□ भारतीय जनता पक्षाने अंधेरीची निवडणूक लढवली असती, तर ऋतुजा लटके यांचा पराभव निश्चित होता : आशिष शेलार.
■ ‘नोटा’च्या नावाने उभा केलेला खोटा उमेदवार इतक्या भरघोस मतांनी पडलाच की! अधिकृत उमेदवार उभा राहिला असता तर केवढा मोठा गोटा हाणला असता मतदारांनी डोसक्यात तुमच्या!
□ ट्विटरवरचे अकाऊंट अधिकृत आहे हे सांगणार्या ब्लू टिकसाठी यापुढे मोजावे लागणार आठ डॉलर.
■ अकाऊंट भले अधिकृत असेल, पण माणूस खोटा असतो, त्याचं काय!
□ इतिहासाची मोडतोड झाल्यास गाठ माझ्याशी : छत्रपती संभाजीराजे यांचा ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांना इशारा.
■ सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड होऊ नये हे खरंच. पण, ही मोडतोड आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार वंशाच्या पुण्याईवर जगणार्या वारसांना नाही, ते काम इतिहासाच्या अभ्यासकांचं.
□ मनात आणलं असतं तर जाहिरातींमध्ये झळकलो असतो, पण आम्ही जनतेच्या सेवेवर लक्ष केंद्रित केलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी.
■ अहो, स्तनपान सप्ताहाच्या जाहिरातीतही माता-शिशु सोडून तुमचाच फोटो; जगाच्या पाठीवर लस घेणार्याचा फोटो नसलेला आणि पंतप्रधानांचा फोटो (कसलाच संबंध नसताना) झळकवणारं प्रमाणपत्र फक्त भारत देशाचं- ही जाहिरातबाजी नाही? आता काय लोकांच्या कपाळावर फोटो छापायचे होते का तुमचे?
□ ट्विटरमधून ५० टक्के कर्मचार्यांची हकालपट्टी, भारतीय वंशाचे प्रमुख पराग अग्रवाल यांनाही हटवले.
■ ट्विटरवर काय चर्चेत आहे, यावर जगात काय घडते आहे, त्याचा अंदाज आधी येत होता… आता ट्विटरवरही ट्विटरच चर्चेत आहे… मालक आहे का ‘मस्क’री!
□ शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार झळकणार.
■ या हिंदी नटांचं दुकान तिकडे बंद पडत आलं की त्यांना मराठीची आठवण येते आणि इकडचे बावळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात!
□ गुजरातमध्ये काँग्रेसला पाचपेक्षा कमी जागा मिळतील : अरविंद केजरीवाल यांनी एका चॅनेलला लिहून दिले भाकीत.
■ लहान तोंडी किती मोठा घास घ्याल केजरीवाल! भाजपच्या सलग सत्तेच्या काळातही काँग्रेसची मतं ३५-४० टक्के होती कायम! ती सगळी तुमच्या पारड्यात पडणार आहेत का?
□ ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताप्रमाणेच मान आणि आदर मिळावा : भाजपची जनहित याचिका.
■ तिकडे वंदे भारत ट्रेनला रोज गायीगुरांच्या धडकेने अपघात होत आहेत, त्याकडे लक्ष द्या आधी. बाकी काही जमलं नाही की गोमाता, राष्ट्रगीत, वंदे मातरम हे उद्योग सुचतात तुम्हाला.
□ मिंधे सरकारने मोदींच्या शैलीत ७५ हजार नोकर्यांची नियुक्तीपत्रे वाटली.
■ देखावे करायला कुठे काय लागतंय? प्रत्यक्षात नोकरी आहे का, ते बघायला कोण गेलंय? प्रशासनिक कामकाजातही श्रेय ओरपत फिरण्याचे संस्कार आहेत परिवाराचे.
□ कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
■ ते भारतीय संस्कृतीचे स्वघोषित ठेकेदार काय म्हणतायत एका महिलेचा असा अपमान झाल्यानंतर? की महिला कोणत्या पक्षाची आहे, ते पाहून निषेध करतात?
□ राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप
■ इतके दिवस भांग पिऊन झोपला होतात काय लोणीकर? कोरोना काळात महाराष्ट्राच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. तुमचं सरकार नव्हतं म्हणून गुजरातेत धडधडलेल्या चिता आणि गंगेत वाहिलेली प्रेतं हे भागधेय महाराष्ट्राच्या वाट्याला आलं नाही.
□ आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने शिवडी कोर्टाची विचारणा
■ आरोपी महाराष्ट्रात आहे, पण आरोपीचे साथीदार आणि फूस लावणारे सत्ताधीश आहेत. कारवाई होणार कशी?
□ चीनची अंतराळ स्थानकावर माकडे पाठवण्याची योजना.
■ भारतातली चालतील काय? हल्ली सगळीकडे बोकाळली आहेत.
□ जयंत पाटील यांनी सरकार पाडून दाखवावं : चंद्रकातदादा पाटील यांचं आव्हान
■ त्यापेक्षा तुम्ही हे खोके सरकार टिकवून दाखवा दादा.