‘काटा तर काढायचा होता.. पण कसा? गणेश काही निर्ढावलेला गुन्हेगार नव्हता. मात्र, कर्मधर्मसंयोगाने एकदा तालुक्यात त्याची गाठ साप, कासव, मुंगूस वगैर चोरून विकणार्या या जोडगोळीशी पडली आणि गणेशच्या डोक्यात अफलातून योजना साकारली. तसेही काकाला नागाच्या रूपातल्या मूळपुरुषाचे भय होतेच, त्याचाच फायदा घ्यायचे त्याने ठरवले.
—-
वाजणार्या फोनच्या स्क्रीनवर ‘हवालदार मोरे’ लिहून आले आणि इन्स्पेक्टर माहेश्वरी जरा बुचकळ्यात पडले. हवालदार मोरे म्हणजे एकदम तयारीचा माणूस होता. ३० वर्षे खात्यात घालवल्यानंतर अंगात येणारा मुरब्बीपणा मोरेंमध्ये अगदी ठासून भरला गेला होता. शक्यतो हातातले काम पटकन संपवायचे आणि सिनिअर्सला केसमध्ये लीड घ्यायला मोकळीक द्यायची ही त्यांची कामाची नेहमीची पद्धत होती. आजही सकाळी सकाळी मोरे एका साप चावून मृत्यू झालेल्या केसच्या कामासाठी रवाना झाले होते. अशा साध्या केसमध्येसुद्धा त्यांनी आपल्याला फोन का करावा ह्याचेच इन्स्पेक्टर माहेश्वरीला आश्चर्य वाटत होते.
‘बोला मोरे…’
‘साहेब, तुम्ही जरा इकडे ‘स्पॉट’वर आलात तर बरे होईल.’
‘मोरे.. काही विशेष घडले आहे का? साप चावल्याची केस आहे ना? का काही भलतेच?’
‘नाही साहेब! भलते सलते काही नाही. १०० टक्के साप चावून मृत्यू झाल्याचीच केस आहे. पण मला काही हे प्रकरण दिसते तेवढे साधे वाटत नाहीये. तुम्ही आलात तर सविस्तर सगळे बोलता आणि दाखवता येईल.’
‘मी लगेच निघतो मोरे…’
मोरेसारखा माणूस शंका घेतोय, म्हणजे नक्कीच प्रकरण काहीतरी वेगळे आहे, याचा माहेश्वरींना अंदाज आला आणि ते तातडीने रवाना झाले. घटना गावाच्या बाहेर असलेल्या शेतात घडलेली होती; त्यामुळे मग माहेश्वरींनी आपली बुलेट थेट रानाच्या रस्त्याकडे घेतली. अर्ध्या तासात कच्चा रस्त्याच्या कडेला जमलेली गर्दी त्यांना लांबूनच दिसली आणि आपण ‘स्पॉट’वर पोचल्याचे त्यांच्या लक्षात आले. साहेबांच्या गाडीचा आवाज ऐकून, गर्दी बाजूला सारत मोरे पुढे धावले.
‘साहेब आपण आधी ‘स्पॉट’ बघू. मग तुम्हाला इतर माहिती देतो.’
मोरेंच्या मागून माहेश्वरी गर्दीत शिरले. मोठे साहेब आलेले बघून गर्दी आपोआपच दुभंगत होती आणि त्या दोघांना मोकळी वाट करून देत होती. शेताच्या एका कडेला बांधलेल्या अर्ध्या कच्च्या घराच्या दिशेने मोरे निघाले. आतापर्यंत पंचनामा उरकून झाला होता आणि प्रेतही हलवण्यात आले होते. शेतात असते अगदी त्याच प्रकारचे ते छोटेखानी घर होते. घराला दोन मोठ्या खिडक्या, आढ्याच्या बाजूने एक झरोका दिसत होता. मागच्या आणि पुढच्या बाजूने दरवाजा आणि मागच्या दरवाजाच्या बाजूने पसरलेले रान स्पष्ट दिसत होते.
‘मोरे, साप बहुदा मागच्या दरवाज्यातून आला असावा असे वाटते आहे. कुठे काही झटापट झाल्याच्या खुणा वगैरे आढळल्या? किंवा सापाला मारण्यासाठी एखादे हत्यार घेतलेले आढळले?’
‘क्लीन केस आहे साहेब. साप झोपेत असतानाच चावला असणार. बचावाची संधी देखील मयताला मिळालेली नाही.’
‘म्हणजे साप बहुदा प्रचंड विषारी असणार बघा मोरे…’
‘तिथेच तर खरी गोम आहे साहेब!’
‘म्हणजे?’
‘गावातल्या जाणकारांच्या मते, साप चावल्याने इतक्या झटपट मृत्यू झाला असेल, तर साप नक्की मण्यार किंवा घोणस यासारखा विषारी असणार हे नक्की!’
‘मग यात नक्की काय गोम आहे मोरे?’
‘साहेब, मयत इसमाचे नाव गणेश वाघमारे आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या गणेशच्या बापाचा, म्हणजे शंकर वाघमारेचा मृत्यूदेखील याच घरात तीन महिन्यापूर्वी झाला होता आणि तो पण साप चावून..’
‘काय सांगताय काय मोरे?’
‘हो साहेब. आणि गावातल्या म्हातार्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे या गावात किंवा त्याच्या आसपास गेल्या बर्याच वर्षात कधीही विषारी साप दिसल्याची किंवा तो कुणाला चावल्याची घटना घडलेली नाही!’
‘आणि अचानक तीन महिन्यात एकाच घरात दोन वेळा विषारी साप घुसला? तेही नेमका रात्रीच्या वेळी? समथिंग इज फिशी मोरे!! तुम्ही सगळे उरकून परत या.. तोवर मी जरा जुने रेकॉर्ड चाळायला घेतो.’
—-
‘या मोरे…. काय म्हणतंय गावचं वातावरण? काही बातमी लागली हाताला?’
‘साहेब, हे वाघमारे घराणे म्हणजे जरा अजबच दिसते आहे. यांच्या राशीलाच साप लागलेला असावा बघा.’
‘म्हणजे? जरा सविस्तर सांगा राव मोरे..’
‘शंकर वाघमारे आणि अनंता वाघमारे दोघे सख्खे भाऊ. यातला अनंता पडला माळकरी आणि अविवाहित. भावाची कसर बहुदा शंकरने भरून काढायची ठरवली असावी, त्यामुळे त्याला दोन बायका. एक लग्नाची आणि एक ठेवलेली. दोघींपासून एकेक मुलगा. शंकर्याने ठेवलेली बाई दोन वर्षापूर्वी मेली. तिचा मुलगा आता शंकरच्या घरीच राहतो. त्याचे नाव विशाल.’
‘आणि पहिली बायको?’
‘ती आहे अजून. पण ती बिचारी साधी भोळी. कधी मान वर करून न बघणारी. तिच्यापासून पण शंकरला एक मुलगा होता आणि तो म्हणजे हा मयत गणेश.’
‘दोन्ही सावत्र भावात कसे संबंध होते? जमिनीचा किंवा संपत्तीचा कसला वाद?’
‘नाही साहेब! गणेश आणि त्याच्या आईने विशालला मनापासून स्वीकारले होते. एक दिवस शंकर अचानक विशालला घेऊन दारात उभा राहिला आणि तेव्हा कुठे मायलेकाला त्याच्या दुसर्या लग्नाबद्दल कळले. त्यांना धक्का नक्कीच बसला असणार..’
‘चुलत्याशी काही वादविवाद? वाटणीसाठी भांडणे?’
‘वाटणी म्हणाल, तर अनंता वाघमारे पडला एकटा माणूस. त्याच्यानंतर सगळे काही शंकरच्या मुलांनाच मिळणार होते. त्याने देखील गावात अनेकदा तसे बोलून दाखवले होते. पण येवढे सगळे असूनदेखील, पुतण्याशी मात्र त्याचा वाद होताच होता!’
‘आँ? काय बिनसले होते म्हणे?’
‘ऐकून तुम्हाला पण धक्का बसेल साहेब. वाघमारेंच्या शेतात एक विहीर आहे अन तिला लागून चिंचेचे झाड आहे. याच झाडाशेजारचा कोपरा सरकारला मधमाशीपालनाला द्यायचा गणेशचा विचार होता. सरकारी शेतकी अधिकारी येऊन पाहणी पण करून गेले होते.’
‘मग अडचण काय होती?’
‘अडचण म्हणजे अनंतरावांचा देवभोळेपणा! त्या झाडाखाली त्यांच्या घराण्याच्या मूळ पुरूष नागाच्या रूपात राहतो हे त्यांचे ठाम मत. शेताच्या त्या भागात शक्यतो वावरायला देखील त्यांनी सर्वांना मनाई केलेली होती. आता तोच तुकडा गणेश सरकारकडे द्यायला निघाला म्हणल्यावर अनंत वाघमारे चवताळला… गणेशने ऐकले नाही, तर सरळ जमिनीचा अर्धा हिस्सा करून तिथे स्वत:शिवाय इतरांना फिरकायची देखील बंदी घालण्याची धमकी देण्यापर्यंत अनंतरावाची मजल गेली. इतका साधा संत माणूस, पण अंधश्रद्धेपोटी पार टोकाला जायला तयार झाला होता! आता तर भावाचा आणि पुतण्याचा बळी त्यांच्या पापानेच गेला असे गावभर बोंबलत फिरतोय. मूळ पुरुषाने शिक्षा दिली म्हणे…’
‘विशाल आणि गणेशचे काही किरकोळ वाद किंवा भांडणे?’
‘विशाल तसा काकासारखाच संत माणूस. कोणाच्या अध्यात न मध्यात. या घरात आपल्याला स्थान मिळाले याचेच त्याला प्रचंड अप्रूप होते साहेब. अगदी श्रावणबाळ म्हणालात तरी चालेल! भावाच्यापेक्षा जास्त तोच घराचे आणि शेताचे बघायचा.’
‘आणि गणेश?’
‘गणेश गावात असायचा तेव्हा साधासरळ सुतासारखा असायचा. पण तालुक्याला गेला की त्याचा ‘गणेशराव’ व्हायचा आणि मग बाई, बाटली सगळ्याला ऊत यायचा. हळुहळू गावातदेखील याबद्दल कुजबूज सुरू झाली होती.’
‘तालुक्याच्या ठिकाणी कोणाशी वैर किंवा वाद?’
‘तसे काही तपासात तरी आढळले नाही साहेब. ठरलेले दोन तीन मित्र बरोबर असायचे. त्या मित्रांच्या चौकशीत देखील विशेष काही आढळले नाही.’
मोरे गेले आणि मिळालेल्या माहितीची उजळणी करत माहेश्वरींनी अलगद डोळे मिटत खुर्चीत अंग टाकले…
—
‘साहेब आपल्या कामाची एक बातमी आताच मिळालीये.’
‘लवकर सांगा मोरे…’
‘पलिकडच्या खुर्द-पिसोळी गावात पोलिसांनी तालुक्याच्या दिशेने निघालेल्या दोघांना खबर मिळाल्याने अडवले. त्यांच्याकडे एक मुंगूस आणि एक मण्यार जातीचा साप जप्त झालाय.’
‘मोरे मोरे मोरे… हीच आपल्या कुलुपाची किल्ली निघणार असा मला ठाम विश्वास वाटतो आहे. जीप काढा आणि खुर्दला जायची तयारी करा!’
—
‘काय विलक्षण प्रकार हो माहेश्वरी साहेब… ऐकून माझी तर मतीच गुंग झाली!’
‘जैसी करनी… म्हणतात ना, ते हेच बघा कमिशनर साहेब! कोणाला वाटले होते की शिकार्याचीच शिकार होईल म्हणून?’
‘मला संपूर्ण केस सांगा. मला प्रचंड रस आहे या तपासाबद्दल मिस्टर माहेश्वरी.’
‘साहेब, खुर्दला दोघांना सापासकट पकडल्याची माहिती मिळाली आणि मी तडक तिकडे रवाना झालो. रंगेहाथ सापडल्याने तसेही दोघे हात-पाय गाळूनच बसले होते. दोन रट्टे पडले आणि सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. दोघांनीही दोन वेळा आपणच साप पैसे घेऊन त्या घरात सोडल्याचे कबूल केले.’
‘आणि हे पैसे त्या दोघांना दिले कोणी होते? आणि का?’
‘गणेशने…’ माहेश्वरी शांतपणे म्हणाले आणि कमिशनर साहेब आ वासून बघायलाच लागले.
‘तुम्हाला धक्का बसणे स्वाभाविकच आहे साहेब. मलाही असाच बसला होता!’
‘अहो पण स्वत:लाच मारायची सुपारी कोण कशासाठी देईल?’
‘तिथेच तर खरी मेख दडलीये साहेब. जमिनीचा एक तुकडा विकावा यासाठी गणेश प्रचंड आग्रह करत होता, मात्र त्याचे तालुक्यात चालू असलेले रंगढंग शंकररावांपर्यंत पोचलेले होते, त्यामुळे त्यांचा या विक्रीला सरळ सरळ नकार होता. त्यात गणेश हाताबाहेर जायला लागलेला पाहून त्यांनी आपल्या वाटचा अर्धा हिस्सा विशालच्या नावाने करायच्या हालचालीदेखील सुरू केल्याची कुणकुण गणेशला लागली होती. एकीकडे व्यसनांना कमी पडत असलेला पैसा आणि दुसरीकडे सावत्र भावाचे कौतुक.. शेवटी एकदा दारूच्या नशेत गणेशमधला सैतान जागा झाला आणि त्याने दोघांचाही काटा काढायचे ठरवले!’
‘मग?’
‘काटा तर काढायचा होता.. पण कसा? गणेश काही निर्ढावलेला गुन्हेगार नव्हता. मात्र, कर्मधर्मसंयोगाने एकदा तालुक्यात त्याची गाठ साप, कासव, मुंगूस वगैर चोरून विकणार्या या जोडगोळीशी पडली आणि गणेशच्या डोक्यात अफलातून योजना साकारली. तसेही काकाला नागाच्या रूपातल्या मूळपुरुषाचे भय होतेच, त्याचाच फायदा घ्यायचे त्याने ठरवले. शंकररावांना संपवण्याची कामगिरी तर अगदी आरामात फत्ते झाली, पण विशालच्या वेळी मात्र नेमकी गडबड झाली.’
‘ती कशी काय?’
‘विशाल आणि गणेश दोघेही भाऊ आलटून पालटून रात्री शेतातल्या घरात झोपायला जायचे. विशालसाठी गणेशने अमावस्येच्या मुहूर्त पक्का केला होता. त्याप्रमाणे बोलणी करून पैसेदेखील सोपवले होते. मात्र यावेळी नेमकी दोन दिवस अमावस्या आली. संध्याकाळी सातला सुरू झाली आणि दुसर्या दिवशी संपली. वार होते मंगळवार अाणि बुधवार. गणेशने बुधवार डोक्यात पक्का ठेवला होता, त्यामुळे काहीतरी कारण काढून तो सोमवार आणि मंगळवार दोन दिवस शेतातल्या घरात जातो म्हणून हटून बसला.’
‘आणि मग?’
‘मग काय? गणेशने पकडला होता बुधवार आणि या जोडगोळीने पकडला मंगळवार…’
‘ते म्हणतात ना माहेश्वरी, लोकासाठी खोदलेल्या खड्ड्यात…’
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)