एखाद्या थोर व्यक्तीच्या निधनानंतर तिच्यावर मृत्युलेख लिहिणे हे मोठे कौशल्याचे काम मानले जाते. शब्दांच्या काही फटकार्यांतून त्या व्यक्तीच्या कारकीर्दीचे, गुणांचे दर्शन घडवायचे, तिची महत्ता वाचकांपर्यंत पोहोचवायची आणि तिच्या जाण्याने आपले काय नुकसान झाले आहे, याचीही विषण्ण करणारी जाणीव करून द्यायची, हे सगळे त्या लेखात साधावे लागते, तेही डेडलाइन सांभाळून, काही तासांत… अशा व्यक्तीच्या निधनानंतर त्यावर व्यंगचित्र रेखाटणे हे तर त्याहून अवघड काम आहे… कारण तिथे पोकळ शब्दांचाही सहारा नाही, जे काही दाखवायचे ते रेषांच्या फटकार्यांमधून, फाफटपसारा न लावता… अशावेळी थोर व्यंगचित्रकाराचा कुंचला किती प्रभावीपणे समग्रपणे त्या व्यक्तीची महत्ता व्यक्त करतो ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून उतरलेल्या या व्यंगचित्रातून समजून जाते… मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांच्या अकाली निधनानंतरचा शोक प्रकट करताना त्यांनी धर्मांधतेच्या चंद्रावरून सत्यशोधनाचा तारा निखळल्याची कल्पना किती सहजतेने मांडली आहे… फक्त अंधार, चंद्र आणि निखळलेला तारा… हमीद दलवाईंच्या सगळ्या जीवनाचं दर्शन एवढ्यातून किती प्रभावीपणे घडते…