काही प्रश्न मी आजूबाजूला बर्याचदा ऐकतो, त्यातले काही प्रश्न भोळे असतात काही माजयुक्त, काही घृणास्पद तर काही इतरही कॅटेगरीमध्ये बसणारे असतात… प्रश्नांची डिटेलमध्ये उत्तरं नाही देता येणार याचं कारण ते प्रश्न विचारणारे, ‘इतकं लांबलचक का लिहितो?’ असेही विचारतात. म्हणून थोडक्यात बघू. बाकी ज्याचा त्याने अभ्यास करावा हे उत्तम. पण अभ्यासापेक्षा जास्त महत्वाची… संवेदनशीलता.
१. आम्ही टॅक्स भरतो आणि मजा त्यांनी करायची?
मुळात त्यांना याची कल्पना नसते की ते ज्याबद्दल बोलत आहेत त्याला इन्कम टॅक्स म्हणतात जो डायरेक्ट टॅक्समध्ये मोडतो. बाकी इनडायरेक्ट.
टॅक्सेस सगळेच भरत असतात जेव्हा ते कोणतीही वस्तू किंवा सेवा घेतात तेव्हा. आता इन्कम टॅक्स तेच भरणार ज्यांना त्या प्रमाणात इन्कम आहे म्हणजे या प्रश्नामागे प्रथम, अरे बरीच जनता इतकेदेखील कमवत नाही… याचे दुःख असले पाहिजे.
राग कोणाबद्दल असू शकतो? तर जे प्रचंड उत्पन्न करून देखील पळवाटा वापरून कर भरणे टाळतात. पण त्या कॅटेगरीमधली लोकं तर त्यांचे आदर्श असतात. शिवाय सी.ए.कडे जाऊन कर कसा वाचवता येईल याचीही पूर्ण चाचपणी केली जाते. मुळात आपल्याला करातून सुटका मिळत नाही याचा जळफळाट असतो तो. पण दुःख, चीड व्यक्त करतात कोणावर त्याचे…
२. शेतकर्यांची मजा आहे, कर नाही नुसती मलाई.
शेती करणार्यांपैकी किती टक्के जनता सधन आहे हे त्यांना माहित नसते. फक्त मिरचीचे उत्पन्न काढून २ महिन्यात चार लाख कमावले किंवा शेतकर्याने जग्वार घेतली असल्या बातम्या ऐकून बनवलेले चित्र असते ते. शेतीसाठी पाणी लागते ते मिळते का, हवामानाचा अचूक अंदाज दिला जातो का, वीज लागते तिचा पुरवठा दिवसभर असतो का, वीज किंवा पाणी कपात असता कोणाला प्राधान्य दिले जाते, बियाणे पुरवठा झाला असता नकली बियाणे मिळाल्यास त्याचा परिणाम काय होतो व त्याची जबाबदारी कोण घेते, कर्ज पुरवठा कोण व कसे करतो, कर्जवसुली कशी केली जाते, नैसर्गिक आपत्ती आली तर उत्पन्नाचे काय होते, नैसर्गिक आपत्ती येण्याची वारंवारता काय आहे, इंश्युरन्स मिळतो का व किती, मालाला योग्य भाव मिळतो का असे अनेक प्रश्न असतात… तुलना करण्यासाठी. लेव्हल प्लेयिंग फिल्डसाठी. शिवाय कर्जमाफी वगैरेची तुलना कॉर्पोरेटशी करून बघावी. शेती क्षेत्राला जगभरात दिल्या जाणार्या सुविधांच्या तुलनेत आपल्याकडे किती मिळतात तेही पाहावे. हा सगळं अभ्यास करून शेतीकडे स्वतः का नाही वळत ते?
३. ते शेतकरी टोमॅटो, दूध रस्त्यावर का टाकतात… दान करायचे ना?
कोण बोलणार, तर मजा नाही म्हणून झोमॅटोवरून मागवलेला डब्बा कचर्यात टाकून देणारा. दान करायचे? दान करून त्यांना विरोध दर्शवता येईल? कोणी दखल घेईल? आणि जेव्हा श्रम, घाम यांचा योग्य मोबदलासुद्धा मिळत नाही तेव्हा दान वगैरे विचार येतात? आणि तुम्ही, चोचल्यांसाठी, देवधर्मासाठी सतत करत असलेल्या नासाडीचे काय?
४. काही पण, काम करणारा माणूस उपाशी कसा राहू शकेल?
देशातील, गरिबीची व्याख्या काय आहे माहित आहे? रोजगार न मिळणार्यांची संख्या? जंगलात राहणार्या आदिवासींची संख्या? सोडून दिलेल्या वृद्धांची संख्या? अपंगांची संख्या? अनाथ मुलांची संख्या? मानसिक रुग्णांची संख्या? प्रकल्प ग्रस्तांची संख्या? नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होणार्यांची संख्या? जातीच्या कारणास्तव अजूनही गुलामगिरीत अडकलेल्यांची संख्या? सोडून दिलेल्या बायकांची संख्या? भटक्या विमुक्तांची संख्या? निर्वासित, शरणार्थी यांची संख्या?… उपासमारीने होणारे मृत्य किंवा बालकांचे कुपोषण त्यांना खोटे वाटतात. त्यांना वाटतं की लोकं मेहनत करत नाहीत म्हणून तसं होतं. आई बाप मेहनत करतील तर मुलं कुपोषित राहणार नाहीत…
५. इतके अन्याय होतात तर त्यांनी पोलिसांकडे जायचे ना…
याला मुळीच नकार नाही पण पोलिसांचं काम तपास करणे आणि न्याय देण्याचे काम हे न्यायसंस्थेचे असते हे माहित आहे का? किती खटले प्रलंबित आहेत? किती नागरिक तुरुंगात खटला चालू होण्याची वाट बघत आहेत? प्रत्येक वेळेस न्याय होतो का? आणि हे असे का? ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्यांच्याबद्दल सहानभूती तर नाहीच, उलट…
६. झोपडपट्टी आहे समोर नुसती.
हो, या गोष्टीचं वाईट वाटू शकतं. आणि त्यामागे आर्थिक हितसंबंध असणारे, राजकारणी गुंड वगैरेसुद्धा निश्चितपणे आहेत. पण कोण राहतात तिथे? निवारा ही मूलभूत गरज की चैन? आपल्या घरात येणार्या कामवाली बाईला तीन हजार पगार वाढवून देण्याची तयारी आहे का तिने बिल्डिंगमध्ये घर घ्यावं म्हणून? की ते कचरा साफ करणारे, गटार साफ करणारे, घरकाम करणारे, रद्दी भंगार जमा करणारे आणि या व्यतिरिक्त चौथ्या प्रश्नात नोंदलेले सगळे यांनी जगायचंच नाही? चीड कोणाबद्दल असली पाहिजे? आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपण काय करतो? आणि सगळ्या सेवा स्वस्तात पाहिजे असतील तर त्या देणार्यांचे राहणीमान तसंच असणार ना? हो आणि आपण लहानपण तिथेच काढून देखील ते विसरून बोलणार्यांची संख्या देखील कमी नाही.
७. आणि त्यांच्या आवडीच्या सरकारच्या बाबतीत अडचणीत आले, निरुत्तर झाले की… सगळेच साले सारखे.
हे मात्र आत्ताच दिसायला लागले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना सगळेच सारखे नाही वाटायचे, अगदी आताही अधून मधून त्यांना तसं वाटत नाही पण अडचणीत आले की… सगळेच साले सारखे. स्वत:ला तटस्थ म्हणवतात ते, अर्थव्यवस्था, बेरोजगारी वगैरेसारख्या राज्याची, देशाची प्रगती वा अधोगती दर्शवणार्या आकड्यांबद्दल त्यांना काही माहिती असते का? टाळ्या थाळ्या वाजवताना त्यांना योग्य अयोग्य सुचतं का?
पण अडचणीच्या वेळी हुकमी वाक्य… सगळे सारखेच. आणि अजून एक… मग विरोधी पक्ष काय करतोय?