अंदाजे एकोणीसशे पन्नास सालाच्या आसपास भारताला स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतरची सावरासावर चालू होती. अनेक प्रश्न होते. गरिबी, लोकसंख्या वाढ… विचारवंतांची मोठी फळी मात्र सतत राष्ट्रप्रेम शिकविण्याचे काम करत होती. सर्व भाषांतील दैनिके नेटाने जनतेचे भले व्हावे म्हणून विचार मांडत होते. नेत्यांसाठी कुरणे तयार नव्हती. कशातही परसेंटेज म्हणजे टक्का मिळतो हे त्यांना ठाऊकच नव्हते. म्हणूनच नाना पाटेकर म्हणतात ना की, महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण वारले तेव्हा त्यांच्या बँक खात्यांमध्ये पंचवीस हजार रुपयेसुद्धा शिल्लक नव्हते. देशाचं थोडफार भलं झालं, सुधारणा झाल्या या त्यामुळेच. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा महाराक्षस जन्माला आलेला नव्हता. त्या काळामध्ये दैत्य, रावण, कंस आदी, तर पुढे पुढे शाहिस्तेखान, अफजल खान, औरंगजेबाच्या कथा प्रचलित झाल्या. नंतर इंग्रजांच्या जुलमाच्या. पन्नास वर्षांनंतर मीडियाच्या भयावह कथा सांगितल्या जातील. आता दिवसरात्र भांडणारे, टक्केवारीसाठी, सत्तेसाठी जीव काढणारे, उंबरातले किडेमकोडे मस्तवाल कोणाच्या खिसगणतीतही नसतील; एक मात्र आहे, कलावंत, प्रज्ञावंत, लेखक, चित्रकार, मूर्तिकार, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील नवी तरुण पिढी, आकाशी झेप घेणारे शास्त्रज्ञ, हे अहोरात्र उत्तम निर्मितीच्या कामात गढलेले आहेत, हे आपलं सुदैव!
आम्ही व्यंगचित्रकारांनी गेल्या पन्नास साठ वर्षातील घटनांना रेषांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण आदी व्यंगचित्रकारांनी स्वातंत्र्यानंतरचे राजकारणच चित्रित करून ठेवले आहे.त्यांच्या तिरकस रेषांमध्ये वैयक्तिक टीकेला, काही खाजगी आयुष्यातील लफडी कुलंगडी यांना स्थान नव्हते. राजकारण सभ्य पातळीवर चाले. जातीय राजकारण, धर्मांधता वगैरेचे पेव फुटले नव्हते. आजूबाजूला घडणार्या घटनांचे मूल्यांकन करणे हे लेखक, कवी, संपादक, व्यंगचित्रकार यांच्या रक्तातच आहे. व्यंगचित्र म्हणजे शुगर कोटेड, अंतर्मुख करणारी औषधाची गोळी.
कोटी कोटीतली आपली लोकसंख्या, बेरोजगारी, गरिबी ही स्वातंत्र्यानंतरच्या काळातली मोठी डोकेदुखी होती. अनेक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत लोकसंख्येला आळा कसा घालता येईल या कामात गढलेले होते. ज्येष्ठ समाजसुधारक रघुनाथराव कर्वे यांनी प्रत्यक्ष नेहरूंनाच हे पटवून दिले होते. स्वत:च्या वृत्तपत्रातून त्यांनी या बाबतीत प्रचारही केला. स्वतःस मूल होऊ दिले नाही. पण तरीही सरकार, विचारवंतांनी, धर्ममार्तंडांनी त्यांची उपेक्षा केली. गो. नी. दांडेकरांची ‘रघुनाथाची बखर’ ही कादंबरी वाचण्याजोगी आहे.
नंतर केव्हातरी साठ सत्तरच्या दशकात ‘हम दो हमारे दो’चा नारा सुरू झाला. त्या काळात मी या विषयावर बरीच व्यंगचित्रे काढली होती. या विषयावर स्पर्धाही होत. एका व्यंगचित्रकाराचे चित्र आठवते ते असे, भटजी नववधूला सुधारित आशीर्वाद देतोय, ‘अष्ट पुत्रा भव’… आज तो म्हणतोय, ‘इष्ट पुत्रा भव’.
हा एक व्यंगचित्र विषय. महाभारतातल्या गांधारीला मुले शंभर. तिला भेटायला आजकालची कुटुंबनियोजन प्रचारिका गेली. भोळसट आणि बावळट. डबडबलेल्या डोळ्यांनी ती गांधारीचे सांत्वन करताना म्हणतेय, ‘सॉरी महाराणी, मलाच मेलीला आपणाकडे यायला उशीर झाला!’ (चित्र) गांधारी उगाच खोटे खोटे डोळे पुसतेय. खरे तर ही चपराक सगळ्या समाजालाच होती. कारण त्या काळी दाराआड प्रत्येकाला दहाबारा मुले असायचीच.
महाराष्ट्रात त्यावेळी दारुबंदी होती. मोरारजी देसाईंसारख्या मुख्यमंत्र्यांना दारुचे अत्यंत वावडे. परिणामी हातभट्टीची दारू प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रभर विकली जायची. कधी चोरट्या मार्गाने तर कधी उघड उघड, दमदाटी करून गुंड लोक हातभट्ट्या चालवायचे. त्या विषयावर वरचे हे चपखल चित्र. भीष्म पितामह शरशय्यी पडलेले तहान लागल्याने ते पाणी मागत आहेत. एक बावळट कौरव तांब्या भांडे घेऊन पाणी घेऊन येतो. चिडून भीष्म म्हणतात, ‘अरे, कुणीतरी अर्जुनाला बोलवा!’ अर्जुन येतो व जमिनीत बाण मारून पाण्याची धार काढतो, ती भीष्माचार्य यांच्या मुखात जाते ते श्रांत होण्याऐवजी चिडतात व पाणी थुंकून टाकतात. अर्जुनाला काय ते उमगते. तो म्हणतो, गुरुदेव क्षमा असावी, हातभट्टीची पाईपलाईन येथून गेली असेल, हे मला ठाऊकच नव्हते. ही झाली (चित्र)पुराणातली वांगी. अशीच दहाबारा चित्रांची ही चित्रमाला भरपेट हसवून गेली.
अलिकडचेच एक चित्र. चिंकारा हरणाला मारल्याच्या आरोपावरून सलमानची त्रेधातिरपीट, कोर्टकचेर्या संपल्या नाहीत. अद्यापही त्यास जीवे मारण्याच्या धमक्या येतात. एका दिवाळी अंकात मी चित्र काढले, सीतामाई रामाला सुवर्णमृग दाखवून म्हणते आहे, ‘मला याच्या कातड्याची कंचुकी हवी…! मागून लगबगीने घामाघूम झालेला येऊन लक्ष्मण म्हणतो, दादा थांब! सलमानची केस अद्याप मिटलेली नाहीये आणि तू कुठं आणखी वाढवतोयस?
काळाची सरमिसळ करणार्या कल्पना फक्त व्यंगचित्रकारालाच सुचू शकतात. रावणाची दहा तोंडे ही एक त्याची वैयक्तिक समस्या होती. एकदा त्याची प्रकृती जाम बिघडली. वैद्य रावणाला तपासत निर्वाणीचं सांगतो, महाराज, आपण अतिरिक्त मद्यपान केलेले आहे. त्रास होणारच. रावण म्हणतो, देवाशपथ, मी महिन्याभरात मद्याला स्पर्शसुद्धा केलेला नाही. इतर नऊ तोंडाकडे पाहून तो म्हणतो, मात्र, मला यांचा भरवसा वाटत नाही.
७० सालाच्या अलीकडे पलीकडे मटका फारच जोरात होता. त्या काळात मी ‘गावकरी’मध्ये ‘आरसा’ नावाची बॉक्स कार्टून काढत असे. वाचकांपेक्षा मटकावाल्यांमध्ये ते बहुदा जास्त पाहिले जायचे. किस्सा असा, एकदा ‘गावकरी’चे सहसंपादक मला म्हणाले, तुम्ही आरसा नियमित देत चला.
मी खुश होऊन म्हटलं, अरे वा! वाचकांना आरसा इतका आवडतो?
वाचकांचे माहित नाही पण मटकेवाल्यांना मात्र खूप आवडतो, संपादक मख्खपणे उद्गारले. पुढे म्हणाले, तुमचे चित्र पाहून त्यांना हमखास मटका लागतो. या क्षेत्रातही तुम्ही पारंगत असाल असं वाटलं नव्हतं.
हे ऐकून मी चाटच पडलो. मटक्यातला ओ की ठो मला ठाऊक नव्हता.
‘हे पत्र बघा!’ संपादकांनी माझ्यापुढे पोस्टकार्ड टाकले. पत्रलेखकाने गिचमिड अक्षरात लिहिले होते ‘सोनार साहेब, कृपया रोज आरसा देत जा. कोणता आकडा येणार हे आधीच सांगितलं तर तुम्हाला आम्ही कमिशन देऊ. कृपया विचार करावा ही आमची विनंती मान्य करावी!’ पुढे कितीतरी वर्षे मला सल राहिला मी आरसा वाचकांसाठी काढतो की मटकावाल्यांसाठी?
परदेशी व्यंगचित्रकाराचे एक चित्र पाहिल्याचे आठवले. पेंटिंगचे प्रदर्शन पाहायला आलेल्या एकाने मोठ्या दिमाखाने एक महागडे पेंटिंग विकत घेतले. त्याने चित्रकारासमोरच ते फाडून काढले व व त्यास देत म्हणाला, आय लाईक युवर वुडन फ्रेम… कीप धिस पिक्चर फॉर यू!
जाताजाता शेवटचे सांगतो… रावणाला त्याच्या तोंडांचा संशय आला होता हे खरे… कसे ते पाहाच.