कर्नाटक सरकारने शाळेतील वर्गांत मुसलमान विद्यार्थिनीनी हिजाब परिधान करण्यावर बंदी घातल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण ढवळून निघाले असतानाच प्रत्येकाचे श्रद्धास्थान त्याला आलेल्या अनुभवावरच अवलंबून असते आणि याबाबत कोणीच मर्यादा लागू करु शकत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी नियम बनविण्याचा अधिकार प्रत्येक शैक्षणिक संस्थेला आहे आणि वर्गात एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांत कांही वावगे नाही हे न्यायालयाने देखील मान्य केले आहे. पण सर्वच नियम काटेकोरपणे अंमलात आणता येत नाहीत आणि त्यांत लवचिकता असतेच.
हिजाबबरोबरच बुरखा देखील मुसलमान महिलाना इतरांपासून दूर ठेवतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु यालाही काही अपवाद आहेत. मुंबईत अंधेरी येथील श्री स्वामी समर्थ मठात काही बुरखाधारी मुसलमान महिला नियमितपणे येऊन स्वामींचे दर्शन घेतात आणि तीर्थप्रसाद घेऊन निघून जातात. इतरधर्मीय भाविकही मठात नियमितपणे येत असतात. बघणार्यांना हे कुतूहल वाटते.
ओशिवरा परिसरात राहणार्या आणि स्वामींचे नित्यनियमाने दर्शन घेणार्या काही महिलांची सहज चौकशी सदर प्रतिनिधीने केली असता ‘आम्ही स्वामींचे दर्शन नेहमी घेतो. इथे आल्यापासून आमच्या बर्याच समस्या दूर झाल्या आहेत,’ असे पिंकी खान म्हणाल्या. त्यांच्या शिरीन आणि काशीद या मुलीदेखील दररोज मठात येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतात.
याबाबत श्री स्वामी समर्थ मठाचे व्यवस्थापक महेश नाटेकर म्हणाले की मठामध्ये बरेच भाविक येतात आणि आम्ही कोणालाही मजाव करत नाही. महिला भाविकांनी जीन्स, शॉर्ट्स असे पुरुषी पोषाख घालू नये आणि प्रत्येक भाविकाने श्रींच्या दर्शनापूर्वी आपले पाय धुवावेत हीच आमची एकमेव अट आहे. महिलांच्या पोषाखाबाबत आम्ही मठाच्या प्रवेशद्वारावर तसा बोर्डही आम्ही लावला आहे. या अटीविरुद्ध बर्याच वेळेला काही महिला वाद घालतात हा भाग वेगळा.
नाटेकर पुढे म्हणाले, श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मठात देखील काही मुसलमान भाविक नियमित दर्शनाला येतात. स्वामींच्या बखरीत देखील तसा उल्लेख आहे. पुरोगामी विचारसरणी केव्हाही चांगलीच. कट्टरता आणि कर्मठपणा सामान्यांपेक्षा पुढार्यांमुळे वाढतो.
वकील सुलेमान भिमानी यांच्या मते मुळात देव निरंकारी आहे. मानव देवाशी आपली तुलना करु शकत नाही. यजुर्वेद आणि कुराणात हेच सांगितले आहे. घटनेचे २१ कलम प्रत्येकाच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण करते. म्हणून कोणाचेही श्रद्धास्थान व भावना यांत ढवळाढवळ करु नये. कांही नेत्यांच्या ‘मी सांगतो तेच खरे’ या वृत्तीमुळे समाजात दुजाभाव निर्माण होतो.
मुंबईत माहिम येथील मखदुम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरुसाची पहिली चादर चढवण्याचा मान मुंबई पोलिसांचा आहे. १०० वर्षांहून जास्त काळ ही परंपरा चालत आली आहे. असं सांगितलं जातं की आज ज्या ठिकाणी माहिम पोलीस स्टेशन उभं आहे, तिथंच पीर मखदुमशाह बाबा रहायचे. त्यांनी अदृश्य रुपाने वेळोवेळी पोलिसांना मदत केली आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. डिसेंबरमध्ये दहा दिवस साजरा होणार्या उरुसात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतात आणि मुंबई पोलीस बाबांची चादर घेऊन वाजत गाजत संपूर्ण माहिमला फेरी मारुन बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवतात.
याचबरोबर अजमेर (राजस्थान) येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहे. पण मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात जातात आणि देशभरातून जवळपास ५०० मानाच्या चादरी दर्ग्यात येतात. याशिवाय कोणताही मोठा नेता, मग तो कोणत्याही धर्माचा असो, अजमेर दर्ग्यावर चादर चढवतोच चढवतो. भारतात इस्लामच्या आगमनाबरोबरच सुफी पंथाची सुरवात झाली. सहिष्णुता, उदारमतवाद आणि मानवप्रेम या पंथाचा आधार होता. म्हणून हे स्थळ एका अर्थी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.
सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गांवात गेली कित्येक वर्षे मशिदीत गणेशाची स्थापना करुन हिंदू आणि मुसलमान गणेशोत्सव एकत्र साजरा करतात अशा बातम्या आपण दरवर्षी वाचतो. शिवाय गणेश चतुर्थी आणि मोहरम जर एकाच वेळी आले तर मशिदीत एकाच मंडपात गणेशमूर्ती आणि पंजेही विराजमान होतात. याच बरोबर गोव्यातील पणजी येथील काकरा गावात हिंदू व ख्रिश्चन गणेशोत्सव एकत्र उत्साहात साजरा करतात. विषेश म्हणजे सर्वजण गणेशोत्सवाच्या काळात मांसाचाराचाही त्याग करतात हे विशेष.
मुंबईत माहीम इथे असलेल्या सेंट मायकेल चर्चमध्ये दर बुधवारी नोवेना प्रार्थनेसाठी ख्रिस्ती धर्मियांबरोबरच इतरधर्मीय देखील मोठ्या प्रमाणात रांगा लावतात. सप्टेंबरमध्ये वांद्रे येथील माऊंट मेरीच्या जत्रेला ख्रिस्ती बांधवापेक्षा, इतरधर्मीयांची होणारी जास्त गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
ख्रिस्ती धर्म अभ्यासक प्राध्यापक मार्सेलिस डिसोझा यांच्या मते ज्याचा ज्या देवावर विश्वास असेल, त्याला ज्या ठिकाणी मन:शांती मिळत असेल, तिथे त्याने जावे आणि धार्मिक आणि राजकीय नेत्यांच्या चिथावणीला बळी पडू नये. थोडक्यात देव एक, रुपे अनेक, विविधतेत एकता हेच आपले ब्रीदवाक्य आहे.