशकर… तोही किती पिढ्यांना… नूतन, तनुजापासून काजोलपर्यंत सगळ्यांना एकच आवाज. त्या १८ वर्षांच्या असताना ज्या नायिका होत्या तिथपासून त्या ८१ वर्षांच्या असताना ज्या नायिका होत्या तिथपर्यंत सगळ्यांना त्यांचाच आवाज… एवढी दशके एवढ्या पिढ्यांचा एकच आवाज, अख्ख्या भारतवर्षाचा एकच आवाज… पहाटेच्या भूपाळीपासून रात्रीच्या लोरीपर्यंत एकच आवाज… आईचं वात्सल्य, बहिणीचं प्रेम, प्रेयसीची प्रणयातुरता, पत्नीची समंजस साथ, मदनिकेचे आवाहन, मीरेची आर्तता, ज्ञानेश्वरांचे पसायदान, श्रीगणेशाची वंदना, बहिणाईची शहाणीव, किशोरीची अल्लडता, पुरंध्रीचा ठेहराव, देशभक्तीची ओजस्विता आणि शहिदांचं स्मरण ठेवण्याचं भावव्याकुळ आर्जव… सगळं सगळं फक्त एकाच आवाजात… असा चमत्कार पुन्हा कधीही होणे नाही…
हा चमत्कार भारतीय सिनेमाकलेच्या याच टप्प्यावर होणे शक्य होते… त्याच टप्प्यावर तो झाला… कारण त्यांच्या तारुण्यात सुरू झालेलं पार्श्वगायनाचं युगच त्यांच्याबरोबर संपत आलं… लतादीदींनी सिनेसंगीतातून एक्झिट घेण्याच्या सुमारास पार्श्वगायन थांबून गाणी पार्श्वभूमीला वाजू लागली… इथून पुढे पडद्यावर गाणी गाणारे नायक अभावानेच दिसतील, त्यांचा ‘आवाज’ बनणारे गायकही दुर्मीळ असतील… पडद्यावरच्या व्यक्तिरेखांमध्ये गुंगून जाणारा, त्यांच्या कचकडी रंगबिरंगी जगण्यात आपलं वास्तवातलं रखरखीत जगणं मिसळून टाकणारा, त्यांतल्या सुरेल गाण्यांनी आपल्या बेसूर आणि भेसूर आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ पाहणारा, नायकनायिकांच्या जागी स्वत:ला कल्पून ती गाणी मनोमन गाणारा प्रेक्षकही आता संपणार आहे… जगण्यातल्या प्रत्येक टप्प्यावर कोणतं ना कोणतं गाणं ज्याच्या मनाच्या तबकडीवर आपोआप वाजू लागतं, असा सिनेमावेडा प्रेक्षक हळुहळू नाहीसा होणार आहे… पण ती तबकडी वाजतच राहणार आहे… पुढच्याही पिढ्यांच्या मनात… तिच्यावर वाजणारं गीत लतादीदींच्या आवाजातलं असणार आहे…
काळ कोणासाठी थांबत नसतो… रामकृष्णही आले गेले, त्यांविण जग का ओसचि पडले, असे म्हणतात…. मृत्यू हेच या जगातलं शाश्वत सत्य आहे. जो जन्मला तो कधी ना कधी मरणार आहेच… एरवी एखाद्याचे प्राण हरण केल्यावर मृत्यू विकट हास्य वगैरे करत असेल, पण सहा फेब्रुवारीला एका जराजर्जर कुडीला संपवल्यानंतर तो फार विकल, हताश, निराश आणि केविलवाणा झाला असणार… कारण, त्याने जे संपवले ते मुळातच पार्थिव होते, कधी ना कधी पिकल्या पानाप्रमाणे गळून पडणारच होते… तसे ते पडले… पण त्या पार्थिवातून उमटलेले अपार्थिव स्वर चिरंतन आहेत… त्यांना संपवण्याची ताकद मृत्यूमध्येही नाही… त्या कृतार्थ कुडीतले प्राण हरून निघाला असताना त्याला कोट्यवधी हुंदक्यांबरोबरच त्या विकल, विद्ध मनांना आधार देणारे लतादीदींचे स्वरही ऐकू आले असणार… तिथे तो हताश झाला असणार… हे मृत्यो, तू हरलास… लता जिंकली… ती कायम जिंकतच आली आहे… आम्हा १२५ कोटी चाहत्यांच्या श्वासोच्छ्वासातून जी कायम जिवंत राहणार आहे… तिला तू आमच्या पश्चातही संपवू शकणार नाहीस… ती अजिंक्य आहे… अजरामर आहे…
…भविष्यात आकाशात सूर्य, चंद्र असतील किंवा नसतीलही… या विश्वाच्या अफाट पसार्यात, सूक्ष्मातिसूक्ष्म कणांतही लताचा अमृतस्वर कायम निनादत राहील… विश्वाचे आर्त प्रकाशवत राहील…